आवळा...निसर्गाचे वरदान आणि आरोग्याची संजीवनी

24 Jan 2026 12:02:37
Emblica officinalis 
 

amla 
भरणी नक्षत्राचे दैवत ‘यमराज’ आहेत; तर आवळा हे ‘अमृत’ देणारे फळ आहे. हा विरोधाभास अतिशय बोलका आहे! यम जसा जीवनातील सत्य आणि संयम शिकवतो, तसाच आवळा शरीरातील दोषांचे ‘नियमन’ करून शरीराला मृत्यूपासून लांब ठेवतो. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी आपल्या परिसरात किमान एक तरी आवळ्याचे झाड लावायलाच हवे.
भारतीय संस्कृती आणि आयुर्वेदामध्ये वनस्पतींना केवळ झाड न मानता त्यांना देवत्व बहाल केले आहे. यामागे त्या वृक्षाचे मानवी जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्याचा हेतू असतो. भरणी नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेला ’आवळा’ याचे उत्तम उदाहरण आहे. जर निसर्गाला आई मानले, तर आवळा हे त्या आईच्या मांडीवरचे सर्वांत लाडके बाळ आहे; जे आपल्या आरोग्याची काळजी एखाद्या परिचारिकेप्रमाणे घेते. म्हणूनच आयुर्वेदात याला ’धात्रीफल’ (धात्री म्हणजे सांभाळ करणारी दाई/आई) असेही म्हणतात.
 
 
पुराणांनुसार; समुद्रमंथनाच्या वेळी अमृताचे काही थेंब पृथ्वीवर सांडले आणि त्यातून आवळ्याच्या वृक्षाची उत्पत्ती झाली, अशी आख्यायिका आहे. म्हणूनच याला ’अमृतफळ’ म्हटले जाते. कार्तिक महिन्यात ’आवळी भोजन’ करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. फाल्गुन शुद्ध एकादशीला आमलकी एकादशी म्हणून याही दिवशी आवळा सेवन करण्याचे विधान आहे. आवळ्याला साक्षात विष्णुस्वरूप मानले गेले आहे. आयुर्वेदात आमलकी रसायन वर्णन करतानाही मंत्रजप सांगितला आहे. यामागे धार्मिक कारणासोबतच; या वृक्षाच्या सान्निध्यात राहून त्याचे आरोग्यदायी गुण शरीरात घेणे; हा वैज्ञानिक दृष्टीकोनही आहे.
 
आवळ्याचे शास्त्रीय नाव Emblica officinalis किंवा Phyllanthus emblica असून संस्कृत नावे; आमलकी, अमृतफळ, वयस्था, धात्री, शिव अशी आहेत.
 
आवळा हा अत्यंत काटक वृक्ष आहे. ज्या जमिनीत इतर पिके येत नाहीत, तिथे आवळा डौलाने उभा राहतो. क्षारयुक्त जमीन सुधारण्यासाठी आवळ्याची लागवड केली जाते. शेतकर्‍यांसाठी हे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे. याचे लाकूड पाण्यात लवकर सडत नाही, म्हणून विहिरीच्या काठाला आधार देण्यासाठी पूर्वी आवळ्याचे लाकूड वापरले जात असे.
 
 
आवळा हा मध्यम आकाराचा, पानझडी वृक्ष असून तो 8 ते 18 मीटर उंच वाढतो. याची पाने संयुक्त प्रकारची, चिंचेसारखी पण अधिक रेखीव असतात. रात्रीच्या वेळी ही पाने मिटतात, जणू काही झाड झोपले आहे. या झाडाची साल राखाडी रंगाची असून ती पापुद्र्यासारखी निघते. वसंत ऋतूत याला पिवळसर फुलांचे गुच्छ येतात आणि शरद ऋतूत फळे पक्व होतात. आवळ्याची दोन प्रमुख रूपे पाहायला मिळतात-एक ’रानआवळा’ (ज्याची फळे लहान आणि कठीण असतात) आणि दुसरा ’बनासी’ किंवा लागवडीचा आवळा (ज्याची फळे मोठी, मांसल आणि रसाळ असतात).
 
आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पोषक तत्त्वे
 
आधुनिक विज्ञानाने आवळ्याला ’सुपरफूड’च्या श्रेणीत स्थान दिले आहे. संशोधनानुसार आवळ्यामध्ये खालील महत्त्वाचे घटक आढळतात:
 
व्हिटॅमिन सी : आवळा हा व्हिटॅमिन सीचा जगातला सर्वात समृद्ध स्रोत आहे. संत्र्याच्या तुलनेत यात 20 पटीने अधिक व्हिटॅमिन सी असते. विशेष म्हणजे, आवळ्यामध्ये ’टॅनिन’ (Tannins) आणि ’गॅलिक सिड’ हे घटक असतात, जे व्हिटॅमिन सीचे रक्षण करतात. त्यामुळे आवळा उकळला किंवा वाळवला तरी त्यातील सत्व नष्ट होत नाही.
 

amla 
 
यामुळेच च्यवनप्राश खातानाही आपल्याला हे गुण मिळतातच. जगातील इतर कोणत्याही फळाच्या बाबतीत हे शक्य होत नाही.
खनिजे : यात कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि ’क्रोमियम’ हे खनिज भरपूर प्रमाणात असते. क्रोमियममुळे रक्तातील साखरेचे नियंत्रण राहण्यास मदत होते.
 
 
अँटी-ऑक्सिडंट्स : आवळ्याचे ORAC (Oxygen Radical Absorbance Capacity) मूल्य खूप जास्त आहे, जे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकण्यास मदत करते.
 
 
आयुर्वेदात आवळ्याला ’रसायन’ (Rejuvenator) म्हटले आहे. चरक संहितेनुसार,;
 
आमलकं वयःस्थापनानाम्। (च.सू.25/40)
 
आवळा हा शरीराला तरुण राखण्यात सर्वोत्तम असल्याचे आयुर्वेद सांगतो.
 
आचार्य सुश्रुतांनी तर,
 
मध्वामलकचूर्णानि सुवर्णमिति च त्रयम् ।
 
प्राश्यारिष्टगृहीतोऽपि मुच्यते प्राणसंशयात् ।
 
(सुश्रुत संहिता चि. 28/20)
 
आवळा चूर्ण + मध + सुवर्ण हे रसायन मृत्युभय निर्माण झालेल्या अवस्थांत उपयुक्त असते. दुर्धर आजार हाताळणार्‍या वैद्यांनी मनात कोरून ठेवावं असं हे सूत्र आहे!
 
आवळ्यात लवण (मीठ) सोडून मधुर (गोड), आम्ल (आंबट), तिक्त (कडू), कटू (तिखट) आणि कषाय (तुरट) हे पाचही रस आहेत. म्हणूनच हे फळ परिपूर्ण मानले जाते.
 
 
याचा ’आंबट’पणा वात कमी करतो; ’थंड’ (शीत) गुण आणि गोडवा पित्त कमी करतो; तर ’तुरट’ आणि ’कोरडा’ (रुक्ष) गुण कफ कमी करतो. अशा प्रकारे, वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांवर चालणारे हे दुर्मीळ औषध आहे.
 
 
आवळा हे हंगामी फळ असले तरी ते वर्षभर वापरता येते. आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने खालील प्रकारे सेवन करणे तुलनेत अधिक योग्य ठरेल.
 
 
* च्यवनप्राश : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ऋषी च्यवन यांच्यासाठी साक्षात अश्विनीकुमारांनी तयार केलेला हा फॉर्म्युला आजही तितकाच प्रभावी आहे. काळजी एकच घ्यायची; मार्केटमधून बनवलेला च्यवनप्राश न घेता वैद्यांनी स्वतः तयार केलेला च्यवनप्राशच घ्यावा.
* मोरावळा : पारंपरिक पद्धतीने घरच्या घरी बनवलेला मोरावळा खाणे योग्य.
* चूर्ण स्वरूपातील आवळा वैद्यांच्या सल्ल्याने घेता येईल.
संशोधन काय सांगते?
आधुनिक विज्ञानाने आवळ्यावर सखोल संशोधन केले असून त्यातून थक्क करणारी माहिती समोर आली आहे:
प्रबळ अँटी-ऑक्सिडंट : आवळ्यात ’गॅलिक सिड’, ’इलॅजिक सिड’ आणि ’फ्लेव्होनॉइड्स’ असतात. हे घटक शरीरातील ’फ्री रॅडिकल्स’ नष्ट करतात, ज्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो आणि पेशींचे आयुष्य वाढते. विशेषत: रेझवेराट्रोल सारखे घटक याबाबत अत्यंत उपयुक्त असल्याचे रिसर्च सांगतात.
इम्युनोमोड्युलेटर : आधुनिक संशोधनानुसार, आवळा शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. यामुळे बदलत्या ऋतूत होणारे सततचे आजार दूर राहतात.
भरणी नक्षत्राचे दैवत ’यमराज’ आहेत; तर आवळा हे ’अमृत’ देणारे फळ आहे. हा विरोधाभास अतिशय बोलका आहे! यम जसा जीवनातील सत्य आणि संयम शिकवतो, तसाच आवळा शरीरातील दोषांचे ’नियमन’ करून शरीराला मृत्यूपासून लांब ठेवतो. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी आपल्या परिसरात किमान एक तरी आवळ्याचे झाड लावायलाच हवे.
लेखक आयुर्वेद वाचस्पति आहेत.
Powered By Sangraha 9.0