Novak Djokovic
शारीरिक आणि मानसिक ताकदीच्या जोरावर ग्रँडस्लॅम टेनिसच्या खेळातील सातत्य जोकोविचने टिकवून ठेवलं आहे. वयाच्या 38व्या वर्षीही पहिला सेट त्याने जिंकला तर सामनाही तो जिंकतोच, हा लौकिक त्याने कायम ठेवला आहे. आकडेवारीच तसं सांगते. आणि दुसरं म्हणजे, आहे ती परिस्थिती स्वीकारण्याचा समजूतदारपणाही त्याने दाखवला आहे. ‘400’ विजयांचा टप्पा त्याने नुकताच पार केला आहे.
नोवाक जोकोविचच्या आयुष्यातील मागचा आठवडा हा नेहमीच्या इतर आठवड्यांसारखाच होता. कसा ते बघा! शनिवारी 24 जानेवारीला त्याने बॉटिक व्हॅन दी झँडशुपला सरळ तीन सेटमध्ये 6-3, 6-4 आणि 7-6 असं हरवलं आणि ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेची चौथी फेरी गाठली. पण, खरं तर तो थोडक्यात बचावला होता. नाहीतर स्पर्धेतून बाद होण्याची वेळच त्याच्यावर आली होती. दुसर्या सेटमध्ये त्याने एक चुकीचा फटका खेळल्यामुळे तो स्वत:वरच चिडला होता. आणि त्या रागात त्याने चेंडू जोरात आपटला तो सीमारेषेवर उभ्या असलेल्या बॉलगर्लच्या अगदी जवळून गेला. पण, सुदैवाने तिला काही झालं नाही. जोकोविचलाही प्रसंगाचं महत्त्व लगेच कळलं. आणि त्याने हात उंचावून लगेच तिची माफी मागितली. ‘माझ्याकडून आवेशात हे घडलं. चूक माझी होती. मी चेंडू आपटायला नको होता,’ असं तो पटकन म्हणाला. म्हणून त्याची बाजू सावरली गेली. नाहीतर 2020 च्या अमेरिकन खुल्या स्पर्धेत याच चुकीमुळे त्याला अपात्र ठरवलं होतं, तसंच होऊ शकलं असतं.
शनिवारी हे घडलं आणि या विजयाबरोबरच त्याने ग्रँडस्लॅम टेनिसच्या इतिहासात 400 सामने जिंकणारा पहिला खेळाडू होण्याचा मान पटकावला. सांगायचा मुद्दा हा की, या दोन्ही गोष्टी जोकोविचच्या आयुष्यात एकाच वेळी घडत होत्या. एकीकडे, तो राग न आवरता येणारा आणि दुसर्यांवर राग काढणारा खेळाडू आहे. तर दुसरीकडे, रॉजर फेडररच्या 369 ग्रँडस्लॅम विजयांना मोठ्या अंतराने मागे टाकलेला तो खेळाडू आहे.
एकूणच त्याचं वागणं मनस्वी आहे. कधी तो कोर्टवर बॉलगर्लच्या हातात आपली रॅकेट देतो. तिच्याबरोबर मुद्दाम फोटो काढतो आणि तिला अगदी आलिंगनही देतो. त्या बॉलगर्लसाठी ती जन्मभराची आठवण होऊन जाते. कधी कधी बेलग्रेडच्या रस्त्यावर रात्रीच्या दिव्याखाली तो मुलांबरोबर टेनिसचा खेळ मांडतो. त्या मुलांसाठी तो अविस्मरणीय अनुभव असतो. पण, असा हा जोकोविच कधी आपल्या वागण्या-बोलण्याने वादग्रस्त ठरेल सांगता येत नाही.
टेनिस कोर्टवरील आकडेवारीच्या बाबतीत मात्र तो आजच्या आणि जुन्या पिढीच्याही कितीतरी पुढे आहे. विक्रमी 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदं त्याच्याकडे आहेत. चारही ग्रँडस्लॅम म्हणजेच करिअरस्लॅम जिंकण्याची किमया त्याने फेडरर आणि नदालच्या बरोबरीने केली आहे. तो कारकीर्दीत 1,500 च्या जवळपास सामने खेळला आहे. आणि यातील 1,166 सामने तो जिंकला आहे. म्हणजे त्याचं विजयाचं गुणोत्तर 83 टक्के इतकं आहे. विक्रमी 422 आठवडे तो जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला आहे. आणि एटीपी टूअरवर एकूण 103 विजेतेपदं त्याने पटकावली आहेत. या बाबतीत जागतिक स्तरावर तो तिसर्या क्रमांकावर आहे. बाकी सगळ्याच विक्रमांत तो अगदी रॉजर फेडरर आणि नदालच्याही पुढे गेला आहे. ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा ही त्याची खास आवडती. आणि ती त्याने विक्रमी 10 वेळा जिंकली आहे. तर विम्बल्डन 7, युएस खुली स्पर्धा 4 आणि फ्रेंच खुली स्पर्धा तीनदा जिंकली आहे.
या भरघोस कामगिरीची पाळंमूळं त्याच्या बालपणात रोवलेली आहेत. सर्बियात बेलग्रेडमध्ये जन्मलेला नोवाक तीन भावंडांत मोठा आहे. चौथ्या वाढदिवसाला त्याचे वडील सार्जन जोकोविच यांनी त्याला छोटी टेनिस रॅकेट आणि खेळातील रबरी चेंडू भेट म्हणून दिला होता. आणि मिळालेल्या असंख्य भेटवस्तूंपैकी हीच भेट छोट्या नोवाकला आवडल्याचंही सार्जन यांनाच लक्षात आलं. ते स्वत: स्किईंग करायचे आणि उपजीविकेसाठी एक फास्टफूड विक्री केंद्र चालवायचे. मुलाचा टेनिसकडे असलेला ओढा बघून त्यांनी सहाव्या वर्षीच त्याला टेनिसच्या शिबिरात दाखल केलं. पुढील सहा वर्षं येलेना जेनसिक यांच्या मार्गदर्शनाखाली नोवाक शिकत होता आणि त्याच्या खेळातील चमक लक्षवेधी ठरत होती. 2000चं नवीन सहस्त्रक सुरू झालं होतं. आणि अमेरिकन पीट सँप्रास हा नोवाकचा आदर्श खेळाडू होता. सँप्रासच्या भात्यातील प्रत्येक टेनिसचा फटका नोवाक तंतोतंत खेळण्याचा प्रयत्न करत होता. अशावेळी येलिना यांनी नोवाकला वेळीच या तंद्रीतून बाहेर काढलं. त्याची शरीराची ठेवण आणि ताकद बघून दोन्ही हातांनी बँकहँड मारायला प्रवृत्त केलं.
हाच तो जोकोविचचा जगप्रसिद्ध बॅकहँडचा फटका, ज्याच्या जोरावर पुढे जाऊन फेडरर आणि नदालसारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांचे जोरदार मारलेले फटके त्याने कधी अडवले आहेत तर कधी नेस्तनाबूत केले आहेत. नोवाकने चमक दाखवायला सुरुवात केल्यावर वडील सार्जन यांनी त्याच्या प्रशिक्षणात कसलीच कसूर ठेवली नाही. अगदी प्रशिक्षण वर्गांसाठी अमेरिका, इटली आणि जर्मनी इथं लहान वयातच नेलं. या सगळ्यासाठी खर्च होत होता. आणि नोवाक मोठा होऊन याची परतफेड करेल अशी वडिलांची भावना होती. ही गोष्ट लहानग्या नोवाकच्या डोक्यात घट्ट रुतून बसली होती. त्याला चांगल्या कामगिरीचं दडपण यायचं. आणि जास्तीत जास्त विजय मिळवून वडिलांचं कर्ज फेडायचं ही भावनाही त्याच्या मनात मूळ करून होती. कदाचित त्याच्या आक्रमक वागण्याचं मूळही कुठेतरी यात असावं. किंबहुना ते आहेच. म्हणूनच त्याची कामगिरी ही कायम निकाल आपल्या बाजूने वळवणारी राहिली.त्याची शरीरयष्टी तशी दिसायला किरकोळ. पण, एकदा का खेळ सुरू झाला की, तो हरवायला अभेद्य आणि विजयासाठी कायम आसुसलेला अशीच त्याची देहबोली आणि कामगिरीही होती.
नोवाक 2003 पासून ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळायला लागला. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे दोन तारे टेनिस विश्वावर तेव्हापासून राज्य करत होते आणि तळपत होते. आणखी 5 वर्षांतच म्हणजे 2008 ला नोवाकने ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत रॉजर फेडररला उपांत्य फेरीत हरवलं. तेव्हा हा निकाल धक्कादायक मानला गेला होता. ही स्पर्धाही पुढे जाऊन नोवाकने जिंकली. तिथपासून दरवर्षी त्याच्यातील विजयाची भूक उत्तरोत्तर वाढतच गेली. 2011 मध्ये रॉजर फेडररची ग्रँडस्लॅम सद्दी त्याने मोडून काढली. यावर्षी 3 ग्रँडस्लॅम स्पर्धा तो जिंकला. टेनिस विश्वात आता फेडरर आणि नदालच्या बरोबरीने जोकोविचचं नाव घेतलं जाऊ लागलं. पुढची 20 वर्षं तिघं टेनिसमधील ‘बिग थ्री’ होते. आणि त्याचबरोबर जाणकारांमध्ये एक वाद सुरू झाला, या तिघांमध्ये ‘ग्रेट ऑफ ऑल टाईम्स‘ म्हणजे सार्वकालीन महान खेळाडू कोण?
इथेच नोवाक जोकोविचच्या वागण्यातील विसंगती त्याच्या विरोधात गेली. फेडररची शालीनता, खेळातील सौंदर्य, चेंडूवरील नियंत्रण यामुळे त्याचा खास चाहता वर्ग होता. नदालच्या खेळाचा दबदबा होता, कोर्टवर त्याचं वर्चस्व होतं. एकदा संधी निर्माण झाली की, नदालची अवस्था रक्ताची चटक लागलेल्या सिंहासारखी व्हायची. आणि हा त्याचा गुण लोकांना आणि जाणकारांना आवडत होता. आणि या दोन खेळाडूंनी आपली जागा जाणकार आणि चाहत्यांच्या मनात निर्माण केलेली असताना जोकोविचला कुठे बसवावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. जोकोविचकडे कुठल्याही परिस्थितीत आणि कुठल्याही पृष्ठभागावर (हार्ड, क्ले व गवत) सर्वोत्तम खेळ करण्याची सहजता होती. सर्बियात कोसोवो युद्ध सुरू असताना शाळकरी नोवाक प्रशिक्षणात खंड पडू नये म्हणून पाणी काढून टाकलेल्या जलतरण तलावातही खेळायचा. जमेल तिथे, जमेल तसा सराव करायचा. या अनुभवांनीच कदाचित त्याला जुळवून घ्यायला शिकवलं असेल. शिवाय त्याची मानसिक ताकदही मोठी आहे.
मैदानावरील कामगिरीने त्याने फेडरर आणि नदाल या दोघांनाही कधीच मागे टाकलं आहे. फेडररकडे 20, नदालकडे 22 तर जोकोविचकडे 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत. पण, सार्वकालीन सर्वोत्तम खेळाडू हा शब्द जरी उच्चारला तरी जाणकारांना आधी फेडरर आणि नदाल दिसतात. आणि नंतर यानिक सिनर आणि कार्लोस अल्काराझ या सध्याच्या नवीन पोरांची चर्चा सुरू होते. जोकोविचचं नाव त्यांना नाईलाजानेच घ्यावं लागतं. त्याची अती आक्रमकता आणि वाद निर्माण करायची वृत्ती त्यामागे असावी. कोविडच्या काळातही लोक गांजलेले असताना लस न घेण्यावरून जोकोविचने नको तो वादंग उभा केला होता. कोर्टबाहेर त्याची प्रतिमा काहीशी डागाळलेलीच राहिली. पण, आकडेवारीत तो कायम पुढे राहिला.
कारण, नजाकत नसली तरी शारीरिक आणि मानसिक ताकदीच्या जोरावर खेळातील सातत्य त्याने टिकवून ठेवलं. आताही 38 वर्षांचा असताना पहिला सेट त्याने जिंकला तर सामनाही तो जिंकतोच, हा लौकिक त्याने कायम ठेवला आहे. आकडेवारीच तसं सांगते. आणि दुसरं म्हणजे, आहे ती परिस्थिती स्वीकारण्याचा समजूतदारपणाही त्याने दाखवला आहे. ‘400 विजयांचा टप्पा पार केला हे छानच झालं. पण, सध्याचे आघाडीचे खेळाडू यानिक सिनर आणि कार्लोस अल्काराझच आहेत. मी आपला जमेल तसा खेळतोय,’ असं तो प्रांजळपणे म्हणाला. कारण, त्याचं वय 38 आहे आणि दुखापतींचा सामना करत तो खेळतोय याचं भान त्याला आलं आहे.
त्याचे डोळे आता 25 व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाकडे रोखलेले आहेत. त्याचबरोबर आता जर तो ग्रँडस्लॅम जिंकला तर वयाने सगळ्यात मोठा ग्रँडस्लॅम विजेता तो ठरणार आहे. आणि ही कामगिरी करण्यासाठी लागणारी विजिगिषु वृत्ती त्याने 38 व्या वर्षीही कायम ठेवली आहे यात त्याचं यश सामावलेलं आहे. 25वं विजेतेपद त्याने पटकावलं तर सार्वकालीनसर्वोत्तम होण्यापासूनही त्याला कुणी रोखू शकणार नाही. आणि ते नाही जरी झालं तरी कणखर आणि विजयासाठी सतत प्रयत्न करणारा खेळाडू म्हणून त्याची कारकिर्द युवा खेळाडूंसाठी कायमच प्रेरणादायी ठरेल.