सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील शेतकरी पांडुरंग विष्णू राणे यांनी परंपरा, प्रयोगशीलता आणि शास्त्रीय अभ्यास यांची सांगड घालत शेती, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा समतोल साधणारे शाश्वत मॉडेल उभे केले आहे. ‘जीविषा‘ संस्थेद्वारे ते नैसर्गिक शेती, प्रशिक्षण आणि प्रयोगातून शेतकर्यांना स्वावलंबी, पर्यावरणपूरक आणि समाजोपयोगी मार्गदर्शन देतात. निसर्गसंवर्धन, अन्नस्वयंपूर्णता आणि स्वावलंबी विकास यांचा हा प्रवास आज अनेकांसाठी दिशादर्शक ठरत आहे.
डोंगर-दर्या, विपुल पाऊस आणि लालसर मातीवर उभी राहिलेली कोकणातील शेती ही केवळ उत्पादनाची साधनं नाहीत, तर कोकणच्या संस्कृतीची, जीवनशैलीची आणि शाश्वततेची खरी ओळख आहे. भात, माड, सुपारी, आंबा, काजू यांसारखी पिके निसर्गाशी सुसंवाद साधत या प्रदेशाला आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीयदृष्ट्या समृद्ध ठेवतात. या परंपरेचे पाईक असलेले कुडाळ येथील शेतकरी पांडुरंग राणे हे निसर्गस्नेही शेतीचे जिवंत उदाहरण आहेत. निसर्गाचा समतोल राखत, त्यांनी आपल्या शेतीचा सर्वांगीण विकास घडवून आणला आहे.
राणे सांगतात की, लहानपणापासूनच मला प्रयोग करण्याची आवड होती. शेती आणि शेतीवर आधारलेली जीवनशैली यांचे संस्कार माझ्या आजीने तसेच आई-वडिलांनी रुजवले. आजीच्या काळातील शेती ही समाजव्यवस्थेचा अविभाज्य भाग होती - जिथे पूरकता, उपयुक्तता आणि सामूहिक आनंद यांचा सुंदर समतोल होता. मात्र शेतीच्या वाढत्या बाजारीकरणामुळे हा समतोल ढासळत गेला. याची जाणीव झाल्याने 1992 पासून मी कृषी साहित्याचे सखोल वाचन सुरू केले. प्रताप चिपळूणकर, सुभाष पाळेकर, अशोक कोठारे यांचे लेखन, वातन-वापसा, वाफसा, जैविक ऑक्सिजनची मागणी, माती व पाण्याचा व्यवहार, आच्छादन, लघु-दीर्घ आर्द्रता चक्र, पाणी-बाष्प, वनस्पती-सूक्ष्मजीव व अन्नसाखळी यांचा अभ्यास केला.
2005 सालचा एक अनुभव पांडुरंग राणे यांच्या जीवनदृष्टीला नवी दिशा देणारा ठरला. या संदर्भात ते सांगतात, 2005 साली ’'Oikos' ’ संस्थेच्या केतकी आणि मानसी यांची एका व्यावसायिक शेती प्रकल्पावर झालेली भेट ही केवळ ओळख नव्हती, तर विचारांची जागृती होती. त्या भेटीत व्यावसायिक शेतीमुळे पर्यावरणावर होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम प्रकर्षाने समोर आले. तोपर्यंत माझा समज असा होता की, मोठ्या प्रमाणावर शेती करून त्यातून जास्तीत जास्त कार्बन रिसायकल करत निसर्गसंवर्धन साधता येईल; मात्र सखोल चर्चेतून हा मार्ग मूलतःच अपुरा आणि दिशाभूल करणारा असल्याचे उमगले.
याच जाणिवेतून निसर्गपूरक जीवनशैलीचा शोध सुरू झाला. त्यासाठी पुदुच्चेरी येथील ऑरोविल अंतर्गत दोन संस्थांमध्ये महिनाभर स्वयंसेवा (Volunteering) करण्याची संधी मिळाली. जगभरातून आलेल्या समविचारी व्यक्तींसोबत राहून, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या पर्यावरणपूरक उपक्रमांची ओळख झाली. वेगवेगळ्या संस्कृती, अनुभव आणि विचारसरणी असलेल्या कम्युनिटीसोबतचा सहवास शिकवणारा आणि परिवर्तनकारी ठरला.
यानंतर ‘थनल’ संस्थेमार्फत नैसर्गिक बांधकाम विषयावर प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण घेतले. स्थानिक साधनसंपत्ती, विशेषतः बांबूचे बांधकाम व विविध उपयोगांतील बहुआयामी वापर, याचे शास्त्रीय आणि व्यवहार्य ज्ञान मिळाले. या प्रवासात निसर्गपूरक जीवनशैलीसाठी आवश्यक असलेल्या विविध प्रशिक्षणांद्वारे अभ्यास वाढत गेला. निसर्गाशी सुसंवाद साधत जगण्याचा अर्थ अधिक स्पष्ट होत गेला.
संपर्क : पांडुरंग विष्णू राणेमु.पो. कुडाळ ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
भ्रमणध्वनी - 9422054868
हे सर्व घडत असतानाच कुडाळ (MIDC) येथील आमच्या फॅक्टरी फार्मचा विकासही टप्प्याटप्प्याने सुरूच होता. संवर्धनाची सुरुवात स्वतःपासून कशी करता येईल? या प्रश्नाचा शोध घेताना कार्बन अकाउंटिंग, पाण्याचा फूटप्रिंट आणि जैवविविधतेचा फूटप्रिंट यांसारख्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात समजून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. निसर्गसंवर्धन ही केवळ कल्पना न राहता, रोजच्या निर्णयांचा भाग बनू लागली. याच काळात मुलीनेही माझ्या कार्याला सक्रिय साथ दिली. तिचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही एकत्र येऊन ‘जीविषा’ या संस्थेची स्थापना केली. शाश्वत जीवनशैली केवळ स्वतःपुरती न ठेवता समाजापर्यंत पोहोचवावी, या उद्देशाने या संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले.
तेवढ्यातच कोविडची लाट आली आणि संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये गेला. त्या कठीण काळात आमची बाग, फळझाडे आणि फुलांनी आम्हाला अक्षरशः तारले. याच काळात आम्ही नैसर्गिक बांधकाम स्वतः उभे केले. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्र यांची सांगड घालत वूड फायर ओव्हन (लाकूड जाळून तयार होणार्या उष्णतेवर अन्न शिजवण्याचे साधन), बांबूचे बाथरूम साकारले, तर घराला नैसर्गिक रंगांची झळाळी दिली. संकटाच्या काळात निसर्गाशी जोडलेपण हेच खरे सामर्थ्य आहे, याची ठळक जाणीव या प्रवासातून झाली.
निसर्गाशी मैत्री, प्रशिक्षण व प्रयोग
राणे म्हणतात, शिकणे कधीच थांबत नसतेही जाणीव माझ्या शेती आणि जीवनप्रवासाची खरी ओळख आहे. प्रशिक्षण घेण्याची प्रक्रिया आजही अखंड सुरू आहे. या प्रवासातील दुसरा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे बदलापूर येथील सेंद्रिय कृषिभूषण राजेंद्र श्रीकृष्ण भट काका यांची झालेली भेट. सेंद्रिय शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी आणि त्यासोबतच आध्यात्मिक विकास साधण्यासाठी भट काकांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. विविध विषयांवरील त्यांच्या प्रशिक्षणातून शेतीकडे पाहण्याची दृष्टी अधिक व्यापक आणि समतोल बनली.
या ज्ञानाचा प्रत्यक्ष प्रयोग करताना निसर्गाच्या विविध व्यवस्थांचे सखोल आकलन झाले. हळूहळू बाग खुलू लागली. अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ दिसू लागले. अवघ्या दोन एकरांच्या बागेत एक सशक्त परिसंस्था आकार घेताना दिसली. विविध कीटक, मधमाशांचे प्रकार, पक्षी, बुरशी, मुंग्या, कोळी, छोटे प्राणी आणि सर्प यांचे सहजीवन अनुभवायला मिळू लागले. भट काकांनी नैसर्गिक शेती करणार्या शेतकर्यांसाठी आयोजित केलेल्या केंद्रीय संस्थेच्या प्रशिक्षणासाठी सोबत नेले. तेथे पद्मश्री भारतभूषण त्यागी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी निसर्ग आणि मानव यांच्यात चुकीच्या पद्धतींमुळे निर्माण झालेला संघर्ष कसा कमी करता येईल, तसेच प्रशासकीय यंत्रणा मानव व निसर्गाच्या समृद्धीसाठी कशी उपयोगात आणता येईल, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकर्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल, याची दिशा देखील या प्रवासातून मिळाली.
अशी एक संकल्पना
निसर्गसंवर्धन, शाश्वत जीवनशैली आणि शेतीआधारित अर्थव्यवस्था यांची सांगड घालत राणे यांनी गावकेंद्रित, पर्यावरणपूरक आणि स्वावलंबी विकासाच्या संकल्पना पुढे आणल्या आहेत. या संदर्भात राणे अधिक सांगतात, ‘एक हेक्टर निसर्गपूरक शाश्वत जीवनशैली’ आणि ‘एक हेक्टर वनआधारित शाश्वत जीवनशैली’ या संकल्पनांद्वारे, भौगोलिक परिस्थितीनुसार शेतीआधारित जीवन जगू इच्छिणार्या कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तींना आमच्या संस्थेमार्फत मार्गदर्शन दिले जाते. प्रत्यक्ष अनुभव, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि आवश्यक माहितीच्या आधारे निसर्गाशी सुसंवादी जीवनशैली कशी उभारता येईल, हे आम्ही दाखवून देतो.
औद्योगिक क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी आम्ही कार्बन फूटप्रिंट, पाण्याचा फूटप्रिंट आणि जैवविविधतेचा फूटप्रिंट कमी करण्यासाठी केलेल्या प्रयोगांचे अनुभव शेअर करतो, जेणेकरून उद्योग आणि पर्यावरण यांच्यातील नाते अधिक जबाबदार आणि पूरक बनेल.
तसेच ‘एक गाव - एक शेतकरी उत्पादक कंपनी’ या संकल्पनेतून शेतकर्यांना नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून जगाचा पोशिंदा म्हणून निसर्गसंवर्धनाची भूमिका बजावण्यासाठी प्रवृत्त केले जाते. उपयुक्तता आणि पूरकतेचा समतोल राखत, व्यावसायिक आणि शेतकरी यांच्यात परस्परपूरक संबंध कसे विकसित करता येतील, यासाठी आम्ही काम करीत आहोत.
मोठ्या कंपन्यांच्या सीएसआर अंतर्गत दोन टक्के निधीचा वापर गावातील निसर्गव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी करणे आणि त्याच्या बदल्यात शेतकर्यांनी कंपन्यांना कार्बन क्रेडिट देणे, हा आमचा अभिनव व्यवहार मॉडेल आहे. या माध्यमातून आधुनिक शेतीच्या चुकीच्या धोरणांमुळे गमावलेली गावाची परिसंस्था पुन्हा उभी राहील, तर नैसर्गिक पद्धतीने उत्पादित मालावर प्रक्रिया व विक्री करून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून स्वावलंबी, समृद्ध आणि जागतिक बाजारपेठेशी जोडलेली ग्रामीण अर्थव्यवस्था उभारली जाईल.
नारळ बागेचे उत्कृष्ट मॉडेल
राणे यांच्या बागेत नारळ हे प्रमुख आणि बहुआयामी पीक असून सध्या त्यांच्याकडे 50 नारळांची झाडे आहेत. यासंदर्भात राणे सांगतात, सुरुवातीपासूनच आम्ही सेंद्रिय पद्धतीने नारळ उत्पादन करीत होतो. त्या काळात प्रती झाड सरासरी 25 नारळांचे उत्पादन मिळत होते. मात्र नैसर्गिक शेतीची पद्धत स्वीकारल्यानंतर उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून आज प्रती झाड सरासरी 100 नारळांचे उत्पादन मिळत आहे. यासोबतच नारळाचा आकार, वजन आणि खोबर्याची गुणवत्ता देखील लक्षणीयरीत्या सुधारली आहे. भविष्यात उत्पादन आणखी वाढवण्यासाठी आवश्यक त्या व्यवस्थाही टप्प्याटप्प्याने विकसित केल्या जाणार आहेत.
ओले नारळ रुपये 25 प्रती नग दराने स्थानिक नागरिक थेट बागेत येऊन खरेदी करतात. शेतकरी व ग्राहक यांचा थेट, विश्वासावर आधारलेला हा व्यवहार आमच्या शेतीची खरी ताकद आहे. आमच्याकडे स्वतःचा लाकडी घाणा असून त्यावर काढलेले शुद्ध नारळ तेल रुपये 360 प्रती लीटर दराने मुंबईतील नियमित ग्राहकांना घाऊक स्वरूपात पुरवले जाते, तर किरकोळ विक्री रुपये 450 प्रती लीटर केली जाते.
नारळाचे व्हर्जिन तेल (औषधी उपयोगासाठी) तयार करण्याची शास्त्रशुद्ध प्रक्रिया आम्ही विकसित केली असून त्याचा अपेक्षित विक्री दर रुपये 800 ते 1,200 प्रती लीटर आहे. याची व्यावसायिक विक्री लवकरच सुरू होणार आहे. तसेच नारळांपासून मिळणार्या तेलाचा वापर करून अंगाचा व कपड्यांचा साबण घरगुती पातळीवर तयार केला जातो.
भविष्यात नारळ सोलणे व व्यवस्थित फोडणे यासाठी यंत्रणा उभारण्याची योजना असून, यामुळे करवंटीपासून शोभिवंत वस्तू तयार करून युवकाला स्वयंरोजगाराची संधी देता येईल. करवंटीपासून क्टिवेट चारकोल, तर नारळाच्या सोडणापासून दोरखंड, सेंद्रिय खत व इतर उपयुक्त उत्पादने तयार करण्याचाही आमचा मानस आहे. नारळ बागेत नारळासोबत इतर झाडांवर मिरीचे वेल जोपासले असून सध्या दरवर्षी सुमारे 40 किलो काळी मिरीचे उत्पादन मिळते. ही मिरी घाऊक बाजारात रुपये 800 प्रती किलो दराने विकली जाते. एकूणच, आमची नारळ बाग ही नैसर्गिक शेती, मूल्यवर्धन आणि ग्रामीण आर्थिक स्वावलंबनाचे सशक्त मॉडेल म्हणून उभी राहत आहे.
हळद ते कोकम पर्यंत
राणे यांनी हळद, आंबा , कोकम आदी पिकांपासून मूल्यवर्धित पदार्थ तयार केले आहेत. याबाबत ते सांगतात - आम्ही गेल्या दोन वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावर हळदीची नैसर्गिक लागवड करीत असून, यंदा सुमारे 50 किलो हळदीचे उत्पादन मिळाले आहे. पूर्वीपासून घरगुती वापरासाठी हळदीचे लोणचे तयार केले जात होते; मात्र यंदा प्रथमच विक्रीसाठी हळदीचे लोणचे तयार करण्यात आले आहे. त्याचा दर रुपये 800 प्रती किलो ठेवण्यात आला आहे. लोणच्याची रेसिपी प्रमाणित झाल्यानंतर पुढील टप्प्यात एक टन हळदीचे लोणचे तयार करण्याचा मानस असून, त्यासाठी लागणारी हळद, मिरी, मिरची व तेल ही सर्व सामग्री स्वत:च्या बागेतच नैसर्गिक पद्धतीने उत्पादित केली जाणार आहे. याशिवाय बागेत हापूस आंब्याची 25 कलमे असून, कोणतीही अतिरिक्त मेहनत न करता सध्या सुमारे 150 डझन उत्पादन मिळते. हे आंबे स्वतःच्या वापरासह स्थानिक बाजारपेठेत विकले जातात. पुढील काळात उत्पादन 500-600 डझनांपर्यंत वाढवून, रुपये 1,000 प्रती डझन दराने विक्री होईल तसेच कोकमपासून सोल, कोकम बटर, आगळ व सरबत तयार केले जाते. सध्या हे पदार्थ स्वतःच्या वापरासाठी असून, गुणवत्ता व्यवस्थापन पूर्ण झाल्यावर त्यांची व्यावसायिक विक्री सुरू करण्याचा विचार आहे. याशिवाय आवळ्याचे पदार्थ, चिक्कू, फणस व कंदमुळांपासूनचे पदार्थ प्रायोगिक तत्त्वावर तयार करून त्यांचे गुणवत्ता मानक निश्चित केले जात आहे.
आमच्या शेतात आज संपूर्ण अन्नसाखळी नैसर्गिक पद्धतीने उभी राहिली आहे. पुढील टप्प्यात या उत्पादनांवर पारंपरिक, कमी कार्बन फूटप्रिंट असलेल्या प्रक्रिया पद्धतींनी एकसारखी गुणवत्ता असलेले पदार्थ विकसित करायचे आहेत. त्यासाठी प्रमाणित रेसिपी तयार करून शेतकरी समूहाच्या माध्यमातून उत्पादन-प्रक्रिया-विक्री अशी एकात्मिक व्यवस्था उभारण्याचा मानस आहे.
सध्या मिळणार्या उत्पन्नातून शेतीचे सर्व खर्च भागवणे हे प्राथमिक उद्दिष्ट असून, नफ्याच्या स्वरूपात किमान 30 जणांचे सकस अन्न उत्पादन व शिजवून देणे ही आमची अपेक्षा आहे.
एकूणच निसर्गाशी सुसंवाद साधत, परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत पांडुरंग राणे यांनी कोकणातील शेतीला नवा आयाम दिला आहे. शाश्वत जीवनशैली, निसर्गसंवर्धन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जाणारा हा प्रवास निश्चितच प्रेरक आहे.