विविध भाषेतील असंख्य म्हणी वाचताना लक्षात येणारी गोष्ट म्हणजे फुशारकी मारणार्या व्यक्तीचे वर्णन करणार्या म्हणी स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही कठोरपणे वर्णन करतात. त्या बाबतीत समानतेचा धर्म पाळतात. दुसरे म्हणजे अशा प्रवृत्तीबद्दल कठोरपणे व्यक्त होताना अनेकदा भाषा शिवराळ किंवा अशिष्ट झालेली दिसते. त्या बाबतीतही सर्व भाषिक समानता आहे. ‘आपण सगळे भारतीय बांधव आहोत‘ याचा असा गमंतीदार प्रत्ययही येतो.
कटच्या फुशारक्या मारणारे लोक आपण नेहमी बघतो. आपल्याला त्यांची चीड येते. अशा माणसाचे वर्णन करताना आपल्याला म्हण आठवते... ‘घरात नाही दाणा पण मला बाजीराव म्हणा.‘
मजा अशी की, अशा लोकांबद्दल राग, टवाळी, हेटाळणी वगैरे भावना देशभर सारख्याच व्यक्त होताना दिसतात. अशा फुशारकीबाज लोकांबद्दल जनभावना इतक्या तीव्र असाव्यात की, भारतातल्या प्रत्येक भाषेत अनेक म्हणी अशा लोकांचा ‘समाचार’ घेताना आढळतात. इतक्या तीव्र भावना आहेत की, कोशकार विश्वनाथ नरवणे यांच्या ‘भारतीय कहावत संग्रह’ या ग्रंथातली, तब्बल 53 पाने देशभरातल्या अशा म्हणींनी भरली आहेत!
अगदी वर लिहिलेल्या म्हणीसारखी ‘कमानी न पहिया - गाडी जोत मेरे भैय्या‘ अशी म्हण हिंदीत आहेच. शिवाय मराठीत ‘बडा घर - पोकळ वासा‘ अशी म्हण आहेत तर हिंदीत ‘मोठ्या वाश्याचे घर आणि घरखर्चाला कर्ज‘ अशा आशयाची म्हण आहे. तर उर्दूत ‘खरुज लागलेला कुत्रा आणि मखमलीची झूल‘ असे कठोरपणे म्हटले आहे. पंजाबीत ‘एक बायको मिळत नाही आणि दुसर्या लग्नाच्या बढाया‘ अशी म्हण आहे. वरती काश्मिरी भाषेत ‘वचन दहा जणांना दिले पण भात एकालाही दिला नाही‘ अशी संभावना केली आहे. सिंधी भाषेत अशा माणसाचे वर्णन करताना म्हणतात, ‘विंचवाचा मंत्र माहीत नाही आणि चालला सापाच्या बिळात हात घालायला‘ तर गुजराती भाषेत ‘खिशात नाही कवडी आणि बाजारात जाते दौडी‘ अशी म्हण आहे. मी मराठीमधल्या फक्त एक दोन म्हणीच वर लिहिल्या आहेत. पण एकट्या मराठीत फुकटच्या फुशारक्या मारणार्याची चांगली हजेरी घेणार्या 100 म्हणी आहेत. त्याचा आढावा घेत बसलो तर फक्त मराठी म्हणींच्यासाठी दोन लेख लिहायला लागतील.
पूर्वेला गेलो तर बंगाली भाषेत ‘एक पैशाची औकात नाही आणि पगडीचा कोन बघून घ्या‘ असे रास्त वर्णन फुशारकी बहाद्दारांचे केले आहे तर ईशान्येला आसामच्या असमिया भाषेत ‘स्वत: आहे नंगा आणि आशीर्वाद देतो जगा‘ असा समाचार घेतला आहे. पूर्वेलाच ओरिसातील उडिया भाषेत ‘बायकोपुढे हुशारीच्या बाता मारणार आणि पोलीस बघून पळ काढणार‘ अशी म्हण आहे. दक्षिणेतील भाषांमध्ये देखील अशा लोकांचा कठोर समाचार घेतला आहे. उदाहरणार्थ तमिळमध्ये ‘सर्वत्र कीर्ती - घरात दुष्काळ‘ असे मोजक्याच शब्दात मांडणारी म्हण आहे किंवा ‘समुद्र लंघून जाण्याची भाषा - पण नाला पार करण्याचे पायात बळ नाही‘ असा सविस्तर समाचार घेणारीही म्हण आहे. तेलुगु भाषेत ‘डोक्याला लावायला तेल नाही आणि मिशांना लावायला अत्तर?‘ किंवा ‘शिंक्यापर्यंत नाही पोचता येत आणि स्वर्गात जाण्याच्या वार्ता?‘ असे वर्णन करणार्या म्हणी आहेत. कन्नडमध्ये ‘उंदराची शिकार आणि वाजत गाजत मिरवणूक‘ किंवा ‘डोक्यावर नाहीत केस आणि आंबाड्याची उठाठेव‘ असे वर्णन करणार्या म्हणी आहेत. केरळच्या मल्याळम भाषेमध्येही ‘घरात नाही दाणा आणि मला बांगड्या आणा‘ अशी म्हण आहे.
अगदी संस्कृत भाषेतही ‘धवल: वेष: रिक्त कोश:‘ असे किंवा ‘विष नसलेल्या सर्पाचा फुत्कार मात्र जोरदार‘ असा आशय मांडणारी सुभाषिते आहेत. या विविध भाषेतील असंख्य म्हणी वाचताना लक्षात येणारी गोष्ट म्हणजे फुशारकी मारणार्या व्यक्तीचे वर्णन करणार्या म्हणी स्त्री आणि पुरुष अशा दोघांचेही कठोरपणे वर्णन करतात. त्या बाबतीत समानतेचा धर्म पाळतात. दुसरे म्हणजे अशा प्रवृत्तीबद्दल कठोरपणे व्यक्त होताना अनेकदा भाषा शिवराळ किंवा अशिष्ट झालेली दिसते. त्या बाबतीतही सर्व भाषिक समानता आहे. ‘आपण सगळे भारतीय बांधव आहोत‘ याचा असा गमंतीदार प्रत्ययही येतो. शेवटचे आणि महत्त्वाचे, या सदराची आखणी आणि काम गेले काही महिने सुरू आहे. तरी ‘घरात नाही दाणा नि बाजीराव म्हणा‘ अशा वृत्तीचे दर्शन नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालात कोणाला दिसून आले तर तो निव्वळ योगायोग समजावा! या सदराचा हेतू अशी कोणाची टोपी उडवण्याचा नाही तर भारतीय भाषाभगिनींच्या अभिव्यक्तीत असणारा एकत्वाचा धागा उलगडून दाखवणे हा आहे.