सहृदय ज्ञानतपस्वी

17 Jan 2026 17:24:16
Ashok Moadk 
विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांसमोर अनेक क्लिष्ट विषय अशोकरावांनी सोपे करून मांडले आणि परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या विचारकक्षा विस्तृत केल्या. जुन्या काळातले ज्ञानतपस्वी कसे असतील याचा प्रत्यय देणारे अशोकराव, व्यक्तिगत बोलण्यात तितकेच मृदू, अतिशय संवेदनशील आणि शब्दशः बापाची माया देणारे होते.
अशोकराव गेले असा मेसेज परिषद गटावर वाचला आणि विविध संवेदनांनी मन भरून गेलं. ‘प्रेमळ, मार्गदर्शक आणि व्यक्ती म्हणूनही आदर्श वाटावा असा पिता’ हे वर्णन जन्मदात्या पित्याइतकेच ज्यांना लागू होईल असे पितृतुल्य अशोकराव अखेरीस देह सोडून गेले. विद्यार्थी परिषदेच्या कामात आल्यानंतर अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे अगदी जवळून अनुभवता आली. यशवंतराव केळकर, मदनदासजी, बाळासाहेब आपटे, अशोकराव मोडक, गीताताई गुंडे, सदाशिवराव देवधर, अनिरुद्ध देशपांडे... ही यादी अजून बरीच लांबेल. लाखो तरुणांच्या मनाच्या ओल्या मातीला आकार देणारे हे सारे शिल्पकार. अनुभव, व्यासंग, अभ्यासविषय, वक्तृत्वशैली, कार्यकर्त्यांशी संवाद यात एकापेक्षा एक सरस. आमचे भाग्य हे की, या नक्षत्रखचित आभाळाखाली आम्ही वावरलो. ही नक्षत्रे निव्वळ दूरस्थ दर्शनाने दिपवून टाकणारी नव्हती तर प्रत्यक्ष जमिनीवरच्या सतरंजीवर, कधी चहाच्या टपरीवर, कधी धूळभरल्या एसटीच्या प्रवासात आमच्या शेजारी बसून आम्हाला आमच्याही नकळत घडवत होती. विद्यार्थी परिषद नावाच्या तरुण मने घडवणार्‍या प्रयोगशाळेत ही सारी शास्त्रज्ञ मंडळी सोळा-सतरा वर्षांच्या वयात असलेल्या आम्हा पोरासोरांना घडवण्यासाठी धडपड करत होती. आज समाजातील विविध क्षेत्रात अग्रस्थानी असलेले विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते हे सारे या प्रयोगशाळेतून निर्माण झालेले आहेत.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
 
अशोकराव या मांदियाळीत विशेष लक्षात रहात ते त्यांच्या अभ्यासपूर्ण, ससंदर्भ आणि आखीवरेखीव मांडणीमुळे. ऐकताना दम लागावा अशी लांबच लांब वाक्ये, ती ही केवळ भाषालालित्याने नटलेली नव्हेत तर महत्त्वाचे संदर्भ पेरत गंभीर मुद्दा उलगडणारी, ते एखाद्या गवयाच्या पल्लेदार तानेसारखी सहज पेलत. एखाद्या प्रबंधासारखे सखोल चिंतन मांडताना त्याला हलक्या उपरोधाची जोड देत, कधी सुभाषिते पेरत ते त्या भाषणाचे जडत्व जरा कमी करत. ‘मला तुम्हाला हे सांगूद्या..’असा नम्र आणि आर्जवी स्वर लावून एखादे कठोर सत्य आपल्यापुढे उलगडत तेव्हा त्या मांडणीत किंचितही विद्वत्तेचा, अभ्यासाचा अभिनिवेश नसे. असायची ती फक्त सत्य पोचवण्याची तळमळ. त्यांची भाषणे ऐकणे ही एक शुद्ध ज्ञानानंदाची अनुभूती असे आणि आपल्या आकलनक्षमतेची आणि एकाग्रतेची परीक्षा.
 
 
Ashok Moadk
 
जगाचा इतिहास, रशिया आणि कम्युनिझम, जागतिक अर्थशास्त्र असे अत्यंत किचकट विषय त्यांनी विशीच्या आतल्या परिषदेच्या कार्यकर्त्यांसमोर मांडले आणि परिषदेच्या कार्यकर्त्याच्या विचारकक्षा विस्तृत केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा त्यांचा अभ्यासाचा आणि अतिशय जिव्हाळ्याचा विषय. बाबासाहेब, समरसता अशा विषयावर बोलताना ते अतिशय दक्ष असत. मांडणी कितीही ससंदर्भ आणि तर्कशुद्ध असली तरीही शब्दांची निवड आणि बोलण्याचा स्वर याकडेही त्यांचे लक्ष असे. ही दक्षता काही आक्षेप येण्याच्या भीतीतून नव्हती तर आपल्या मांडणीतून एखादा अधिकउणा शब्द जाण्याने आपण ज्या विचारधारेचे प्रतिनिधत्व करतो आहोत आणि जी सद्भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याचे नुकसान होऊ नये ही जाणीव असायची. आपल्या मांडणीतून आपल्याला कुणाला नामोहरम करायचे नाही, तर माणसांची मने, समाजातील समूह जोडले जावेत या प्रामाणिक भूमिकेचा झरा कायम पार्श्वभूमीला वाहत असायचा. डॉ. बाबासाहेबांची भाषणे उद्धृत करताना त्यांच्या मुद्रेवर तोच आवेश, तेच तेज झळकताना दिसे आणि डॉ. बाबासाहेबांनी सोसलेल्या हालअपेष्टा आणि उपेक्षा सांगताना अशोकरावांच्या करारी मुद्रेवरचा करुण भाव आणि त्यांच्या डोळ्यात तरळणारे पाणी कदापि विसरता येत नाही. त्यांच्या मांडणीत बुद्धिप्रामाण्याला अशी संवेदनेची जोड असायची आणि त्यामुळे ऐकणार्‍याच्या मनात ती सहवेदना उमटल्याखेरीज राहत नसे.
 
स्वतःची सर्व व्यवधाने सांभाळून, सतत अभ्यास करून नवनवीन विषय तयार करणे आणि विविध माध्यमातून त्याची अचूक आणि प्रभावी मांडणी करणे हे अचंबित करणारे होतेच पण त्याचसोबत प्रचंड प्रवास करून अगदी छोट्यात छोट्या कार्यकर्त्याला भेटणे, आस्थेने आणि तपशीलवार बोलणेच नव्हे तर ऐकणे, हे अधिक विशेष होते. अशोकरावांचे आपल्यावर जरा अधिकच प्रेम आहे असे वाटायला लावणार्‍या भेटी.. फोन.. पत्रे.. पंचाहत्तरीनंतरही तितक्याच ऊर्जेने केलेले प्रवास.. तितकीच तल्लख बुद्धी आणि अत्यंत जागरूक मन पाहून थक्क व्हायला होत असे.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावरची त्यांची तीन भाषणे एकत्र करून त्याची पुस्तिका करण्याचं काम करायला मिळणे हा माझ्यासाठी खूप अभिमानाचा विषय झाला होता. त्या चिमुकल्या कामातूनही खूप गोष्टी शिकता आल्या. ते अतिशय खुबीने सूचना देत. ‘थ्री इडियटस्’मधल्या, ’सर मैं तो ये दिखा रहा था कि सिखाते कैसे है’ या वाक्यासारखं त्यांनी शिकवलंय. एक छोटीशी पुस्तिकादेखील किती गांभीर्याने आणि जबाबदारीने करण्याची गोष्ट आहे हे दाखवले. आपलेच भाषण असले तरी त्यातल्या प्रत्येक वाक्याची शहानिशा करणे, त्याचे संदर्भ त्या त्या ठिकाणी येत आहेत ना, आणि ते योग्य आहेत ना, हे त्यांनी कसून पहिले.
 
Ashok Moadk 
 
जुन्या काळातले ज्ञानतपस्वी कसे असतील याचा प्रत्यय देणारे अशोकराव, व्यक्तिगत बोलण्यात तितकेच मृदू, अतिशय संवेदनशील आणि शब्दशः बापाची माया देणारे होते. पूर्णवेळ काम करत असताना एक वर्ष ते आमचे पालक होते. त्या काळात प्रत्येक पत्राला त्यांचे सविस्तर उत्तर आले आहे. पत्रातल्या प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करणारे आणि between the lines असलेल्या भावनाही समजून त्याला स्पर्श करणारं पत्र. मी पूर्णवेळ म्हणून थांबल्यानंतर आणि ते परिषद कामातून अन्य भूमिकेत गेल्यानंतरही हा व्यक्तिगत संपर्क कायम राहिला हे त्यांचे मोठेपण.
 
 
नुसता कोरडा आणि पोकळ आदर्शवाद मांडणारे नव्हे तर तसे कठोर आचरण असणारे अशोकराव म्हणजे चालताबोलता ध्येयवाद वाटत. आणि त्यामुळेच एकदा एका जबाबदार कार्यकर्त्याने ‘परिषदेच्या निधीसंकलनासाठी फटाके विक्री करू आणि त्याचे कार्यकर्त्यांना कमिशन देऊ’ असा प्रस्ताव मांडल्यावर आलेली अस्वस्थता त्यांनाच कळवावीशी वाटली. त्यांचे अतिशय सविस्तर उत्तर आले. केवळ समजूत घालणारे नाही तर त्यावरील उपाय सुचवणारे. त्यातला शेवटचा परिच्छेद सर्व कार्यकर्त्यांना, देशभक्तांना प्रेरणा देणारा आणि म्हणून आवर्जून वाचावा असा आहे. त्यांनी लिहिलं होतं,
 ‘आपण सर्वजण एका महान तीर्थक्षेत्राचे यात्रिक आहोत. हे तीर्थक्षेत्र हिमालयाच्या अत्युच्च शिखरावर आहे. तिथे पोचण्यासाठी बर्‍याच खस्ता खाव्या लागतील. वहाणा झिजवाव्या लागतील. या उपक्रमात वैताग आहे. पण हा वैताग कृतार्थता मिळवून देणारा आहे. समजा कुणा सहकारी यात्रिकाला ही कृतार्थता भावली नाही व केवळ वैतागच जाणवला, त्याने या तीर्थयात्रेतून अंग काढून घेण्याचे ठरविले तर आपण काय करावे? मला वाटते, आपण नवीन यात्रिक जमवावेत, त्यांच्यात अत्युच्च शिखरावरच्या मंदिराविषयीची भक्ती जागवावी.. मग यश आपलेच आहे. आपण या मंदिराच्या शिखराकडे लक्ष ठेवायचे व एकमेकांना निरपेक्ष भावनेने सांगत राहायचे, चलो भाई चलते चलो!’
 
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
आयुष्याच्या अखेरच्या पर्वातही अखंड कार्यरत राहण्याची, शिखराकडे चालत राहण्याची प्रेरणा त्यांच्यात कशामुळे कायम राहिली असेल असा विचार करताना अशोकरावांनी बाबासाहेबांवरच्या भाषणात केलेला उल्लेख आठवतो.
 
 
अशोकराव म्हणाले होते- बाबासाहेबांना धर्माविषयीच्या दोन गोष्टींचे आकर्षण होते. पहिले म्हणजे धर्म आपल्याला शिकवतो की, ‘तू म्हणजे शरीर नाहीस, तुझं नातं हे परमात्म्याशी आहे. यानं माणसाचं उन्नयन होतं, उदात्तीकरण होतं. मग माणूस अनावश्यक उपभोगात रमत नाही.’ बाबासाहेब आयुष्यभर विरक्त, संन्यस्त राहू शकले कारण त्यांना धर्माच्या या पहिल्या पैलूचा अर्थ हृदयंगम झाला होता. त्यामुळेच आलेल्या लोभाच्या, मोहाच्या क्षणांवर मात करून ते आयुष्यभर ज्ञानाची उपासना करू शकले, आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहू शकले.
 
 
अशोकरावांचे या परम शक्तीशी जडलेले नाते आणि त्या मंदिराविषयी त्यांना वाटत असलेली परम भक्तीच त्यांना अखेरच्या क्षणापर्यंत कार्यमग्न ठेवू शकली असणार यात संदेह नाही. या तपस्वी व्यक्तिमत्वाचे स्मरण करत आपली प्रेरणा कायम धगधगती ठेवणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.
Powered By Sangraha 9.0