इतिहासाचे शहाणपण शिकवणारे ज्ञानर्षी डॉ. रा. श्री. मोरवंचीकर

28 Jan 2026 18:57:41
@संकेत कुलकर्णी
 
 
Ramchandra Morwanchikar
डॉ. रा. श्री. मोरवंचीकर हे दिसायला अत्यंत साधे, पण विचारांनी अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवास्थानी ’ज्ञानेश्वरी’चे पारायण आणि इतिहासाचे संशोधन एकाच वेळी चालत असे. ते म्हणत की, इतिहास आपल्याला बदला घेण्यासाठी नाही, तर भविष्य सुधारण्यासाठी शिकायचा असतो. अलीकडच्या काळात इतिहासाचे जे काही ’रंजन’ केले जात आहे, त्याबद्दल त्यांनी नेहमीच नाराजी व्यक्त केली. पैठणच्या मातीतील सातवाहन, यादवांचे देवगिरी, मलिक अंबरची नहर पद्धत आणि संतांची मांदियाळी या सर्वांना आपल्या लेखनातून जोडणारे ते खर्‍या अर्थाने ’गोदाकाठचे ऋषी’ होते. त्यांच्या जाण्याने केवळ एक इतिहासतज्ज्ञ हरपला नाही, तर इतिहासाच्या माध्यमातून जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा एक मार्गदर्शक हरपला आहे.
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पटलावर गेल्या पाच दशकांत ज्या काही मोजक्या अभ्यासकांनी आपल्या संशोधनाने जागतिक ठसा उमटवला, त्यामध्ये डॉ. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. शनिवार, 17 जानेवारी 2026 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि महाराष्ट्राने केवळ एक इतिहास संशोधकच नव्हे, तर पैठणच्या इतिहासाचे आणि महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचे चालते-बोलते विद्यापीठच गमावले. डॉ. मोरवंचीकर यांचे संपूर्ण आयुष्य हे पुराव्याधारित इतिहासलेखनाचा एक वस्तुपाठ होते. त्यांनी पैठणच्या मातीतून सातवाहनकालीन वैभवाचे कण वेचले, ’पैठणी’च्या पदरावरील कलाकुसरीचा इतिहास जगाला सांगितला आणि देवगिरीच्या तटबंदीमधील लुप्त जलव्यवस्थापनाचा शोध घेऊन ’जलसंस्कृती’ नावाचा एक नवा विचार प्रस्थापित केला.
 
 
डॉ. मोरवंचीकर यांचा जन्म 6 डिसेंबर 1937 रोजी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली या गावी झाला. त्यांच्या नावातील ’मोरवंचीकर’ हे आडनाव त्यांच्या मूळ गावाशी असलेल्या अतूट नात्याची साक्ष देते. सोलापूरच्या ग्रामीण मातीत त्यांचे बालपण गेले, जिथे त्यांना महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे आणि निसर्गाचे पहिले धडे मिळाले. त्यांचे उच्चशिक्षण पुणे विद्यापीठात झाले. तिथे बी.ए. आणि एम.ए. करताना ’प्राचीन भारतीय संस्कृती’ हा विषय निवडून आपल्या भावी संशोधनाची दिशाच त्यांनी निश्चित केली. पुण्यातील त्या काळच्या दिग्गज इतिहासकारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यात चिकित्सक बुद्धी आणि ’नामूलं लिख्यते किंचित’ (पुराव्याशिवाय काहीही लिहू नये) हा बाणा विकसित झाला. 1978 मध्ये त्यांनी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून ’पैठण थ्रू द एजेस’ या विषयावर प्रबंध सादर करून डॉक्टरेट मिळवली. हा प्रबंध केवळ एका शहराचा इतिहास नाही, तर तो गोदावरी खोर्‍यातील नागरीकरणाचा आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचा एक सखोल दस्तऐवज ठरला आहे. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात तशी पैठणच्या प्रतिष्ठान महाविद्यालयातून झाली. तिथे त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले. कालांतराने ते विद्यापीठाच्या इतिहास विभागात रुजू झाले. तिथे त्यांनी विभागप्रमुख आणि पर्यटन विभागाचे संचालक म्हणून प्रदीर्घ काळ सेवा दिली.
 
 
सातवाहनांच्या राजधानीचे उत्खनन
 
डॉ. मोरवंचीकर यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू ’पैठण’ अर्थात प्राचीन ’प्रतिष्ठान’ हे शहर राहिले आहे. सातवाहन राजांच्या या राजधानीने प्राचीन भारताच्या व्यापारात आणि संस्कृतीत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती. मोरवंचीकर सरांनी या नगरीचा इतिहास केवळ कागदपत्रांवरूनच नव्हे, तर उत्खननातून मिळालेल्या प्रत्यक्ष अवशेषांच्या आधारे शोधला. पैठणला पालथी नगरी भागात 1994 ते 1996 दरम्यान आणि पुढे 1999 पर्यंत उत्खनन झाले. यामध्ये डॉ. मोरवंचीकर यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि सोसायटी फॉर साउथ एशियन स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या उत्खननात मराठवाड्याच्या प्राचीन वैभवाचे अनेक पुरावे समोर आले. या उत्खननातून हे सिद्ध झाले की, पैठण हे केवळ एक धार्मिक केंद्र नसून थेट रोमन साम्राज्याशी संबंध असलेले ते एक जागतिक दर्जाचे व्यापारी केंद्र होते. या उत्खननात प्राचीन मंदिर संरचना, पाचव्या ते आठव्या शतकातील विटांच्या मंदिरांचे अवशेष, सातवाहन काळातील नाणी, मृदभांडी आणि मणी, रोमन नाण्यांशी साधर्म्य असलेले ’टेराकोटा’ मणी, यादवांच्या काळातील आणि त्यानंतरच्या वसाहतींचे स्तर, पाणीपुरवठ्याची प्राथमिक व्यवस्था आणि तटबंदीचे अवशेष मिळाले. तसेच विदेशी बनावटीची मातीची भांडीदेखील मिळाली, ज्यातून पैठणचा रोमन साम्राज्याशी असलेला व्यापार सिद्ध झाला.
 
 
या उत्खननातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करून मोरवंचीकर सरांनी ’दक्षिण काशी पैठण’ आणि ’पैठण : थ्रू द एजेस’ हे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिले. त्यांनी या उत्खननात सापडलेल्या विटांच्या दोन मंदिरांचा अभ्यास केला, ज्यातून त्या काळातील स्थापत्यशास्त्राचा विकास कसा झाला होता, हे स्पष्ट झाले. या मंदिरांच्या बांधकामातील पाच वेगवेगळे टप्पे त्यांनी अधोरेखित केले, जे पाचव्या शतकापासून ते आठव्या शतकापर्यंतच्या बदलांचे साक्षीदार आहेत. त्याचबरोबर पैठणमधील ’मणी’ (Beads) आणि त्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर त्यांनी प्रकाश टाकला. प्राचीन काळी पैठण हे मौल्यवान खडे आणि मण्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते. येथील कारागीर गोदावरीतील खड्यांपासून अत्यंत सुबक मणी तयार करत असत, ज्यांना जगभरात मागणी होती. याव्यतिरिक्त, पैठणमधील लाकडी कोरीव काम यावरही त्यांनी स्वतंत्र संशोधन केले आहे, जे ’वूड वर्क ऑफ वेस्टर्न इंडिया’ या त्यांच्या ग्रंथात पाहायला मिळते.
 
अस्सल महावस्त्र आणि कलाकुसरीचा इतिहास
 
महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये ’पैठणी’ साडीला जे मानाचे स्थान आहे, त्यामागे डॉ. मोरवंचीकर यांच्या संशोधनाचा मोठा वाटा आहे. ’पैठणी’ ही केवळ एक साडी नसून तो एक समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे, हे त्यांनी आपल्या ’पैठणी’ (A Romance in Brocade) या ग्रंथातून जगाला पटवून दिले. त्यांनी पैठणीच्या इतिहासाचा मागोवा घेताना सातवाहन काळापासून ते पेशवे काळापर्यंतच्या बदलांचे दस्तऐवजीकरण केले. डॉ. मोरवंचीकर यांनी पैठणीच्या प्रत्येक भागाचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या मते, पैठणीची खरी ओळख तिच्या ’काठ’ आणि ’पदरा’मध्ये दडलेली असते. नारळी काठ, वेलींची आणि फुलांची नाजूक गुंफण असलेली असावली नक्षी, विणकामातील सर्वांत कठीण आणि कलात्मक असा बांगडी मोर, मुनिया, पर्शियन आणि भारतीय कलेचा संगम असलेले हुमा परिंदा हे स्वर्गीय पक्ष्याचे काल्पनिक चित्र याबाबत त्यांच्या संशोधनातूनच जगाला माहिती मिळाली. पैठणीसाठी वापरले जाणारे रेशीम ऐतिहासिकदृष्ट्या म्हैसूर आणि बंगळुरू येथून येत असे, तर सोन्याचांदीची जर सुरतहून आणली जात असे, हे त्यांनी समोर आणले. पैठणीच्या विणकामात ’साळी’ समाजाची भूमिका आणि औरंगजेबाच्या काळात ’मोमीन’ विणकरांनी दिलेले योगदान, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. पैठणी हे केवळ श्रीमंतांचे लेणे नसून ती महाराष्ट्राच्या लोकजीवनातील एक जिवंत कला आहे, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या संशोधनामुळेच पैठणीच्या पुनरुज्जीवनाला शास्त्रीय आधार मिळाला.
 
 
जलसंस्कृती: इतिहासाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन
 
डॉ. मोरवंचीकर यांच्या संशोधनाचा सर्वांत क्रांतिकारी पैलू म्हणजे ’जलसंस्कृती’. त्यांनी इतिहासाचा अभ्यास केवळ राजघराण्यांच्या लढाया किंवा सत्तेच्या संघर्षातून न करता, ’पाणी’ या जीवनावश्यक घटकाच्या आधारे केला. पाणी हे मानवी संस्कृतीच्या निर्मितीचे आणि नाशाचे कसे मुख्य साधन ठरू शकते, हा विचार त्यांनी मांडला. देवगिरी (दौलताबाद) किल्ल्याचा अभ्यास करताना मोरवंचीकर सरांना तेथील प्राचीन जलव्यवस्थापनाने थक्क केले. उंच टेकडीवर असलेल्या या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय कशी केली जात असे, याचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. यादवांनी आणि त्यानंतर मलिक अंबरने विकसित केलेली ’नहर’ संकल्पना म्हणजे अभियांत्रिकीचा चमत्कार असल्याचे त्यांनी दाखवून दिले. मलिक अंबरने डोंगराच्या पायथ्याशी विहिरी खोदून, तिथले पाणी भूमिगत जलवाहिनीद्वारे शहरापर्यंत आणले. मोरवंचीकर सरांनी या ’नहर’ व्यवस्थेचे केवळ कौतुकच केले नाही, तर त्याचे नकाशे तयार करून त्यातील प्रत्येक घटकाचे (उदा. ’गायमुख’, ’बंबा’, ’खजिन्याची विहीर’) महत्त्व विशद केले.
 
 
’पाणी हेच सत्तेचे खरे उगमस्थान असते,’ हे त्यांनी देवगिरीच्या उदाहरणावरून सिद्ध केले. ’भारतीय जलसंस्कृती’ या ग्रंथातून मोरवंचीकर सरांनी ऋग्वेद काळापासून आतापर्यंतच्या जलव्यवस्थापनाचा आढावा घेतला. नद्यांना आपण माता मानतो, पण त्यांच्या जतनासाठी आपण काय करतो? हा प्रश्न त्यांनी विचारला. ’अश्मक’, ’मूलक’ आणि ’सातवाहन’ या राजसत्तांचा अभ्यास करताना त्यांनी हे निदर्शनास आणून दिले की, ज्या राजसत्तांनी पाण्याचे नियोजन उत्तम केले, त्याच दीर्घकाळ टिकल्या. ’शुष्क नद्यांचे आक्रोश’ या ग्रंथाने वर्तमानातील जलसंकटावर कठोर भाष्य केले. महाराष्ट्रातील नद्या आज प्रदूषणामुळे आणि वाळू उपशामुळे मरणासन्न अवस्थेत आहेत. नद्यांचे हे मरण म्हणजे संस्कृतीचे मरण आहे, असा इशारा त्यांनी दिला. ‘नकाशात नद्या दाखवायच्या असतील तर रेषांना निळा रंग दिला जातो. भविष्यात त्या लाल रंगाने दाखवायला लागतील. हा लाल रंग रक्ताचा असू शकतो,’ असे ते सूचक भाष्य ते करत. त्यांनी ’भारतीय जलसंस्कृती मंडळाची’ स्थापना करून जलसाक्षरतेचे काम आयुष्यभर केले.
 
 
ग्रंथसंपदा आणि साहित्यिक योगदान
 
डॉ. मोरवंचीकर हे केवळ एक संशोधक नव्हते, तर ओघवत्या शैलीचे लेखक होते. त्यांनी सुमारे 45 हून अधिक पुस्तके लिहिली, ज्यामध्ये इतिहासापासून ललित साहित्यापर्यंतच्या विविध विषयांचा समावेश आहे. ’दक्षिण काशी पैठण’ हा पैठणच्या सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासाचा एक अधिकृत ग्रंथ आहे. सातवाहन काळ हा महाराष्ट्राचा सुवर्णकाळ मानला जातो. सरांच्या ’सातवाहनकालीन महाराष्ट्र’ या पुस्तकात या काळातील व्यापार, कला आणि समाजव्यवस्थेचे चित्रण आहे. पैठणी साडीच्या निर्मितीचे तांत्रिक पैलू आणि तिचे ऐतिहासिक सौंदर्य उलगडणारे दोन ग्रंथ त्यांनी लिहिले. ’भारतीय जलसंस्कृती : स्वरूप आणि व्याप्ती’ हा मानवी संस्कृती आणि पाण्याचे नाते उलगडणारा मोरवंचीकर सरांचा ’मॅग्नम ओपस’ मानला जातो. ’देवगिरी-दौलताबाद : अ‍ॅन आर्किऑलॉजिकल व्ह्यू’ देवगिरी किल्ल्याच्या स्थापत्यशास्त्रीय अभ्यासावर आधारित हा इंग्रजी ग्रंथ जगभरातील अभ्यासकांसाठी महत्त्वाचा आहे. ’शुष्क नद्यांचा आक्रोश’ हे नद्यांच्या प्रश्नावर लिहिलेले एक अत्यंत संवेदनशील आणि वास्तववादी पुस्तक आहे. ’जैनांचे सांस्कृतिक योगदान’ या पुस्तकात त्यांनी जैन धर्माने महाराष्ट्राच्या कलेत आणि साहित्यात काय भर घातली, याचा सखोल आढावा घेतला आहे. ’येई परतुनी ज्ञानेश्वरा’ हे संत ज्ञानेश्वरांच्या पैठण येथील वास्तव्यावर आणि त्यांच्या कार्यावर आधारित चिंतनशील पुस्तक आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देणार्‍या अनेक थोर व्यक्तींची चरित्रे लिहिली. सर साप्ताहिक विवेकच्या ’आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिला इतिहास खंड याचे संपादक होते. त्यांचे साहित्य हे केवळ माहितीचे भांडार नव्हते, तर ते इतिहासाकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारे होते.
 
 
 
संस्थात्मक कार्य
 
 
डॉ. मोरवंचीकर यांनी केवळ लेखन केले नाही, तर ऐतिहासिक वास्तूंच्या जतनासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरून काम केले. 1996 ते 2005 या काळात त्यांनी ’इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज’ (INTACH) च्या छत्रपती संभाजीनगर चॅप्टरचे नेतृत्व केले. संभाजीनगर शहराची ओळख असलेले मध्ययुगीन दरवाजे वाढत्या शहरीकरणामुळे नामशेष होऊ लागले. मोरवंचीकर सरांनी या दरवाजांच्या जतनासाठी मोठा आवाज उठवला. त्यांनी आग्रह धरला की, हे दरवाजे केवळ दगड-विटांचे बांधकाम नसून ते शहराच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांनी या वास्तूंच्या नोंदणीसाठी मोलाचे काम केले आणि सरकारकडे त्यांच्या दुरुस्तीसाठी सक्रिय पाठपुरावाही केला. मराठवाड्याच्या पर्यटनाला जागतिक नकाशावर स्थान मिळावे, यासाठी मोरवंचीकर सरांनी ’वेरूळ महोत्सवाच्या’ संकल्पनेसाठी पुढाकार घेतला. 1985 मध्ये जेव्हा हा महोत्सव पहिल्यांदा कैलास मंदिराच्या प्रांगणात झाला, तेव्हा त्यामागे तत्कालीन प्रशासनासोबतच मोरवंचीकर सरांची संकल्पना आणि मेहनत होती. पर्यटन हे केवळ फिरण्यासाठी नसून ते संस्कृती समजून घेण्यासाठी असावे, हा त्यांचा विचार होता.
 
 
डॉ. मोरवंचीकर यांनी आपल्या 40 वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत 30 हून अधिक पीएच.डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. दुलारी कुरेशी, डॉ. अरुणचंद्र पाठक, डॉ. शरद हेबाळकर अशी काही ठळक उदाहरणे इतिहास संशोधन क्षेत्रात आज दीपस्तंभाचे काम करत आहेत. त्यांचे विद्यार्थी आज महाराष्ट्रातील आणि भारतातील विविध विद्यापीठांमध्ये इतिहासाचे अध्यापन करत आहेत. इतिहास हा जिवंत असायला हवा, तो केवळ तारखांची गोळाबेरीज नसावा, ही शिकवण त्यांनी आपल्या शिष्यांना दिली. विद्यापीठाच्या पर्यटन विभागातून शिकलेले अनेक तरुण पर्यटक मार्गदर्शक (गाइड) म्हणून तयार झाले. आजही ते अजिंठा, वेरूळ येथे पर्यटकांना अस्सल इतिहास सांगत आहेत.
 
 
डॉ. मोरवंचीकर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. वयाच्या 80 व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने त्यांना ‘जीवन साधना’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यासोबतच महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, तसेच त्यांच्या कार्यासाठी विविध संस्थांनी दिलेले साहित्य आणि संस्कृती पुरस्कार त्यांच्यासाठी केवळ सन्मान नव्हते, तर त्यांनी केलेल्या तपश्चर्येची ती पोचपावती होती. तरीही ते नेहमी म्हणत की, माझ्यासाठी खरा पुरस्कार म्हणजे लोकांनी आपल्या नद्यांचे प्रदूषण थांबवणे आणि आपल्या वारशाचे रक्षण करणे हाच असेल.
 
 
ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि इतिहासाचे शहाणपण
 
 
डॉ. मोरवंचीकर हे दिसायला अत्यंत साधे, पण विचारांनी अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व होते. छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवास्थानी ’ज्ञानेश्वरी’चे पारायण आणि इतिहासाचे संशोधन एकाच वेळी चालत असे. ते म्हणत की, इतिहास आपल्याला बदला घेण्यासाठी नाही, तर भविष्य सुधारण्यासाठी शिकायचा असतो. अलीकडच्या काळात इतिहासाचे जे काही ’रंजन’ केले जात आहे, त्याबद्दल त्यांनी नेहमीच नाराजी व्यक्त केली. पैठणच्या मातीतील सातवाहन, यादवांचे देवगिरी, मलिक अंबरची नहर पद्धत आणि संतांची मांदियाळी या सर्वांना आपल्या लेखनातून जोडणारे ते खर्‍या अर्थाने ’गोदाकाठचे ऋषी’ होते. त्यांच्या जाण्याने केवळ एक इतिहासतज्ञ गेला नाही, तर इतिहासाच्या माध्यमातून जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा एक मार्गदर्शक हरपला आहे.
 
 
डॉ. मोरवंचीकर यांचा वारसा चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. त्यांनी सांगितलेल्या जलसंस्कृतीचा विचार करणे, ऐतिहासिक वास्तूंचे रक्षण करणे आणि पुराव्याधारित इतिहास स्वीकारणे, हेच त्यांच्या ऋषितुल्य कार्याचे सार्थक ठरेल. त्यांच्या जाण्याने मराठवाड्याच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक ’अमृतधारा’ खंडित झाली आहे, पण त्यांनी मागे ठेवलेली ग्रंथसंपदा आणि विचार पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहतील.
Powered By Sangraha 9.0