Sports Analyst
@वैशाली भिडे बर्वे 9820382117 / अॅड. रुपाली ठाकूर 9820383118
क्रीडा विश्लेषक म्हणजे Sports Analyst होय. क्रीडा क्षेत्रातील संधी आणि त्यासाठी लागणारी तयारी ह्या विषयी आपण मागील लेखामध्ये जाणून घेतले. क्रीडा क्षेत्रातील आपल्या passion ला profession मध्ये रूपांतरित करणार्या विद्यार्थ्यांचे आपण उदाहरण वाचले. पण क्रीडा विश्लेषक म्हणजे नक्की काय, हे आज आपण जाणून घेऊया.
आजचा खेळ फक्त मैदानावर खेळला जात नाही, तर डेटा, रणनीती आणि विश्लेषणाच्या पातळीवरही जिंकला जातो. खेळाडूंची निवड, संघाची रणनीती, सामना जिंकण्याचे निर्णय या सगळ्याच्या मागे एक शांत पण अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, ती म्हणजेे Sports Analyst (क्रीडा विश्लेषक) ची.
क्रीडा विश्लेषक हा खेळाडू, संघ किंवा सामन्याशी संबंधित आकडेवारी (Statistics), व्हिडिओ फुटेज, कामगिरीचे ट्रेंड्स आणि रणनीती यांचे सखोल विश्लेषण करतो.
त्याचे काम फक्त आकडे मोजणे नसते, तर
_ हे आकडे काय सांगतात?
_ संघ कुठे चुकतोय?
_ खेळाडूची ताकद आणि कमकुवत बाजू कोणती?
_ पुढील सामना जिंकण्यासाठी काय बदल हवेत?
यांची स्पष्ट उत्तरे देणे हेच क्रीडा विश्लेषकाचे खरे काम असते. हा विषय अधिक सोप्पा करण्यासाठी आपण काही उदाहणामार्फत समजून घेऊ या.
उदा 1: क्रिकेटमधील विश्लेषकाचे महत्त्व
एका IPL संघाचा युवा फलंदाज सातत्याने अपयशी ठरत होता. प्रशिक्षकांना वाटत होते की, त्याची फॉर्म खराब आहे. क्रीडा विश्लेषकाने त्याच्या डेटाचा अभ्यास केला आणि लक्षात आले की,
* तो वेगवान गोलंदाजांविरुद्ध चांगला खेळतो पण फिरकी गोलंदाजांविरुद्ध त्याचा स्ट्राइक रेट कमी आहे. या विश्लेषणावरून त्याच्या सराव पद्धतीत बदल करण्यात आला. काही सामन्यांतच तोच खेळाडू “Match Winner” ठरला. अशा प्रकारे मैदानावर न उतरता देखील सामना जिंकण्यात विश्लेषकाचा मोठा वाटा असतो.
उदा 2: फुटबॉलमध्ये आकड्यांची जादू
एका फुटबॉल संघाने सलग 5 सामने गमावले. चाहत्यांना वाटत होते संघ कमजोर आहे. क्रीडा विश्लेषकाने सांगितले; “संघाकडे जास्त ताबा आहे, संधी तयार होतात, पण Final Third Conversion खूप कमी आहे. यावर आधारित स्ट्रायकरची भूमिका बदलण्यात आली आणि पुढील काही सामन्यांत संघ विजयी झाला. या वरून एक लक्षात येते की, डेटा योग्य वाचला तर निकाल बदलू शकतो.
आज बदलत्या क्रीडा विश्वामध्ये क्रीडा विश्लेषक या करिअरची गरज झपाट्याने वाढत आहे. जगभरातील क्रीडा संघ, लीग्स आणि फ्रँचायझी आता खेळाडूंची निवड, कामगिरी सुधारणा, दुखापत टाळणे, सामना रणनीती आणि चाहत्यांशी संवाद यासाठी डेटा-आधारित निर्णय घेत आहेत.
एका अहवालानुसार, जागतिक स्तरावर क्रीडा विश्लेषण उद्योगाची किंमत अब्जावधी डॉलर्समध्ये असून, पुढील दशकात या क्षेत्रातील नोकर्यांमध्ये 13-15% वाढ अपेक्षित आहे. 2024 मध्ये अंदाजे USD 75 दशलक्ष भारतामध्ये क्रीडा विश्लेषणचे मार्केट होते तर 2030 पर्यंत सुमारे USD 290 दशलक्ष पर्यंत वाढण्याचे अपेक्षित आहे.
ही वाढ होण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे
* IPL, ISL, PKL सारख्या व्यावसायिक लीग्स
* AI, Wearable Technology, Performance Tracking
*
Talent Scouting, Injury Prevention आणि Fan Engagement
भारतात क्रीडा विश्लेषकाचा प्रारंभिक पगार अंदाजे 1.8 ते 4 लाख प्रतिवर्ष एवढा अपेक्षित आहे अनुभव, कौशल्ये आणि स्पेशलायझेशन वाढल्यास तो 6-9 लाखांपर्यंत वाढू शकतो आणि जर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केल्यास उत्पन्न अधिक.
एखाद्याला क्रीडा विश्लेषक ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचे असेल तर काही मूलभूत कौशल्ये असणे आवश्यक आहेत. जसे की, विश्लेषणात्मक विचारशक्ती, आकडेवारी समजून घेणे, गणित व डेटा कौशल्य, Excel, Python, SQL यांसारखी टूल्स शिकणे, खेळाचे सखोल ज्ञान, खेळ का आणि कसा बदलतो हे समजणे, सवांद कौशल्य, तांत्रिक कौशल्य, ह्या आणि अशांसारखे अनेक कौशल्ये असणे आवश्यक आहेत.
क्रीडा विश्लेषकासाठी जशी काही मूलभूत कौशल्ये आवश्यक असतात तशी काही शैक्षणिक पात्रता सुद्धा महत्त्वाची असते.
प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि बुद्ध्यांकानुसार ठरवणे आवश्यक असते. सर्वसमावेश वैज्ञानिक मूल्यांकन ह्या साठी खूप उपयुक्त ठरते. क्रीडा विश्लेषक बनण्यासाठी दहावी-बारावीमध्ये गणित व विज्ञान विषय उपयुक्त ठरतात. पुढे पदवीधर शिक्षण तत्सम विषयांमध्ये म्हणजे Statistics, Data Science सारखे विषय घेऊन स्पोर्ट्स विश्लेषणामध्ये विशेष प्रशिक्षण करता येते. डेटा व आकडेवारीवर आधारित अभ्यास जास्त फायदेशीर ठरतो. पदवी तर महत्त्वाची आहेच पण त्यासोबत व्यावहारिक ज्ञान आणि अनुभव अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे शिक्षणानंतर क्रीडा संघ, FIFA, IPL यांसारख्या मोठ्या लीग्समध्ये, मीडिया हाऊसेस, स्टार्टअप्स येथे खपींशीपीहळि साठी प्रयत्न करू शकता. प्रशिक्षक, विश्लेषक, क्रीडा व्यावसायिकांशी संपर्क उपयुक्त ठरू शकतो.
ह्या क्षेत्रामध्ये पदवी शिक्षणासाठी विविध सरकारी संस्था व विद्यापीठ भारतामध्ये- मुंबई, चेन्नई, बंगलोर, ग्वाल्हेर, पुणे आणि भारताबाहेर ही उपलब्ध आहेत. जगभरात क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, टेनिस, बॅडमिंटन अशा अनेक खेळांमध्ये क्रीडा विश्लेषक निर्णायक भूमिका बजावित आहेत. भारतातही IPL, ISL, PKL, राष्ट्रीय संघ आणि क्रीडा मीडिया यामध्ये या क्षेत्राची मागणी झपाट्याने वाढत आहे.
आजच्या काळात क्रीडा विश्लेषक हे करिअर
* भारतात आणि जगभरात भविष्यातील करिअर ठरत आहे.
* खेळाची आवड आणि अभ्यासाची दिशा यांचा उत्तम संगम आहे.
* योग्य मार्गदर्शन, शिक्षण आणि कौशल्यांमुळे हे क्षेत्र शाश्वत उत्पन्न देणारे बनते.
- खेळ आवडतो पण खेळाडू बनणेे शक्य नाही?
- डेटा, आकडे, विचारशक्ती आणि क्रीडा यांचा संगम हवा आहे?
तर क्रीडा विश्लेषक हे करिअर तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.
आजच्या स्पर्धात्मक क्रीडा विश्वात क्रीडा विश्लेषक हा एक स्वंतत्र व्यवसाय असण्यासोबतच अनेक संबंधित क्रीडा व्यवसायांसाठी आधारस्तंभ ठरतो. खेळाडूंचे यश, संघाची रणनीती, व्यावसायिक निर्णय आणि प्रेक्षकांचा अनुभव, या सगळ्यांच्या मागे विश्लेषणाची अदृश्य ताकद असते.
क्रीडा विश्लेषक हा मन आणि कामगिरी यांना जोडणारा वैज्ञानिक दुवा आहे. खेळामध्ये यश फक्त शारीरिक ताकदीवर अवलंबून नसते, तर मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि दबाव हाताळण्याची क्षमता यावरही अवलंबून असते. इथेच Sports Psychologist (क्रीडा मानसशास्त्रज्ञ) आणि क्रीडा विश्लेषक यांची भागीदारी अत्यंत महत्त्वाची ठरते.
क्रीडा विश्लेषक आकडे, ट्रेंड्स आणि पॅटर्न दाखवतो, तर क्रीडा मानसशास्त्रज्ञ त्या आकड्यांंमागील मानसिक कारणे आणि उपाय शोधतो. जर तुम्हाला खेळ, विचारशक्ती आणि इतरांना यशस्वी करण्यात आनंद वाटत असेल, तर क्रीडा विश्लेषक ही भूमिका तुमच्यासाठी आणि अनेकांसाठी परिवर्तन घडवणारी ठरू शकते.
- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत
आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.