मरण कल्पनेशीं थांबे...

29 Jan 2026 15:48:19
 
 
ajit pawar
‘मरण कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्याचा...’ ही ओळ आहे, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी-गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांच्या ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या सुप्रसिद्ध गीतातील. त्या ओळीचा अर्थ फार खोलवर महाराष्ट्राला समजला तो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या अकस्मात, अनपेक्षित, अतर्क्य मृत्यूने.
‘मरण कल्पनेशीं थांबे तर्क जाणत्याचा...’ ही ओळ आहे, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी-गीतरामायणकार ग. दि. माडगूळकर यांच्या ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा’ या सुप्रसिद्ध गीतातील. त्या ओळीचा अर्थ फार खोलवर महाराष्ट्राला समजला तो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या झालेल्या अकस्मात, अनपेक्षित, अतर्क्य मृत्यूने.
 
महाराष्ट्रातल्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यात प्रचार सभांसाठी खाजगी विमानाने निघालेल्या अजितदादांवर काळाने झडप घातली. हा अपघात इतका भयावह होता की बेचिराख झालेल्या या विमानातील सर्वांनाच मृत्यूने गाठले. प्रसारमाध्यमांद्वारे अजितदादांच्या आकस्मिक मृृत्यूची बातमी वणव्यासारखी राज्यभर पसरली आणि लाडक्या नेत्याच्या अंत्यदर्शनासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्या लाखो चाहत्यांनी आणि सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी बारामती गाठले. पवार कुटुंबियांचे गाव म्हणून बारामतीला ओळखले जाते. या गावाविषयी आपल्या काकांइतकीच आत्मीयता असणार्‍या अजितदादांची अखेरही बारामतीच्या मातीतच झाली, हा चटका लावणारा योगायोग.
 
 
राजकीय विचार वेगळे असणारा प्रत्येक जण अजितदादांच्या मृत्यूने हळहळला. शोकमग्न झाला. तसेच या नेत्याने आयुष्यभरात कार्यकर्त्यांचे कमावलेले प्रेम, विश्वास पाहून चकितही झाला. अन्य कुठल्याही लौकीक कमाईपेक्षा त्यांची ही कमाई कांकणभर अधिकच भरेल. मात्र ही कमाई हा चमत्कार नव्हता की नशिबाचे त्यांना पडलेले सहजदान नव्हते. ते पक्षाच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याशी, शेतात राबणार्‍या शेतकर्‍याशी-शेतमजुराशी त्यांच्या कामातून जोडले गेले होते. म्हणूनच ही त्यांची सर्वार्थाने आपकमाई होती. पुण्याई होती.
 
 
अजितदादा त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे जसे स्मरणात राहतील तसे आणखीही काही गोष्टींमुळे दीर्घ काळ स्मरणात राहतील. त्यांची प्रशासनावर असलेली मजबूत पकड, कामाचा झपाटा, राज्यातल्या प्रश्नांची असणारी नेमकी जाण, वागण्याबोलण्यातली निर्भीडता-थेटपणा, हजरजबाबीपणा, स्वभावातली लक्षवेधी मिश्किल छटा आणि सरकारात काम करताना त्यांनी अतिशय मनापासून निभावलेला युतीधर्म या सगळ्यासाठीही ते आठवले जातील.
 
 
अनेकदा अतिशय परखड, समोरच्याला बोचेल असे बोलणे हा ही त्यांचा गुणविशेष होता. पण अशा बोलण्यामुळेे माणसं त्यांना दुरावली नाहीत. कारण या परखडपणाच्या तळाशी होती सर्वसामान्यांच्या आयुष्याबद्दलची प्रांजळ आस्था. म्हणूनच त्यांचे प्रेम अजितदादांना कायमच लाभले. त्या प्रेमाचे विराट दर्शन त्यांच्या अखेरच्या निरोपाच्या वेळी झाले. ते जमलेल्या गर्दीतून झाले तसे सामूहिक आक्रोशातूनही झाले. एकूणच कोरडेपणा वाढलेल्या आणि हिशोबी झालेल्या आजच्या जगात असे भाग्य फार थोडक्या नेत्यांच्या नशिबी येते. अजितदादा अशा भाग्यवंतांपैकी एक.
 
 
दररोज सकाळी सहा-साडेसहा वाजल्यापासून जनतेची गार्‍हाणी ऐकण्यासाठी अजितदादा त्यांच्या दिवाण ए आम मध्ये उपस्थित असत. त्यांची ही सवय अनेक वर्षांपासूनची आणि अतिशय असाधारण अशी. समोर आलेल्या प्रत्येक निवेदनाची तड लावणे, त्याला जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न करणे हे ते पक्षाचे वरिष्ठ नेता म्हणून जसे करत आले तसे मंत्रीमंडळात विविध खात्यांचा कार्यभार सांभाळतानाही करत आले. त्यांची प्रशासनावर उत्तम पकड असल्याने त्यांच्या खात्यात काम करणार्‍या अधिकार्‍यांवरही त्याचा दबाव असे. मंत्री सक्षम असेल आणि तो पूर्ण कार्यक्षमतेने काम करत असेल तर त्याच्या खात्यावर नियंत्रण त्या मंत्र्याचेच असते, खात्यातल्या बाबू लोकांचे नाही हे त्यांनी आपल्या कार्यपद्धतीतून दाखवून दिलं.
 
गरज असेल तिथे तोंडावर स्पष्ट बोलण्याची त्यांची सवय. अशा फटकारण्यातून त्यांचे काका - त्यांच्या राजकीय जीवनातले आद्य गुरूही सुटले नाहीत. आपली पक्षात होत असलेली कुचंबणा स्पष्टपणे बोलून दाखवत त्यांनी उघडपणे न्याय मागण्याचा प्रयत्न केला. तो मिळत नाही असे दिसल्यावर अधूनमधून ‘नॉट रिचेबल’ होण्याचा मार्ग अवलंबला. त्यानेही फारसा फरक पडत नाही हे लक्षात आल्यावर आपल्या साथीदारांसह दूर होण्याचे धाडस दाखवले. पूर्णपणे भिन्न वैचारिक परंपरा असलेल्या भाजपाबरोबर जाऊन उत्तम कारभार करताना युतिधर्माचे पालन कसे केले जाते याचा वस्तुपाठही घालून दिला. यासाठी मुख्यमंत्री होण्याच्या त्यांच्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला मुरड तर घातलीच शिवाय त्यामुळे नाराज न होता अतिशय मन:पूर्वकतेने हाती आलेला कार्यभार सांभाळला. राजकारणातील मूलभूत वैचारिक भिन्नता युतीचे पालन करताना जशी आड येत नाही तशी ती मैत्रीच्याही आड येत नाही हे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी राखलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून दाखवून दिले. म्हणूनच त्यांच्या आकस्मिक जाण्याने या दोघांना झालेले दु:ख एक सहकारी गमावण्यापुरते मर्यादित नाही तर ते एका जवळच्या सुहृदाच्या चिरवियोगाचे दु:ख आहे.
 
 
जन्मलेल्या प्रत्येकाला मृत्यू हा अटळ असतो. पण जेव्हा तो अनाकलनीय, अतर्क्य रूपात सामोरा येतो तेव्हा तो अधिक भयकारी भासतो. असा मृत्यू ‘जीवन हे अशाश्वत आहे, मरण हेच शाश्वत’ हा विचार समूहमनावर अधिक खोलवर ठसवतो. अजितदादांच्या मृत्यूमुळे समाजमनावर नेमका हाच परिणाम झाला आहे. तो आणखी काही दिवस टिकेल. नंतर रहाटगाडगे पुन्हा एकदा पूर्वपदावर येईल. त्यांचे कुटुंब पुन्हा एकदा उभारी घेऊन दैनंदिन कामात स्वत:ला झोकून देईल, त्यांच्यासाठी शोकाकुल झालेला प्रत्येक जण आपापलं जीवन जगू लागेल. राजकारणही पुढे जात राहील. काळ हेच सगळ्या दु:खावरचं, आघातावरचं, वेदनेवरचं रामबाण औषध आहे याची पुन्हा एकदा प्रचिती येईल. तरीही सर्वसामान्यांच्या मनात आणि राजकीय पटलावर अजितदादांच्या स्मृती चिरंतन राहतील.
Powered By Sangraha 9.0