बिहारप्रमाणेच केरळमध्ये तावडे कमळ फुलवणार का?

विवेक मराठी    21-Jan-2026
Total Views |
Vinod Tawde
 
 
मुंबई : दक्षिणेकडील कर्नाटक वगळता अजूनही भाजपाला अपेक्षित असे यश मिळालेले नाही. त्यामुळे देशातील इतर राज्यात सत्ता असतांनाही भाजपाला मात्र दक्षिणेकडे सत्तेसाठी अजूनही संघर्ष करावा लागत आहे. यावर्षांत केरळमध्ये निवडणुका होणार आहेत आणि यासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. यासाठी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे केरळ निवडणूक प्रभारीपदाची जबादारी देण्यात आली आहे.
 
विनोद तावडे यांच्याकडे उत्तम संघटन कौशल आहे. नुकत्याच झालेल्या बिहारचे निवडणूक प्रभारी म्हणून विनोद तावडे यांच्यावर भाजपाने जबाबदारी दिली होती. बिहारमध्ये त्यांनी भाजपाचे उत्तम संघटन निर्माण केले होते. जबादारी मिळताच त्यांनी नितीश कुमार यांच्याशी जवळीक साधून राजदशी युती तोडून पुन्हा भाजपाबरोबर येण्यास तयार केले होते. निवडणुकीत प्रभारी म्हणून काम करतांना ते बिहारमध्ये तळ ठोकून होते. अमित शहांसोबत त्यांनी निवडणुकीचे मायक्रो मॅनेजमेंट करण्यात योगदान दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा कुठे होईल, तसेच इतर नेत्यांच्या सभा, रोड शो कुठे घ्यायचे याबाबत त्यांनी अत्यंंत अभ्यासपूर्ण नियोजन केले. याचे प्रतिबिंब एनडीएला अनुकूल अशा लागलेल्या निकालात पडलेले दिसले. बिहारची सुप्रसिद्ध युवा गायिका मैथिली ठाकूर हिला भाजपात प्रवेश देऊन अलीपूरसारख्या काँग्रेसच्या बाल्लेकिल्ल्यातून निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. एकंदरीत त्यांचे काम भाजपाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे आगामी होणार्‍या केरळच्या विधानसभा निवडणुकीची जबादारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. बिहारसारखेच ते केरळमध्येही भाजपाचे उत्तम संघटन निर्माण करून भाजपाला केरळात भाजपाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणतील अशी अपेक्षा पक्षाला आहे.