@अर्चना मोडक -भिडे
दादांच्या आचरणातून आम्ही दोन्ही भावंडांनी जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन शिकला. त्यांचे विचार, चिंतन आणि कृती यातून कालांतराने साकल्याने विचार करण्याची दृष्टी मिळाली. त्याचसोबत महत्त्वाचे दादांंचे अनमोल धन म्हणजे समाजसेवा आणि माणसं जोडण्याची कला हा आमच्यासाठी पाठ आहे. त्यांच्या विविध गुणांचे आणि कार्यांचे अल्प अनुकरण जरी आम्हाला शक्य झाले तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!
कै. ति. दादांच्या स्मृतींना उजाळा देणार्या साप्ताहिक विवेकच्या पुरवणीत लेख लिहायचे ठरवले आणि त्यांच्या अनेक प्रेरक स्मृती मनात दाटून आल्या.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक दादा, रुईया महाविद्यालयाचे प्राध्यापक दादा, आधी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि पुढे राष्ट्रीय अध्यक्ष दादा, विधान परिषदेचे आमदार दादा, मी किंवा माझा भाऊ आशिष क्वचित आजारी असताना तर हळवे होणारे दादा, स्वतःबद्दल काहीही बोलण्यास संकोचणारे दादा अशी त्यांची अनेक रूपे मनःपटलावर झरझर दिसू लागली, आणि मी मनाने बालपणीच्या डोंबिवलीच्या घरात पोहोचले.
आई आणि दादा दोघेही प्राध्यापक. मध्यमवर्गीय घरात फार धनसंचय वगैरे नव्हता परंतु आपुलकी आणि समाधानाची मात्र रेलचेल होती. दुसर्याच्या दुःखाने दुःखी होणारे आणि शक्य ती सर्व मदत करणार्या आई-दादांनी येणार्या पाहुण्याचे सदैव हसतमुखाने स्वागत करताना पहिले आहे.
तो काळच असा होता की, घरातले सात्विक खाणे हा नियम होता आणि हॉटेलातले खाणे हा अपवाद होता. कधीतरी दादा आम्हा दोघांना घेऊन सामंत दुग्धालयाजवळ पावभाजी पार्सल आणायचे आणि ही गरमागरम पावभाजी आम्ही सर्वजण सेलेब्रेट करत असू. कधी आजीला आवडतात म्हणून विनोदचे बटाटेवडे आणि वर्ष-सहा महिन्यांत वेळ असेल तर मुंबईच्या जुहू बीचला संध्याकाळी फिरायला जाणे, कुर्ल्याहून डबलडेकर मिळाली तर त्यातला वरचा डेक... आमच्या दृष्टीने ही चैन होती.
मला आठवतंय की शाळेला सुट्टी होती आणि दादा दोन दिवसांसाठी चाळीसगावला जाणार होते. आई म्हणाली, जा की जरा दादांबरोबर. ते काय काम करतात ते तुलाही समजेल. मग काय, रात्रीच्या गाडीने चाळीसगाव स्टेशन गाठले. पहाटे पाच वाजता चाळीसगाव स्टेशनवर उतरलो तर पहिलाच धक्का म्हणजे 15-20 जण घ्यायला आले होते. अगदी तिथपासून दुसर्या रात्री परत गाडीत चढेपर्यंत हा माणसांचा समुदाय किती आपुलकीने वागत होता, दादांचा आणि त्यांचा स्नेहमय संवाद अथक सुरूच होता ते बघून मी थक्क झाले होते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे दादांना केवळ प्रत्येकाचे नावच नव्हे तर घरातील सर्वांची नावे व ते काय करतात, कुठे असतात हे देखील माहीत होते. प्रत्येकाची चौकशी केल्यावर त्या त्या व्यक्तीला होणारा आनंद अनमोल होता.
चार-सहा मैत्रिणींमधे रमणारी मी आणि दादांचा तो मैत्रसंग्रह! अगदी परतीच्या प्रवासासाठी रात्री गाडी गाठेपर्यंत हा सुसंवाद आणि गाठीभेटी सुरूच होत्या. दादांच्या कामाचे, जनसंग्रहाचे हे सुखद दर्शन, 40-45 तासांच्या प्रवासातला हा स्नेहमय अमृतानुभव त्यांच्याबद्दलचा आदर शतगुणित करणारा होता.
आजी-आण्णा कधी पुण्याला काकाकडे तर कधी डोंबिवलीत आमच्याबरोबर रहात असत. ते पुण्याला गेले की आम्ही त्यांना नियमित पत्र लिहावे असा दादांचा आग्रह असायचा. पहिले पत्र लिहून झाल्यावर ते दादांना दाखवले. दादांनी त्यातल्या शुद्धलेखनाच्या अनेक चुका दाखवून दिल्या. दादा पटकन कपडे बदलून कोपर्यावरच्या दुकानातून 4 वह्या घेऊन आले. रोज एक पान मराठी आणि एक पान इंग्रजी असे शुद्धलेखन करावे असा आग्रह त्यांनी धरला. आम्ही दोघेही असे शुद्धलेखन अडीच वर्षे नियमित लिहीत होतो. पुढे कधीतरी शुद्धलेखन सुधारले आहे आणि नियमित लेखन नको परंतु वाचन मात्र सुरूच ठेवा, असं सांगत ते लेखन बंद झाले. परंतु सकस वाचण्याची जी गोडी लागली ती कायम राहिली.
लग्नाच्या आधी आई फक्त बी.ए. झालेली होती. दादांच्या पाठबळामुळे आईने नोकरी करता करता बी.एड., एम.एड., पीएच.डी. पूर्ण केले. हा अभ्यास करताना आई सकाळी स्वयंपाक करून गाडी गाठत असे. कधीतरी कामाच्या बाई आल्या नाहीत तर दादा न सांगता आम्हाला बरोबर घेऊन स्वतःहून सर्व कामे करायचे.
प्रत्येक काम करताना आधी तयारी, मग प्रत्यक्ष काम आणि शेवटी नीट आवराआवर.. कुठलंही काम उत्तम पद्धतीने कसं करायचं हे शिकावं तर दादांकडूनच.
डोंबिवलीला आणि नंतर पवईला घरात किमान 12-15 वृत्तपत्रे तर यायची. त्यात जोडीला अनेक नियतकालिकेही यायची. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दादा वाचनात व्यग्र असायचे. मला अनेकदा ते इतके पेपर का वाचतात? असा प्रश्न पडायचा परंतु आदरयुक्त भितीमुळे मी तसे विचारले नाही. परंतु एकदा मनात धाडस करून विचारलेच तेव्हा दादांनी पेपर बाजूला ठेवून त्यांची भूमिका सांगितली. दादा विविध बातम्या वाचत असले तरी मुख्यतः सर्व वृत्तपत्रांचे मनापासून एडिटोरियल वाचायचे. एडीटोरियलमधे साधारणतः त्या आधीच्या दिवसांमधे घडलेल्या महत्त्वाची घटना किंवा बातमी आणि त्याबद्दलची संपादकीय मते वाचायला मिळतात. घटना-बातमी तीच परंतु वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टीतून त्याच विषयाचे 360 डिग्री व्ह्यू देऊन जातात. त्यांच्या या अभ्यासू पैलूचा मला अचानक साक्षात्कार झाला.
विद्वान संपादकांनी आणि लेखकांनी मांडलेले विचार वाचून त्यावर चिंतन करून आपला दृष्टीकोन व्यापक होतो आणि आपली मते अधिकाधिक विकसित होतात हा त्यांचा दृष्टीकोन या संवादानंतर मला मनोमन पटला. मीही नकळत त्यांचे अनुकरण करू लागले. कालांतराने यातून साकल्याने विचार करण्याची दृष्टी मिळाली!
इतक्या विस्तृत वाचनानंतरही समाजात घडणार्या वाईट गोष्टींवर चर्चा न करता ते नेहमी सकारात्मक बातम्यांवर चर्चा करायचे. परंतु क्वचित कधी फारच मोठी घटना असेल किंवा काही वाईट विषय जरी निघाला तरी अशा वेळी आपण काय सकारात्मक करू शकतो यावर लक्ष केंद्रीत करायला हवे असा त्यांचा आग्रह असे.
आशिष आणि मी यातून जीवनाकडे सतत सकारात्मक विचाराने बघण्याचा नवा दृष्टीकोन शिकलो. एम.एस्सी. झाल्यानंतर दादांच्या अथक कामामुळे प्रेरित होऊन मी विद्यार्थी परिषदेचे पूर्णवेळ काम करायचे असा विचार करत होते.
दादांनी हे कर किंवा करू नकोस अशी कुठलीही सक्ती केली नव्हती परंतु काम करताना आपण संस्थेच्या कामाशी समरस होऊन काम केले पाहिजे, आपले काम समाजासाठी आहे आणि समाजासाठी सकारात्मक काम करत आहोत, त्याचबरोबर एक व्यक्ती म्हणून समाजात वावरताना समाजमन समजून घेण्याची आणि समाजाकडून शिकण्याची संधी आहे, हेही सांगितले.
पूर्णवेळ थांबल्यानंतर मी परत आले आणि लगेचच मला रूईया कॅालेजमधे लेक्चररचे काम मिळाले. जिथे शिकले तिथेच शिकवायला मिळाले. हे जबाबदारीचे आणि अभिमानाचे काम होते. वर्ष होते न होते तोपर्यंत लग्न ठरले. लग्नानंतर दादांनी कसे वागायचे किंवा काय करायचे असं फारसं काही सांगितलं नाही, पण एक छोटीशी गोष्ट सांगितली की, परिषदेच्या कामात कार्यकर्ता अनेकदा रावणासमोरचा हनुमान झालेला असतो परंतु सांसारिक जीवनात हनुमानाचे आपल्याला आवडणारे रूप हे रामासमोरचा हनुमान आहे, ते लक्षात ठेवून वाग!
माझे बी.एस्सी.पर्यंत शिक्षण आणि वर्षभर अध्यापन दोन्ही माटुंग्याच्या रूईया कॉलेजमधे झाले तरी संकोची स्वभावामुळे लग्न ठरेपर्यंत मी प्राध्यापक अशोक मोडकांची मुलगी आहे, असा परिचय करून दिला नव्हता. जेव्हा सांगितले तेव्हा सर्वांना राग आला. आजवर का सांगितलं नाहीस? असे अनेक वरिष्ठ प्राध्यापकांनी विचारले. मॅथेमॅटीक्स विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. कुलकर्णी मॅडम तर जणू स्वतःच्या घरचे कार्य असल्यासारखे दादांच्या वतीने हातात अक्षता घेऊन निमंत्रण करत होत्या. अर्चना मोडक नसून प्राध्यापक डॉ. अशोक मोडकांची मुलगी आहे हे कळल्यावर सर्वांनी कॉलेजमधे केळवणाचा संस्मरणीय थाट केला. दादांबद्दलच्या त्यांच्या सहकार्यांच्या प्रेमाचा हा वर्षाव आजही मनाला सुखावून जातो.
बारा वर्षांच्या आमदारकीच्या काळात दादांचा हा लोकसंग्रह वर्धिष्णु झाला. जो जो त्यांच्यापर्यंत पोहचला त्या प्रत्येकाला त्यांनी शक्य ते सहाय्य केले. त्यासाठी पराकाष्ठेचा पाठपुरावा केला आणि बहुतांश लोकांना न्याय/अर्थ सहाय्य प्राप्त करून देत दिलासा मिळवून दिला.
सातारच्या विजयाताई भोसले, मिलिंदजी एकबोटे यांनी अफझलखानाच्या थडग्याच्या उदात्तीकरणाविरूद्ध लढा उभा केला होता. विधिमंडळाचे सदस्य म्हणून दादांनी त्यांच्या या लढ्यात मनापासून सहभाग घेतला आणि ते उदात्तीकरण कायमचे थांबवले.
मतदारसंघातले लोकं नवनवीन कल्पना सुचवत. त्यातल्या सुयोग्य कल्पना उचलून धरत त्यांनी त्यावर विधायक काम सुरू केले. मग ते कोकणातील मुलींसाठी नर्सिंग सहायक कोर्स असेल किंवा कामाचा वार्षिक अहवाल आणि पैशांच्या विनियोगाचा हिशोब देणे हा त्यांचा स्वभावच होता. राजकीय जीवनातून निवृत्त झाल्यावर दादांनी पुन्हा समाजसेवेला वाहून घेतले. विविध संस्थांच्या कामाद्वारे समाजहिताचे अन् देशप्रेमाचे धोरण स्वीकारले जाईल याची सर्वतोपरी व्यवस्था केली.
ध्यानीमनी नसताना अचानक कर्करोगाचे निदान झाले. गेली अडीच वर्षे त्यांच्या विलक्षण धीरोदत्तपणाचा अनुभव आला. संतुलित आहार, आणि नियमित 25 सूर्यनमस्कारांसह शिस्तबद्ध जीवनशैली होती तरी कर्करोग कसा झाला? असे आमच्या मनात येत होते. निदान समजल्यावर ही बातमी दादांना कशी द्यायची? हा धक्का त्यांना सोसेल का? असा विचार करत असतानाच त्यांना ती बातमी समजली.
त्यांना धक्का बसला खरा परंतु त्यांनी तो स्थितप्रज्ञतेने स्वीकारला. तज्ज्ञ डॅाक्टरांचे उपचार आणि तुम्हा मुलांचे पाठबळ यावर मी यातून नक्कीच बाहेर पडेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हिरानंदानी हॅास्पिटलमध्ये दादा एक अकॅडमिशियन आहेत हे स्टाफला समजले होते. इम्युनोथेरपीची पहिली 7-8 इंजेक्शन झाल्यानंतर स्टाफ विचारायचा ते नेमके काय करतात? सकाळी डाव्या हातात इंजेक्शन घेत उजव्या हाताने त्यांचे हसतमुख वाचन लेखन सुरूच असायचे.
वेदना होत नसतील का? परंतु तोंडावरचे स्मितहास्य कधीही कोमेजले नाही. ना कधी कुरकुर की ना कधी स्टाफवर रागावून आवाज चढवून बोलणे. प्रत्येकाचे नाव लक्षात ठेवणारा आणि प्रेमाने नावाने हाक मारणारा हा पेशंट सर्वांचा आवडता होता. त्यांनी बेल वाजवली की सर्वच स्टाफ त्वरेने धावून येत होता.
इतका गंभीर कॅन्सर झाला तरी ते शांत असायचे आणि इतर पेशंट्सना धीर द्यायचे. एकदा तर बाजूलाच असलेल्या पेशंटने तुम्ही इतर पेशंटना इन्सपिरेशन आहात असे सांगितले. दादांचे असे जाणे आमच्या मनाला चटका लावणारे आहे, परंतु जो सहवास मिळाला जे प्रेम मिळाले, जी जीवनदृष्टी मिळाली आणि त्यापेक्षा महत्त्वाची समाजसेवेची आणि माणसं जोडण्याची जी जीवनमूल्ये त्यांनी जपली हेच त्यांचे अनमोल धन आमच्यासाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विविध गुणांचे आणि कार्यांचे अल्प अनुकरण जरी आम्हाला शक्य झाले तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल!