डॉ. आनंद कापसे यांना कै. मधुकरराव महाजन स्मृती पुरस्कार प्रदान

विवेक मराठी    22-Jan-2026
Total Views |
awarded
मुंबई : “माझी कारकीर्द ही साठे घराण्यापासूनच झाली. हा पुरस्कार साठे घराण्याशी संबंधित आणि अतिशय सेवावृत्तीने काम करणारे महानुभव असे कै. मधुकरराव महाजन यांच्या नावे मिळतो आहे हे माझ्यासाठी विशेष आहे. तसेच या पुरस्काराचे पहिले मानकरी माधवराव काणे होते, हे कळल्यावर एक वर्तुळ पूर्ण झाल्याची माझी भावना आहे. माझ्या आयुष्यावर ज्या व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव आहे. ज्या पिढीपासून आमच्या पिढीने संस्कार घेतले. त्यांची कामे उत्तुंग आहेत, त्या समोर माझे काम नगण्य वाटते. त्यांना दिला गेलेला पुरस्कार आपल्यालाही मिळतो आहे, याचा अर्थ आपण त्यांनी दाखविलेल्या दिशेने मार्गक्रमण करतो आहे याची ही पावती आहे असे मला वाटते. आणि म्हणून हा पुरस्कार घेताना कृतार्थ वाटते, असे सत्कारमूर्ती डॉ. आनंद कापसे यांनी आपले मनोगत सादर करताना म्हटले. यंदाचा कै. मधुकरराव महाजन स्मृती पुरस्कार डॉ. आनंद कापसे यांना 9 जानेवारी 2026 रोजी, हिंदुजा रुग्णालयाचे निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद लेले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
 
डॉ. आनंद कापसे पुढे मनोगतात म्हणाले,“माझे बाबा आणि त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रांतील मित्रपरिवार यांचाही माझ्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव आहे. माझ्या हातून आज जे काही काम उभे राहत आहे याचे श्रेयही त्यांचेच. त्यातील एक संस्कार म्हणजे वयाच्या साठीनंतर कोणत्याही पदाचा मोह न ठेवता आपली जेवढी शक्ती आहे ती समाजकारणासाठी उपयोगी आणावी. हा संस्कारच वैयक्तिक निर्णय घेताना मार्गदर्शक ठरला. पालघरला ज्या उद्देशाने गेलो, त्याचबरोबर अनेक उद्देश खुणावू लागले आणि त्याची पूर्तता समाजातील सज्जनशक्तीच्या दातृत्व भावनेने पूर्णत्वास येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार, थोरामोठ्यांचे आशीर्वाद आणि सज्जनशक्तीच्या पाठिंब्यामुळे समाजासाठी काम करण्याची ऊर्जा मिळाली.” असेही त्यांनी सांगितले.
 
 
कै. मधुकरराव महाजन हे जनसंघाचे संस्थापक सदस्य व मुंबईचे पहिले संघटन मंत्री होते. समाजातील ज्या लेखकांनी- साहित्यिकांनी, उद्योजकांनी आणि समाजसेवकांनी त्यांच्या आयुष्यात आपापल्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली. त्यांच्या या ध्येयवादी कार्याची प्रेरणा समाजातील पुढील पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने कै. मधुकरराव महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने हा पुरस्कार गेली काही वर्षे दिला जातो. समाजकारण, साहित्य-पत्रकारिता व उद्योग क्षेत्रातल्या व्यक्तींना हा पुरस्कार एक वर्षाआड देण्यात येतो. कै. माधवराव काणे, ज्येष्ठ संपादक श्री.ग.माजगावकर, आदरणीय चं.प.भिशीकर, ज्येष्ठ विचारवंत-संविधानाचे गाढे अभ्यासक-विवेकचे माजी संपादक रमेश पतंगे, ज्येष्ठ विचारवंत ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे, ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन, उद्योजक विमलजी केडिया आणि सा. विवेकच्या संपादक कविता (अश्विनी) मयेकर आदींना आतापर्यंत हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
 
 
डॉ. आनंद कापसे हे होमिओपॅथीमध्ये ‘एमडी’ आणि शिक्षण व्यवस्थापन ‘एमबीए’ पदवीधर असून, कल्याण येथे त्यांचा यशस्वी वैद्यकीय व्यवसाय सुरू होता. मात्र, प्रा. डॉ. ढवळे यांच्या स्मरणार्थ पालघर येथे सुरू झालेल्या दवाखान्यातून सेवाकार्य सुरू करत, ग्रामीण आणि आदिवासी भागात आरोग्यसेवेचे महत्त्व त्यांनी ओळखले. दर्जेदार आरोग्यसेवेसाठी कुटुंबासह पालघर येथे स्थायिक होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
 
 
आज पालघर येथील रुग्णालयाचा बहुआयामी विकास झाला असून, भारतातील मोजक्या ठिकाणी चालणारा होमिओपॅथी ‘एम.डी.’ अभ्यासक्रम येथे सुरू आहे. कल्याण येथील ‘सदिच्छा’ संस्थेच्या माध्यमातून बौद्धिक दिव्यांग मुलांसाठी विद्यालय, दिव्यांगासाठी व्यवसाय प्रशिक्षण आणि पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे. ‘सेवाप्रकल्पांचे मार्गदर्शक आणि अनुभवी डॉक्टर’ म्हणून डॉ. आनंद कापसे यांची ओळख आहे. डॉ. कापसे यांच्या 35 पेक्षा अधिक वर्षांच्या वैद्यकीय सेवेसोबतच आदिवासी आणि वंचित भागात केलेल्या समाजोपयोगी कार्याची दखल घेत यंदाचा ‘कै. मधुकरराव महाजन स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या देवधर यांनी केले. मान्यवरांचा परिचय आणि स्वागत इरा कुलकर्णी आणि रोहिणी कुलकर्णी यांनी केला. डॉ. कापसे यांचा परिचय आणि त्यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन सलोनी देवधर यांनी केले. यावेळी ‘राष्ट्र सेविका समिती’च्या सुशीला महाजन, सलोनी देवधर, डॉ. विद्या देवधर आणि सुरेश साठे आदी मान्यवर उपस्थित होते. आभारप्रदर्शन डॉ. विद्या देवधर यांनी केले.