@राजकुमार भाटिया
9212208859
संघासारखे वैचारिक आंदोलन भक्कम करण्यासाठी स्वयंसेवकास संघशरणता आणि बौद्धिक क्षमता या दोहोंमध्ये पारंगत होणे गरजेचे आहे. हे कौशल्य थोड्याच स्वयंसेवकांकडे असते. अशोकजी मोडक अशा थोड्याच स्वयंसेवकांच्या श्रेणीत येतात.
स्व. अशोक मोडक हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक होते. मी सुद्धा लहानपणापासून स्वयंसेवक आहे. हे संघशताब्दीचे वर्ष आहे. गेल्या शंभर वर्षांमध्ये ’भारत हिंदुराष्ट्र आहे’, ह्या वैचारिक अधिष्ठानाच्या आधारावरच संघाचा हा वटवृक्ष फोफावला, जो लाखो स्वयंसेवकांच्या समर्पणाने पल्लवित झालेला आहे. संघकार्य करताना मला हे समजले आहे की, स्वयंसेवकाने संघशरण होणे जितके महत्त्वाचे आहे तितकाच त्याचा उत्तम बौद्धिक स्तरही महत्त्वाचा आहे. संघासारखे वैचारिक आंदोलन भक्कम करण्यासाठी स्वयंसेवकास संघशरण होणे आणि बौद्धिक क्षमता या दोहोंमध्ये पारंगत होणे गरजेचे आहे. हे कौशल्य थोड्याच स्वयंसेवकांकडे असते. अशोकजी मोडक अशा थोड्याच स्वयंसेवकांच्या श्रेणीत येतात.
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
सखोल अभ्यास करणे हे बुद्धिजीवी वर्गाचे वैशिष्ट्यच आहे. याचबरोबर तो जर लेखनकलेत पारंगत असेल तर तो उच्च कोटीचा मनुष्य असतो आणि तोच जर वक्त्याच्या रूपात विचारांच्या अभिव्यक्तीत सशक्त असेल तर मग तो श्रेष्ठत्वाला पोहोचतो. अशोकराव या तिन्ही म्हणजे सखोल अभ्यास, विपुल लेखन आणि प्रभावी वक्ता या गुणांनी युक्त होते. अशोकजी मोडक यांच्याशी माझा परिचय जवळजवळ 56 ते 57 वर्षे जुना आहे. त्यावेळी ते दिल्ली स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज व नंतर ते जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे भाग बनले. ते तिथे पीएच.डी करत होते. तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप)च्या कार्यकर्त्याच्या रूपात आमचा परिचय झाला. कालांतराने ते आणि मी दोघेही अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा झालो. आमचा 25-26 वर्षांचा ऋणानुबंध होता. त्यांच्यासोबत संघटन आणि समाजासंबंधी चर्चा करण्याची संधी मिळत होती. गेल्या 30 वर्षांपासून आमची कार्यक्षेत्रे भिन्न झाली. आम्ही दोघे वेगवेगळ्या शहारांमध्ये वास्तव्यास होतो. यामुळे भेटीगाठी कमी झाल्या परंतु तरीही आम्ही संपर्कात होतो. गेल्या काही वर्षात आमचा संपर्क एका वेगळ्या समितीच्या म्हणजेच राष्ट्रीय समाज विज्ञान परिषदेच्या निमित्ताने होत होता. त्या संस्थेत मी गेल्या काही वर्षांपासून सक्रिय आहे आणि अशोकजी मोडक यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करत होतो. तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय समाज विज्ञान परिषदेद्वारे त्यांच्या निबंधांवर आधारित पुस्तकाचे Centric Thought Process and Other Essays सुद्धा प्रकाशन केले गेले.
1-2 वर्षांपूर्वी त्यांना कर्करोग झाल्याचे मला समजले. मला काळजी वाटू लागली. पण मला कळले की, त्यांनी या रोगाचा धैर्याने सामना केला आणि असा रोग झालेला असतानाही त्यांची बौद्धिक क्षमता सक्रीय होती. गेल्या वर्षी जेव्हा त्यांच्या Integral Humanism : Distinct Paradigm चे लोकार्पण दिल्लीत झाले तेव्हा मला आश्चर्य आणि आनंद झाला. तेव्हा दिल्लीत त्यांचा मित्र या नात्याने लोकार्पण समारंभाचे नियोजन करण्यात माझी भूमिका असावी, असे त्यांना वाटत होते. पुस्तकाचे प्रकाशन भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषदेद्वारे झाले होते आणि दिल्लीतल्या या कार्यक्रमाचे संयोजन विनय सहस्रबुद्धे करत होते. स्वाभाविकपणे प्रकाशन संस्थेनेसुद्धा कार्यक्रम उत्तमरित्या संपन्न होण्यासाठी मदत केली. या कार्यक्रमानिमित्त अशोकजी मोडक यांनी मला अनेकदा फोन केला होता. ह्या विद्वान स्वयंसेवकास माझी भावपूर्ण श्रद्धांजली..
लेखक अभाविपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
अनुवादक - कौमुदी परांजपे