@विनय सहस्रबुद्धे
निष्ठावंत स्वयंसेवक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार, प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले प्रभावी वक्ता आणि थोर अभ्यासक, चिंतक, लेखक अशा बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेले प्रा. डॉ. अशोकराव मोडक यांचे अलिकडेच दुःखद निधन झाले. साप्ताहिक विवेकचेही नियमित लेखक व वाचक असलेल्या प्रा. डॉ. अशोक मोडक यांना विवेक समूहातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंचा परिचय करून देणारी ही विशेष पुरवणी.
आयुष्यभर स्वत:ला जमिनीशी जोडून घेऊन, सामान्य कार्यकर्ते आणि वंचित, उपेक्षित समाजबांधव यांच्या सुखदु:खांशी समरस होत अशोकराव आनंदाने जगले. मोडक सरांच्या शब्दकोषात कंटाळा, आळस हे शब्द पूर्वीपासूनच बाद होते. ‘कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती’ या एका संघगीतातल्या ओळी ते अक्षरशः जगले. ते संघटनशरण होतेच, पण संघटनेच्या निर्णयांची - खाजगीतच, पण परखड चिकित्सा करण्याचा संकोच त्यांनी कधी केला नाही.
दिनांक 26 डिसेंबर 2025, शुक्रवारची सकाळ!
मी अशोकराव मोडक सरांच्या पवईमधील निवासस्थानी गेलो तेव्हा सर बाहेरच्या खोलीतल्या पलंगावरच शांतपणे झोपले होते. मी आत जाताच काही वेळानंतर घरातल्या रुग्णसेवकाच्या मदतीने ते पलंगावर बसले आणि मग मी आणि तो सेवक, दोघांनी मिळून त्यांना समोरच्या खुर्चीत बसवले. खुर्चीत विराजमान झाल्यावर त्यांचा मूड बदलला. दोनच दिवसांनी म्हणजे 28 डिसेंबरला डोंबिवलीत त्यांना चतुरंग संस्थेचा अत्यंत प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार होता आणि प्रकृती बरी नसतांनाही त्या कार्यक्रमात समक्ष उपस्थित राहून हा पुरस्कार स्वीकारावा, त्या निमित्ताने डोंबिवलीतल्या सर्व जुन्या-ज्येष्ठ कार्यकर्त्यांना भेटावे, मित्रमंडळींचे क्षेमकुशल विचारावे ही त्यांची उत्कट इच्छा होती. एखाद्या प्रशस्त गाडीतून त्यांच्या तब्येतीला कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने प्रवास करावा अशी सगळी चोख रचना त्यांच्या कुटुंबियांनी चतुरंग संस्थेच्या मदतीने खूप आधीच केली होती. पण 27 तारखेस मोडक सरांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार जवळच्याच हिरानंदानी रुग्णालयात ते दाखल झाले. अति दक्षता विभागात असून सुद्धा त्यांचे अवधान शाबूत होते आणि क्षीण आवाजात का होईना, चतुरंगच्या कार्यक्रमासंदर्भात जाणून घेण्यासाठी बोलण्याचे -विचारण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच होते. पण अवघ्या तीन दिवसांत प्रकृती अधिक गंभीर होत होत अखेर दोन जानेवारीच्या रात्री त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
अशोकराव गेले आणि एकाचवेळी अनेक यात्रा थांबल्या. एका अविरत, अखंड धडपडीला पूर्णविराम मिळाला! संघटननिष्ठ कार्यकर्ता ते लोकनिष्ठ नेता, अभ्यासनिष्ठ चिंतक, एक वस्तुनिष्ठ विश्लेषक, बहुश्रुततेचे महत्त्व जाणणारा विचक्षण श्रोता ते विचारनिष्ठ वक्ता असे सगळे सगळे प्रवास एका क्षणात थांबून गेले. आज अशोकरावांना आठवतांना त्यांची अनेक रूपं, त्यांच्या अनेक भूमिका आणि त्यांच्या व्यक्तित्वाच्या अनेक मिती अगदी सहज मनाच्या अंतरंगात अलगद उलगडतात.
प्राध्यापक अशोक मोडक हे एक चिंतक कार्यकर्ते होते. संघटनेची जबाबदारी सांभाळणार्यांचे सर्व स्रोत, सर्व ती संसाधने, शारीरिक-मानसिक-आर्थिक अशी सर्व संपदा शोषून घेणारे मुदलातले संघटक-कार्यकर्तेपण निभावताना त्यांनी हातचे काही राखून ठेवले नव्हते. पण असे बहुआयामी कार्यकर्तेपण निभावताना त्यांनी कार्यकर्त्याने अभ्यास करावा, विचार आणि विश्लेषण करावे, ‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे’ हे आणि या प्रकारचे आग्रह कधी पातळ केले नाहीत. आणि या प्रकारच्या विषयांमध्ये ते नेहमीच स्वत:च्या बाबतीत अत्यंत कठोर राहिले आणि संघटन शास्त्राच्या संकेतानुसार इतरांच्या विषयात औदार्याची भूमिका घेत गेले. एखाद्या परिचित कार्यकर्त्याचा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेला लेख वाचल्यानंतर त्या लेखनाची प्रेमळ समीक्षा करणारा पहिला फोन त्याला यायचा तो अशोकरावांचाच. समोरच्याला वेळ आहे ना, याची खात्री करून अशोकराव एकेक मुद्याबद्दलचा अभिप्राय सांगायचे, तो ही अगदी समजुतीच्या स्वरात. या संवादात समीक्षा असायचीच पण त्याहीपेक्षा प्रोत्साहन अधिक असायचे. त्यांचे वाचन अफाट होते आणि विश्लेषक विचार-शक्ती असाधारण! पण या सर्वांना पूरक होता तो त्यांचा लिखाणातला उरक. डोंबिवली किंवा ठाकुर्ली स्थानकात चढून बसण्याची जागा मिळताच त्यांच्या शबनममधून ते बिनरेघांचे कोरे कागद काढत, मांडीवर बर्यापैकी मोठ्या आकाराची डायरी ठेऊन त्यावर कागद पसरून फाउंटेन पेनाने देखण्या अक्षरात झरा-झरा लेख लिहून काढत. त्यांच्या डोक्यात नुसते लेखाचे मुद्देच नव्हे तर त्या मुद्द्यांचा क्रम, त्यात वापरावयाची उद्धरणे, एखाद्या कवितेच्या ओळी, एखादे वचन असा सगळा कच्चा माल तयारच असायचा. झाडावर फुले उमलावीत तसे विचार त्यांच्या मनात उमलत आणि जणू त्यांच्या लेखणीलाच मेंदू जोडला असावा तसे ते विचार-कोणत्याही खाडाखोडी शिवाय-विनासायास कागदावर उमटत. पेनाला मराठीत ‘झरणी’ का म्हणतात ते लेखन समाधी लावलेल्या अशोकरावांकडे बघून सहजी समजत असे.
चिंतक कार्यकर्त्याकडून ज्या ‘समत्वाची’, सम-दृष्टीची अपेक्षा असते ती त्यांच्या ठायी ओतप्रोत होती. धारावीतल्या झोपडपट्टीतल्या एखाद्या कार्यकर्त्याला त्यांचे सलगी देणे जितके सहज असे तितकीच सहजता रशियन वकिलातीतील एखाद्या अधिकार्याशी भारत-रशिया संबंधांबाबत बोलताना त्यांच्याकडे असे. आपल्या कार्यकर्त्यांनी अभ्यास करावा, भाषेवर प्रभुत्व मिळवावे, भाषण करताना पुरेशा तयारीने बोलावे या बद्दल ते आग्रही असायचे पण शेवटी कार्यकर्ता हा ही एक माणूस आहे आणि त्याचे माणूसपण त्यांच्या अभ्यासवृत्तीपेक्षा अधिक मोलाचे आहे, याची जाणीव त्यांना नेहमीच असायची.
अशोकरावांची सामाजिक काम करण्याची क्षेत्रे बदलली पण कार्यकर्तेपणाचे त्याचे असिधाराव्रत त्यांनी कधी सोडले नाही. चाळीसगावात असताना त्यांच्याकडे संघाची स्थानिक जबाबदारी होती आणि पुढे मुंबईत आल्यानंतर विद्यार्थी परिषदेत त्यांच्याकडे मुंबई महानगरापासून पुढे राष्ट्रीय जबाबदारी आली. नंतर ते भाजपात गेले. तिथे ते नुसतेच आमदार नव्हते तर ठाणे विभागाचे अध्यक्ष म्हणून संघटनेची जबाबदारी सांभाळणारे नेतेही होते. पुढे प्रदेश आणि राष्ट्रीय पातळीवरही मोठमोठ्या जबाबदार्या पेलणार्या अशोकरावांकडे अलीकडच्या काळात संघाच्या रचनेतून मोरोपंत पिंगळे यांनी स्थापन केलेल्या सुंदरनारायण गणेश संस्थान या जनजाती भागातील देवबांध येथील एका छोट्या संस्थेचे आणि कर्जतच्या एका शिक्षण संस्थेचेही काम आले. आणि मोडक सर तिथेही रमले, तिथेही त्यांनी उत्साहाने नवनवे प्रकल्प आणि योजना राबविल्या. आपण आपल्या तरुणपणात घरच्या परिस्थितीमुळे प्रचारक म्हणून बाहेर पडू शकलो नाही, याची काहीशी खंत त्यांच्या मनात खोलवर कुठे तरी सदैव होती.
कार्यक्षेत्र आणि त्या अनुषंगाने वातावरण कोणतेही असो, अशोकरावांनी आपली कथनी आणि करणी यात कधीही अंतर पडू दिले नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याचे मूर्तिमंत उदाहरण होती, ती त्यांची जीवनशैली! आमदार झाल्यानंतरसुद्धा द्वितीय श्रेणीतून रेल्वे प्रवास करण्याची त्यांची मानसिकता विशद करताना एकदा त्यांनी मला सांगितले, ‘आयुष्यभर जी श्रेणी परवडू शकेल त्यातूनच नेहमी प्रवास केलेला चांगला’! आपल्या हाताने आपले कपडे धुण्यापासून, घरात सकाळचा चहा करण्यापासून ते आपल्या संदर्भ-कात्रणांचे फाइलिंग करण्यापर्यंत अशोकराव आपली कामे आपणच करून जणू व्यक्तिगत जीवनात आत्मनिर्भरता कशी अंगी बाणावी याचाच वस्तुपाठ घालून देत असत.
अशोकराव जन्मले 1940 मध्ये. त्यामुळे उणीपुरी साठ वर्षे मागच्या शतकात घालवूनही त्यांची दृष्टी आधुनिकतेचे डोळसपणाने स्वागत करणारी होती. परंपरेने दिलेला आपुलकीचा संस्कार आणि भविष्याकडे उमेदीने पाहण्याचा मोकळेपणा त्यांच्या समाज-जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीत ठासून भरलेला होता. त्यांना डॉ. हेडगेवार जसे वंदनीय होते तसेच वीर सावरकर आणि डॉ. आंबेडकर सुद्धा! ते ज्या रुईया कॉलेजात होते तिथल्या डॉ. सदानंद वर्टी, पुष्पा भावे अशा विरोधी विचाराच्या प्राध्यापकांशीही त्यांचा छान संवाद असायचा. पुढे विधान परिषदेतसुद्धा विरोधी विचाराच्या आमदारांशी त्यांची मनमोकळी बातचीत होई. ते ऑर्गनायझर, सा. विवेक, किंवा तरुण भारत इत्यादी तर वाचतच पण साधना, इकोनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली अशा नियतकालिकांमधील लिखाणही ते आवर्जून वाचत, त्याबद्दल चर्चा करत. आणखी उल्लेखनीय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल अशोकरावांच्या मनात अतीव आदर होता आणि तो त्यांच्या बोलण्यातून, लिखाणातून नेहमी व्यक्तही होत असे. विद्यार्थी परिषदेतल्या अनेकांनी शंकरराव खरातांच्या ‘तराळ-अंतराळ’ या आत्मचरित्राबद्दल प्रथम ऐकले ते बहुदा अशोकरावांकडूनच! 1983मध्ये विद्यार्थी परिषदेने स्वातंत्र्यवीर सावरकर समता ज्योत यात्रा काढली, तिच्या मुंबईतील चैत्यभूमीवर झालेल्या समारोप प्रसंगी डॉ. प्रकाश आंबेडकर आले होते आणि त्यांना आणण्यात अशोकरावांच्या आर्जवी विनंतीचा मोठा वाटा होता. एकूणातच सामाजिक न्याय, समता आणि समरसता या तत्त्वांशी त्यांची अव्यभिचारी निष्ठा होती. दलित साहित्य, दलित साहित्यकार यांच्याबद्दलचा त्यांच्या ठायीचा कळवळा नेहमीच अत्यंत प्रामाणिक होता. पुढे दलित इंडस्ट्रियल चेंबर किंवा डिक्की संस्थेचा संस्थापक म्हणून नावारूपाला आलेल्या मिलिंद कांबळे सारख्या कार्यकर्त्याला अशोकरावांनी नेहमीच सर्व प्रकारे प्रोत्साहन दिले.
अशोकरावांची असामान्यत्व अधोरेखित करणारा आणखी एक मुद्दा म्हणजे विशुद्ध अकादमीक संशोधन पद्धतीबाबतचा त्यांचा काटेकोरपणा. त्यांचे अभ्यासपूर्ण लिखाण कधीही संदर्भ सांगणार्या तळटीपेशिवाय नसे. संदर्भासह स्पष्टीकरणाचा त्यांचा आग्रह इतका पराकोटीचा असायचा की, ‘थांबा, लगेच पुरावा देतो’ असं ते बोलता-बोलता देखील अगदी सहजपणे म्हणत. मोडक सरांच्या शब्दकोषात कंटाळा, आळस हे शब्द पूर्वीपासूनच बाद होते. ‘कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती’ या एका संघगीतातल्या ओळी ते अक्षरशः जगले. ते संघटनशरण होतेच, पण संघटनेच्या निर्णयांची - खाजगीतच, पण परखड चिकित्सा करण्याचा संकोच त्यांनी कधी केला नाही.
आयुष्यभर स्वत:ला जमिनीशी जोडून घेऊन, सामान्य कार्यकर्ते आणि वंचित, उपेक्षित समाजबांधव यांच्या सुखदु:खांशी समरस होत अशोकराव आनंदाने जगले. डोंबिवलीतल्या दातार सदनातून पवईच्या उच्चभ्रूंच्या हिरानंदानी वसाहतीत ते गेले खरे, पण खूप पूर्वी ते ज्या ग्रांटरोडमधील चाळीत राहिले होते, तिथल्या परिस्थितीच्या आठवणींचा त्यांना कधीच विसर पडला नाही. त्यांच्या या ‘सम-दृष्टी’च्या व्यवहारांमागे होती त्यांच्यातील सकारात्मकतेची न संपणारी ऊर्जा! या सकारात्मक दृष्टीने त्यांच्या परखड विश्लेषणाला कधीच बाधा आणली नाही आणि परखडपणाने पाहतांना त्यांची सकारात्मक दृष्टी कधी अधू झाली नाही.
मोडक सर जी परंपरा मागे ठेवून गेले आहेत तिचा पाया या विलक्षण संतुलित विचार पद्धतीत होता यात शंका नाही!
- लेखक राज्यसभेचे माजी खासदार, अभाविपचे माजी कार्यकर्ते आणि म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आहेत.