हुनर बोलते हैं!

19 Jan 2026 14:25:47
 
 पुण्यात व पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपशी लढण्यासाठी अजितदादांनी कुठलीही कसर ठेवली नाही. पिंपरी-चिंचवड म्हणजे अजितदादांची जहागिरीच जणू. अजितदादांची स्वबळावर जिंकण्याची मनीषा असलेली राज्यातील ही एकमेव महापालिका होती. अजितदादा आणि आ. लांडगे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुप्त राजकीय संघर्ष होताच. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्याला जाहीर तोंड फुटले. या संघर्षावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु त्यांनी केवळ एक सभा घेतली आणि विजय रॅली काढली. आपला संपूर्ण भर त्यांनी विकासावर दिला. टीकेला टीकेने प्रत्युत्तर न देता विकास हाच त्यांनी आपला केंद्रबिंदू ठेवला. त्यांच्या याच मुद्द्यावर पिंपरी- चिंचवडकरांनी शिक्कामोर्तब केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.
 
PMCE 
 
 
परिंदों को मिलेगी मंजिल एक दिन,
ये फैले हुए उनके पर बोलते हैं,
वही लोग रहते हैं खामोश अक्सर,
जमाने में जिनके हुनर बोलते हैं!
 
 
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये केलेल्या संक्षिप्त प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ऐकविलेल्या या ओळी. त्यांच्या स्वतःच्या राजकारणाचे मर्म तर त्या सांगतातच, इतरांनाही राजकारणाचे बाळकडू पाजतात. किंबहुना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनाच कानमंत्र देण्यासाठी त्या ओळी ऐकविलेल्या. कधी काळी विधानसभेत त्यांनीच उच्चारलेल्या ’मैं समंदर हूं... लौटके आऊंगा’ या ओळी जशा राजकीय लोकसाहित्याचा भाग झाल्या आहेत, तशाच याही ओळी भविष्यात व्हायला हरकत नाही. कारण त्या ओळींचा सच्चेपणा आज सिद्ध झाला आहे. राज्यातील सत्तेत मित्रपक्ष परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधक असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही कानात त्या निनादत असणार.
 
 
राज्यात बहुप्रतिक्षित असलेल्या महापालिका निवडणुका अखेर पार पडल्या. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात 29 महापालिकांपैकी 22 पालिकांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या. राजकीय विरोधकांसोबतच इतर विविध शंकासुरांनाही फडणवीसांनी आपले बळ परत दाखवून दिले. भाजपच्या झंझावातात विरोधकांची अक्षरशः वाताहात झाली. विधानसभा आणि नगरपालिकेनंतर महापालिका निवडणुकीतही भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभाराला मुंबई आणि इतर महापालिका क्षेत्रातील जनतेने स्पष्ट कौल दिला.
 
 
मुंबईशिवाय नागपूर, पुणे, सांगली, नाशिक, अकोला, धुळे, जळगाव, सोलापूर, उल्हासनगर, इचलकरंजी, जालना, नांदेड, कल्याण-डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, पिंपरी-चिंचवड, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कोल्हापूर येथे भाजपने बाजी मारली. दुसरीकडे लातूर, चंद्रपूर, भिवंडी आणि परभणीत आमची सत्ता येत असून आमचे महापौर होतील, असा दावा काँग्रेसने केला आहे. मालेगावमध्ये इस्लामिक पार्टी या नव्या पक्षाने यश मिळविले.
 
 
गंमत म्हणजे यातील बहुतांश पालिकांमध्ये सत्ताधारी महायुतीतील मित्रपक्षच एकमेकांसमोर उभे ठाकले होते. नवी मुंबई आणि मीरा-भाईंदरमध्ये भाजपने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पराभव केला. मात्र ठाणे महापालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. येथे शिवसेनेला बहुमत मिळाले. सोलापुरात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले, परंतु ते भाजपचा विजयरथ रोखू शकले नाहीत.
 
 
मात्र खरी गंमत सांस्कृतिक राजधानी पुणे आणि शेजारची उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये झाली. तिथेही लढत झाली ती भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. इथे लढत एवढी शर्थीची होती की, अजितदादांनी दोन वर्षांपूर्वी ज्यांच्याविरुद्ध बंड केले त्याच काकांशी - शरद पवार यांच्याशी - भाजपला हरविण्यासाठी म्हणून हातमिळवणी केली. पवार यांनीही पडत्या फळाची आज्ञा म्हणून पुतण्याशी जुळवून घेतले, कारण एरवीही त्यांच्यात लढण्याचे त्राण उरलेले नव्हतेच.
 
 
फडणवीस यांनी मुंबईत उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना एकत्र यायला भाग पाडले, इकडे पश्चिम महाराष्ट्रात ते काका-पुतण्यामध्ये दिलजमाई घडायला कारणीभूत झाले. पुण्यात फडणवीसांचेच पहिलवान असलेल्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजितदादांना अस्मान दाखविले, तर पिंपरी-चिंचवडमध्ये महेश लांडगे यांनी दादांना धूळ चारली.
 
 
पुण्यात एकूण 165 जागांपैकी भाजपला 119 जागा (तब्बल 22 जागांची वाढ) तर दोन्ही राष्ट्रवादीला एकत्रित 30 जागा मिळाल्या. एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भाजपची ही वाढ राष्ट्रवादीच्या घसरणीमुळेच झाली आहे. मागील वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे 43 नगरसेवक होते, ते आता 27 वर (अधिक शरद पवारांचे 3) आले आहेत. आश्चर्य म्हणजे काँग्रेसच्या जागा वाढून 10 वरून 15 पर्यंत गेल्या. उबाठा सेनेला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले तर शिवसेनेला इथे खातेही उघडता आले नाही. पिंपरी- चिंचवडमध्ये एकूण 128 जागांपैकी भाजपने 84 जागा जिंकल्या. शिवसेनेला इथे 6 जागा, तर दोन्ही राष्ट्रवादी मिळून 37 जागा मिळाल्या.
 
काँग्रेसचा धुव्वा उडायचा तो उडाला. रवींद्र धंगेकर, रूपाली ठोंबरे (पाटील), वसंत मोरे अशा माध्यमांमध्ये जोर काढणार्‍या अनेकांना मतदारांनी त्यांची वास्तविक जागा दाखवून दिली.
 
 
पुण्यात लोकसभेपासून सुरू झालेली भाजपची विजयाची मालिका पालिकेतही कायम राहिली. निवडणुकीच्या प्रचारात तर कोलाहल बराच मोठा झाला होता. अगदी शरद पवारांनी भाजपशी सत्तासोबत करणार्‍या अजितदादांशी समेट केल्याने पवारांचे बिनीचे शिलेदार प्रशांत जगताप यांच्या राजीनाम्यापासून अनेक नाट्ये रंगली. जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व ते स्वतः निवडून आले, परंतु काँग्रेसचा धुव्वा उडायचा तो उडाला. रवींद्र धंगेकर, रूपाली ठोंबरे (पाटील), वसंत मोरे अशा माध्यमांमध्ये जोर काढणार्‍या अनेकांना मतदारांनी त्यांची वास्तविक जागा दाखवून दिली.
 
 
पुणे पालिकेत भाजपने सलग दुसर्‍यांदा स्वबळावर बहुमत मिळवले आहे. मध्यंतरीच्या 2023 च्या विधानसभा निवडणुकीचा (पोटनिवडणुकीचा) अपवाद वगळला, तर पुण्यात 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून भाजपची यशाची कमान चढती राहिली आहे. तेव्हापासून सर्व लोकसभा निवडणुका या पक्षाने जिंकल्या आहेत. विधानसभेसाठीही 2014 मध्ये सर्व आठ जागा, 2019 आणि 2024 मध्ये प्रत्येकी सहा जागा जिंकून अशीच कामगिरी राहिली आहे. मागील निवडणुकीत, 2017 मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस युतीची सत्ता उलथवून टाकताना भाजपला 97 जागा मिळाल्या होत्या. केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर पक्षाने टाकलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या मदतीने पुण्यात झालेल्या विकासकामांच्या आधारे भाजपला विजयाची खात्री होती. भाजपच्या राजवटीत मेट्रो रेल्वे सुरू झाली आणि नदी सुधारणा आणि विकासाचा मेगा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे, असे मोहोळ यांनी विजयानंतर सांगितले.
 
 
पिंपरीतील संग्राम
 
शेजारचे पिंपरी-चिंचवड म्हणजे अजितदादांची जहागिरीच जणू. अजितदादांची स्वबळावर जिंकण्याची मनीषा असलेली राज्यातील ही एकमेव महापालिका. या महापलिकेत ते 25 वर्षे सत्तेत होते आणि त्यातील 15-17 वर्षे तर त्यांचा एकछत्री अंमल होता. काँग्रेसचे नेते स्व. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर तिथे त्यांना आव्हान देणारे कोणीच उरले नव्हते. पिंपरी-चिंचवडचा ग्रामीण चेहरा बदलून त्याला शहरी तोंडवळा देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. परंतु 2017च्या निवडणुकीत त्यांचा हा बालेकिल्ला ढासळला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणारे आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनीच त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यानंतर दीड वर्षांतच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांचाही मावळ मतदारसंघात पराभव झाला. सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी भाजपाशी सोयर जोडल्यावरही अजितदादांची ती जखम भरलेली नाही.
 
अजितदादांची स्वबळावर जिंकण्याची मनीषा असलेली राज्यातील ही एकमेव महापालिका. या महापलिकेत ते 25 वर्षे सत्तेत होते आणि त्यातील 15-17 वर्षे तर त्यांचा एकछत्री अंमल होता. काँग्रेसचे नेते स्व. रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर तिथे त्यांना आव्हान देणारे कोणीच उरले नव्हते.
 
 
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर त्या पक्षातील तालेवार मानला जाणारा सगळा तगडा गट त्यांच्याकडे आला होता. विधानसभा निवडणुकीत त्यांनी काकांना नामोहरमही केले होते. त्यामुळेच ते अलीकडच्या काळात पुन्हा आक्रमक झाले होते. त्या पराभवाचा बदला घेऊन पुन्हा महापालिका हस्तगत करण्यासाठी अजितदादांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. भाजपला हादरवून टाकणारे कथित भ्रष्टाचाराचे मुद्दे त्यांनी उकरून काढले. त्यामुळे आधी एकतर्फीं वाटणार्‍या या निवडणुकीत त्यांनी रंग भरला. परंतु भ्रष्टाचाराच्या या आरोपांना विकासाच्या मुद्द्याने प्रत्युत्तर देत भाजपने अजितदादांची सगळी शस्त्रे बोथट केली. अखेरच्या टप्प्यात अत्यंत प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीत भाजपने 84 जागांसह जोरदार मुसंडी मारली. अजितदादांना थेट अंगावर घेणारे भोसरीचे आमदार महेश लांडगे हे या विजयाचे शिल्पकार ठरले. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे 77 नगरसेवक होते, त्यात सात जागांची वाढ झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 37 जागा जिंकल्या.
 
 
गेल्या 9 वर्षांत भष्ट्राचार आणि दहशत माजल्याचा मुद्दा काढून अजित पवारांनी पिंपरीत तळ ठोकला होता. विशेषतः आ. लांडगे यांना लक्ष्य करून त्यांनी भोसरीसह शहरात चौफेर सभा घेतल्या. शहराचा कारभार माझ्या हातात द्या, येथील दादागिरी मी मोडून काढतो आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करून दाखवितो, असा दावा अजितदादांनी केला. अजित पवारांच्या बेलगाम टीकेने भाजपचे वरिष्ठ नेतृत्व अस्वस्थ होते. मात्र, आ. लांडगे यांनी पवारांचे आव्हान स्वीकारले. बारामतीतून तुम्ही पिंपरी-चिंचवडचा काय विकास करणार, असा प्रश्न आ. लांडगेंनी केला. प्रचारादरम्यान पवार आणि लांडगे यांच्यामध्ये रंगलेले वाग्-युद्ध माध्यमांच्या कृपेने राज्यात चर्चेचा विषय ठरले. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली.
 
अजित पवारांच्या बेलगाम टीकेने भाजपचे वरिष्ठ नेतृत्व अस्वस्थ होते. मात्र, आ. लांडगे यांनी पवारांचे आव्हान स्वीकारले. बारामतीतून तुम्ही पिंपरी-चिंचवडचा काय विकास करणार, असा प्रश्न आ. लांडगेंनी केला.
 
 
अजितदादा आणि आ. लांडगे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून सुप्त राजकीय संघर्ष होताच. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने त्याला जाहीर तोंड फुटले. अजितदादांनी लांडगेंवर आरोपांच्या फैरी सुरू केल्या, तर लांडगेंनीही त्याला रांगड्या एकेरी भाषेत प्रत्युत्तर दिले. भाजप नेतृत्वाने, विशेषतः आ. शंकर जगताप यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांनी, यावर भाष्य करणे टाळले.
 
त्यामुळे आ. लांडगे यांच्यासाठी हा एकहाती लढा ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसच्याच तालमीत तयार झालेल्या आ. लांडगेंनी ते आव्हान स्वीकारले. भोसरी हा लांडगेंचा घरचा मतदारसंघ, त्याच भोसरीच्या मैदानात विजयसभा घेण्याची वाच्यता अजितदादांनी केली होती. प्रत्यक्षात भोसरी विधानसभा मतदारसंघातील 48 जागांपैकी 35 जागा मिळवून लांडगेंनी अजून तिथे आपलीच वट असल्याचे दाखवून दिले.
 
 
या संघर्षावर मुख्यमंत्री फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु त्यांनी केवळ एक सभा घेतली आणि विजय रॅली काढली. आपला संपूर्ण भर त्यांनी विकासावर दिला. टीकेला टीकेने प्रत्युत्तर न देता विकास हाच त्यांनी आपला केंद्रबिंदू ठेवला. त्यांच्या याच मुद्द्यावर पिंपरी- चिंचवडकरांनी शिक्कामोर्तब केल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.
 
 
पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात जगताप कुटुंबीयांचा करिष्मा अद्याप कायम असल्याचेही या निवडणुकीने सिद्ध केले. दिवंगत आ. लक्ष्मण जगताप यांनी 2017 मध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये परिवर्तन घडवून भाजपला सत्तेपर्यंत नेले होते. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार उलथण्याच्या आधी 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा व विधानपरिषद निवडणुकीत मुक्ता टिळक यांच्याप्रमाणेच लक्ष्मण जगताप यांनीसुद्धा रुग्णवाहिकेतून येऊन मतदान केलं होतं. अगदी गंभीर आजारी असतानाही मतदान करून त्यांनी भाजपच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यांच्या निधनानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होती. त्यांचे बंधू आ. शंकर जगताप यांनी निवडणूक प्रचारप्रमुख म्हणून यंदा धुरा सांभाळली.
 
 
पुण्यात व पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपशी लढण्यासाठी अजितदादांनी कुठलीही कसर ठेवली नाही. भगिनी सुप्रिया सुळे आणि पुतणे रोहित पवार तसेच खासदार अमोल कोल्हे यांनाही प्रचारात सहभागी करून घेतले. त्यांच्यासोबत संयुक्त रॅली आणि पत्रकार परिषदा घेतल्या. अगदी 70,000 कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याशी संबंधित आरोपांचीही राळ उडविली. परंतु फडणवीसांच्या कानमंत्राप्रमाणे मोहोळ व त्यांच्या सहकार्‍यांनी शाब्दिक संघर्ष न करता फक्त विकासावर लक्ष केंद्रित ठेवले.
 
 
शायरीची जुगलबंदी
 
प्रचारादरम्यान फडणवीस आणि अजितदादा यांच्यात जुंपलेली शायरीची जुगलबंदी हीसुद्धा चर्चेचा बिंदू ठरली. एकीकडे अजितदादा आणि लांडगे यांच्यात शाब्दिक हमरीतुमरी होत असताना फडणवीस यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून दादांना चिमटा काढला. लेखाच्या सुरुवातीला उद्धृत केलेला शेर हा त्यातीलच. हा शेर ऐकवून त्यांनी आ. लांडगे यांना बळ देतानाच संयम बाळगण्याचाही सल्ला दिला.
 
 
त्यावर अजितदादांनीही,
 
हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता,
कई सपनें घमंड और गलत दिशा में टूट जाते हैं!
हुनर की बातें करने से कुछ नहीं होता,
जमाना उसी को पहचानता है,
जो मैदान में उतर के साबित करे!
अशा शायरीच्या माध्यमातूनच उत्तर दिले.
 
 
त्याच्या दुसर्‍याच दिवशी झालेल्या सभेत फडणवीस यांनी ’क्यूं पडे हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में!’ या वाक्यासरशी या वादविवादाला पूर्णविराम दिला. फडणवीसांचे तेच वाक्य या राजकीय नाट्याचे भरतवाक्य ठरले.
 
साठमारीतील पालापाचोळा
 
जेव्हा दोन हत्ती भांडतात तेव्हा गवत चिरडले जाते, अशी एक आफ्रिकी म्हण आहे. एकीकडे फडणवीस आणि अजितदादांच्या रूपात दोन हत्ती भांडत होते, दुसरीकडे इतर पक्ष पालापाचोळा होऊन चिरडले जात होते. राष्ट्रवादी (शरद पवार गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसचा या निवडणुकीत धुव्वा उडाला. भाजप आणि राष्ट्रवादीतच इतकी जुंपली होती की इतर पक्ष खिजगणतीतही उरले नाहीत. उबाठा सेनेने 48, काँग्रेसने 55 तर मनसेने एक जागा लढविली होती परंतु हे तीनही पक्ष शून्यवत नव्हे, तर शून्यच ठरले. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत एका जागेवर विजय मिळाला होता, तीसुद्धा जागा गमवावी लागली.
 
 
त्याहूनही वाईट अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची झाली. एकसंघ असताना जवळजवळ अडीच दशके ज्या पालिकेवर शरद पवारांची हुकूमत होती, तिथे त्यांच्या गटाला भोपळाही फोडता आला नाही.
 
 
पश्चिम महाराष्ट्रात इतरत्र पाहता इचलकरंजी (व मराठवाड्यातील जालन्यात) पहिल्यांदाच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने बाजी मारली. कोल्हापूरमध्ये काँग्रेसने चांगली लढत दिली. तिथे सतेज पाटलांनी विधानसभा निवडणुकीत स्वपक्ष असलेल्या काँग्रेसने त्यांचा खेळखंडोबा केला. परंतु त्यानंतरही हिम्मत न हारता भाजपच्या विरोधात त्यांनी रान उठवले. मात्र भाजपने तिथे पहिल्यांदाच विजय मिळविला, त्यातून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाला झळाळी मिळाली. चंद्रकांतदादांच्याच प्रयत्नातून शेजारच्या सांगलीतही सलग दुसर्‍यांदा भाजपने बहुमत मिळविले. तिथे विश्वजित कदम व विशाल पाटील यांनी चांगली लढत दिली. तिथे अजितदादांच्या राष्ट्रवादीनेही मोठी मजल मारली. दुसरीकडे लातूर व परभणीत काँग्रेसने सत्ता राखली. याचाच अर्थ शर्थीने प्रयत्न केले तर विरोधकांनाही विजय मिळू शकतो. शाई पुसणे किंवा मतदान यंत्रात मते भरणे असे पोरकट आरोप करणार्‍यांना ती चपराक आहे.
 
 
भाजपने जे यश मिळविले, ते फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या अथक प्रयासांचे फळ आहे. परंतु दे रे हरी खाटेवरी या वृत्तीने आयते यश मिळवू पाहणार्‍यांना तो विजय कधीही लाभणार नाही, हेही तेवढेच खरे. फडणवीसांच्या ’हुनर बोलते हैं!’ याचा हा अर्थ आहे.
देविदास देशपांडे
8796752107
Powered By Sangraha 9.0