श्रीमद्भगवद्गीता आणि गांधीजी

30 Jan 2026 11:42:55
 
Bhagavad Gita and Gandhiji
गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता...
भगवद्गीता हा भारतीय तत्त्वज्ञानाचा महान ग्रंथ आहे. हिंदूंना तो वंदनीय आहे. भगवद्गीतेवर गेल्या चार-पाच हजार वर्षांत अनेक भाष्ये झालेली आहेत. समाज गतिमान असतो. राज्यव्यवस्थेत बदल होत जातो. अर्थव्यवस्था बदलत जातात. समाजव्यवस्थेतदेखील परिवर्तन होते. अशा वेळी समाजाचे मार्गदर्शन कोणत्या तत्त्वांच्या आधारे केले पाहिजे, हे गीतेवर भाष्य करून थोर पुरुष सांगत असतात.
 
अनेक जण हौसेखातर, आपल्या बुद्धीची भूक भागवण्यासाठी गीतेवर काही ना काही लिहीत असतात. कुणी गीतेचा प्रादेशिक भाषेत अनुवाद करतो; परंतु असे लिखाण आणि असले अनुवाद यांना जनमान्यता मिळत नाही. जनमान्यता मिळण्यासाठी गीता जगणारा थोर पुरुष असावा लागतो. त्याचे गीतेवरील भाष्य प्रमाण मानले जाते. लोक त्या भाष्याची पारायणे करतात. श्रद्धेने तो ग्रंथ आपल्या घरी ठेवतात, त्याची पूजा करतात.
 
असे भाग्य आद्य शंकराचार्य यांना लाभलेले आहे. त्यांचे गीतेवरील भाष्य अनेक शतके प्रमाण मानले गेले. आजही ज्या कुणाला गीतेचा तत्त्वज्ञानाच्या अंगाने अभ्यास करायचा असतो, त्याला शंकराचार्यांच्या भाष्याचा आधार घ्यावा लागतो आणि पुढे जावे लागते.
 

vivek
पुस्तक खरेदी करण्यासाठी
 
 
ज्ञानदेवांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली. येथे टीकेचा अर्थ भाष्य असा आहे. ज्ञानदेवांचे गीतेवरील भाष्य नऊ हजार ओव्यांचे आहे. मूळ गीता केवळ सातशे श्लोकांची आहे. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी वारकरी संप्रदायाच्या प्रस्तानत्रयीतील प्रमुख ग्रंथ आहे. या ग्रंथाला आता सातशे वर्षे झालेली आहेत. त्याची गोडी अवीट आहे. मराठी भाषेचा तो आधारभूत ग्रंथ आहे. त्यातील काव्याला कोणतीही उपमा देता येत नाही आणि तो तत्त्वज्ञानाचा महाग्रंथराज आहे. अनेक जण ज्ञानेश्वरीला पाचवा वेद समजतात.
 
 
ज्ञानेश्वरी हे गीतेवरील भाष्य आहे. भाष्यकार मूळ संहितेतील शब्द बदलत नाहीत. श्लोकांची रचना बदलत नाहीत. तो या सर्वांमध्ये एक नवीन अर्थ भरतो. शब्द तेच असतात, श्लोक तेच असतात, पण अर्थ मात्र त्या काळाला आवश्यक असा असतो. ज्ञानदेवांच्या काळात समाजाची घडी विस्कटली, जातिभेद पक्के झाले, अस्पृश्यता अधिक कडक झाली, धार्मिक कर्मकांडे वाढली, धर्माचा अर्थ लोप पावला, खुळचट समजुती म्हणजे धर्म अशी परिस्थिती निर्माण झाली. संन्याशांच्या मुलांची मुंज करायची की नाही, हा धर्मनिर्णयाचा ज्वलंत विषय झाला. असा समाज संघटित होऊ शकत नाही आणि परकीय आक्रमकांसमोर टिकूही शकत नाही.
 
 
ज्ञानदेवांनी धर्म विसरलेल्या समाजाला धर्म म्हणजे काय आणि त्याचे आचरण कसे करायचे, हे गीतेवर भाष्य करून सोप्या शब्दांत सांगितले. गीतेत भक्ती सांगितलेली आहे आणि परमेश्वराची भक्ती निष्काम भावनेने केली पाहिजे. ईश्वराचा निवास सर्व मानवांत आहे. म्हणून माणसाला तुच्छ लेखू नये, त्याची सेवा करावी. हीच ईश्वराची सेवा आहे. भगवान श्रीकृष्णाने हीच गोष्ट भगवद्गीतेत सांगितली आहे. ज्ञानदेवांनी तिला नाव दिले - भागवद् धर्म. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात भक्ती संप्रदायाचा उदय झाला. विठ्ठलाची उपासना मोठ्या प्रमाणात सुरू झाली. विठ्ठलाचे वर्णन सात्त्विक देवता असे बिंबवण्यात आले. त्याची आराधना करा. जे कुठले काम कराल ती विठ्ठलाचीच भक्ती आहे, या भावनेने करा. ‘कांदा, मुळा, भाजी, अवघी विठाई माझी’ ही अभंगाची ओळ या भावनेचे प्रतिबिंब आहे.
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी
 
 
आक्रमक मुसलमानी राज्यात आपला धर्म, संस्कृती, मूल्ये टिकून ठेवण्याचे काम भक्ती संप्रदायाने केले. आपले राज्य गेले. राज्याबरोबर दंडशक्ती जाते. ती परक्यांच्या हातात येते. तिचा वापर करून लोकांना वाटेल तसे पिडले जाते. सगळ्या भारताने याचा अनुभव घेतला; पण भारत मुसलमान झाला नाही. भारतातील असंख्य हिंदू, मुसलमान झाले. त्याची कारणे इस्लामच्या तलवारीत आहेत; परंतु जे हिंदू राहिले, त्यांना तसे राहण्यास ज्ञानदेवादी संतांनी प्रवृत्त केले.
 

Bhagavad Gita and Gandhiji 
 
यानंतर भारतात इंग्रजांचे राज्य आले. त्याच्याबरोबर ख्रिश्चन धर्म आला. तसेच विदेशी तत्त्वज्ञान आले. विदेशी विद्या आल्या. इंग्रजांचे राज्य भारतात स्थिर होण्याच्या काळात भारतीय समाजाची अवस्था दगडासारखी झाली होती. छोटी-छोटी राज्ये, त्यांचे त्यांचे आपआपसातील कलह, जातिसंस्थेचा जाच, अस्पृश्यता, धर्मभेद आणि घोर अज्ञान, यात आपला सगळा समाज बुडालेला होता. त्याला जागे करण्याची आवश्यकता होती. त्याला उभे करणारे तत्त्वज्ञान सांगण्याची गरज होती. पुन्हा एकदा गीतेवर कालानुरूप भाष्य करण्याचा विषय आला.
 
 
हे काम लोकमान्य टिळकांनी केले. त्यांनी ‘श्रीमद्भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची रचना त्यांनी मंडालेच्या तुरुंगात केली. श्रीकृष्णाने अर्जुनाला कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगितली. श्रीकृष्णाचा जन्म कारागृहात झाला. कृष्णाच्या गीतेवरील भाष्याचा जन्म कारागृहातच झाला. टिळकांचा ‘गीतारहस्य’ हा ग्रंथ मराठी वैचारिक वाङ्मयातील कैलासाचे शिखर आहे. ज्ञानदेवादी भाष्यकारांनी गीतेवर भाष्य करताना पूर्वीच्या भाष्यकारांच्या भाष्याचा आधार घेतला. लोकमान्य टिळकांनीही तो घेतलेला आहे; परंतु लोकमान्य टिळक येथेच थांबलेले नाहीत.
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी
 
 
टिळकांच्या काळात पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास भारतात सुरू झाला होता. जॉन स्टुअर्ड मिल, कान्ट, हर्बर्ट स्पेन्सर, ओपनहिमर इत्यादींच्या तत्त्वज्ञानांचा अभ्यास सुरू झाला होता. उदारमतवाद, उपयुक्ततावाद, व्यक्तिवाद असे वेगवेगळे वाद भारतात आले होते. या सर्वांचा नीट अभ्यास करून त्याची तुलना गीतेच्या तत्त्वज्ञानाशी करणे आवश्यक होते. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या मर्यादा स्पष्ट करणेदेखील आवश्यक होते. इंग्रजी विद्या म्हणजे वाघिणीचे दूध आणि आपल्या विद्या म्हणजे बकरीचे दूध, अशी जी विचारवंतांची भावना झाली होती, त्याला सुरुंग लावणे आवश्यक होते. टिळकांच्या ‘गीतारहस्या’ने हे काम केले. म्हणून त्यांचा हा ग्रंथ मराठी भाषेची प्रतिष्ठा जशी वाढविणारा आहे, तसे गीतेचे कालसापेक्ष भाष्य देणाराही आहे.
 
 
लोकमान्य टिळकांनी गीतेचा कर्मप्रधान अर्थ सांगितला. शंकराचार्यांनी गीतेचा संन्यासप्रधान अर्थ सांगितला. ज्ञानदेवांनी भक्तिप्रधान अर्थ सांगितला. त्या त्या काळाच्या संदर्भात ते सर्व बरोबरच होते. टिळकांच्या काळात समाजाने कर्म करणे आवश्यक होते. कर्म म्हणजे सतत उद्योग. प्रचंड हालचाल आणि कर्म कोणते तर, प्रत्येकाला प्राप्त झालेले विहित कर्म होय. कर्माशिवाय कुणी राहू शकत नाही आणि कर्म कुणाला सुटत नाही.
 
 
टिळक म्हणतात की, गीतेतील मुख्य मुद्दा, ‘मनुष्याने शुद्ध परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान संपादन करून तद्द्वारा आपली बुद्धी होईल तितकी निर्मल व पवित्र करणे...हा गीतेतील मुख्य मुद्दा नव्हे.’ गीतेतील मुख्य मुद्दा कोणता, हे सांगताना टिळक म्हणतात, “युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म असला तरी उलटपक्षी कुलक्षयादी घोर पातके घडून जे युद्ध मोक्षप्राप्तिरूप आत्मकल्याणाचा नाश करणार ते करावे का करू नये, अशा कर्तव्यमोहांत युद्धारंभी अर्जुन पडला होता. म्हणून तो मोह घालवण्यासाठी शुद्ध वेदान्तशास्त्राधारे कर्माकर्माचे व त्याबरोबरच मोक्षोपायाचेही पूर्ण विवेचन करून आणि कर्मे कधीच सुटत नाहीत व सोडूही नयेत असे ठरवून, ज्या युक्तीने कर्मे केली म्हणजे कोणतेच पाप न लागता अखेर त्यानेच मोक्षही मिळतो, त्या युक्तीचे म्हणजे ज्ञानमूलक व भक्तिप्रधान कर्मयोगाचेच गीतेत प्रतिपादन आहे, असा आमचा अभिप्राय आहे.” टिळकांच्या ‘गीतारहस्या’ने स्वातंत्र्यलढ्याची वैचारिक पृष्ठभूमी तयार केली.


vivek
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी
 
 
या ग्रंथाविषयी महात्मा गांधी म्हणतात, “कै. लोकमान्य टिळकांना आपल्या अभ्यास व विद्वत्ता यांच्या ज्ञानसागरातून गीताप्रसादामुळेच हे दिव्य टीका-मौक्तिक मिळाले. बुद्धीने शोधावयाच्या व्यापक सत्याचे भांडारच त्यांना गीतेत गवसले. गीतेवरील टिळकांची टीका हीच त्यांचे शाश्वत स्मारक होय. स्वराज्याची लढाई फत्ते झाल्यानंतरही ते टिकूनच राहील. तेव्हादेखील टिळकांचे निष्कलंक चारित्र्य आणि गीतेवरील त्यांची महान टीका यामुळे त्यांची स्मृती चिरप्रेरक राहील. त्यांच्या हयातीत किंवा आतासुद्धा टिळकांपेक्षा अधिक व्यापक किंवा सखोल शास्त्रज्ञान कोणाचेही सापडणे कठीण. त्यांच्या गीतेवरील अधिकारी टीकेपेक्षा जास्त चांगला ग्रंथ अद्याप झाला नाही व लवकर होणारही नाही.”
 
 
ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी आपल्या जीवन तत्त्वज्ञानांचा मुख्य आधार भगवद्गीतेला मानले, त्याप्रमाणे महात्मा गांधींनीही गीतेला आपल्या जीवनाचा मुख्य आधार केले आहे. दुर्दैवाने या विषयाची माहिती लोकांना नसते. महात्मा गांधींविषयी ज्या गोष्टींविषयी माहिती नसली पाहिजे, त्याची माहिती भरपूर असते आणि ती प्रमाण मानून गांधीजींचे मूल्यमापन अनेक लोक करीत असतात. गांधीजी गीता जगत होते, हे मात्र किती लोकांना माहीत आहे?
 
 
भगवद्गीतेविषयी गांधीजी म्हणतात, “आज माझ्यासाठी गीता केवळ एक बायबल नसून, केवळ कुराण नसून, माझ्यासाठी गीता आई आहे. मला जन्म देणारी माता तर केव्हाच गेली; परंतु संकटाच्या काळी गीतामातेच्या जवळ जाण्यास मी शिकलेलो आहे.” गांधीजी म्हणतात की, गीता माझ्यासाठी केवळ बायबल किंवा कुराण नाही, याचाही अर्थ नीट समजून घ्यायला पाहिजे. तसे पाहू जाता- गीता म्हणजे बायबल नव्हे किंवा कुराणही नव्हे. गांधीजी जेव्हा या दोन ग्रंथांचा उल्लेख करतात तेव्हा तो धर्मग्रंथ या अर्थाने करतात. बायबल आणि कुराण धर्मग्रंथ आहेत, तशी गीता हीदेखील धर्मग्रंथ आहे. हा ग्रंथ मला मातेसमान आहे. गांधीजींना हे सांगायचे आहे. मुलासमोर काही प्रश्न निर्माण झाल्यास, काही संकटे आल्यास, तो आईच्या कुशीत जातो. तेथे त्याला सुरक्षितता वाटते. आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असा त्याला विश्वास वाटतो. गांधीजींनी गीतेला माता मानून, एका अर्थाने सर्व मातांचाच सन्मान केलेला आहे.
 
 
vivek
पुस्तक खरेदी करण्यासाठी
 
भगवद्गीतेचा आणि माझा कसा परिचय झाला, याचा किस्सा गांधीजींनी सांगितला आहे. तो मोठा अर्थपूर्ण आहे. बॅरिस्टरीचे शिक्षण घेण्यासाठी गांधीजी इंग्लंडला गेले. धार्मिक संस्कार बालवयातच त्यांच्यावर झालेले होते. त्यांचा जन्म वैष्णव संप्रदायात झाला होता. रामनामाची आवड बालवयात त्यांच्या मनात झाली. ‘सत्याचे प्रयोग’ या आपल्या आत्मकथनात ते म्हणतात, “माझ्या मनावर सर्वात जास्त कसला परिणाम झाला असेल तर तो रामायणाचा.” परंतु भगवद्गीतेशी त्यांचा परिचय पोरबंदरला आपल्या घरी राहत असताना झाला नाही तर, गीतेचा त्यांचा परिचय इंग्लंडमध्ये झाला. याविषयी गांधीजी वरील आत्मकथनात लिहितात-
 
“विलायतेत राहून एक वर्ष झाले असेल, इतक्यात दोन थिऑसॉफिस्ट मित्रांची ओळख झाली. दोघे सख्खे भाऊ होते व अविवाहित होते. त्यांनी माझ्यापाशी गीतेसंबंधी गोष्ट काढली. ते एडविन आर्नाल्डचे गीतेचे भाषांतर वाचीत असत; परंतु मला त्यांनी ती आपल्याबरोबर संस्कृतात वाचण्यास बोलाविले.”2 गांधीजी प्रांजलपणे सांगतात की, त्यांचे संस्कृतचे ज्ञान नावापुरतेच होते. गांधीजींचे गीतेचे वाचन सुरू झाले, म्हणजे एडविन आर्नाल्ड यांच्या गीता भाषांतराचे वाचन सुरू केले. “एडविनचे भाषांतर मला सर्वोत्तम वाटले. मूळ ग्रंथातील भावार्थाला मुळीच बाधा आलेली नाही,” असे गांधीजी सांगतात.
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी
 
 
एडविन आर्नाल्ड यांनी गीतेचे इंग्रजी भाषांतर इ. स. 1885 साली केले. त्यांच्या भाषांतराचे शीर्षक आहे, The song Celestial म्हणजे स्वर्गीय गीत. पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात, “महाभारताच्या भीष्म पर्वात प्रसिद्ध आणि अप्रतिम संस्कृत काव्य एक कथानक या स्वरूपात येते. भारतात ते अत्यंत लोकप्रिय असून प्रमाणग्रंथ मानला जातो. देवनागरी साहित्यात तिचे वर्णन ‘पंचरत्नानी’ या शब्दात केले जाते. अत्यंत सोप्या आणि श्रेष्ठ भाषेत तत्त्वज्ञानाची बैठक गीता उघड करते. ही बैठक आजपर्यंत वैदिक धर्माच्या विश्वासाची आधारशिला राहिलेली आहे. गीतेत कपिल, पतंजली आणि वेद यांचा समन्वय साधला आहे.” प्रस्तावना लहान आहे. या प्रस्तावनेत त्यांनी बायबलची शिकवण आणि गीतेची शिकवण यांची तुलना काही वाक्यांत केली आहे. ते स्वतः ख्रिश्चन असल्यामुळे गीता, बायबलच्या अगोदर आहे, हे काही ते सांगत नाहीत. उलट बायबलमधील तत्त्वज्ञानाचा प्रभाव गीतेवर पडलेला आहे, असे ते लिहून जातात. असे काही जरी असले तरी एडविन आर्नाल्ड यांचे गीतेवरील भाषांतर प्रमाण मानले जाते आणि या भाषांतराने महात्मा गांधींचा गीतेशी परिचय झाला आणि ही गीता पुढे गांधीजींची माता झाली. हे ऐतिहासिक योगदान, बायबल अगोदर की गीता अगोदर या ऐतिहासिक चर्चेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
 
 
पुढे महात्मा गांधीजींनी भगवद्गीतेचा गुजरातीत अनुवाद केला. 1929 साली तो प्रसिद्ध झाला. या गुजराती अनुवादाचे हिंदी रूपांतर ‘अनासक्तियोग’ या नावाने प्रसिद्ध झाले. नवजीवन प्रकाशन मंदिर, अहमदाबाद यांचे हे प्रकाशन आहे. भगवद्गीता ही महाभारतातल्या भीष्म पर्वात येते. युद्धासाठी कौरव आणि पांडवांचे सैन्य कुरुक्षेत्रावर समोरासमोर आलेले आहेत. सैन्याचे निरीक्षण करण्यासाठी अर्जुनाचा रथ घेऊन श्रीकृष्ण दोन्ही सैन्यांच्या मध्ये आलेला आहे. ज्यांच्याशी युद्ध करायचे आहे, ते आपले काका, मामा, भाऊ, गुरू, आजोबा आहेत, हे जेव्हा अर्जुनाने पाहिले, तेव्हा त्याचा युद्ध करण्याचा संकल्प डळमळीत झाला. त्याने धनुष्यबाण खाली टाकले आणि मी युद्ध करणार नाही. युद्ध करून माझ्याच भाऊबंदांना मी ठार मारणार नाही, असे तो श्रीकृष्णाला म्हणाला. याचे सर्व वर्णन गीतेच्या पहिल्या अध्यायात येते. पहिल्या अध्यायाचे नावच ‘विषादयोग’ असे आहे. अर्जुनाचा भ्रम दूर करण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला जे सांगितले ती म्हणजे गीता. ती सातशे श्लोकांची आहे. तत्त्वज्ञानाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ असे तिचे वर्णन केले जाते.
 
 
अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की, रणांगणावर एवढा वेळ गीता सांगायला आणि ती ऐकायला श्रीकृष्ण आणि अर्जुनाकडे वेळ होता का? तत्त्वज्ञानाचा उपदेश करण्याची रणांगण ही जागा असते काय? मूळ गीता वेगळीच असली पाहिजे, असे श्री.म. माटे यांनी एका लेखात म्हटले. ज्यांची भगवद्गीतेवर अपार श्रद्धा आहे किंवा ज्यांनी भगवद्गीतेला संप्रदायाचा मुख्य ग्रंथ केले आहे, ते असल्या शंकांना स्थान देत नाहीत. असल्या शंका म्हणजे श्रद्धेवर आघात असे त्यांना वाटते.
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी
 
 
महात्मा गांधींना तसे वाटत नाही. ते म्हणतात, “गीता ऐतिहासिक ग्रंथ नाही. गीतेत भौतिक युद्धाच्या वर्णनाचे निमित्त करून प्रत्येक मनुष्याच्या निरंतर चालणार्‍या द्वंद्वयुद्धाचेच वर्णन केले गेलेले आहे.” महात्मा गांधी यांच्या मते, महाभारत ऐतिहासिक ग्रंथ नसून तो हिंदूंचा धार्मिक ग्रंथ आहे. ऐतिहासिक की धार्मिक या वादामध्ये महात्मा गांधी फार शिरत नाहीत. गीतेची शिकवण काय आहे आणि ती का जगली पाहिजे, कशी जगली पाहिजे, यावर मात्र त्यांचे भाष्य, गीता प्रत्यक्ष जगणार्‍या महापुरुषाचे भाष्य आहे. ज्ञानदेव गीता जगले, म्हणून ते ‘ज्ञानियांचा राजा, गुरू महाराज’ झाले. लोकमान्य टिळक गीता जगले, म्हणून ते महान कर्मयोगी झाले. गांधीजी गीता जगले म्हणून ते महात्मा झाले.
 
“महाभारताने भौतिक युद्धाची आवश्यकता प्रतिपादली नसून तिची निरर्थकता सिद्ध केली आहे. विजेत्यांना महाभारताने रडायला लावले आहे, पश्चात्ताप करायला लावले आहे आणि त्यांच्या जीवनात दुःखाशिवाय आणखी काही ठेवले नाही,” असे गांधीजींचे म्हणणे आहे.
 
 
महाभारतात गीता सर्वोच्च स्थानी आहे आणि महाभारताचा दुसरा अध्याय युद्धाचा व्यवहार शिकवण्याऐवजी स्थितप्रज्ञाची लक्षणे शिकवतो. ही स्थितप्रज्ञ लक्षणे दुसर्‍या अध्यायात श्लोक क्रमांक 54 ते 72 अशी आहेत. गांधीजींच्या जीवनावर याचा जबरदस्त प्रभाव आहे. भगवद्गीतेचा मुख्य विषय कोणता? गांधीजींच्या शब्दांत सांगायचे तर, “ईश्वररूप झाल्याशिवाय मनुष्याला सुख मिळत नाही, शांतीचा अनुभव येत नाही. ईश्वररूप बनण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याचेच नाव उचित आणि एकमात्र पुरुषार्थ असे आहे आणि तेच आत्मदर्शन आहे. हे आत्मदर्शन ज्याप्रमाणे सर्व धर्मग्रंथांचा विषय आहे त्याप्रमाणे गीतेचाही आहे; परंतु गीताकारांनी या विषयाच्या प्रतिपादनासाठी गीतेची रचना केलेली नाही. गीतेचा उद्देश आत्मार्थी लाभ, आत्मदर्शन घडवून आणण्याचा एक अद्वितीय उपाय दाखविण्याचा आहे. जी गोेष्ट हिंदू धर्मग्रंथात इथे-तेथे विखुरलेली आढळते, तिलाच गीतेने अनेक रूपांत, अनेक शब्दांत, पुनरुक्तीचा दोष स्वीकारूनही उत्तम प्रकारे स्थापित केले आहे.
 
तो अद्वितीय उपाय आहे, कर्मफलाच्या त्यागाचा. याच केंद्रबिंदूच्या सभोवताली गीतेचा सारा विषय गुंफलेला आहे. भक्ती, ज्ञान इत्यादींनी या केंद्रबिंदूच्या आसपास तारामंडलाच्या रूपात आपआपले स्थान ग्रहण केलेले आहे. जेथे देह आहे तेथे कर्म आलेच. कर्मापासून कोणत्याही मनुष्याला मुक्ती नाही. असे असूनही सार्‍या धर्मांनी हे प्रतिपादन केले आहे की, देहाला ईश्वराचे मंदिर बनवून त्याद्वारे मुक्ती प्राप्त होते; परंतु प्रत्येक कर्मात काही ना काही दोष असतातच. मुक्ती केवळ निर्दोष मनुष्यालाच मिळते. तेव्हा कर्माच्या बंधनातून म्हणजे कर्माच्या दोषातून माणसाची सुटका कशी होणार? या प्रश्नाचे उत्तर गीतेने निश्चयात्मक शब्दांत दिलेले आहे. “निष्काम कर्म करून, यज्ञार्थ कर्म करून, कर्मफलाचा त्याग करून, सारे कर्म कृष्णापर्ण करून- अर्थात मन, वचन आणि काया सर्वांचा ईश्वराचा होम करून.”
 
थोडक्यात महात्मा गांधीजी सांगतात की, कर्म कुणाला सुटत नाही. प्रत्येक कर्माचे फल असते. त्याला कर्मफल म्हणतात. तेही कुणाला चुकत नाही; परंतु माणसाने कर्म करताना कोणते फल मला मिळणार आहे, याचा विचार करू नये. निष्काम भावनेने कर्म करत जावे. निष्काम कर्माविषयीचा भगवद्गीतेचा हा श्लोक अतिशय प्रसिद्ध आणि जवळजवळ सर्वांना माहीत आहे असा आहे -
 
‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सडोऽस्त्वकर्मणि॥ अध्याय 2/47
या सर्व आशयावर कवी मनोहर कवीश्वर यांचे सुंदर गीत आहे आणि ते सुधीर फडके यांनी गायले आहे. गीताचे बोल आहेत,
 
“विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था”
आणि शेवटचे कडवे आहे,
“कर्मफलाते अपूर्ण मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परि त्यजून येई शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्माथा”
 
गीतेतील हा कर्मयोग म्हणजे फलासक्ती सोडून कर्म करत राहणे, हे बोलणे सोपे आहे. महात्मा गांधी गीता जगत होते. त्यांच्या जीवनात गीता जगण्याचे असंख्य प्रसंग आहेत. आश्रमात एक गृहस्थ आले आणि त्यांनी गांधीजींना विचारले, “मला गीता समजून घ्यायची आहे. मी गीतेला अनेक वेळा वाचले; परंतु गीतेचे रहस्य काही मला समजले नाही. कृपा करून मला गीतेचे रहस्य समजावून सांगा आणि माझे समाधान करा.”
 
 
महात्मा गांधी तेव्हा आश्रमाची जमीन फावड्याने खोदत होते. ते म्हणाले, “थोडा वेळ तुम्ही बसा.” गांधीजी जमीन खणण्याच्या कामात व्यस्त राहिले. त्यात खूप वेळ गेला. तो गृहस्थ अस्वस्थ झाला. तो म्हणाला, “मी खूप लांबून गीतेचे रहस्य समजून घेण्यासाठी आलो आहे; परंतु तुम्हाला कामातच अधिक रस दिसतो.” गांधीजी त्याला म्हणाले, “माझे काम करून मी तुम्हाला गीतेचे रहस्य समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे.” तो गृहस्थ म्हणाला, “तुम्ही तर माझ्याशी न बोलताच काम करीत आहात, मला केव्हा गीता समजावून सांगितली?” गांधीजी म्हणाले, “बोलण्याची काय आवश्यकता आहे. गीतेचा उपदेश आहे की, कर्म करीत रहा आणि फळाची अपेक्षा धरू नका. मी तुमच्यासमोर कर्मच करीत आहे आणि गीतेचे रहस्यदेखील हेच आहे की, सतत कर्म करीत रहा. मनुष्यासाठी कर्म सर्वश्रेष्ठ आहे. सर्वश्रेष्ठ कर्म करून मनुष्य आपल्या जीवनाची सार्थकता प्राप्त करू शकतो.”
 
 
गांधीजींचे जीवन म्हणजे निरंतर कर्म. जीवनातील एक क्षणदेखील ते वाया दवडीत नसत. कर्म म्हणजे नुसते काम नव्हे. जर प्रत्येकाला कर्म अनिवार्य आहे, तर प्रत्येक कर्म पवित्र आणि श्रेष्ठ आहे. त्याच्यात लहान-मोठेपणा, श्रेष्ठ-कनिष्ठपणा आणता येत नाही. मी बौद्धिक कर्म करतो म्हणून मी मोठा आणि दुसरा जोडे शिवतो म्हणून कनिष्ठ, असे कर्माच्या बाबतीत काही नसते. म्हणून महात्मा गांधी भाजी चिरण्याचे काम करीत, स्वयंपाक करण्याचे काम करीत, भांडी घासण्याचे काम करीत, जोडे शिवण्याचे काम करीत, सूतकताई करीत आणि शौचालय साफ करण्याचे कामही करीत. गीतेचा कर्मयोग असा आहे. प्रत्येक कर्म ईश्वराची पूजा असते आणि ईश्वरार्पण भावनेने ते कर्म करायचे असते.
 
 
 
गीता तोंडपाठ असणे, गीतेवर प्रवचन देणे, गीतेवर ग्रंथरचना करणे, या गोष्टी महात्मा गांधींच्या दृष्टीने तेवढ्या महत्त्वाच्या नव्हत्या. गीता जगता आली पाहिजे. गांधीजी म्हणतात, “विद्वान माणसाजवळ थोडेफार ज्ञान असते. ते तोंडाने वेद पाठ करू शकतात; परंतु तरीही ते स्वार्थात बुडालेले असतात.” याचा अर्थ गीता केवळ बुद्धीने जाणून घेण्याचा विषय नाही. कर्मफलाच्या त्यागासाठी योग्य प्रकारच्या ज्ञानाची आवश्यकता आहे. ज्ञान ही बुद्धीची गोष्ट आहे; पण केवळ बुद्धीने काम भागत नाही. बुद्धीला भक्तीची जोड हवी. भक्तीरहित ज्ञान विकृत रूप धारण करू शकते. म्हणून कर्म करताना ज्ञान तर पाहिजेच; पण ज्ञानाला भक्तीची जोड पाहिजे.
 
 
पुस्तक खरेदी करण्यासाठी
 
दुसर्‍या अध्यायात स्थितप्रज्ञ लक्षण सांगितले आहे. या दुसर्‍या अध्यायाचे नाव सांख्ययोग असे आहे आणि यात श्रीकृष्णाने कर्मयोगाचे विवरण केलेले आहे. बुद्धीने ज्ञान करण्याचा विषय या अध्यायात मांडलेला आहे. अशा ज्ञानी स्थितप्रज्ञांची लक्षणे या अध्यायात सांगितलेली आहेत. गीतेचा 12वा अध्याय भक्तियोगाचा अध्याय आहे. भक्ताची लक्षणे सांगताना जी लक्षणे ज्ञानी कर्मयोग्याची आहेत, तीच लक्षणे भक्तीचीदेखील आहेत, हे श्रीकृष्णाने सांगितले. गांधीजींच्या शब्दांत, “भक्त माळा, गंध, अर्घ्य इत्यादी साधनांचा उपयोग करीत असेनात का; परंतु ही साधनेे भक्तीची लक्षणे नव्हेत. जो कुणाचा द्वेष करीत नाही, जो करुणेचे भांडार आहे, जो अहंता आणि ममतेपासून मुक्त आहे, ज्याच्यासाठी सुख-दुःख, शीत आणि उष्ण समान आहेत, जो सदा संतुष्ट आहे, ज्याचे निश्चय कधी बदलत नाहीत, ज्याने आपले मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण केली आहे, ज्याला लोक कधी कंटाळत नाहीत आणि जो लोकांना कंटाळत नाही, जो हर्ष, शोक, भय यापासून मुक्त आहे, जो पवित्र आहे, जो शुभ-अशुभाचा त्याग करणारा आहे, शत्रू आणि मित्र दोघांच्या बाबतीत ज्याचे भाव समान आहेत, मान आणि अपमान ज्याला सारखेच वाटतात, जो एकांतप्रिय आहे, ज्याची बुद्धी स्थिर आहे, त्याला भक्त म्हणायचे.”
 
 
आपल्यापुढे सर्वश्रेष्ठ लक्ष्य आपल्या दर्शनकारांनी ठेवले आहे, ते म्हणजे - मुक्ती प्राप्त करून घेणे, संपत्ती प्राप्त करणे, सत्ता प्राप्त करणे, ऐश्वर्यात राहणे, दुसर्‍यांवर हुकमत गाजवणे इत्यादी मनुष्यजीवनाचे लक्ष्य राहू शकत नाही. मुक्तीसाठी आत्मदर्शन आवश्यक आहे. ज्ञान प्राप्त करून भक्त होणे हेच आत्मदर्शन आहे, असे महात्मा गांधीजी सांगतात आणि तोच मोक्ष आहे. गांधीजींच्या शब्दांत, “ज्याप्रमाणे एक रुपया देऊन विषही घेता येऊ शकते, अमृतदेखील घेता येऊ शकते, त्याप्रमाणे ज्ञान आणि भक्तीच्या बदल्यात बंधन प्राप्त करता येऊ शकते. येथे साध्य आणि साधन पूर्णतः एकच नसून जवळजवळ एकसारखेच आहेत. साधनेची पराकाष्ठा म्हणजे मोक्ष आणि गीतेच्या मोक्षाचा अर्थ आहे कर्मशांती.
 
 
गांधीजींनी लौकिक अर्थाने कोणत्याही देवतेची पूजा केली नाही. ते तीर्थयात्रेला कधी गेले, कुठली वारी केली, असे काही झालेले नाही. दरिद्री माणूस हाच त्यांचा देव होता. विवेकानंदांचा शब्द ‘दरिद्रनारायण’ त्यांनी स्वीकारला आणि या दरिद्रनारायणाला परमेश्वर मानून त्याच्या सेवेचे व्रत घेतले. या व्रताचे त्यांनी आजन्म पालन केले. भक्ताचे लक्षण सांगत असताना श्रीकृष्णाने, ज्याला मान आणि अपमान समसमान आहेत, तोच भक्त, असे सांगितले आहे.
 
 
गांधीजींचे जसजसे नाव वाढू लागले, तसतसे त्यांचे प्रशंसक वाढू लागले, तेवढ्याच प्रमाणात त्यांचे विरोधकही वाढू लागले. विरोधक त्यांच्याविषयी खोट्यानाट्या गोष्टी पसरवत असत. जे गांधीभक्त होते, त्यांना या गोष्टी खटकत. एका प्रशंसकाने गांधीजींना विचारले, “बापूजी, आप के विरोध में पत्र, पत्रिकाओं में झूठा और विषेला प्रचार हो रहा है, आप बिलकूल मौन है, ना कुछ लिखते है ना कुछ बोलते है।” त्यावर गांधीजी म्हणाले, “माझ्याविषयी जो विरोधी प्रचार चालू आहे, त्याची माहिती मला असते; परंतु मी करू तरी काय? ज्याप्रमाणे काही मित्र माझी घोर निंदा करतात, त्याप्रमाणे काही मित्र माझी अवास्तव स्तुतीदेखील करतात. निंदा करणार्‍या निंदकापासून मी वाईट का वाटून घेऊ आणि स्तुती करणार्‍या प्रशंसकांपासून फुलून कशाला जाऊ? निंदकाच्या निंदेने मी कमी होत नाही आणि स्तुतिपाठकांच्या प्रशंसेने मी वाढतही नाही. मी केवळ सत्कर्मावर विश्वास ठेवतो.”
 
 
त्यांच्या आश्रमातील एक प्रसंग आहे. गांधीजी गोशाळेची पाहणी करत होते. तेथे एक मुलगा होता. दिवस थंडीचे होते आणि तो गोशाळेतच झोपत असे. पांघरण्यासाठी त्याच्याकडे एक सामान्य चादर होती. गांधीजींनी त्याला विचारले, “तू येथेच झोपतोस का?” तो म्हणाला, “हो.” गांधीजींनी त्याला विचारले, “पांघरायला तुझ्याजवळ काय आहे? इथे थंडी तर खूप असते.” तो म्हणाला, “माझ्याकडे फक्त एक चादर आहे.” गांधीजी आपल्या खोलीत गेले. त्यांनी बांकडून दोन जुन्या साड्या मागून घेतल्या. काही जुने पेपर मागविले. काही कापूस मागवला आणि त्याची एक रजई तयार केली. रजई तयार झाल्यानंतर गोशाळेतून त्या मुलाला त्यांनी बोलावले. ती रजई त्याला दिली आणि रात्री पांघरण्यास सांगितले.
 
 
दुसर्‍या दिवशी गोशाळेत जाऊन त्यांनी त्या मुलाला जवळ बोलावले आणि विचारले, “रात्री थंडी वाजली का?” तो म्हणाला, “नाही, अत्यंत उबदार वाटले आणि मला गाढ झोप लागली.” गांधीजींचा ईश्वर असा सर्वसामान्य माणसात असे.
 
 
गांधीजींना कशाचा मोह नसे. गीतेच्या दुसर्‍या अध्यायात आणि बाराव्या अध्यायात स्थितप्रज्ञ आणि भक्ताची जी लक्षणे सांगितली आहेत, त्यात त्याला कसल्याही प्रकारचा मोह असू नये, हेदेखील एक लक्षण सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी जेव्हा प्रथम भारतात आले तेव्हा अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार झाले. लोकांनी त्यांना मूल्यवान वस्तू भेट दिल्या. या भेटीत सोने, जवाहीर अशा मौल्यवान वस्तूदेखील होत्या. ‘बां’ना त्या आपल्या वस्तू वाटल्या आणि त्याचा वापर आपण केला पाहिजे, असे त्यांना वाटले. गांधीजींनी बांना सांगितले की, जनसेवेच्या कामासाठी जनतेने दिलेल्या या वस्तू आहेत आणि त्यांचा वापर आपल्याला जनसेवेसाठीच केला पाहिजे. व्यक्तिगत वापरासाठी त्याचा उपयोग करू नये. हा नियम गांधीजींनी मरेपर्यंत पाळला आहे.
 
गांधीजी म्हणजे अहिंसा. भगवद्गीता रणांगणावर सांगितली गेली. न लढणार्‍या अर्जुनाला लढण्यास श्रीकृष्णाने उभे केले. युद्ध म्हणजे हिंसा. युद्धात असंख्य माणसे ठार मारली जातात. माणसे मारण्याच्या कोणत्याही गोष्टीपासून गांधीजी स्वतःला अलिप्त ठेवीत. देशाचा स्वातंत्र्यलढा त्यांनी अहिंसक मार्गाने चालवला. भारतातील सर्व इंग्रजांना ठार मारून जे स्वराज्य मिळेल, ते हिंसकच असेल, असे त्यांचे मत होते. त्यामुळे प्रश्न निर्माण होतो की, अहिंसक गांधींनी अर्जुनाला युद्धास प्रवृत्त करणारी गीता आपली माता कशी मानली?
 
 
गीतेचा विषय हिंसा करा, असा नाही, हे महात्मा गांधींनी वेगवेगळ्या प्रकारे तर्कशुद्ध मांडलेले आहे. ते म्हणतात, “आत्मज्ञान व त्याच्या प्राप्तीची साधने हा गीतेचा मूळ विषय आहे. दोन सैन्यांमधील युद्ध हा केवळ तो विषय समजावून सांगण्याचे निमित्तमात्र आहे. कवी व्यासांनी आपल्या या अतिसुंदर महाकाव्यातून युद्धाची विफलता फारच परिणामकारकरीत्या दाखवून दिली आहे. कौरव पराभूत झाले तर काय झाले? आणि पांडव जिंकले म्हणून काय झाले, असे ते विचारतात. जे जिंकले त्यांच्यापैकी किती जण वाचले आणि त्यांच्या नशिबी काय आले? कुंती मातेची दशा काय झाली? आणि आज यादवकुल कुठे आहे? या महाभारताच्या महाकाव्याचा विषय वा आशय हा हिंसेच्या लढायांचे वर्णन व त्याचे समर्थन हा नव्हेच. मग त्यावर भर देणे चुकीचे ठरते.”
 
 
गीतेची शिकवण हिंसा करा, अशी नाही. गांधीजी याविषयी म्हणतात, “गीतेच्या शिकवणुकीची मध्यवर्ती कल्पना हिंसा नसून अहिंसा आहे, हे स्पष्टपणे गीतेच्या दुसर्‍या अध्यायाच्या प्रारंभी आणि अठराव्या अध्यायाच्या परिसमाप्तीत दाखवून दिलेले आहे. आसक्ती आणि मत्सर यांच्याशिवाय हिंसा संभवनीय नसते आणि गीता तर आपल्याला सत्त्व, रज, तमस यांच्या पलीकडे जाऊन द्वेषरहित अनासक्त जीवन जगण्यास शिकविते.”
 
 
कर्माविषयी आसक्ती निर्माण झाल्यावर आसक्तीतून अनेक दोष निर्माण होतात, वासना निर्माण होतात, काही तरी प्राप्त करण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते. त्यासाठी भले-बुरे मार्ग अवलंबले जातात. कायिक, वाचिक आणि मानसिक हिंसा होते. या हिंसेवर मात करायची असेल तर कर्माची आसक्ती सोडली पाहिजे. या ठिकाणी आणखी एक प्रश्न निर्माण होतो की, कर्माची आसक्ती सोडायची म्हणजे कर्मसंन्यास घ्यायचा का? कर्मसंन्यास कुणालाही शक्य नाही. संन्यास घ्यायचा असेल तर तो कर्मफलाचा संन्यास घ्यायला पाहिजे. गांधीजी म्हणतात, “फलत्याग करणे म्हणजे कर्मफलाची वासना सोडणे. वस्तुतः जो फलत्याग करतो, त्यालाच हजार पटीने मिळते. कर्म करीत असताना जो सतत फलाचा विचार करतो, तो कर्तव्य पार पाडीत असताना अनेकदा हातपाय गाळून बसतो, तो अधीर होतो. म्हणून त्याचा क्रोध प्रगट होतो. मग इतर अनुचित गोष्टी करू लागतो. जो सदैव फलाचाच विचार करतो, तो विषयासक्त माणसासारखा सतत चलबिचल होतो. नैतिक मूल्यांना रामराम ठोकतो.”
 
 
गांधीजी म्हणतात की, “गीतेची ही शिकवण आचरणात आणण्याचे प्रयत्न केल्याबरोबरच माणसाला सत्य व अहिंसेचा मार्ग अनुसरावासा वाटेल. जेव्हा कर्मफलाची आसक्ती राहणार नाही, तेव्हा असत्य व हिंसेचे प्रलोभनही राहत नाही.” गीतेची शिकवणूक व्यवहारात उपयोगाची आहे की नाही? या प्रश्नाची चर्चादेखील भरपूर चालते. व्यापार करणारा म्हणतो की, व्यापाराचा धर्म वेगळा असतो. तुमचा मोक्षप्राप्तीचा धर्म व्यापारात उपयोगाचा नाही. गीतेचे असे म्हणणे नाही. गांधीजींच्या शब्दांत, “आपल्या ऐहिक व्यवहारांवर धर्माचे राज्य असावे. मला असे निश्चित वाटते, गीतेची शिकवणूक अशी आहे की, आपल्या दैनंदिन जीवनात जो आपण आचरणात आणू शकत नाही, तो धर्मच नव्हे.” दुसर्‍या भाषेत ध्यानधारणा, समाधी लावणार्‍यांसाठीच गीता नसून आपल्यासारख्या सामान्य माणसांसाठी गीता आहे. तिच्या तत्त्वांचे आपण पालन केले पाहिजे.
 
 
कोणत्याही जीवाची हत्या न करणे, तसेच कुणालाही मानसिक दुःख न देणे, नेहमी क्षमाशील राहणे, याला अहिंसा म्हणतात. याचा अर्थ जर एखादा माझा जीव घ्यायला आला, की मी त्याचा प्रतिकार करायचा की नाही? की मरून जायचे? गांधीजींच्या जीवनातील एक प्रसंग आहे. गुजरात विद्यापीठातील काही मुली किशोरीलाल भाई यांना भेटण्यासाठी आल्या. एक मुलगी म्हणाली, “आम्ही वाटेने येत असताना काही मुले आम्हाला त्रास देतात. त्याचे काय करायचे? त्यांचा प्रतिकार कसा करायचा?” किशोरीलाल भाई म्हणाले, “तुमच्या पायात चपला असतात ना, त्या काढून त्याने मारा.” त्यावर त्या मुली म्हणाल्या, “हा हिंसक प्रतिकार झाला. आम्हाला अहिंसात्मक मार्ग सांगा.” किशोरीलाल म्हणाले, “मला हाच मार्ग योग्य वाटतो; पण तुम्ही गांधीजींना भेटा आणि त्यांना विचारा.” मुली गांधीजींकडे गेल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर गांधीजी त्यांना म्हणाले, “किशोरीलाल यांनी एवढेच सांगितले तुम्हाला, मी तर असे सांगेन की, जर कुणी तुमच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्याकडे चाकू असेल तर त्या बलात्कारीवर तो खोचा.” मुलींना गांधीजींचे हे म्हणणे ऐकून आश्चर्य वाटले. गांधीजी त्यावर म्हणाले, “आपला सन्मान राखण्यासाठी सुरीवार करणे हीदेखील अहिंसाच आहे. गांधीजींनी गीतेचे महत्त्व सांगताना सोळाव्या अध्यायाचाही एकदा उल्लेख केला. गीतेच्या सोळाव्या अध्यायाचे दैवासुरसम्पत्ति योग असे नाव आहे. श्रीकृष्ण प्रथम दैवीगुण सांगतात. त्यातला पहिला श्लोक आहे -
 
‘अभयं सत्त्वसंशुद्धिर्ज्ञानयोगव्यवस्थितिः।
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्॥
 
अभय, शुद्धी, दान, दमन, यज्ञ, स्वाध्याय, चांगली वाणी इत्यादी चांगले गुण आहेत, असा याचा अर्थ झाला. पुढील श्लोकात आणखी काही गुण सांगितले आहेत. दैवीगुणात पहिला गुण अभय, असे श्रीकृष्ण सांगतात. अभयचा अर्थ होतो- निर्भयता, कशालाही न घाबरणे. माणसाला सर्वाधिक भय त्याच्या मृत्यूचे असते. स्वतःहून मरायला सामान्यतः कुणी तयार नसते. उच्च ध्येयासाठी काही जण आत्मबलिदान करतात, ती गोष्ट वेगळी. मृत्यूलाही न घाबरणारा, आपल्याकडे नचिकेता निर्माण झाला ज्याचा यमाशी प्रत्यक्ष संवाद झाला. त्या संवादाचे पुढे कठोपनिषद तयार झाले. महात्मा गांधींच्या जीवनात मृत्यूला न घाबरणारे अनेक प्रसंग आहेत. त्यातील एक प्रसंग.
 
 
चंपारण्याचा सत्याग्रह चालू होता. गांधीजी त्याचे नेतृत्व करीत होते. नीळ उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांवर भयानक अत्याचार होत. गांधीजींनी त्यांना लढ्यासाठी उभे केले. आंदोलन जोर पकडू लागल्यानंतर एका इंग्रजाच्या मनात गांधीजींना ठार करण्याचा विषय आला. त्याने त्यासाठी काही माणसे नेमली. त्यांना शस्त्रे दिली. ही बातमी गांधीजींना समजली. एकाने येऊन इंग्रज अधिकारी कोण, त्याचे नाव सांगितले, त्याचे घर कोठे आहे हेदेखील सांगितले. गांधीजींनी त्याला सांगितले की, ही बातमी तू कुणालाही सांगू नकोस.
रात्री एकटेच गांधीजी त्या इंग्रजाच्या घरी गेले. इंग्रज त्यांना ओळखत नव्हता. गांधीजी त्याला म्हणाले, “माझे नाव गांधी. मला मारण्यासाठी तुम्ही माणसे नेमली आहेत. त्यांना कष्ट पडू नयेत म्हणून मीच तुमच्याकडे आलो आहे. एकटाच आलो आहे. पोलिसांना सांगितलेले नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तुम्ही मला मारू शकता.”
 
 
त्या इंग्रज माणसाची बोबडी वळायची वेळ आली. मरणाला न घाबरणारा एवढा निर्भय माणूस त्याने आयुष्यात कधी पाहिलेला नव्हता. तो गांधीजींना म्हणाला, “गांधीजी, मला क्षमा करा. तुमच्याइतका निर्भय आणि तेजस्वी माणूस मी आजवर पाहिला नाही. एका मोठ्या अपराधापासून तुम्ही मला वाचवले आहे.” गीता अशी जगावी लागते.
 
आपल्या देशात आजही गीतेवर वेडेवाकडे बोलणारे अनेक लोक आहेत. गांधीजींच्या काळातही होते, उद्याही ते असणार आहेत. त्या सर्वांसाठी गांधीजींनी गीतेवर भाष्य करताना जे म्हटले ते लक्षात ठेवायला पाहिजे. “गीतेच्या ज्ञानाचे केलेले गुणगान हे मुख्यतः हृदयाला केलेले आवाहन आहे आणि हृदयाने समजून घेण्याची गोष्ट आहे. ज्याच्यापाशी श्रद्धा नाही त्याच्यासाठी गीता हा ग्रंथ नाही. म्हणून व्यासांनी कृष्णाच्या तोंडी हे शब्द घातले आहेत, ‘जो माझे अस्तित्व मानत नाही, ज्याला या उपदेशाची गरज नाही, जो भक्तिहीन आहे, त्यागाची भावना बाळगत नाही, त्याच्या हाती हा ज्ञानाचा खजिना सोपवू नये. उलटपक्षी जे हा मौल्यवान खजिना माझ्या भक्तांच्या हवाली करतील ते या सेवेनेच माझ्या चरणी खात्रीपूर्वक रुजू होतील.”
 
 
 ( ज्येष्ठ विचारवंत, लेखक रमेश पतंगे यांच्या  'गांधी समजून घेताना' या पुस्तकातील प्रकरण आहे...)
 
संदर्भ
1. गीतारहस्य पृष्ठ क्रमांक - 7 आणि 11
2. आत्मकथा - पृष्ठ क्रमांक- 69
3. अनासक्तियोग - पृष्ठ क्रमांक - 9
Powered By Sangraha 9.0