चारोतरमगरींच्या अनोख्या अधिवासात

30 Jan 2026 17:51:57
 crocodiles
 
@मिलींद सुधाकर जोशी
9822011595
 
 crocodiles
मगर संरक्षित क्षेत्रांबाहेरील चारोतरमधला मगर संवर्धन आणि रक्षणाचा प्रकल्प आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे जगभर नावाजला जातोय, संवर्धनाचे आदर्श उदाहरण म्हणून ओळखला जातोय. यानिमित्त मगर आणि माणूस यांच्या शांतीपूर्ण सहअस्तित्वाचा एक अनोखा आणि यशस्वी इतिहास गुजरातमधील चारोतर गाव रचत आहे.
मगर आणि तिची पकड आणि यामुळे तिच्याबद्दल सर्वत्र निर्माण झालेला भीतीचा, तिरस्काराचा, दहशतीचा व शत्रुत्वाचा दृष्टीकोन याला छेद देणारा एक आगळावेगळा प्रदेश म्हणजे गुजरातमधला चारोतर हा होय. भारताला दूध उत्पादक म्हणून समर्थ बनवणार्‍या अमूलच्या दूधक्रांतीसाठी प्रसिद्ध असलेल्या आणंद शहराच्या आजूबाजूची 30-40 खेडी आपापल्या गावातील तळ्यात आणि तलावांमध्ये आता मगर संवर्धनाचा आणि मगर आणि माणूस यांच्या शांतीपूर्ण सहअस्तित्वाचा एक अनोखा आणि यशस्वी इतिहास रचत आहेत. स्थानिक लोकांच्या संस्कृतीतून आलेल्या आणि त्यांच्या उत्स्फूर्त आणि उत्साही सहभागामुळे मगर संवर्धनाचे हे अनोखे कार्य इतके यशस्वी झाले आहे की, गेल्या दहा वर्षात मगरींची संख्या 130 पासून वाढून 550 झाली आहे आणि या वर्षी 600 चा आकडा पार करण्याची शक्यता आहे. 50 वर्षांपूर्वी नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या मगरींच्या प्रजातीचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने भारतात प्रोजेक्ट क्रोकोडाईल सुरू केला गेला आणि यामुळे मगरी नष्ट होण्यापासून वाचल्या.
 
आज मगर संरक्षित क्षेत्रांबाहेरील चारोतरमधला हा मगर संवर्धन आणि रक्षणाचा प्रकल्प आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे जगभर नावाजला जातोय, संवर्धनाचे आदर्श उदाहरण म्हणून ओळखला जातोय. मात्र याची माहिती अनेकांना नाही तशी ती त्या ठिकाणी जाईपर्यंत मलाही नव्हती.
 
माझा जळगांवचा बालमित्र नितीन जोशी याच्याबरोबर मी भारतभर अनेक अभयारण्यातील विविध वन्य सर्वेक्षणांत सहभागी झालो आहे, त्याने मला फोन करून चारोतर क्रोकोडाईल काऊंटची माहिती दिली. आम्ही दोघांनी सर्व माहिती भरून रितसर अर्ज केले आणि आमची निवड होऊन आम्ही या उपक्रमात सहभागी होणार हे निश्चित झाले. वल्लभ विद्यानगर, आणंद येथील व्हॉलेंटरी नेचर कॉनझरव्हन्सी (VNC) ही संस्था गेली 13 वर्षे हा क्रोकोडाईल काऊंट आयोजित करीत आहे. चारोतरमधला हा मगर संवर्धन आणि रक्षणाचा प्रकल्प यशस्वी होण्यात अत्यंत मोलाचे योगदान या संस्थेचे आहे. संस्था अनेक उपक्रम राबवून स्थानिकांना आणि नागरिकांना मगर संवर्धन आणि रक्षण करण्याचे महत्त्व समजावून देऊन त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेत आहे.
 
 
आज परिस्थिती अशी आहे की, या खेड्यांमधील लोकच या मगरींचे रक्षण करतात, मगरींची शिकार करत नाहीत, दुसर्‍याला करू देत नाहीत. 2013 साली पहिली मोजणी केली गेली तेव्हा 99 मगरी मोजल्या गेल्या होत्या आणि 2025 मधल्या 12व्या मोजणीत 549 मगरी मोजल्या गेल्यात. आम्ही 2026 च्या ज्या 13व्या मोजणीत सहभागी झालो होतो त्या मोजणीत ही संख्या 600 पेक्षा जास्त भरावी. प्रामाणिक आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आणि गावकर्‍यांच्या आपुलकीयुक्त उत्साही सहभागाशिवाय हे शक्यच नव्हते. लहान मुलांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये मगरींची भीती कमी व्हावी आणि संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी खास कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. मगर संवर्धनाखेरीज अनेक सामाजिक उपक्रम स्वयंसेवी पद्धतीने संस्था राबवत असते.
 

 crocodiles 
 
या चारोतरमध्ये 150 वर्षांपासून मगरींच्या अस्तित्वाचे दाखले मिळतात. शेजारच्या बडोद्यात मानव-मगर संघर्षाच्या घटना झाल्या आहेत मात्र चारोतरमध्ये त्या झालेल्या नाहीत हे एक अद्भुतच आहे. चांगा नावाच्या एका खेड्यात आम्ही गेलो होतो तिथे मगरींचे अस्तित्व असलेल्या तळ्याकाठीच मनुष्य वस्ती आहे, शाळा आहे, मध्ये कुंपणही नाही, गुरांचा गोठाही तळ्याकाठीच आहे. मगरींच्या पिल्लाशी तिथली लहान मुले खेळतात आणि जर ही पिल्ले गावात आली तर ती पुन्हा तळ्यात सोडतात, हे अविश्वसनीय वाटत असले तरी सत्य आहे.
 
क्रोकोडाईल काऊंटच्या उपक्रमात सहभागी सदस्यांनी गावातील नागरिकांची मुलाखतही घ्यायची असते. याच तळ्याकाठच्या शाळेतील सुपरवायझर भरतभाईंची मुलाखत मी घेतली आणि अनेक विषयांवरील गावकर्‍यांची मते जाणून घेतली. त्यांना मगरींची भीती तर वाटत नाहीच उलट गावात मगरी असल्याचा अभिमानच आहे. हे अद्भुत चित्र बघायला देश-विदेशातून लोक येतात त्यामुळे गावकर्‍यांना गौरवास्पद वाटते, हे ही त्यांनी आवर्जून सांगितले. त्या मगरी जिथे आहे त्या ठिकाणीच मगरींचे संवर्धन झाले पाहिजे, मगरी इथेच राहिल्या पाहिजेत, त्यांचा आम्हाला काहीही त्रास नाही व आमची कुठलीही हरकत नाही, आम्ही या कार्यात मदतच करू हे ही त्यांनी सांगितले. मी आणि माझ्या टीमचे इतर सदस्य अनेक गांवांमधून फिरलो. सर्वांनी तेथे अनेकांच्या मुलाखती घेतल्या आणि सर्वत्र हेच मत असल्याचे आम्हाला जाणवले.
 
 
चारोतरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथले पक्षीवैभव. स्थानिक आणि स्थलांतरित असे अनेक सुंदर पक्षी आम्हाला पाहायला मिळाले. यात सारस क्रेन, ग्रे लॅग गूज, सर्व प्रकारचे आयबिस, हुप्पो, किंगफिशर, अनेक प्रकारच्या पाणकोंबड्या, अनेक प्रकारचे स्टॉर्क्स, हेरॉन्स, सँडपायपर्स, इग्रेटस, बदके अशा जवळ जवळ 70-80 पक्षीप्रजाती आम्हाला पाहायला मिळाल्या. एकेक पक्षी, त्याची रंगसंगती, आणि त्याच्या अदा इतक्या सुंदर की कितीदाही पाहिले तरी पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. भरीस भर म्हणून कोल्हे, मुंगूस, साप आणि नीलगायींचा एक कळपही पाहायला मिळाला. तळ्यांमधल्या सुंदर कमळांच्या दर्शनाने आनंद त्रिगुणीत झाला. पक्षीनिरीक्षणासाठीही हा प्रदेश अत्यंत उत्तम आहे, आवर्जून भेट द्यावी असा.
 
 
उत्क्रांतीच्या साखळीत डायनॉसोरशी साम्य असलेला आजपर्यंत टिकून असलेला मगर हा महत्त्वपूर्ण प्राणी आहे. प्राण्यांची अनावश्यक वाढ टाळण्यासाठी आणि अन्नसाखळीत संतुलन राखण्यासाठी तो आवश्यक आहे. पर्यावरण संतुलनाचे आणि मृत प्राणी खाऊन नष्ट करीत असल्याने जलस्वच्छतेचे कामही मगरींमुळे होत असते. म्हणूनच भारतात वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अ‍ॅक्ट 1972च्या अंतर्गत मगरींना सर्वोच्च सुरक्षेचा दर्जा देण्यात आलेला असून तिची शिकार करणे हा कठोर शिक्षापात्र गुन्हा आहे. शासकीय पातळीवरून मगरींच्या संवर्धनाचे प्रयत्न केले जात आहेत. सांस्कृतिक आणि धार्मिक मान्यतांमुळेही मगरींचे संवर्धन केले जाते. नुकताच मी इजिप्तला गेलो होतो. तेथील अती प्राचीन फेरोह संस्कृतीत तर सोबेक हा त्यांचा देव मगरींच्या रूपात मानला जात असे, सोबेकची मंदिरे सापडली आहेत ज्यात जिवंत मगरींची पूजा केली जात असे आणि मृत्यूनंतर त्यांच्याही ममीज बनवल्या जात होत्या. तिथल्या संग्रहालयात आम्हाला त्या पाहायला मिळाल्या.
 
 
मगर हा शिकारी प्राणी असला तरी तिच्या नैसर्गिक अन्नगरजेत नरमांस नाही, माणसावर ती अन्न म्हणून हल्ला करीत नाही, तर हल्ल्याची इतर बरीच कारणे आहेत. थंड रक्ताच्या आणि अतिशय संथ चयापचय प्रक्रिया असणार्‍या या एवढ्या मोठ्या प्राण्याला दिवसाला 200-400 ग्रॅम अन्न पुरते. मगरी अनेक दिवस अन्नाशिवाय राहू शकतात. जगातील सर्वात लांब मगर साधारण 21 फुट लांब आहे. तिचे वजन 1275 किलो होते व ती फिलीपाईन्समध्ये नोंदली गेली आहे. चारोतरमध्ये आम्हाला सर्वांत मोठी साधारण 11 फूट लांबीची मगर आढळली. मिलनानंतर मादी बिळात अंडी देते आणि त्यांचे रक्षणही करते. 65 ते 90 दिवस अंडी उबवल्यानंतर पिले बाहेर येतात. या पिल्लाचे लिंग जनुकांच्या आधारे ठरत नाही तर ते त्यावेळच्या तापमानाच्या आधारे ठरते. मगरीच्या आयुष्यात तिला अनेकदा नवीन दात येतात. मगर बिळात राहते जे ती तळ्याच्या काठात किंवा जर तळ्यात बेटासारखा टापू असेल तर त्याच्या कडेने करते. आम्ही अशी अनेक बिळे नोंदली. बीळ 40 फुटांपर्यंत लांब असू शकते. बिळाच्या शेवटी उलटे फिरण्यासाठी मोठा भाग कोरलेला असतो. पाण्याचा अंदाज घेत बीळ एकापेक्षा जास्त मजल्यांचे असू शकते. मगर जरी सुस्त किंवा संथ वाटत असली तरी त्वरेने हल्ला करते आणि जमिनीवरून 17 कि.मी. प्रतितास धावल्याची नोंद आहे. मगरीचा चावा हा सर्व प्राण्यांमधे सर्वात शक्तिशाली असतो, मात्र जबडा उघडण्यासाठीची ताकद फारच कमी असते. मगरीबाबतची ही माहिती थक्क करणारी आणि धक्कादायक वाटते.
 
क्रोकोडाईल काऊंटसाठी आम्ही VNCच्या ऑफिसमध्ये जमलो. तिथे मगर संवर्धन आणि त्यांची शरीररचना व जीवनक्रमाबद्दल अतिशय सखोल माहिती देणारी व्याख्याने आणि चर्चासत्रे डॉ. राजूभाई व्यास जे Regional Vice-Chair and member of the IUCN SSC Crocodile Specialist Group आहेत त्यांनी तसेच VNC चे डायरेक्टर अनिरुद्ध वसावा Member, International Union for Conservation of Nature (IUCN), Species Survival Commission (SSC), Crocodile Specialist Group यांनी प्रत्यक्षात आणि डॉ. स्टिवन प्लॅट जे जागतिक कीर्तीचे Herpetologist (सरपटणार्‍या प्राण्यांचे तज्ज्ञ) आहेत आणि या क्षेत्रात 30 वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दिली.
 
 
प्रत्येक सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तरे होती. खूपच उपयुक्त आणि नवीन माहिती मिळाली. यानंतर टीम बनवल्या गेल्या. माझ्या टीमच्या लीडर होत्या नियती पटेल वसावा ज्या स्वत: या विषयात मास्टर्स डिग्री केलेल्या आहेत, त्याचबरोबर रिआना ही फरीदाबादची शाळकरी मुलगी आणि दक्षेस सोनी हा बडोद्याचा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच आमच्या गाडीचे सारथ्य करणारा आणंदचा जिगर पटेल हा अनेक वर्षांपासून वन्यप्राण्यांच्या रेस्क्यूचे काम करणारा आणि अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेला अशी आमची 12 ते 65 वयाची टीम तयार झाली. त्याच बरोबर स्वत: डायरेक्टर वसावाही आमच्या सोबत होते.
 
 
या उच्चशिक्षित आणि प्रचंड अनुभव असलेल्या, विनम्र जोडप्याकडून दोन्ही दिवस थक्क करणारी माहिती आणि प्रत्यक्ष फील्डवर मार्गदर्शन मिळाले हे माझे अहोभाग्यच. या दोन दिवसांत आम्ही 7 गावांना भेटी दिल्या. काही गावात दोन तळी तर काहीत एक तळे होते. या तळ्यांच्या काठाकाठाने ओल्या अथवा निसरड्या पायवाटांची तमा न बाळगता, फिरुन आम्ही 64 मगरींची नोंद केली. पेंचच्या क्रोकोडाईल सर्वेक्षणामध्ये दोन दिवस धरणाच्या बॅकवॉटरच्या काठाने अनेक किलोमीटर बोटीने आणि पायी फिरून आम्हाला 3 मगरी दिसल्या होत्या, त्याच्या तुलनेत हा तर जॅकपॉटच. चारोतरला जायचे ठरले तेव्हा गुगल मॅप बघितला, ज्या भागात जाणार तिथे एकही मोठी वॉटरबॉडी दिसत नसल्याने आम्हाला असे वाटत होते की, मोजणीसाठी खंबातच्या आखातात जावे लागेल. गावागावात इतकी तळी असतील आणि तिथे इतक्या मगरी असतील, इतके पक्षी असतील, याची आम्हाला अजिबात माहिती नव्हती. या आगळ्यावेगळ्या अधिवासाच्या दर्शनाने तसेच या प्रकल्पात काम करणार्‍या स्वयंसेवकांची निष्ठा आणि ध्येयवेड बघून आणि त्यांच्या सामाजिक जबाबदारीच्या समृद्ध जाणीवा बघून बसलेल्या आत्यंतिक सुखद धक्क्यातून अजूनही सावरलेलो नाही. हे अनुभव ज्ञानवर्धन करणारे, अनुभव संपन्नता वाढवणारे, बरेच काही शिकवणारे आणि आयुष्य समृद्ध करणारे असतात.
Powered By Sangraha 9.0