कळपावेगळा कारभारी

विवेक मराठी    29-Jan-2026   
Total Views |
ajit pawar
काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केला असला तरी अजितदादा कधी त्या सरंजामशाही गोतावळ्याचा भाग वाटले नाहीत. पुरोगामी कळपापेक्षा ते कायम वेगळे राहात गेले, ठरत गेले. त्यांच्या वाट्याला आलेली प्रखर टीका ही कदाचित त्या वेगळेपणाचीच त्यांना मोजावी लागलेली किंमत असावी. मनस्वी कार्यार्थी न गणयति दुःखं न च सुखं या न्यायाने त्यांनी कधी या टीकेची पर्वा केली नाही. आपला रांगडेपणा व निखळपणाही सोडला नाही. संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेला त्यांनी कधीही थारा दिला नाही. पुरोगामीपणाच्या नावाखाली हिंदूद्वेष किंवा संघद्वेष त्यांनी कधी केला नाही. इतकेच नव्हे, तर असे प्रकार करणार्‍यांवर जाहीरपणे डाफरण्यासही त्यांनी कमी केले नाही. आशा या नेत्याला श्रद्धांजली अर्पण करणारा लेख..
सुमारे साडेपाच वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते व तत्कालीन मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे भावी प्रमुख अजित पवार यांनी भल्या पहाटे शपथ घेऊन संपूर्ण देशाला स्तंभित केले होते. त्यावेळी कट्टर शिवसैनिक असलेल्या परंतु पत्रकार-राजकीय विश्लेषक असलेल्या एका मित्राची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती - ही जोडी मस्त आहे. राज्याला अशीच जोडी हवी आहे. देवेंद्राची दूरदृष्टी (व्हिजन) आणि अजितदादांची तडफ एकत्र आली तर खूप मजा येईल.
 
 
ते सरकार तर औटघटकेचे ठरले, मात्र काही काळाने हे दोन नेते खरोखरच एकत्र आले. मात्र आता पुन्हा ही जोडी भंगली आणि त्यातील एक दुवा कायमचा निखळला आहे.
 
 
अनपेक्षित, अवचित आणि अचंबित करण्यासाठी ओळखल्या जाणार्‍या अजित पवार यांचे निधनही तसेच अघटित म्हणावे असे. अजितदादा कायम उमेदवार राहिले. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार, पक्षप्रमुख पदाचे उमेदवार अशा नाना प्रकारे त्यांच्या वाट्याला नेहमी उमेदवारी आणि दावेदारीच आली. प्रत्यक्ष सत्तारोहण असे झालेच नाही. राज्याच्या राजकारणात आपली छाप उमटविणार्‍या काही ठळक व्यक्तिमत्त्वांपैकी ते एक होते. काका शरद पवार यांच्या छायेखाली त्यांचे राजकारण बहरले तरी त्या छायेतून बाहेर पडून स्वकर्तृत्वावर पुढे जाण्याची त्यांनी सुरुवात केली होती. गेल्या काही वर्षांमध्ये तर त्यांनी नेतृत्वाचीही मांडही बसविली होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. आणि एक स्पष्टवक्ता पण उमदा व तडफदार नेता महाराष्ट्राने गमावला. त्यांच्या विमानाचे कोसळणे हा अपघात की घातपात वगैरे चर्चा होत राहतील, त्याची चौकशी व अहवाल वगैरे सोपस्कारही होतील. परंतु अजितदादा आपल्यात नसतील, ही वस्तुस्थिती कायम राहील.
 
ajit pawar 
 
अजितदादा म्हटले की पहिल्यांदा डोळ्यापुढे येतो तो एक करारी आणि तडफदार कारभारी. कारभार कसा करावा याचा वस्तुपाठ अजित पवार होते. जागच्या जागी निर्णय आणि ताबडतोब अंमलबजावणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. बघतो पाहतो असे शब्द त्यांच्या शब्दकोशातच नव्हते. परंतु हा कारभारी इतर राजकीय गोतावळ्यापासून वेगळा होता आणि म्हणूनच जनप्रिय होता.
आधी काँग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केला असला तरी अजितदादा कधी त्या सरंजामशाही गोतावळ्याचा भाग वाटले नाहीत. पुरोगामी कळपापेक्षा ते कायम वेगळे राहात गेले, ठरत गेले. त्यांच्या वाट्याला आलेली प्रखर टीका ही कदाचित त्या वेगळेपणाचीच त्यांना मोजावी लागलेली किंमत असावी. मनस्वी कार्यार्थी न गणयति दुःखं न च सुखं या न्यायाने त्यांनी कधी या टीकेची पर्वा केली नाही. आपला रांगडेपणा व निखळपणाही सोडला नाही.
 
 
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर शरद पवार यांना दिल्लीचे वेध लागले. त्यावेळी बारामतीत त्यांची गादी चालविण्यासाठी त्यांना उत्तराधिकारी हवा होता. खाद्यतेलाच्या कारखान्याद्वारे उद्योग जगतात पुढे आलेल्या अजितदादांना ती संधी मिळाली. वास्तविक जून 1991 मध्ये ते आधी संसदेवर निवडून गेले होते, परंतु नरसिंहराव यांच्या मंत्रीमंडळात शरद पवार यांना संरक्षण मंत्रिपद मिळाल्यामुळे लोकसभेची जागा त्यांना रिकामी करावी लागली. ते विधानसभेवर निवडून आले आणि थेट सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात मंत्री झाले.
 
 
मंत्रिपदाच्या नव्या नवलाईच्या काळातच अजितदादांना वादाला सामोरे जावे लागले. बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मैदानाची जागा वाढवून देण्याचे निमित्त झाले आणि टीकेचे मोहोळ उठले. आपल्या विरोधी विचारांच्या संस्थेला मदत कशी काय केली, असा गहजब सुरू झाला. वास्तविक अजितदादा स्वतः या संस्थेचे माजी विद्यार्थी. शिवाय संस्था कुठल्याही विचाराची असली तरी काम चांगले असेल तर मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, ही त्यांची भूमिका होती.
 
 
अजितदादांचे मामा अण्णासाहेब कदम हे संघाचे कार्यकर्ते. म्हणजेच मातुल घराण्याकडून अजितदादांना संघसंस्कार लाभले असावेत. म्हणूनच की काय, संभाजी ब्रिगेडसारख्या संघटनेला त्यांनी कधीही थारा दिला नाही. पुरोगामीपणाच्या नावाखाली हिंदूद्वेष किंवा संघद्वेष त्यांनी कधी केला नाही. इतकेच नव्हे, तर असे प्रकार करणार्‍यांवर जाहीरपणे डाफरण्यासही त्यांनी कमी केले नाही. अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळात सामील झाल्यानंतर काही दिवसांनंतर पुण्यातील संघाच्या मोतीबाग कार्यालयात येण्यात त्यामुळेच त्यांनी काही अनमान केला नाही. स्व. मदनदास देवी यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेले असताना फडणवीस यांच्याकडून संघाविषयी जाणून घेताना ते दिसत होते. अलीकडेच महापालिका निवडणुकीत भाजपाशी सख्य करण्यावरून पुण्यातील त्यांच्याच काही माजी सहकार्‍यांनी शरद पवारांनी त्यांच्याशी सहकार्य करायला विरोध केला आणि वेगळा मार्ग पत्करला त्याला ही पार्श्वभूमी होती.
 
ajit pawar 
 
सुमारे पस्तीस वर्षांच्या कार्यकाळात अजितदादा उत्तरोत्तर मोठे झाले. कामाची तडफ व निर्णयक्षमता ही त्यांची ओळख बनली. कोरोनाच्या काळात राज्यातील सरकार जवळजवळ क्वारंटाईन झालेले असताना तीन नेते प्रत्यक्ष मैदानात उतरून आणि जनतेमध्ये जाऊन काम करत होते. एक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, दुसरे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि तिसरे उपमुख्यमंत्री अजित पवार.
 
 
राज्याच्या राजकारणात बस्तान बसल्यानंतर अजितदादांनी पिंपरी-चिंचवड शहरावर आपले लक्ष केंद्रित केले. पिंपरी-चिंचवड उद्योग नगरी म्हणून ओळखली जात असली तरी तेथील राजकारण आणि शहरकारण गावकीभावकीच्या पठडीतलेच होते. त्याला शहरी तोंडवळा अजितदादांनी दिला. प्रशस्त रस्त्यांपासून सायन्स सेंटरपर्यंत अनेक विकासकामे केली. त्यामुळेच पुढे 2007 मध्ये पुणे महापालिकेची सत्ता मागत असताना, एकदा पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन पहा, असे आव्हानही त्यांनी दिले होते. त्याच पुण्यात धडाक्याने कामे का होत नाहीत, या प्रश्नावर पुण्यात शहाण्या लोकांची संख्या खूप आहे म्हणून येथे कामे अडून राहतात, असे तिरकस उत्तरही त्यांनी दिले होते.
 
वेळकाढूपणा आणि पळकाढूपणा या दोन्ही गोष्टी अजितदादांमध्ये नव्हत्या. 2009मध्ये कुठली तरी शासकीय बैठक पुण्याच्या विधानभवनात (काऊंसिल हॉल) होती. बैठक सुरू असतानाच अधिकार्‍यांनी अजितदादांना निरोप दिला की, विधासनभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. बैठक संपताच दालनातून बाहेर पडलेल्या अजितदादांनी त्वरित शासकीय वाहन नाकारून खासगी गाडी मागवली. त्यावेळी व्हाट्सअप वगेरैंचे व्हायरल प्रकार नव्हते. एसएमएस असले तरी त्यांची चलती तेवढी नव्हती. केवळ अजितदादांच्या त्या एका कृतीमुळे आचारसंहिता लागू झाल्याचे पत्रकारांनी ताडले.
 
ajit pawar 
 
अजितदादांचा फटकळपणा सर्वश्रुत होता. त्यापायी ते अनेकदा गोत्यातही आले. परंतु कामाच्या नावाने लोकांच्या तोंडाला पाने पुसायचे प्रकार त्यांनी कधीही केले नाहीत. एक घाव दोन तुकडे हा त्यांचा बाणा होता. पण म्हणूनच बनवाबनवी आणि चालढकल त्यांच्यापुढे चालत नसे. ही गोष्ट अधिकार्‍यांसाठी जेवढी खरी होती तेवढीच लोकांसाठीही होती. तरीही 2012 मधील धरणाबाबतच्या त्या वक्तव्यामुळे त्यांची कारकीर्द जवळपास उध्वस्त झाली होती. त्यावेळी त्यांनी कराड येथे आत्मक्लेश उपोषण केले होते. ते आत्मक्लेश सच्चे असावेत, असे त्यांच्या पुढील वाटचालीवरून दिसते. कारण त्यानंतर त्यांनी जिभेला आवर घातला. त्यांच्या तोंडून पुन्हा तसे वावगे उद्गार निघाले नाहीत. त्यांच्याकडे विनोदबुद्धी नव्हती असे नाही, परंतु ती ग्रामीण शैलीची होती. त्यात एक मोकळेढाकळेपणा होता. नागरी मुलामा चढलेला नव्हता, विशेष म्हणजे ती शेवटपर्यंत तशीच राहिली.
 
 
विशेषतः महायुतीत सामील झाल्यानंतर अजितदादांच्या वागण्या बोलण्यात प्रचंड फरक पडला. लोकांमध्ये याची जोरदार चर्चा होत होती. पूर्वी अभिमानाने स्वतःला टग्या म्हणून घेणार्‍या अजितदादांनी महिला वर्गामध्ये लोकप्रियता मिळविण्याचा आणि वाढविण्याचा प्रयत्न केला. तो बर्‍यापैकी यशस्वीही होऊ लागला होता.
 
 
अजितदादांनी कधी संघर्ष केला नाही असे बोलले जाते. मात्र त्यांचा संघर्ष वेगळा होता, तो त्यांच्या स्वतःच्या पक्षातच होता. त्या संघर्षाची चिन्हे थेट 2009 पासून दिसून येत होती. त्यावेळेसच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जोर असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मनसेची युती करावी, अशी जाहीर भूमिका त्यांनी मांडली होती. त्यानंतर शरद पवारांशी त्यांचे वारंवार खटके उडू लागले. अजितदादांच्या कामावर शरद पवार वारंवार नाराजी व्यक्त करू लागले. उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा अजितदादांकडे विरोधी पक्षनेते पद आले. मात्र विधीमंडळात अजितदादा सरकारच्या विरोधात पुरेशी आक्रमक भूमिका घेत नाहीत, अशी जाहीर तक्रार शरद पवारांनी केली. तेव्हा आता मी जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी हाणामारी करू काय, असा उद्विग्न प्रश्न अजितदादांनी विचारला होता.
 
त्यातूनच अधूनमधून अजित पवार आऊट ऑफ रेंज होऊ लागले. ज्या पक्षासाठी ऐन उमेदीच्या काळात प्रचंड मेहनत घेतली, त्याच पक्षात अडगळीत टाकल्याची त्यांची भावना होऊ लागली. ईदच्या बकर्‍याला खाऊपिऊ घालून मग त्याची कुर्बानी द्यावी, अशी काहीशी अवस्था आपली झाली की काय हा प्रश्न त्यांना सतावू लागला. त्याचा जाहीर उद्रेक 2023 मध्ये शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या दुसर्‍या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात झाला. त्यावेळी पवारांनी राजकीय खेळी करून त्यांना निष्प्रभ केले खरे, परंतु थोड्याच दिवसांत अजितदादांनी आपली वाट निवडली आणि नवी वाटचाल सुरू केली.
 
 
त्या वाटचालीला आता कुठे फळे येऊ लागली होती. लोकसभा निवडणुकीत दारुण अपयश आले तरी विधानसभेतील दणदणीत यशाने त्याची भरपाई केली. त्यामुळे नव्या हुरुपाने ते कामाला लागले होते. मात्र त्या सगळ्यावर आता पूर्णविराम लागला आहे. स्वबळावर भरारी घेऊ पाहणार्‍या एका नेत्याचे अस्तित्व विमान कोसळल्यामुळे अस्तंगत झाले. क्षमता असूनही या नेत्याला कर्तृत्व दाखविण्याची संधी खर्‍या अर्थाने कधी मिळाली नाही, ही रुखरूख कायम राहील.

देविदास देशपांडे

पत्रकार आणि राजकीय विश्लेषक