स्टॅलिनची हार आणि सनातनचा विजय

22 Jan 2026 17:49:31
तामिळनाडूचे वर्णन वेदांची भूमी असे केले गेले आहे, जिथे सनातन संस्कृतीचे सार जपले गेले आहे, मग स्टॅलिन यांना कोणती ओळख उखडून काढायची आहे? तसे ते त्यांनी आधीपासून ठरवलेच आहे, कारण त्यांचा भारतीयच काय पण तमिळ संस्कृतीशी अगदी नावापुरताही संबंध नाही. त्यांचे नावच मुळी नरपिशाच म्हणता येईल अशा रशियातील स्टॅलिनकडून त्यांनी उसने घेतले आहे. तेव्हा ते स्टॅलिनप्रमाणेच आपल्या विरोधकांच्या नरसंहाराची भाषा बोलणार, यात नवल ते काय? पण त्यांचे ढोंग न्यायालयात उघडे पडले आहे.
 
vivek
 
एम. के. स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन उपमुख्यमंत्री आहेत, जे सत्ताधारी द्रमुक पक्षातील घराणेशाहीच्या राजकारणाचे एक प्रमुख उदाहरण आहे. यांची व यांच्या द्रमुक पक्षाचीही परंपरा काय आहे याबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाच्या न्यायमूर्ती एस. श्रीमथी म्हणाल्या की, उदयनिधी ज्या पक्षाचे सदस्य आहेत, त्या पक्षाने सनातन धर्माविरुद्ध वारंवार विधाने केली आहेत. हे स्पष्ट आहे की, गेल्या 100वर्षांपासून द्रविडर कळघम (डीके) आणि त्यानंतर द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), ज्या पक्षाचे हे मंत्री सदस्य आहेत, यांच्याकडून हिंदू धर्मावर स्पष्ट हल्ला होत आहे. न्यायालयाने आपल्या निकालात अशी टिप्पणी करण्याचे कारण ठरले आहे उदयनिधी यांनी बेमुर्वतखोरपणे केलेले विधान. सप्टेंबर 2023 मध्ये तामिळनाडू प्रोग्रेसिव्ह रायटर्स आर्टिस्ट्स असोसिएशनने चेन्नईमध्ये आयोजित केलेल्या एका परिषदेत उदयनिधी यांनी सनातन धर्मावर टिप्पणी करताना म्हणाले होते, काही गोष्टींना संपवलेच पाहिजे. त्या अर्थाने, सनातनलाही संपवले पाहिजे. आपण डास, डेंग्यू, कोरोना व्हायरस यांचा प्रतिकार करू शकत नाही. त्यांना संपवलेच पाहिजे.
 
 
तेव्हा भाजपा नेते अमित मालवीय यांनी एक्सवर पोस्ट केले होते: मंत्र्यांनी सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली आहे. त्यांच्या मते सनातनला समूळ नष्ट केले पाहिजे. ते सनातन धर्माचे पालन करणार्‍या भारतातील 80% लोकसंख्येच्या वंशसंहाराची हाक देत आहेत. आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना उदयनिधी यांनी म्हटले होते, मी सनातन धर्माचे पालन करणार्‍या लोकांच्या वंशसंहाराची हाक कधीही दिली नाही... सनातन धर्माचा नायनाट करणे म्हणजे मानवता आणि समानतेचे समर्थन करणे. एकेकाळी विविध अनिष्ट भेदभावपूर्ण अंधरूढी हिंदू धर्माचा भाग समजून त्यांचे धर्मासकट उच्चाटनाचा विचार मांडला जात होता, पण काळाच्या ओघात हिंदू समाज हा प्रगल्भ झालेला असून त्याने विषमतेला तिलांजली देत समरसतेचा विचार स्वीकारला आहे, हे उदयनिधी यांच्या गावीही नाही. उदयनिधी यांच्या सनातन धर्मावरील मूळ टिप्पण्यांना विकृत केल्याबद्दल तिरुची शहर पोलिसांनी 2023 मध्ये अमित मालवीय यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता, जो मदुराई खंडपीठाने 20 जानेवारी 2026 रोजी रद्द केला. न्यायमूर्ती एस. श्रीमथी यांनी निरीक्षण नोंदवले की, मालवीय यांनी केवळ मंत्र्यांनी केलेल्या भाषणावर प्रतिक्रिया दिली होती आणि अशा प्रतिक्रियेबद्दल त्यांच्यावर कोणतीही कारवाई सुरू ठेवणे हा कायद्याचा गैरवापर ठरेल... त्यांनी मंत्र्यांच्या भाषणातील गर्भितार्थावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, असे दिसते.
 
 
न्यायमूर्तींनी पुढे म्हटले की, उदयनिधी यांनी जे म्हटले होते तेच द्वेषपूर्ण भाषण (हेट स्पीच) होते. मालवीय यांचाही युक्तिवाद होता की, मंत्र्यांचे विधान स्वतःच गंभीर स्वरूपाचे आहे आणि त्यात सनातन धर्म पाळणार्‍या भारतातील बहुसंख्य नागरिकांविरुद्ध द्वेष भडकवण्याची आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याची क्षमता आहे. आपण मंत्र्यांनी केलेले भाषण, जे आधीच माध्यमांमध्ये होते, तेच घेतले आणि त्याचा उद्देश आणि प्रयोजन यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायमूर्तींच्या मते, जेव्हा मंत्र्यांनी द्वेषपूर्ण भाषण केले होते, तेव्हा त्या द्वेषपूर्ण भाषणाचा विरोध करणार्‍या याचिकाकर्त्याला गुन्हा केल्याचे मानले जाऊ शकत नाही. याचिकाकर्त्याने मंत्र्यांचा अर्थ 80% लोकसंख्येचा वंशसंहार असा आहे का, असा प्रश्न विचारला होता, त्यांनी कोणत्याही लोकांना मंत्री किंवा त्यांच्या पक्षाविरुद्ध कोणतेही आंदोलन सुरू करण्यास सांगितले नाही, तर केवळ वस्तुस्थिती मांडली आहे आणि मंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. याचिकाकर्त्याची पोस्ट प्रश्नाच्या स्वरूपात आहे आणि त्यात उत्तराची मागणी केली आहे, आणि त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या कोणत्याही कलमांचे उल्लंघन होत नाही, असे न्यायाधीश म्हणाल्या.
 
 
स्टॅलिन यांच्या विचारधारेचा मुख्य आधार हा उत्तर आणि दक्षिण यांच्यातील विरोधाभास राहिलेला आहे. त्यामुळे तमिळ आणि सनातन संस्कृतीमधील समानता ते सतत नाकारत आहेत. खरे तर तमिळ संस्कृती ऐतिहासिकदृष्ट्या व्यापक सनातनशी म्हणजे हिंदू धर्माशी गुंफलेली आहे. तेथील साहित्यात शिव, विष्णू (पेरुमाळ), मुरुगन यांसारख्या हिंदू देवतांचा उल्लेख आहे, जे वैदिक परंपरेत आढळणार्‍या समान देवतांचे प्रतिबिंब आहेत. वैदिक आणि आगम परंपरा पाहिली तर तमिळमध्ये मराई म्हणून ओळखले जाणारे वेद प्राचीन तमिळकाममध्ये धार्मिक स्रोत मानले जातात. शिवाय, तमिळनाडूमधील मंदिरातील पूजाविधी आगमांमध्ये खोलवर रुजलेला आहे, जे व्यापक सनातन आध्यात्मिक परंपरेचा भाग मानले जातात. कांचीपुरम हे ’हजार मंदिरांचे शहर’ म्हणून ओळखले जाणारे हे शहर आदि शंकराचार्यांच्या प्रभावामुळे अद्वैत वेदांताचे केंद्र बनले. या दोन्ही परंपरांमध्ये कर्म, धर्म, मोक्ष आणि आत्म्याच्या अमरत्वावरील विश्वास यासारख्या मूलभूत संकल्पना आहेत. रामायण आणि महाभारत हे तमिळ संस्कृतीत खोलवर रुजलेले आहेत, या महाकाव्यांचे संदर्भ प्राचीन तमिळ साहित्यात आढळतात. भक्ती चळवळ ही उत्तर भारताइतकीच दक्षिणेतही विस्तारली आहे. तामिळनाडूतील भक्ती चळवळीचे नेतृत्व 63 नायन्मार (शैव संत) आणि 12 आळवार (वैष्णव संत) यांनी केले व त्यांचे साहित्य सनातन तत्त्वज्ञानाला पायाभूत मानले जाते. तमिळ भाषेमध्ये अनेक संस्कृत शब्द आहेत आणि संस्कृतमध्ये तमिळ शब्दांचा समावेश आहे. तेथील चोळ, पल्लव आणि पांड्य राजघराण्यांनी या दोन्ही भाषांच्या संवर्धनाची भूमिका निभावली. तामिळनाडूचे वर्णन वेदांची भूमी असे केले गेले आहे, जिथे सनातन संस्कृतीचे सार जपले गेले आहे, मग स्टॅलिन यांना कोणती ओळख उखडून काढायची आहे? तसे ते त्यांनी आधीपासून ठरवलेच आहे, कारण त्यांचा भारतीयच काय पण तमिळ संस्कृतीशी अगदी नावापुरताही संबंध नाही. त्यांचे नावच मुळी नरपिशाच म्हणता येईल अशा रशियातील स्टॅलिनकडून त्यांनी उसने घेतले आहे. तेव्हा ते स्टॅलिनप्रमाणेच आपल्या विरोधकांच्या नरसंहाराची भाषा बोलणार, यात नवल ते काय? पण त्यांचे ढोंग न्यायालयात उघडे पडले आहे.
Powered By Sangraha 9.0