डॉ. श्रीहरी हसबनीस
9022651287 / 7588034068

कोकणच्या निसर्गाशी आणि शेतकर्यांच्या जीवनाशी अतूट नातं असलेल्या नारळाचा उद्योग आज उत्पादन घट, कीड व व्यवस्थापन यामुळे अडचणीत आहे. माडांचे आरोग्य सुधारले तरच नारळ उत्पादन वाढेल आणि शेतकर्यांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित होईल, हीच या लेखाची मध्यवर्ती भूमिका आहे.
नारळ हा ओले खोबरे आणि शहाळे पाणी यासाठी खूपच नित्याच्या वापरात आहे. कोकण प्रदेश हा भारतातील नारळ उत्पादनासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. भरपूर पाऊस, उष्ण-आर्द्र हवामान आणि सुपीक जमिनी यामुळे कोकणात माडांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. याशिवाय देशावर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील नारळाची शेती नाही, पण नारळाची झाडे बांधावर, घराभोवती, बंगल्याभोवती लावण्याची आणि त्यापासून नारळ फळ मिळवण्याची पद्धत सर्वसामान्य आहे.
वर म्हटल्याप्रमाणे नारळाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन येत होते. पण आज मात्र उत्पादन घटलेलं आहे. नारळाच्या किमती सुद्धा घटलेल्या उत्पादनामुळे तसेच वाढलेल्या मागणीमुळे खूपच वाढल्या आहेत. अगदी किरकोळ बाजारात चांगला नारळ 50 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. साधारणपणे एका माडाच्या झाडापासून वर्षाकाठी 200 पर्यंत नारळ मिळाले पाहिजेत. अगदी कमी म्हटलं तरी सरासरी शंभर नारळ प्रति झाड प्रति वर्ष मिळाले पाहिजेत. आजकाल काही खाजगी कंपन्या, खाजगी नर्सरी थायलंड, मलेशिया इ. जातींची रोपे देऊन तीन वर्षांपासूनच नारळ सुरू होतात आणि प्रति झाड 300 नारळ येतात, असेही सांगत आहेत.
आपणाकडे प्रचलित आणि सर्वत्र दिसणारी लोकप्रिय अशी नारळाची जात म्हणजे ’बाणावली’ किंवा ’वेस्ट कोस्ट टॉल’. ही झाडे गर्द हिरव्या रंगाच्या पानांची, तसेच गर्द हिरव्या रंगाच्या फळांची असतात. खूप उंच वाढतात. या झाडांचं उत्पादकता आयुर्मान सुद्धा खूप चांगलं आहे. या जातीमध्ये खोबर्याची प्रत म्हणजे जाडी आणि चव अप्रतिम. आपल्या विषयाच्या अनुषंगाने, उत्पादनात येणारी घट किंवा आलेली घट आणि त्याची कारणमीमांसा याप्रमाणे, कोणत्याही पीक उत्पादनात अनुकूल हवामान पाण्याची उपलब्धता आणि जमिनीची प्रत हे तीन मुख्य घटक आहेत. हे तीनही घटक अनुकूल असणार्या ठिकाणी सुद्धा आज नारळाचे उत्पादन घटलेलं आहे. या सर्वच बाबींवरती लिखाण करावयाचे झाल्यास मोठा लेख होईल, पण खालील ठळक बाबींकडे लक्ष दिल्यास उत्पादनात घट आल्याची कारणे लक्षात येतील आणि त्यावरती मात करणे शक्य होईल व सुधारणा करणे जमेल.
लागवडीचे अंतर
नारळाच्या दोन झाडांमध्ये अंतर हे दहा मीटर असावे, किमान हलक्या जमिनीत आठ मीटर असावेच. कोकणातील जुन्या लोकांची नारळाबाबत एक म्हण आहे की, लागे तो न लाघे, आणि न लागे तोची लाघे. इथे लाघे याचा अर्थ त्याला येणारं उत्पन्न आणि लागणे याचा अर्थ की ज्याची पाने एकमेकांना लागतात. अति जवळ किंवा वर निर्दिष्ट अंतराच्या पेक्षा कमी अंतराने लागवड केल्यामुळे उत्पादनात घट येत आहे.
नारळ रोप लावताना ते लहान असते. दिसायलाही खूपच लोभस वाटते आणि बहुसंख्य लोक इथेच चुकतात. लावताना लहान आहे, परंतु दहा वर्षानंतर, वीस वर्षानंतर ते किती अंतरापर्यंत पसरणार आहे याचा विचार केला जात नाही. बरेचशे शेतकरी दोन झाडांतील अंतर फक्त दहा फूट किंवा त्यापेक्षाही कमी ठेवून लागवड करतात. अशा सर्व झाडांची पाने एकमेकांना लागतात. ही झाडे सूर्यप्रकाश आणि अन्न मिळवण्यासाठी एकमेकांशी मोठ्या प्रमाणात स्पर्धा करतात. या स्पर्धेमध्ये ते फक्त आणि फक्त शाखीय वाढ (व्हेजिटेटीव्ह ग्रोथ) इकडेच आपले सर्व बळ खर्च करतात. उत्पादकतेकडे मात्र तितकीशी एनर्जी शिल्लक नसते. परिणामी उत्पन्न नगण्य मिळते. आंबा, पेरू अशा पिकांमध्ये घन लागवड / अति घन लागवड ही पद्धत प्रचलित झाली. कारण, या पिकांमध्ये छाटणी करता येते. नारळ, सुपारी अशा फळ झाडांमध्ये छाटणी करता येत नाही. आणि म्हणूनच अशा झाडांची लागवड करताना दोन झाडातील अंतर, दोन ओळीतील अंतर हे झाडे लावतानाच लक्षपूर्वक ठेवले पाहिजे. याचा निकाल अर्थात उत्पन्न मिळण्यासाठी मोठा कालावधी सात ते दहा वर्षे जातात. त्यानंतर दुरुस्त करणे दुरापास्त. त्याला थोडंसं मनाचे धाडस हवं. तीस फूट म्हणजे दहा मीटर अंतरात समजा, तीन झाडे असतील, तर मधलं झाड काढायचं आणि ते दुसरीकडे पावसाळ्यात लावायच. हो, नारळ अशी लावून जगतातच. थोडीशी काळजी घेतली पाहिजे.
जो नारळ काढावयाचा आहे, त्याची सर्व पाने (सुरळीचे पान सोडून) छाटून टाकावीत. जिथे नेऊन लावायचा आहे तिथला खड्डा जेसीबीने किंवा माणसांच्या करवी काढून खत-माती घालून तयार ठेवावा. परंतु न भरता म्हणजे खड्ड्याच्या वरच्या बाजूला खत, माती, पालापाचोळा तयार ठेवायचा. साखरेचे जे बारदान असतं त्याचा उपयोग झाड काढून त्यात बांधून पुन्हा या बारदानासहित तयार केलेल्या खड्ड्यात लावण्यासाठी चांगला होतो. या साखरेच्या बारदानाची उभी एक बाजू उसवावी किंवा फाडावी. जे नारळाचं झाड स्थलांतरित करावयाचा आहे, तिथे जेसीबीने तीन बाजूने माती काढून रिकामी करावी. उसवलेले बारदान अशा रितीने खाली धरावे की नारळाचा वरच्या थरातील बहुतांश मुळ्यासहित गठ्ठा जेसीबीच्या खोर्याने सहज, अलगद बारदानात येऊन पडेल. नंतर बारदानाच्या दोन्ही बाजू या मातीच्या गठ्ठ्याभोवती गुंडाळाव्यात. काथ्याने गठ्ठा घट्ट बांधावा. असा बांधलेला गठ्ठा त्याच दिवशी काही तासांच्या आतच तयार केलेल्या खड्ड्यात नेऊन उभा करावा. वर जमा केलेली माती, पालापाचोळा, खत याने खड्डा पूर्ण भरावा. पाणी द्यावे. झाड जगणार. हे स्थलांतर पावसाळ्यात पण कमी पाऊस असताना करावे. सारांश दोन नारळ झाडातील अंतर 10 मीटर जोपासले तर उत्पादन मिळेल.
उंदीर व खारूटीचा प्रादुर्भाव
याखेरीज नारळ उत्पादन घटनेचे आणखीन एक समस्या म्हणजे उंदीर आणि खारुटी यांचा प्रादुर्भाव. नारळाच्या वरती खोबडीमध्ये बरेचसे उंदीर आपली घरटी करतात, पिल्ले घालतात. बर्याच वेळेला नारळाच्या झाडाच्या खाली कोवळी फळे पडलेली दिसतात. उचलून पाहिलेत तर देठाकडील भाग हा कुरतडलेला असतो. हा कुरतडण्याचा जो प्रकार दिसतो तो खारुटी आणि उंदीर यांच्यामुळे. झाडांच्यावरती उंदीर किंवा खारुट्टी गेलीच नाही पाहिजे, यासाठी त्यांना अटकाव करणे. दीड फूट उंचीचा पत्रा झाडाच्या खोडाभोवती जर गुंडाळून लावला तर त्यावरून उंदीर आणि खारुटी यांना वरती जात येत नाही. बर्याच ठिकाणी हा उपाय करतात आणि तरीही तक्रार की, आमच्याकडे नारळ उंदीर आणि खारुटी यांच्यामुळे फळे खाली गळून पडतात. कारण या नारळाच्या झावळ्या इतर झाडांना किंवा घराच्या भिंतीला, बंगल्याच्या खिडक्यांना चिकटलेल्या असतात. त्यावरून उंदीर पुन्हा झाडाच्या शेंड्याकडे जातात. एका झाडावरून दुसर्या झाडावर सुद्धा जातात. पत्रा लावून सुद्धा प्रादुर्भाव कमी होत नाही. वर्षातून एकदा नारळाची वरच्या शेंड्याच्या भागाची स्वच्छता केली पाहिजे. खराब झालेल्या झावळ्या, त्याच्याभोवती गुंफलेला सुका भाग, काढून उंदराची घरटी असतील तर ती नायनाट करून स्वच्छ केली पाहिजेत. असे छोटे छोटे उपाय योजले तर नारळाच्या कोवळ्या फळांचं, फुलोर्याचं उंदीर आणि खारुटीपासून संरक्षण होईल.
गेंडा भुंग्याचे निर्मूलन
आणखीन एक महत्त्वाचा भाग की, बर्याच नारळांच्या वरती म्हणजे जे कुपोषित आहेत, त्यांच्यावर गेंडा भुंगा याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसतो. त्याचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी नारळाच्या झाडावर चढण्याची गरज नाही. लांबून 100 मीटर वरून सुद्धा तुम्हाला गेंडा भुंग्याचा प्रादुर्भाव झाले आहे किंवा नाही ओळखता येते. ज्या नारळाच्या झाडाची हिरवी पाने फॅनसारखी एका रेषेत कापलेली दिसतात. (चित्र दिले आहे त्याप्रमाणे) तिथे समजावे की आतमध्ये गेंडा भुंग्याच्या अळीने सुरळी बाहेर येण्यापूर्वीच खाल्ली. बाहेर पान आल्यानंतर एका ओळीत फॅन सारखे पान कापलेले दिसते. हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी दोन साधे उपाय आहेत.
गेंडा भुंगा मादी आणि नर शेणाच्या वासाकडे आकर्षित होतात. नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ किंवा आसपास शेण रबडी भरलेली डबे किंवा प्लास्टिकचे कॅन अडकून म्हणजे लटकवून ठेवावेत. त्यात पाणी कमी झाल्यास पुन्हा पाणी टाकावे. त्या वासाने हे नर-मादी येऊन शेणात पडतील. तिथून काढून ते मारून टाकता येतील. म्हणजे त्यांचा जीवनक्रम इथे आपण अशा रीतीने थांबवू शकतो.
दुसरा आणखीन एक रामबाण उपाय असा आहे की, नारळाच्या झाडावर चढणार्या माणसाकडून अगदी सुरळीजवळच्या दोन-तीन झावळ्यांच्या खोबणीमध्ये बारीक चाळलेली वाळू ठासून भरावी. दोन लीटर पाण्याची प्लास्टिकची बाटली घेऊन त्यात कीडनाशक भरावे. त्या बाटलीला म्हणजे तिच्या टोपणाला अतिशय बारीक असं तापलेल्या तारेने छिद्र पाडावे की ज्यातून पाणी चुळकी न येता, थेंब थेंब पडत राहील.
आता या बाटलीमध्ये कीडनाशक (रासायनिक उपाय नको आहे त्यांनी) स्पिनोसॅड नावाचे कीडनाशक जे जैविक आहे ते तीन मिली प्रति दहा लीटर या प्रमाणात द्रावण तयार करून बाटलीत मिसळावे. अशा बाटल्या वाळू भरल्यानंतर सुरळीच्या जवळच्या खोबणीमध्ये ठेवावे. हे द्रावण हळूहळू वाळूमध्ये झिरपत जिथे गेंडा भुंग्यामुळे सुरळी खाल्ली जाणार आहे तिथे पोहोचेल. त्या किडीच्या पोटात विष जाईल. ती आतल्या आत मरून जाईल. दोन महिन्यानंतर येणारी सुरळी न कातरलेली आली म्हणजे खात्री झाली की आत गेंडा भुंगा मेला. जर पुन्हा सुरळी अशीच आली तर मात्र आपलं टाकलेले कीडनाशक गेंडा भुंगा आत जिथे खातोय तिथे पोचलेले नाही, असे निष्कर्ष काढून पुन्हा विषप्रयोग केला पाहिजे.
वर्षातून एकदा हे निरीक्षण घेऊन करावे. ज्या झाडाची पाने कापलेली नसतात तिथे हे करण्याची गरज नाही. परंतु ज्या झाडांची पाने दुरून सुद्धा एका रेषेत कापल्यासारखी दिसतात, तिथे मात्र हा उपाय वारंवार केला पाहिजे.
- निवृत्त कृषी अणुजीव शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख,
वनस्पती रोग शास्त्र कृषी महाविद्यालय, पुणे 411005
प्रस्तावित श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ, डेरवण, चिपळूण, जि. रत्नागिरी
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट , डेरवण, चिपळूण, जि. रत्नागिरी 415606