मुंबई : संस्कार भारतीच्या वतीने आयोजित करण्यात येणारा अखिल भारतीय भरतमुनि सन्मान सोहळा यावर्षी सांस्कृतिक राजधानी असलेल्या मुंबईत आयोजित करण्यात आला आहे .दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी साडेदहा वाजता हा प्रतिष्ठेचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
छत्तीसगड येथिल वेदमती शैलीतील प्रख्यात पंडवांनी गायिका प्रभा यादव आणि महाराष्ट्रात पुण्यातील सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना त्यांच्या दीर्घकालीन कला साधने साठी आणि आपल्या कार्यक्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल भरतमुनि सन्मान २०२५ या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना, पद्मविभूषण व माजी राज्यसभा सदस्य विदुषी सोनल मानसिंग यांच्या हस्ते तसेच संस्कार भारतीचे अखिल भारतीय अध्यक्ष व सुप्रसिद्ध व्हायोलिन वादक मैसूर मंजुनाथ यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संस्कार भारतीचे अखिल भारतीय महामंत्री अश्विन दळवी यांनी सांगितले की ,संस्कार भारती तर्फे दिला जाणारा अखिल भारतीय भरतमुनि सन्मान पुरस्कार भारतात पंचम वेद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाट्यशास्त्र ग्रंथाचे रचनाकार महर्षी भरतमुनि यांना समर्पित आहे. कला माध्यमातून समाजासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या असाधारण कलाकारांचा गौरव दरवर्षी केला जातो . साहित्य, मंचिय, लोककला, दृक कला, कला धरोहर या पाच विभागांपैकी दोन विभागात हा पुरस्कार दिला जातो .यावर्षी लोककला आणि चित्रकला म्हणजेच दृक विभागात हा पुरस्कार दिला जात आहे. स्मृतिचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि १,५१,०००/ रुपये रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.
यंदाचे पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून या सोहळ्याची जबाबदारी संस्कार भारती कोकण प्रांताकडे असणार आहे. कार्यक्रमावेळी लोककलेवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात येणार असून हा संपूर्ण कार्यक्रम कलाकारांसाठी आणि रसिकांसाठी सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रसिकांनी या पुरस्कार सोहळ्याकरिता उपस्थित राहावे तसेच संपर्क 98206 20148 या मोबाईल नंबर वर साधावा असे आवाहन संस्कार भारती कोकण प्रांत अध्यक्ष सुनील बर्वे आणि कार्याध्यक्ष मुकुंद मराठे यांनी केले आहे.