बांबू -चक्रीय अर्थव्यवस्थेचा कणा

विवेक मराठी    19-Jan-2026
Total Views |
@डॉ. हेमंत बेडेकर
-  9767200905
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे पर्यावरणावर पडणारा ताण आणि वाढता कचरा ही आजची मोठी समस्या आहे. यावर उत्तर म्हणून चक्रीय अर्थव्यवस्था पुढे येते. पूर्णपणे वापरता येणारा, जैविक आणि बहुपयोगी बांबू हा कमी कर्ब उत्सर्जनासह उत्पादन, पुनर्वापर आणि पर्यावरणस्नेही विकासाचा मजबूत आधार ठरतो.

bamboo
 
या पूर्वीच्या भागांमध्ये आपण बांबूचे स्वरूप व इतर गोष्टी पाहिल्या. बांबूचे कंद, फांद्या, पाने असे सर्व भाग वापरून अनेक वस्तूंची निर्मिती केली जाते. उत्पादन निर्मिती दरम्यान तयार होणारा भुसा, साली आणि फांद्या अशा कचर्‍याचा दुसर्‍या कुठल्या तरी उद्योगासाठी कच्चा माल म्हणून वापर करता येतो. या कच्च्या मालापासून फ्लायबोर्ड, पार्टिकल बोर्ड, जमिनीसाठीच्या टाइल्स, घरामध्ये वापरायच्या अनेक वस्तू बनवता येतात. वेगवेगळ्या यंत्रामधील प्लास्टिकला पर्याय म्हणून बांबू उपयोगी आहे.
 
 
बांबूचा भुसा आणि रेझीन्स (चिकट द्रव्य) वापरून तयार केलेले लाकूड पाहिले तर त्याचा यासाठी वापर झाला नाही, तरी कोळसा, क्टिवेटेड कार्बन, सीएनजी गॅस आणि इथेनॉल असे उत्तम प्रतीचे पदार्थ तयार केले जातात. या सगळ्या व्यवहारामध्ये कमीत कमी कर्ब उत्सर्जन होतो. कमी ऊर्जा बाहेर टाकली जाते व नगण्य कचरा तयार होतो. सर्वांत शेवटी जी राख आहे, त्याच्या वापरातून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते. बांबूपासून निर्माण केलेल्या वस्तू बराच काळ टिकत असल्यामुळे त्यामध्ये साठवलेला कर्ब निसर्गात सोडायला बरीच वर्षे लागतात. त्यामुळे कर्बाचे हवेतील प्रमाण कमी होते. साहजिकच या पुनर्वापर तंत्राने 50-60 रुपयाच्या बांबूची किंमत 500 ते 600 रुपये होते. हे सर्व मूल्यवृद्धीमुळे घडते. एकीकडे उत्पन्न वाढते आणि दुसरीकडे पर्यावरणाचा तोल सांभाळण्याचे काम केले जाते.
 
 
बांबू व त्यापासून उत्पादने आणि पुनर्वापर या प्रवासात पूर्ण जैविक भार निसर्गामध्ये मिसळून त्याचे खतात रूपांतर होऊन पुन्हा तो मातीत जातो. कोणत्याही गोष्टीचा असा शंभर टक्के वापर होणे यालाच चक्रीय अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. ही अर्थव्यवस्था काही अंशाने भारतीय जीवन पद्धतीशी सुसंगत आहे. याची व्यवहारातील दोन उदाहरणे आपण लहानपणापासून अनुभवली आहेत. आपल्या रोजच्या जीवनातील याचे एक उदाहरण म्हणजे जुने कपडे देऊन नवीन वस्तू घेणे. पूर्वी दारोदार भटकणारी बोहारीण ही या अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग होती. त्यावेळी आजच्यासारखी सर्व गोष्टींची विपुलता ही नव्हती आणि तेवढे पैसे पण नसायचे. साहजिकच कोणत्याही वस्तूचा पुनर्वापर होत असे. मग कपडे किंवा साड्या जुन्या झाल्या की, त्या बोहारणीला देऊन त्या बदल्यात घरात वापरण्याच्या एखाद्या भांड्याचा विनिमय होत असे. बोहारीण ही वस्तू घेऊन त्या बदल्यात आपल्याला भांडी देत असे व घेतलेल्या कपड्यांचे पुनर्वापरासाठी रूपांतर करत असे किंवा हे कपडे त्यापासून सतरंज्या बनवणे किंवा इतर गोष्टी याच्यामध्ये रूपांतर होण्यासाठी दिले जात. अगदीच फाटके कपडे जरी असले तरी त्यापासून फरशी पुसणे किंवा कट्टा पुसणे याच्यासाठी वापर होत असे. पूर्ण जीर्ण झाल्यानंतर ही पायपुसणी हात पुसणे जाळून तरी टाकली जात किंवा खताच्या खड्ड्यामध्ये टाकली जात.
 
 
 
विद्यार्थिदशेतील दुसरे उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी वापरलेल्या वह्या व त्यातले पाठकोरे कागद बाजूला काढून पुढील वर्षीसाठी रफ नोटबुक्स तयार केली जात. गेल्या वर्षीचे पूर्ण वापरलेले कागद रद्दीत जात आणि ही रद्दी पुन्हा लगदा करून पुठ्ठे किंवा रॅपिंग पेपर तयार होत असे. आजही हे सत्र चालू आहे. याबरोबर आपण इतरही सर्व गोष्टींचा असाच विचार केला तर लक्षात येईल की, भारतामध्ये हे आपल्या अंगवळणी पडलेलं होतं.
 

bamboo 
2020-2021 सालच्या कोरोनाने याची आपल्याला पुन्हा आठवण करून दिली. हे पुनर्वापर किंवा रिसायकलिंग तंत्र नवीन नावाने आपल्यासमोर आले व ते जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये शास्त्रीय दृष्टीकोन देऊन बसवलं गेलं, यालाच म्हणतात चक्रीय अर्थव्यवस्था. या चक्रीय अर्थव्यवस्थेमध्ये शास्त्रीय दृष्टीकोनाचा विचार करून व्यवहाराची सांगड घालून एक अर्थव्यवस्था तयार झाली. ती अर्थव्यवस्था अर्थशास्त्रीय अंगाने विचार करून मोठमोठ्या उत्पादनांसाठी वापरली गेली आणि जगासाठी चक्रीय अर्थव्यवस्था या नावाने पुन्हा व्यवहारात आली. साहजिकच या व्यवस्थेची काही तत्त्वे ठरवली गेली व जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग बनवून गेली. ही तत्त्वे काय आहेत याचाही विचार करू या आणि आपला बांबू चक्रीय अर्थव्यवस्थेचा कसा एक महत्त्वाचा घटक आहे ते पाहू या.
 
 
चक्रीय अर्थनीती
 
चक्रीय अर्थनीती किंवा अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं काय हे आता पाहू या. चक्रीय अर्थव्यवस्था ही अर्थशास्त्राच्या पुस्तकांमध्ये गेली अनेक वर्षे पहायला मिळत होती. व्यवहारात मात्र दुसर्‍या महायुद्धानंतर गेली काही दशक आपण रेषीय अर्थव्यवस्था पाहात होतो. त्यामध्ये तयार करा वापरा आणि फेकून द्या या पद्धतीमुळे कचर्‍याचे ढीग तयार करण्याचे काम आपण वर्षानुवर्षे करत गेलो. हे करताना आपण आपल्या पर्यावरणाचे प्रचंड प्रमाणात नुकसान केलं. अमर्याद वृक्षतोड केली गेली, पुन्हा लागवडीचे नाव नाही. ऊर्जा निर्मितीसाठी प्रचंड प्रमाणात खनिजांचा विशेषतः दगडी कोळशाचा वापर पेट्रोल व डिझेल सारख्या साधनात नष्ट होताना वातावरणात मोठ्या प्रमाणात सोडलेल्या कर्ब वायूमुळे नुकसान करणार्‍या गोष्टीचे उत्पादन व नदीच्या वाळूचा निर्बंध वापर या सार्‍या गोष्टींमुळे आपण आपलेच पर्यावरण बिघडवून टाकले आणि मग याचे परिणाम म्हणून हवामानातील अतिपर्जन्यवृष्टी, तीव्र थंडी, मोठे दुष्काळ आणि परिणामतः अन्नधान्यटंचाई, रोगराई या सर्वांमध्ये वाढ होत गेली. भरीस भर म्हणून स्वस्त दरात निर्माण होणार्‍या पेट्रोलियमजन्य प्लास्टिकची निर्मिती झाली. हे प्लास्टिक स्वस्तात उपलब्ध आहे म्हणून भरमसाठ वापरले जाते. ते वर्षानुवर्षे सहजपणे विघटित होत नाही. त्यामुळे कचर्‍याचे ढीग व डोंगर बनून जातात.
 
 
बाजारातून कोणतीही वस्तू आणताना आपण सहजपणे प्लास्टिकची पिशवी मागतो. वस्तू घरात आणल्यानंतर त्याचे कचर्‍यात रूपांतर करतो. घरातला टूथब्रश दोन-तीन महिन्यात निरुपयोगी झाल्यावर कचर्‍यात फेकून देतो. हा टूथब्रश पूर्णपणे प्लास्टिकचा असल्यामुळे त्याची विल्हेवाट व्हायला 100 वर्षे लागतात. हे आपण लक्षातच घेत नाही. गेली 40-50 वर्ष बेपर्वाईनं प्लास्टिकचा वापर करून आपण आपलं खूप मोठं पर्यावरणीय आणि आर्थिक नुकसान करून घेतले आहे.
 
 
अनेक ठिकाणी हे प्लास्टिक कचर्‍यात न टाकता जाळून टाकले जाते. ते जळताना रासायनिक पदार्थ व त्यातून निघणारे अनेक विषारी वायू श्वसनाद्वारे आपल्या शरीरात जातात. मग कॅन्सरसारख्या असाध्य रोगांना आमंत्रण देतात. या संपूर्ण वायू प्रदूषणाच्या दुष्टचक्रामुळे समाजाचे आरोग्य, व्यक्तीचे आरोग्य आणि सर्व जीवांचे आरोग्य बिघडवून आपल्या आरोग्ययंत्रणेवर प्रचंड मोठा ताण पडत आहे. म्हणूनच चक्रीय अर्थव्यवस्थेचा चपखल वापर हा त्यावर उपाय आहे.
 

krushivivek

krushivivek 
 
पुनर्वापराचे तंत्र
 
पुनर्वापराचे तंत्र बांबू उद्योगात चपखलपणे कसे वापरता येते याचा सविस्तर विचार करू. रेषीय अर्थव्यवस्थेने आपल्या जीवनाला असह्य करून टाकले. ते पुन्हा सुसह्य करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. यासाठी वर्षानुवर्षे न कुजणार्‍या, कधीच मातीत विलीन न होणार्‍या सिमेंट, पोलाद, प्लास्टिक, अल्युमिनियम अशा अजैविक पदार्थांचा वापर न करता बहुतांश औद्योगिक उत्पादनात जैविक वस्तूंचा वापर करून वस्तुनिर्मिती होणे आवश्यक आहे. तसा आग्रह धरायला हवा. त्यासाठी संशोधन करून उत्पादन पद्धती विकसित करावी लागेल. हे जगभरातल्या शास्त्रज्ञांपुढे आव्हान आहे.
 
 
जागतिक व्यापार समूहाने 2016 पासून पुनर्वापराचे तंत्र वापरून जैविक पदार्थ वापरून पर्यावरणपूरक अशा वस्तूंचे उत्पादन व्हावे यासाठी आग्रह धरला आहे. यासाठी संपूर्ण बांबू हा कच्चा माल वापरून असंख्य गोष्टींच्या निर्मितीसाठी जगभरातील लोक उत्सुक आहेत. जागतिक हवामानविषयक संशोधन आणि व्यापारी उत्पादन करणार्‍या संस्थांनी यावर काम करायला सुरुवात केली आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणून औष्णिक वीजनिर्मिती करताना दगडी कोळशाऐवजी बांबूपासून तयार केलेल्या बांबू पेलेट्स (घन इंधन) वापर सुरू झाला आहे. भारत सरकारने प्रत्यक्षरित्या पावले टाकायला सुरुवात केली आहे.
 

bamboo 
औष्णिक वीजनिर्मितीत मुख्यतः दगडी कोळशाचा वापर होतो. वीजनिर्मिती करताना जाळलेल्या दगडी कोळशातून विजेबरोबरच 30 टक्क्यांपर्यंत राख निर्माण होते. कोणत्याही औष्णिक वीज केंद्राच्या परिसरात या राखेच्या डोंगरांचे करायचे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. याऐवजी कोळशा स्वरूपामध्ये तयार केलेल्या बांबूच्या पॅलेट्सचा वापर केला तर वीजेबरोबर फक्त चार ते पाच टक्के राख निर्माण होते आणि ही राख पण सेंद्रिय खतांच्या निर्मितीसाठी उपयोगी पडते. त्यामुळे 100 किलो कोळशामधून 70 टक्के उपयोग वापर विरूद्ध 100 किलो बांबू पॅलेट्स पासून 100 टक्के वापर अशी स्थिती निर्माण होते. भारत सरकारने आता 100 टक्के कोळसा वापरण्याऐवजी 90 टक्के कोळसा वापरून व 10 टक्के बाबू पॅलेट्स वापरून वीजनिर्मिती करण्याबद्दल पाऊले टाकली आहेत. यात दोन फायदे आहेत. कोळसा खाणींचे कमी उत्खनन आणि कोळशाची बचत म्हणजेच खाणीमधून काढणे, वाहतूक यावर होणार्‍या प्रचंड खर्चाची बचत व प्रचंड प्रमाणात सेंद्रिय खतनिर्मिती हे देशाच्या फायद्याचे आहे.
 
बांबूचे औद्योगिक पदार्थांमध्ये रूपांतर करताना ते तीन विभागांमध्ये वाटले गेले आहे.
 
1) दीर्घकाळ टिकणारी बांबू उत्पादने
 
2) मध्यम व अल्प आयुर्मान असलेली बांबू उत्पादने
 
3) उत्पादन साखळीत तयार होणार्‍या कचर्‍यापासून उत्पादने.
 
यातील दीर्घकाळ टिकणार्‍या वस्तू उत्पादन उद्योगाच्या निर्मितीत बर्‍याच गोष्टी येतात. साधारणणे 25 ते 30 वर्षे आयुर्मान असणार्‍या उत्पादनांचा यात समावेश होतो. दीर्घकाळ टिकणारी घरे, फर्निचर, बांबूचे पोल, पाइप्स, बांबूपासून तयार केलेले कृत्रिम लाकूड म्हणजेच बांबू कॉम्पोजिट्स यांचा वापर करून तयार केलेले फर्निचर, बांबू टाईल्स, लांब धागा असलेला असलेले कापड, प्लास्टिकला पर्याय म्हणून तयार केलेले विविध सुटे भाग पार्टिकल बोर्ड, ड्रेनेज, पाइप्स अशा अनेक वस्तू येतात. अशी कम्पोजिट्स (दोन किंवा अधिक वेगवेगळ्या पदार्थांचे एकत्र करून तयार केलेले नवे साहित्य.) तयार करत असताना रेसिन्स (चिकट द्रवरूप) सारख्या रासायनिक पदार्थांचा वापर करावा लागतो हे खरे आहे. हे पदार्थ 25-30 वर्ष निसर्गात एका जागी स्थिर राहतात हेही तितकच खरं आहे. जगभरातले अनेक शास्त्रज्ञ सोयाबीन आणि एरंडी यापासून तयार करायचा रेझीन्सवर संशोधन करत आहेत. त्यांना यश येत आहे. हे साध्य झाल्यावर आपण आणखी अनेक पदार्थ यापासून तयार करू शकू. जास्त वर्षे आयुर्मान असलेल्या वस्तूंमुळे वातावरणात कर्बाचा शिरकाव कमी होतो. त्यांचा पर्यावरणाचा परिणाम पण खूप कमी होतो. अशा वस्तूंसाठी जागतिक मानक (आयएसआय) तयार करायला सुरुवात झाली आहे.
 
 
पाच व त्याहीपेक्षा कमी वर्षे आयुर्मान असलेल्या उत्पादननिर्मिती करताना संशोधनाला बराच वाव आहे. अशा वस्तूंच्या डिझाइन्स विकसित कराव्या लागतील. रोजच्या वापरातील सिमेंट, प्लास्टिक, लोखंड, अ‍ॅल्युमिनियम न वापरता बांबू आधारित वस्तूंची निर्मिती करावी लागेल. काही प्रमाणात यावर पूर्वीच काम सुरू झाले आहे. आज बाजारात रोजच्या वापरातील ताटवाट्या, चमचे, भांडी अशा आपल्या स्वयंपाकघरातल्या किंवा परवडणारी किंमत असलेल्या पण प्रचंड मागणी असणारी उत्पादने आता मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहेत. त्याचबरोबर लॅपटॉप आणि टेलिफोन यांचे आवरण, सायकली, टूथब्रश, कॉटन बड्स अशा असंख्य गोष्टी तयार करण्याला सुरुवात झाली आहे. याचं उत्तम उदाहरण म्हणजे टूथब्रश. टूथब्रशची पट्टी ही बांबूची आणि मक्याच्या धाग्यांपासून पासून तयार केलेले धागे यावर आधारित उत्पादन भारतभर प्रसिद्ध होऊ लागली आहेत. मोठ्या प्रमाणात टूथब्रश तयार करणारे किमान पाच-सहा उद्योजक आज भारतामध्ये निर्मिती करतात. हे टूथब्रश हे पूर्णपण जैविक आहेत.
 
 
आता तर खनिज तेलापासून तयार करण्यात येणार्‍या प्लास्टिकऐवजी मक्याचे स्टार्च आणि चिंचेचे स्टार्च यापासून विघटित होणारे प्लस्टिक वापरून निर्माण केलेले प्लास्टिक व त्यापासून तयार केलेल्या पिशव्या वेगवेगळी आवरणे तयार होतात. उपयोग झाल्यानंतर ही आपण जैविक कचर्‍यामध्ये टाकून देऊ शकतो. आपोआप त्याचे विघटन होऊन मातीत मिसळून जातात. यातलं आणखी एक उदाहरण घ्यायचं झालं तर, आपल्या मोटारींचे स्टीयरिंग व्हील, गाड्याचे इंटीरियर हे बांबूपासून तयार केले जाते.
 
 
या सर्व वापरानंतर तयार होणारा कचरा व त्याचा पुनर्वापर करताना असंख्य वस्तूंची निर्मिती होते. हा भुसा किंवा वाया जाणारे पदार्थ यांचे भुशात रूपांतर करून अनेक उद्योगात वापरता येते. वाया जाणारे पदार्थ, वाळलेली पानं यांचे ठरावीक मेशच्या भुशात रूपांतर करून त्यापासून काम्पोझीटस, पार्टिकल बोर्ड, बांबूपासून ऊर्जानिर्मितीसाठी लागणार्‍या पॅलेटस, कोळसा, क्टिवेटेड कार्बन, एलपीजी गॅस. पेट्रोल-डिझेलमध्ये मिसळण्यासाठी लागणारे औद्योगिक इथेनॉल अशा प्रचंड मागणी असणार्‍या पदार्थांमध्ये आपण रूपांतर करू शकतो. उद्योगांच्या पुरवठा साखळीत वापर, उत्पादन व पुनर्वापर यांचा अंतर्भाव करावाच लागेल. चीनने हे प्रचंड प्रमाणात साध्य केले आहे. भारतातही त्याचा वापर सुरू झाला आहे. हे सर्व अमलात आणताना चीनने हे कसे केले, समस्या काय आल्या, त्यावर काय उपाय केले व मात कशी केली हे आपणास मार्गदर्शक ठरते. यावर पुढील भागात बोलू.
 
संचालक, वेणू वेध बांबू संशोधन संस्था, पुणे.