दर्पोक्ती की हतबलता?

19 Jan 2026 13:34:58
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची एक ध्वनिमुद्रित क्लिप सध्या चर्चेत आहे. अजहरने दिलेली धमकी पाहता डोवाल यांचे आवाहन किती समर्पक वेळी आले याची कल्पना येऊ शकेल. तेव्हा या योगायोगाने एकाच वेळी घडलेल्या दोन घडामोडी-घटनांची दखल घेणे सयुक्तिक.
 
azar
 
जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याची एक ध्वनिमुद्रित क्लिप सध्या चर्चेत आहे. ती क्लिप ताजी आहे किंवा पूर्वीची पण आता प्रकाशात आली आहे, याबद्दल खात्रीशीर सांगता येत नसले तरी त्या क्लिपमधून अजहरने भारताला दिलेला इशारा मात्र गंभीर आहे. एक नाही, दोन नाही, शंभर नाही तर हजार आत्मघातकी दहशतवादी तयार आहेत व भारतात घुसखोरी करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून आपल्यावर दबाव आणत आहेत, असे अजहर त्यात बोलताना ऐकायला येतो. शिवाय आपल्या संघटनेच्या आत्मघातकी दहशतवाद्यांचा खरा आकडा सांगितला तर जगभरातल्या माध्यमांमध्ये हाहाकार उडेल, असेही त्याने त्या क्लिपमध्ये म्हटले आहे. अर्थात मुदलात हे ध्वनिमुद्रण आताचे आहे किंवा पूर्वीचे हा कळीचा मुद्दा आहे. याचे कारण ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानमधील पंजाबस्थित बहावलपूर येथे केलेल्या हल्ल्यात त्या संघटनेच्या जाळ्यालाच नव्हे तर खुद्द अजहरच्या कुटुंबीयांना तडाखा बसला होता. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर इल्यास काश्मिरी हा भारताने चढविलेल्या हल्ल्याने संतप्त झाल्याचा एक व्हिडिओ युट्यूबवर प्रसारित झाला होता. भारताच्या त्या मोहिमेस आता कुठे आठेक महिने होत आहेत. कंबरडे मोडलेल्या जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या ते विसरून भारताला धमक्या देईल याचा संभव कमी. मात्र तरीही ते ध्वनिमुद्रण अलीकडेचच आहे असेच गृहीत धरून भारताने सतर्क राहणे श्रेयस्कर.
 
 
हे ध्वनिमुद्रण प्रकाशात येण्याच्याच सुमारास देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे राष्ट्रीय युवक दिनाचे औचित्य साधत आयोजित केलेल्या ‘विकसित भारत युवा नेते संवाद’ कार्यक्रमात सुमारे चौतीस मिनिटांचे तडाखेबंद व्याख्यान झाले. त्यात डोवाल यांनी भारतावर इतिहासात झालेल्या आक्रमणांचे स्मरण करून देताना त्याचा ’सूड’ घेण्याचे आवाहन युवकांना केले. त्यांच्या या शब्दावरून बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्यांनी नाहकच काहूर उठविले आणि त्या विधानास धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. मुळातच विश्वासार्हता गमावलेल्या कथित धर्मनिरपेक्षतावाद्यांना उठलेल्या पोटशूळास फारसे महत्त्व कोणी दिले नाही हा भाग अलाहिदा; मात्र अजहरने दिलेली धमकी पाहता डोवाल यांचे आवाहन किती समर्पक वेळी आले याची कल्पना येऊ शकेल. तेव्हा या योगायोगाने एकाच वेळी घडलेल्या दोन घडामोडी-घटनांची दखल घेणे सयुक्तिक.
 
 
जैश-ए-मोहम्मदच्या कारवाया
 
मुळात अजहरने असा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. परंतु गेल्या 25 वर्षांत जैश-ए-मोहम्मदने भारतात केलेले दहशतवादी हल्ले पाहता त्याचा हा इशारा गांभीर्यानेच घ्यायला हवा हे निश्चित. कराचीतील एका इस्लामी विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या एका शाळा शिक्षकाचा अजहर हा मुलगा. वयाच्या विशीत अजहरने शिक्षण सोडले व पाकिस्तानस्थित हरकत-उल-मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत तो सामील व सक्रिय झाला. पुढे त्या संघटनेचा तो सरचिटणीस झाला व त्याने सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, झांबिया अशा देशांचा दौरा केला. भारतात व विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये जिहाद पुकारण्याची तयारी त्याने केली होती.
 

azar 
 
 
1994मध्ये भारतीय संरक्षण दलांनी अजहरला अटक केली. त्यानंतर पाच वर्षे तो तुरुंगात होता. मात्र 1999च्या डिसेंबर महिन्यात दहशतवाद्यांनी काठमांडू-दिल्ली मार्गावरील इंडियन एअरलाईन्सच्या आयसी-814 विमानाचे अपहरण करून ते अमृतसर-लाहोर-दुबईमार्गे अफगाणिस्तानमधील कंदहार येथे नेले. प्रवासी व विमान कंपनीचे कर्मचारी यांच्या सुखरूपतेच्या व सुटकेच्या बदल्यात भारतातील तुरुंगात असणार्‍या तीन दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी अपहरणकर्त्यांनी केली. अखेरीस भारत सरकारने तीन दहशतवाद्यांची सुटका केली; त्या तीनपैकी एक मसूद अजहर. सुटका झाल्यावर अजहरने सरळ पाकिस्तान गाठले व 2000 मध्ये बहावलपूर येथे एका सभेत जैश-ए-मोहम्मद या सुन्नी इस्लामी दहशतवादी संघटनेची स्थापना केली. त्यासाठी त्याने त्यावेळी अफगाणिस्तानचाही दौरा केला होता व तालिबानी दहशतवाद्यांचे ’आशीर्वाद’ घेतले होते. मात्र तरीही दहशतवादी विश्वात अजहरचा प्रवेश तुलनेने उशिरा झाला होता. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेची स्थापना 1990च्या दशकातच झाली होती. त्या संघटनेने अगोदर अफगाणिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया केल्या असल्या तरी सोव्हियत महासंघाने अफगाणिस्तानमधून माघारी जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर हाफिज सैदच्या या दहशतवादी संघटनेने आपला मोर्चा जम्मू-काश्मीरकडे वळवला होता.
 
 
क्षेत्र कोणतेही असो; नव्याने व उशिरा प्रवेश केलेल्याला अधिक आक्रमकपणे काही करून दाखविण्याची खुमखुमी असते; कारण तरच त्या क्षेत्रात आपले स्थान निर्माण होऊ शकेल अशी त्याची धारणा असते. मसूद अजहर त्यास अपवाद नव्हता. त्यातूनच आत्मघातकी दहशतवादी हल्ले हा नवीन प्रकार त्याने सुरू केला. आत्मघातकी दहशतवादी हल्ला करण्यासाठी ज्यांना तयार करण्यात येते त्यांचे ’ब्रेनवॉश’ किती पराकोटीचे करण्यात आलेले असेल याची कल्पनाच केलेली बरी. आता अजहर हजारोंच्या संख्येने आत्मघातकी दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची दर्पोक्ती करीत आहे. मात्र याची सुरुवात 2000 मध्ये झाली. अफक अहमद शहा या 19 वर्षीय व बारावी इयत्तेत शिकत असणार्‍या विद्यार्थ्याने स्फोटकांनी भरलेले वाहन श्रीनगरच्या वेशीवरील बदामी बाग छावणीत नेऊन धडकवले व त्या हल्ल्यात पाच भारतीय सैनिक हुतात्मा झाले; तो जैश-ए-मोहम्मदने घडवून आणलेला पहिला आत्मघातकी हल्ला. त्याने बहुधा जैश-ए-मोहम्मदची दखल पाकिस्तान व मुख्यतः तेथील आयएसआय या गुप्तहेर संघटनेने घेतली असावी. त्यानंतर गेल्या पाव शतकात जैश-ए-मोहम्मद संघटनेने भारतात अनेकदा दहशतवादी हल्ले केले आहेत. त्यांतील 2001 मधील संसदेवरील हल्ला; त्याच वर्षी श्रीनगर येथे जम्मू-काश्मीर विधानसभेवर घडवून आणलेला हल्ला; 2008 मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, 2019 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर पुलवामा येथे केलेला हल्ला हे ठळक होत. जैश-ए-मोहम्मदची धिटाई इतकी वाढली की पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी दहशतविरोधी युद्धात अमेरिकेची साथ करण्याची घोषणा केली तेव्हा त्यांची देखील कराचीत हत्या करण्याचा प्रयत्न अजहरच्या संघटनेने दोनदा केला. दोन्हीवेळा तो अयशस्वी ठरला हा भाग वेगळा. अर्थात जैश-ए-मोहम्मदमध्ये फूट पडल्यानंतर अब्दुल जब्बारच्या नेतृत्वातील गटाने ते हल्ले केले होते असे म्हटले जात असले तरी एकूण त्या दहशतवादी संघटनेचे विकृत चरित्र त्यातून स्पष्ट होते.
 
 
धमक्या पूर्वीपासूनच
 
2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मद संघटनेवर कठोर कारवाई करण्याचा दबाव पाकिस्तानवर वाढला. तेव्हा त्याला अटक झाली खरी; पण लाहोर उच्च न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समीक्षा समितीने अजहरच्या सुटकेचे आदेश दिले. तेव्हा अटक म्हणजे केवळ दिखाऊपणा होता हे उघड होते. 2008 मध्ये मुंबई बॉम्बस्फोटांनंतर पुन्हा अजहरवर कारवाईचा आंतरराष्ट्रीय दबाव वाढला. तेव्हा पाकिस्तानने अजहरला नजरकैदेत ठेवण्याचा देखावा निर्माण केला. पण त्याच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही, एवढेच नव्हे तर कालांतराने पाकिस्तानी यंत्रणांनी तर अजहरला अटक केल्याचेही निर्लज्जपणे नाकारले.
 
 
अशाने अजहरची भीड चेपली यात शंका नाही. जैश-ए-मोहम्मदला त्याने कौटुंबिक व्यवसायाचेच स्वरूप दिले व 2007 मध्ये या दहशतवादी संघटनेची सूत्रे आपला भाऊ रौफ अजहरला दिली. त्यानंतर अजहर अनेक वर्षे सार्वजनिकरित्या कुठे दिसला नसला तरी त्याचा अर्थ तो निष्क्रिय होता असा नाही. आता त्याने ज्या धमक्या दिल्या आहेत त्याच प्रकारच्या धमक्या त्याने 2014 मध्येही दिल्या होत्या. पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे आत्मघातकी दहशतवाद्यांच्या एकत्रीकरणाला दूरध्वनीवरून अजहरने संबोधित केले होते. तेव्हाही या कार्यक्रमात 313 आत्मघातकी दहशतवादी हजर आहेत; पण आवाहन केले तर ती संख्या सहज दोन हजारांवर जाईल, अशी दर्पोक्ती त्याने केली होती.
 
 
2018 मध्ये ध्वनिमुद्रित संदेशात अजहरने अयोध्येत राममंदिर उभे राहिले तर भारत पेटेल असा इशारा दिला होता. 2024 मध्ये त्याने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना संबोधित करताना काश्मीरमध्ये जिहादी पाठवण्याचा तसेच इस्रायलच्या विरोधात कारवाया करण्याचा इशारा दिला होता आणि लगोलग एका संदेशात त्याने बाबरी ’मशीद’ मुक्त करण्याची व राममंदिरावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. तेव्हा आता त्याने दिलेल्या धमक्या नवीन नाहीत. फरक इतकाच की त्याच्या अशा धमक्यांना भारत धूप घालत नाही; उलट त्याच्या प्रत्येक दहशतवादी कारवाईला दामदुप्पट प्रत्युत्तर देतो. 2019 मध्ये बालाकोट येथे भारतीय संरक्षण दलांनी केलेला ’सर्जिकल स्ट्राईक’ व गेल्या वर्षी मे महिन्यात ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेद्वारे थेट बहावलपूर येथे चढविलेले हवाई हल्ले हे त्याचेच द्योतक. मात्र म्हणून त्याच्या ताज्या इशार्‍याकडे कानाडोळा करता येणार नाही. दिल्लीत अलीकडेच झालेला दहशतवादी हल्ला व व त्यात पांढरपेशा व्यवसायातील व्यक्तींचा सहभाग पाहता अशा प्रत्येक धमकीकडे गांभीर्यानेच पाहणे व संरक्षणाची तटबंदी अभेद्य करणे हाच पर्याय होय.
 
 
पाकिस्तानने पोसले
 
वास्तविक पाकिस्तानने अशा दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा असली तरी ती अपेक्षा देखील अवास्तव वाटावी अशी स्थिती आहे. जैश-ए-मोहम्मदला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना घोषित करावे म्हणून भारत सतत प्रयत्नशील होता. त्या प्रयत्नांस चीन आडकाठी करीत होता. निदान चार वेळा तरी चीनने भारताची बोळवण नकाराधिकार वापरून केली. पण अखेरीस 2019 च्या मे महिन्यात चीनने आपले आक्षेप मागे घेतले व भारताच्या प्रयत्नांना यश आले. तोवर अजहर पाकिस्तानात मोकाट होता. पाकिस्तानचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री कुरेशी यांनी अजहर आजारी असल्याची व तो आपल्या घराच्या बाहेर पडू शकत नसल्याची बतावणी केली. पण आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या सूचीत नाव येताच अजहर ’गायब’ झाला. दरम्यान फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सने (एफएटीएफ) पाकिस्तानचा समावेश करड्या यादीत (ग्रे लिस्ट) केला होता. याचा अर्थ पाकिस्तानमधून ’टेरर फंडिंग’ होते यावर शिकामोर्तब झाले होते. त्या यादीतून वगळले जावे म्हणून पाकिस्तान प्रयत्नशील होताच. 2022 मध्ये पाकिस्तानला त्या यादीतून वगळणार अशी चिन्हे दिसू लागताच पाकिस्तानने अजहर अफगाणिस्तानमध्ये दडून बसला असल्याचा दावा केला. तालिबान राजवटीत तो निवांतपणे जगतो आहे असा पाकिस्तानचा दावा होता. पण तालिबान-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण होऊ लागले होते. तालिबान राजवटीने पाकिस्तानचा दावा केवळ फेटाळून लावला नाही तर दहशतवाद्यांना पाकिस्तान आश्रय देतो; अफगाणिस्तान नाही असा घरचा आहेर दिला. तरीही तालिबानशी आपले संबंध जवळचे आहेत असे भासविण्याचा प्रयत्न अजहरने केला पण तालिबान राजवटीचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांनी अंतर राखले. अजहरचा झालेला हा मुखभंग होता. आता पाकिस्तानशिवाय अजहरला पर्याय नाही व पाकिस्तानला भारतात कुरापती काढण्याकरिता अजहर सारख्यांना पोसणे आवश्यक वाटते. आता त्याने दिलेल्या धमकीचा तोच अर्थ आहे.
 
 
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतात पुन्हा दहशतवादी कारवाया करण्याची खुमखुमी अजहरला असू शकते. जैश-ए-मोहम्मद संघटनेने अद्याप महिलांना आत्मघातकी दहशतवादी म्हणून प्रवेश दिला नव्हता. मात्र ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर महिलांची भरती आत्मघातकी दहशतवादी म्हणून कराचीसह बहावलपूर, मुझफ्फराबाद इत्यादी ठिकाणी करण्यात येत आहे असे म्हटले जाते. आयसिस, बोको हराम, हमाससारख्या दहशतवादी संघटनांनी पूर्वीच महिलांना आत्मघातकी दहशतवादी दलात प्रवेश दिला आहे. जैश-ए-मोहम्मद आता त्याच पंक्तीला जाऊन बसली आहे. याचा अर्थ त्या दहशतवादी संघटनेला आता पूर्ण हतबलता आली आहे. पाकिस्तानचे कितीही पाठबळ असले तरी भारतासमोर आपला निभाव लागणे शक्य नाही याची जाणीव अजहरला झाली आहे. त्यातूनच मग भारताला उद्देशून धमक्या देण्याचेही प्रकार घडतात. मात्र त्यामुळे त्या संघटनेच्या कारवायांवर भारतीय गुप्तहेर व संरक्षणदलांचे जास्तच बारकाईने लक्ष असेल याचे भान अजहरला नाही.
 
 
डोवाल यांचा संदेश
 
या पार्श्वभूमीवर डोवाल यांचे भाषण लक्षवेधी ठरते. भारतावर झालेल्या आक्रमणांत आता दहशतवादी हल्ल्यांचीही भर पडली आहे. डोवाल यांनी इतिहासात भारतावर झालेल्या आक्रमणांचा ’सूड’ घेण्याचे आवाहन केले. तेव्हा त्या शब्दाचा त्यांना अभिप्रेत असणारा अर्थ त्यांनी लगेचच स्पष्ट केला. तरीही बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्यांना त्यात अल्पसंख्यांकांना लक्ष्य करण्याचा संदेश आढळला. वास्तविक सूड म्हणजे रूढ अर्थाने बदला किंवा हिंसाचार वा चिथावणीखोरपणा त्यांना अभिप्रेत नव्हता. पण देश दुर्बल असल्याने त्यावर आक्रमणे झाली त्याचा वचपा आपल्या मूल्यांच्या भक्कम आधारावर, आपल्या क्षमता, सामर्थ्य वाढवून समर्थ राष्ट्रनिर्मिती करूनच घेता येईल असा अर्थ त्यांना अपेक्षित होता. अजहरने दिलेल्या धमकीच्या सावटामध्ये तो संदेश नेमका व नेमक्या वेळी दिलेला आहे असेच म्हटले पाहिजे.
Powered By Sangraha 9.0