देशभक्ती ही फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यादिवशी नारेबाजी करण्यापुरती किंवा भाषणे देण्यापुरती मर्यादित नसते. देशाप्रती असलेले प्रेम आपण कोणत्याही स्वरूपात दाखवू शकतो. देशभक्ती ही ओढून-ताणून आणायची गोष्ट नाही, ती तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून, विवेकातून आणि मनातून आपोआप उमटली पाहिजे. आपल्या सर्वांना सीमेवर जाऊन लढता येणार नाही, पण राष्ट्रध्वजाची आन, बान आणि शान तर नक्कीच राखू शकतो. 26 जानेवारीच्या निमित्ताने ज्यांनी आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढावा यासाठी पुढाकार घेतला असे ‘फ्लॅग मॅन ऑफ इंडिया’ उद्योजक डॉ. राकेश बक्षी यांच्या कार्याची आपण ओळख करून घेणार आहोत.

डॉ. राकेश बक्षी यांच्या रक्तातच देशभक्ती आहे. त्यांचे वडील भारतीय लष्करात होते. साहजिकच, लहानपणापासून त्यांचे स्वप्न सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याचे होते. ते सैनिकी शाळेत दाखलही झाले, पण नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळेच नियोजन केले होते. काही कारणास्तव त्यांना तिथून परत यावे लागले. मात्र, लष्करात जाता आले नाही तरी एक सामान्य नागरिक म्हणून मी देशासाठी काय करू शकतो? हा प्रश्न त्यांच्या मनात कायम घर करून होता. खेळ असो वा राष्ट्रीय उत्सव, जेव्हा तिरंगा फडकतो तेव्हा भारतीयांची मान अभिमानाने उंचावते. तिरंग्याप्रती असलेल्या ओढीने त्यांना एक नवा रस्ता दाखवला. आपल्या तिरंग्याला प्रत्येक हृदयापर्यंत नेण्याचा विडा त्यांनी उचलला. देशभरात त्यांनी अनेक ठिकाणी मॉन्युमेंटल फ्लॅग म्हणजे 100 ते 150 फूट उंचीचे तिरंगा ध्वज स्थापित केले आहेत.
ही कल्पना त्यांना कशी सुचली, याविषयी ते म्हणाले की आपल्या देशात आपल्याच झेंड्याबाबत लोकांच्या मनात एक भीती होती. झेंडा खाली पडला तर काय होईल? फाटला तर काय? किंवा चुकून उलटा लागला तर शिक्षा होईल का? या भीतीमुळे लोक झेंड्याशी जोडलेच जात नव्हते. पण जेव्हा नवीन जिंदाल यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन, राष्ट्रध्वज फडकवणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे सिद्ध केले, तेव्हा डॉ. बक्षी यांनी ’डी. के. फ्लॅग फाऊंडेशन’ ची स्थापना केली. त्यांनी शहराशहरांत 100 ते 150 फूट उंचीचे मॉन्युमेंटल फ्लॅग’ (स्मारकीय राष्ट्रध्वज) उभारण्यास सुरुवात केली. या ध्वजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते विशेष प्रकाशयोजनेमुळे रात्रीच्या वेळीही सन्मानाने फडकवले जाऊ शकतात आणि वर्षाचे 365 दिवस ते उतरवण्याची गरज नसते.
मी पहिला झेंडा अंबरनाथमध्ये लावला. तिथे आधी ’हुतात्मा चौक’ होता, पण आज लोक त्याला अभिमानाने ’झेंडा चौक’ म्हणतात. सर्व मोठे कार्यक्रम आता तिथूनच होतात. अशा प्रकारे गव्हर्नर हाऊस, मुंबई विद्यापीठ, SRPF ग्राउंड अशा सुमारे 18 ठिकाणी मी महाराष्ट्रात झेंडे लावले आहेत. नुकताच एक कर्नाटकमध्ये लावला आणि पुढच्या महिन्यात गुवाहाटी विद्यापीठात लावणार आहे.
हे सांगताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती. यादरम्यान आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांबद्दलही त्यांनी सांगितले. जेव्हा मी अंबरनाथमध्ये झेंडा लावला, तेव्हा रात्री मला पोलीस स्टेशनमधून फोन आला की, तुम्हाला अटक करावी लागेल. मी विचारले का? तर ते म्हणाले की, रात्री झेंडा फडकलेला आहे. मी त्यांना सांगितले की, तुम्ही गुगलवर ’मोन्युमेंटल फ्लॅग’ आणि ’फ्लॅग कोड’ तपासा, रात्री तो झेंडा फडकवता येतो. तेव्हा त्या इन्स्पेक्टरनी माझी माफी मागितली. शासकीय, प्रशासकीय सेवेतील लोकांनाही ध्वजाच्या आचारसंहितेविषयी माहिती नाही. म्हणूनच मी शाळा-कॉलेजमध्ये जाऊन याविषयी जनजागृती करतो. मला अनेकदा फोन येतात की, तुम्ही लावलेला झेंडा फाटला आहे, कारण पावसामुळे, हवेमुळे कधीकधी ते फाटतात. तेव्हा आम्ही तेथे जाऊन तो बदलून देतो.
मुंबई विद्यापीठातील एक क्षण
रोजच्या जीवनात आपण देशभक्ती कशी आणू शकतो आणि आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा वाढवू शकतो याविषयी ते म्हणाले, लोक झेंड्याला फक्त 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला लक्षात ठेवतात. मी आतापर्यंत अडीच ते तीन लाख तिरंगा ध्वजाच्या लेपल पिन वाटल्या आहेत. मी आणि माझ्या फार्मा कंपनीतील सर्व कर्मचारी दररोज अभिमानाने ही पिन लावतो. आमचे ब्रीदवाक्य आहे- Not only one day, every day.
डॉ. राकेश बक्षी यांची डी. के. बायोफार्मा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ते स्वतः एक खेळाडू असल्याने शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातही मोठे कार्य करत आहेत. नाशिकच्या एका आदिवासी मुलाला त्यांनी दत्तक घेऊन त्याचे शिक्षण आणि क्रीडा सराव पूर्ण केला, ज्याने पुढे भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. तसेच अनेक होतकरू खेळाडूंना त्यांनी अमेरिका आणि केनियामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांनी आजच्या तरुण पिढीला आवाहन केले आहे की, आजची पिढी खूप हुशार आहे. माझा 6 वर्षांचा नातूही आता सांगतो की, हा दादूचा झेंडा आहे. आपल्याला सीमेवर लढण्यासाठी जाता येत नसेल तरी एक गोष्ट आपण नक्कीच करू शकतो ती म्हणजे आपल्या कामातून तिरंग्याचा सन्मान राखून आपण नक्कीच देशसेवा करू शकतो. जेव्हा तुम्ही तिरंगा पाहाल तेव्हा मंदिर, मशिदीप्रमाणे त्याला आदर द्या आणि अभिमान बाळगा. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनाला फक्त एक सुट्टी म्हणून पाहू नका, तर त्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार देशासाठी काहीतरी करण्याचा निर्धार करा.
डॉ. राकेश बक्षी यांच्या या कार्यातून देशभक्तीचा एक नवा आयाम समोर आला. देशभक्ती ही फक्त दोन दिवसांपुरती दाखवण्याची गोष्ट नाही तर रोजच ती आपल्या वागण्यातून दिसली पाहिजे. त्यांचे कार्य पाहून हेच वाटते की, जर प्रत्येकाच्या मनात अशी जिद्द निर्माण झाली, तर भारत नक्कीच जागतिक पटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण करेल. डॉ. राकेश बक्षी यांच्यासारख्या व्यक्तींची आज समाजाला गरज आहे. त्यांच्या कार्याला प्रणाम!
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा!!!