“गुणसागर अशोकराव..” - मा. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

विवेक मराठी    23-Jan-2026
Total Views |
Ashok Moadk
 
मुंबई : “माझ्या पिढीतील असंख्य कार्यकर्त्यांच्या जडणघडणीची भूमिका समर्थपणे पार पाडणारे पथदर्शक म्हणजे अशोकराव. अशोकरावांची पहिली भेट 1974च्या अभाविपच्या दादरमधील एका अधिवेशनात झाली, तेव्हापासून जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले. साधी रहाणी, उच्च विचारसरणीचे जितेजागते उदाहरण अशोकराव होते. अशोकरावांच्या अभ्याससत्रात बसून अनेकांचा बौद्धिक स्तर उंचावला एवढे निश्चित.” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. सरकार्यवाह दत्तात्रेयजी होसबाळे यांनी केले.
 
निष्ठावंत स्वयंसेवक, थोर तत्त्वचिंतक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार, प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ अनुभव गाठीशी असलेले प्रभावी वक्ता आणि थोर अभ्यासक, लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले दिवंगत प्रा. डॉ. अशोकराव मोडक यांची श्रद्धांजली सभा दादर येथे दि. 21 जानेवारी 2026 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह, राजा शिवाजी विद्यालय संकुल, हिंदूू कॉलनी येथे पार पडली.
 
 
दत्तात्रेयजी पुढे म्हणाले,“अशोकराव यांच्या गुणसमुच्चयाबद्दल सारेच जाणतात, खर्‍या अर्थाने ते गुणसागर होते. प्रत्येक कामात ते अग्रभागी असत. हिंदुत्व, संघ विचारधारा, राष्ट्रीयत्व याबाबत त्यांचा व्यासंग दांडगा होता. अशोकराव विषय मांडणी करण्याआधीच विषयाचा आराखडा देत असत, त्यामुळे विषय समजण्यास सुलभ होत असे. प्री-गुगलच्या काळातील अशोकराव मूळ अध्ययन करणारे परिश्रमी संशोधक होते. अशोकराव एक आदर्श पती, पिता, सहकारी, मित्र, समर्पित स्वयंसेवक, जागरूक नागरिक, या सर्वांसोबतच ते नम्रतेचे परमोच्च बिंदू होते. या सार्‍या व्यापातही ते सामान्य कार्यकर्त्यांशी, त्यांच्या कुटुंबियाशी तितक्याच आत्मियतेने वागत. अशोकरावांच्या गुणसागरातील काही थेंब जरी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ती खरी श्रद्धांजली ठरेल.”
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी म्हटले,“अशोकरावांची सहजता मनाला भावणारी होती. स्वतःचा स्वभाव आपल्याला घडवावा लागतो आणि अभ्यासाने हे साध्य होते असे ते नेहमी म्हणत. नवीन पिढीला तयार करण्याचे महाकठीण काम अशोकरावांनी केले. त्यांच्या प्रत्येक कामात पूर्वयोजना आणि पूर्णयोजना याचे दर्शन घडत असे.”
 
Ashok Moadk 
महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या उद्भोधनात म्हटले,“अभाविपच्या माझ्या सुरुवातीच्या काळात जोडलो गेलो खरा, पण टिकलो, प्रभावित झालो, ते अशोकरावांमुळे. अशोकरावांचा तेव्हाचा कामाचा पसारा पाहिला तर इतकंही काम करता येतं, याच आश्चर्य आणि कौतुक वाटायचं. विद्वत्ता असूनही नम्रता, विद्वत्ता असूनही निर्व्याज प्रेम, ही अशोकरावांची मुख्य वैशिष्ट्ये. अशोकरावांनी त्यांच्या व्यापात कधीही त्यांचा नित्यनेम मोडला नाही. अशोकरावांसारखा विद्वान माणूस सामान्य कार्यकर्त्याला बरोबरीने वागवत होता, हे दुर्मीळ चित्र होते. अशोकरावांनी स्वतःच्या आचरणातून आम्हा कार्यकर्त्यांवर संस्कार घडविले.”
 
 
अशोकरावांच्या आठवणींना उजाळा देताना भारतीय स्त्री शक्तीच्या उपाध्यक्षा डॉ. नयना सहस्त्राबुद्धे म्हणाल्या,“मा. अशोकराव हे नात्याने माझे थोरले दीर. अभ्यास, व्यासंग, साधेपणा, कौटुंबिक नातेसंबंध संभाळण्याची हातोटी, कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहचण्याचा त्यांचा स्वभाव, कार्यकर्त्यांना त्यांच्या व्यासंगाचा दर्प न जाणवता, परंतु कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक वाढ, स्पष्टता यावी यासाठी त्यांच्याशी सहज संवाद साधणं, या सर्वच बाबतीत अशोकराव थोरले होते. ‘वाचन हा त्यांचा श्वास होता, तर संशोधन हा त्यांचा ध्यास होता’. आम्ही अभाविपचे काम करीत असताना महाराष्ट्रात अनेक विषय उग्र झालेले होते, तेव्हा अतिशय योग्य मार्गदशर्र्न अशोकराव करत. रूढार्थाने महिला जेंडर हा त्यांच्या संशोधनाचा विषय नव्हता, परंतु महिलांचा सन्मान, त्यांच्या प्रती आस्था, महिलांच्या प्रश्नांची सखोल आणि कळकळीची जाणीव त्यांना होती. याच जाणीवेतून त्यांनी आपल्या जीवन गौरव पुरस्काराची रक्कम विवेकानंद केंद्राच्या वनवासी मुलींच्या वसतिगृहासाठी दिली असावी असे वाटते.”
 
Ashok Moadk 
 
अभाविपचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मिलिंद मराठे म्हणाले,“प्रखर वैचारिक चिंतक, अभ्यासक, उत्तम वक्ते, लेखक तर ते होतेच, अभाविपच्या कामात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ‘दिला एकदा शब्द न पालटावा’ (कमिटमेंट) चे महत्त्व काय असते हे अशोकरावांच्या आचरणातून आम्ही शिकलो.”
 
 
याप्रसंगी अशोकराव मोडक यांच्या परिवारातून त्यांच्या पत्नी डॉ. अंजली अशोक मोडक, पुत्र आशिष मोडक, सून स्मिता आशिष मोडक, कन्या अर्चना भिडे, नातवंडे अदिती, अवनी, अर्णव आणि अशोकरावांचे बंधू अरुण मोडक आदी उपस्थित होते.
श्रद्धांजली सभेत विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र-गोवा राज्य प्रमुख अभय बापट, कोकण पदवीधर मंचाचे वसंतराव काणे, राष्ट्रीय सामाजिक विज्ञान परिषदेच्या सचिव वैदेही दप्तरदार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.रवींद्र कुलकर्णी, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अभिराम घड्याळ-पाटील, संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक संजीव परब, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रनजी, त्यांचे पुत्र आशिष मोडक यांनी अशोकरावांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच रा. स्व. संघाचे पदाधिकारी-कार्यकर्ते, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, खा. डॉ. विनय सहस्रबुद्धे, अभाविपचे पदाधिकारी-कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, महत्त्वाचे म्हणजे अशोकरावांच्या प्रेमाखातर तीन पिढ्यांचे एकत्रिकरण झाले होते.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडक कुटुंबीयांना पाठविलेल्या सांत्वनपर पत्राचे वाचनही यावेळी करण्यात आले. श्रद्धांजली सभेचे सूत्रसंचालन मंदार भानुसे यांनी केले. ‘मन समर्पित, तन समर्पित और यह जीवन समर्पित, चाहता हूँ देश की धरती, तुझे कुछ और भी दूँ’ हे समयोचित गीत साहील जामदार यांनी सादर केले. शांतिमंत्राने श्रद्धांजली सभेची सांगता झाली.