चरण धावू दे सदा आरोग्यमंदिराकडे...

विवेक मराठी    31-Jan-2026
Total Views |
@विलास आराध्ये
मुलाखतकार
 
 
Dr. Brajmohan Jhanwar
लातूरच्या सुप्रसिद्ध विवेकानंद रुग्णालयातील डॉ. ब्रजमोहन झंवर आणि डॉ. आरती झंवर या दोघांनीही अलीकडेच बँकॉकमधील मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन त्यात प्रथम क्रमांक मिळवला. आपल्या ‘धावत्या’ प्रवासाविषयी त्यांनी मांडलेले हे मनमोकळे विचार...
 
आपले बालपण आणि पार्श्वभूमी थोडक्यात सांगाल का?
 
डॉ. ब्रजमोहन - माझा जन्म लातूर जिल्ह्यातील औसा इथे झाला. शालेय शिक्षण तिथेच झाले. नंतर निजाम मेडिकल कॉलेज येथून एम.बी.बी.एस. झालो आणि मुंबईतल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून सुपर स्पेशालिटीचे शिक्षण पूर्ण केले.
 
डॉ. आरती - माझे माहेर बार्शीचे. दहावी-बारावीपर्यंतचे शिक्षण तिथेच झाले. पुढे सोलापूरच्या वाडिया कॉलेज व हॉस्पिटलमधून एम.बी.बी.एस. झाले. नंतर पोस्ट गॅ्रज्युएशन आणि सुपर स्पेशालिटी मुंबईतल्या केईएम हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियलमधून केली.
 
पुढे नोकरी केली की, व्यवसाय म्हणजे स्वतःचे रुग्णालय सुरू केले?
 
डॉ. ब्रजमोहन - तसे म्हटले तर रूढार्थाने नोकरीच. पण आम्ही याला नोकरी म्हणत नाही, तर डॉक्टर झाल्यापासून लगेचच लातूरच्या विवेकानंद हॉस्पिटलमध्ये आम्ही रुग्णसेवा देत आहोत ती आजतागायत.
 
 
धावण्याच्या छंदाची सुरुवात कधी झाली? म्हणजे तुमच्या सरावाच्या वेळा वेगवेगळ्या असू शकतील, पण स्पर्धेत धावण्याच्या दृष्टीने, दोघांनी एकत्रच सराव केला का?
 
डॉ. ब्रजमोहन - धावण्याची सुरुवात 2016 नंतर झाली. 2017-18मध्ये नियमित धावत होतो. पण ज्याला शास्त्रीयदृष्ट्या धावणे समजले जाते ते अलीकडच्या दोन वर्षांत म्हणजे 2023 पासून सुरू झाले. पुण्याचे डॉ. योगेश सातव हे आमचे कोच आहेत. ते बालरोगतज्ज्ञ आहेत आणि धावपटूही आहेत. त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आम्ही शास्त्रीयदृष्ट्या धावण्याचा सराव सुरू केला. धावण्याचेही वेगवेगळे प्रकार असतात-पद्धती असतात. स्पर्धेत धावण्यासाठी आम्ही 2023 पासून म्हणजे गेली दोन-अडीच वर्षे त्यांचे मार्गदर्शन घेत आहोत.
 
 
शास्त्रीयदृष्ट्या धावायला सुरुवात केल्यावर कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतला?
 
डॉ. ब्रजमोहन - आरती तर 2018-19 पासून धावण्याच्या स्पर्धांमधून भाग घेत होती आणि त्यात तिला बक्षीसेही मिळत होती.
डॉ. आरती - टाटा विमेन्स मॅरेथान, टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, लडाख मॅरेथॉन अशा स्पर्धामध्ये भाग घेऊन पहिल्या तीनांत मी नंबर मिळवला आहे.
 
 
डॉ. ब्रजमोहन - लडाख मॅरेथॉन ही जगातली सर्वात जास्त उंचीवरील स्पर्धा आहे आणि आरतीने ती जिंकली आहे. कॉमरॅडसमध्ये भारतातली सर्वांत वेगवान धावपटू म्हणून आरतीचा गौरव झाला आहे.
 
डॉ. आरती - त्याचबरोबर सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर, पुणे किंवा नुकताच झालेली सातारा मॅरेथान या प्रत्येक ठिकाणी मी भाग घेतला आणि त्या-त्या ठिकाणी माझा पहिला, दुसरा किंवा तिसरा क्रमांक आलेला आहे.
 
तुमच्या दोन्हीकडच्या कुटुंबात कोणी अशी धावपटू होती जिच्या प्रभावामुळे तुम्ही या क्षेत्राकडे वळलात?
 
डॉ. आरती - नाही, दोन्ही कुटुंबात असे कोणीही नव्हते. इतकेच काय, लहानपणी शाळेतही मी कधी धावले नव्हते.
 
 
 
 
तुमची रुग्णसेवा आणि हा छंद यांची सांगड कशी घालता?
 
डॉ. आरती - हा तोल सांभाळणं अवघड आहेच. धावायला सुरुवात केली तेव्हा तर फार अवघड वाटत होते. आता सवय झाली आहे. मला माझ्या कुटुंबाचे सहकार्य आहे, माझ्या सहकार्‍यांचाही सपोर्ट चांगला आहे. मी रोज पहाटे लवकर उठते, स्वतःचे आवरून मी माझ्या ’रन’साठी बाहेर पडते. परत घरी आल्यावर मुलांचे आवरून त्यांना शाळेत पाठवून सकाळी आठ-साडेआठला मी माझ्या ओटीसाठी (ऑपरेशन्स) रुग्णालयात जाते. ते काम दिवसभर चालते.
 
बँकॉकला जाण्याआधी कोणत्या स्पर्धेत तुम्ही भाग घेतला होता?
 
डॉ. आरती - बँकॉकला जाण्यापूर्वी साऊथ आफ्रिकेची 90 कि.मी.ची स्पर्धा मी 8 तास 37 मिनिटांत पूर्ण केली होती आणि त्या स्पर्धेत कॉमरेडस्मध्ये मी सर्वांत वेगवान धावपटू ठरले होते. त्यामध्ये सहभागी झालेल्या भारतीय महिलांमध्ये मी सर्वांत वेगवान होते. याच स्पर्धेमधून मला बँकॉक स्पर्धेसाठी फेडरेशनकडून आमंत्रित करण्यात आले होते. बँकॉकच्या ट्रेनिंगदरम्यान मी वर्ल्ड पुणे मॅरेथॉन या स्पर्धेत, तसेच बारामती मॅरेथॉनमध्येही सहभागी झाले होते आणि या दोन्ही स्पर्धांमध्ये मी पहिली आले होते.
 
 
बँकाकच्या स्पर्धेविषयी तुम्हाला कधी आणि कसे कळले?
 
डॉ. आरती - बँकॉक स्पर्धेसाठी अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट होती. काही कारणाने आपल्याला या स्पर्धेत सहभागी होणे शक्य नाही, असे मला वाटत असल्याने मी अर्ज पाठवला नव्हता. मात्र मुदत संपल्यावर जवळजवळ 12-15 दिवसांनी मला फेडरेशनचा कॉल आला की, तुमचे नाव आम्हाला सुचवण्यात आले आहे. तुम्ही साऊथ आफ्रिकेची स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे पूर्ण केली होती, तरी तुम्ही या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आम्हाला वाटते. मग मी सर्वांशी चर्चा केली. घरात सासूबाईंशी, पतीशीही बोलले. ते दोघेही म्हणाले की, जर शक्य असेल तर तू भाग घे. आमच्या कोचनेही सांगितले की चांगली संधी आहे, तर शक्य असेल तर तुम्ही ही संधी चुकवू नये. म्हणून मग मी त्यांना होकार कळवला.
 
 
बँकाकमध्ये स्पर्धा आयोजित करणारी ऑर्गनायझेशन कोणती?
 
डॉ. आरती - ही पूर्ण जगभरातील असोसिएशन असते. जिला इंटरनॅशनल अल्ट्रा रनर असोसिएशन (IAU) असे म्हटले जाते. ती आणि वर्ल्ड फेडरेशन असोसिएशन (WFA) या दोन्ही संघटना मिळून विविध देशांच्या फेडरेशन्सशी संपर्क साधतात. जशी भारतात अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन ऑफ इंडिया आहे, तशाच इतर देशांच्या संघटना असतात. या स्पर्धेसाठी धावपटू पाठविण्याविषयी इतर देशांच्या फेडरेशन्सना कळवतात. फक्त त्यांच्या काही अटी असतात. फक्त 6 पुरुष आणि 6 स्त्रिया एवढेच प्रत्येक देशाकडून सहभागी होऊ शकतात. आता ही स्पर्धा एशिया ओशनिया गटासाठी होती. या गटातील देशांचे स्पर्धक यात सहभागी झाले होते. आपल्या देशातून 6 पुरुष आणि 5 महिला स्पर्धेत सहभागी झालो होतो.
 
 
या स्पर्धेची पूर्वतयारी तुम्ही कधी, कशी, कुठे केली? आणि किती वेळ केली ?
 
 
डॉ. आरती - आम्हाला या स्पर्धेसाठी खूप कमी वेळ मिळाला होता. फक्त आठ आठवडे मिळाले. 14 सप्टेंबरला सातारा मॅरेथॉन होती. ती झाल्यावरच या स्पर्धेचे ट्रेनिंग आले. ते ऑनलाईन येते. इंडियन टीमचे कोच आहेत संतोष पद्मनाभन. ते आधी आमची सर्व माहिती घेतात-आमची रनिंग कशी आहे, स्पीड कसा आहे आतापर्यंतची टायमिंग कशी होती, कुठे-कुठे स्पर्धेत भाग घेतला अशा माहितीवरून ते आम्हाला जाणून घेतात आणि त्यानुसार सरावाचे वेळापत्रक पाठवतात. त्याप्रमाणे त्यांनी 8 आठवड्यांचे वेळापत्रक पाठवले होते. संपूर्ण ट्रेनिंग आपल्या गावातच करायचे होते. शक्य असेल तर आपण आपल्या टीमबरोबर सराव करू शकतो. आपले रनिंग बडीज म्हणजे धावण्यातले नेहमीचे सहकारी सरावाच्या वेळी मदत करतात. पण मला माझ्या गावातच सराव करणे भाग होते. मला सरावाला कोणी सोबत नव्हते. ही स्पर्धा रात्री दहा ते सकाळी दहा या वेळेत होत असल्याने रात्रीच सराव-ट्रेनिंग व्हायला हवे, असे आमच्या कोचने आग्रहाने सांगितले होते. रात्रीचे ट्रेनिंग म्हटल्यावर मला बरीच चॅलेंजेस होती. एक तर प्रोफेशनल चॅलेंज होते, मला माझे घर होते, सरावाला सलग सुरक्षित रस्ता नव्हता, रस्त्यांवर खड्डे, कुत्री अंगावर येणे, पोल लाईट्सची अडचण, टूव्हीलर्सचा त्रास अशा अनेक अडचणी होत्या. राजीव गांधी चौक ते बसवेश्वर चौक असा दोन किलोमीटर जाऊन-येऊन मी सव्वा तासाचा रन केला. सरांचे (माझ्या पतीचे) सहकार्य सतत मला होते. ते, अभिमन्यू सर आणि अमित सर यांच्या मार्फत डीएचओ महादेव यांच्याशी बोलले. त्यानंतर डीएचओनी पूर्ण परवानगी दिली की, तुम्ही ग्राउंडवर सराव करा. फक्त मला पूर्वकल्पना द्या. त्यामुळे मोठी अडचण दूर झाली. माझे मोठे दोन रन-एक 60 किमीचा मी 6 तासात केला, दुसरा 75 किमीचा मी 8 तासांत केला ग्राउंडवर. क्रीडा संकुलच्या पोलिटिकल ग्राउंडवर हा सराव झाला..
 
या स्पर्धेत कोणत्या देशांचे किती खेळाडू सहभागी झाले होते?
 
डॉ. आरती - या स्पर्धेसाठी फेडरेशन खेळाडू पाठवते. चॅम्पियन्स स्पर्धेत आठ देशांचे 60 खेळाडू सहभागी झाले होते. तिथे दुसरी एक ओपन रेसही असते..
 
 
 
बँकॉकला जाताना मनात कोणत्या भावना होत्या?
डॉ. आरती - खूप संमिश्र भावना होत्या. खूप आनंद होता. इतर स्पर्धांमध्ये शेकडो स्पर्धक असतात. येथे मोजकेच स्पर्धक, तेही त्यांच्या देशातले सर्वोत्तम. ते कसे स्वतःला ट्रेन करतात ते समजले. आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहोत, याचा आनंद जेवढा होता, तेवढीच जबाबदारी वाटत होती.
 
डॉ. ब्रजमोहन - या स्पर्धेमध्ये चार-चार किलोमीटर्सचे लूप्स असतात. इतर स्पर्धांमध्ये एक-एक किलोमीटरचे लुप्स असतात. एक किलोमीटरनंतर धावकाला पाणी, इलेक्ट्रोलाईटस् मिळतात. येथे ते चार किलोमीटरनंतरच मिळतात. मध्ये पाण्याचे जार ठेवलेले असतात, पण 100 किमी. धावताना सेकंदांचा हिशोब ठेवावा लागतो. तसेच या स्पर्धेत फेडरेशनचा फायनान्शिअल सपोर्ट नसतो. त्यामुळे धावकाबरोबर क्रू नसतो. क्रूचे काम म्हणजे चार कि.मी. अंतरावर तेथे पोचल्यावर धावकाला पाणी, इलेक्ट्रोलाईटस पुरवणे.पण या टीमबरोबर फक्त यांचे कोच होते आणि अकरा धावपटूंना त्यांनी एकट्यानेच मदत करायची होती. हे सर्व एका जुन्या अल्ट्रा रनरला कळले. ते भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले अधिकारी होते, ते जोधपूरहून बँकाकला स्वखर्चाने आले. ’हा खेळ जिवंत राहावा म्हणून, खेळावरच्या प्रेमाने मी येथे आलो आहे,’ असे त्यांनी सांगितले. स्ट्राव्हा नावाचे अ‍ॅथलिट लोकांचे एक सोशल मीडिया अ‍ॅप आहे. त्यावरून बँकॉकमध्ये राहणार्‍या एका भारतीय जोडप्याला समजले की, भारतीय टीमबरोबर क्रू नाही. तेव्हा ते मदतीला आले. या लोकांनी धावकांना प्रोत्साहन देणे, त्यांना पाणी-इलेक्ट्रोलाईटस पुरवणे, त्यांचे बूट बदलणे अशी सगळी कामे स्वयंस्फूर्तीने केली. आणि आमच्या कोचलाही मानलं पाहिजे की जेव्हा त्यांना स्टेजवर सुवर्णपदक दिले गेले, तेव्हा ताबडतोब यांनी ते सुवर्णपदक जोधपूरहून जे लष्करातले निवृत्त अधिकारी आले होते, त्यांना देऊन टाकले आणि सांगितले की, या सुवर्णपदकावर माझ्यापेक्षा तुमचा जास्त हक्क आहे.
 
 
या स्पर्धेत तुम्ही विजय कसा प्राप्त केलात?
 
डॉ. आरती - मगाशीच म्हटल्याप्रमाणे ही स्पर्धा चार किलोमीटरच्या लुप्समध्ये होती. म्हणजे चार किलोमीटरचे पंचवीस फेरे आम्हाला करायचे होते. ही स्पर्धा एका पार्कमध्ये झाली. रॉडपॅक पार्क असे त्याचे नाव. बँकॉकची हवा उष्ण व दमट आहे. पण रात्रीची वेळ असल्यामुळे वातावरण ठीक होते. लाईटसची सोय-चांगली केलेली होती. मला काही त्रास जाणवत होते, पण कोणत्याही खेळाचा तो एक भाग असतोच. पन्नास किमी धावल्यानंतर हे त्रास मला होऊ शकतील, हे मला माहीत होते. त्याप्रमाणे 40-50 किमीनंतर माझी टाच दुखू लागली. माझ्या पायाला फोड येऊ लागले. पण मी हरले नाही. थोडीशी स्लोडाऊन झाले, पण मी सातत्य टिकवून ठेवले. सुरुवातीला माझा चौथा-पाचवा क्रमांक होता. माझ्यापुढे एक न्यूझीलंडची, एक लडाखची, आणि एक मनालीची महिला होती. पण पन्नास किमीनंतर मी तिसर्‍या क्रमांकावर आले आणि शेवटपर्यंत त्या क्रमांकावरच राहिले. मला ब्रॉन्झपदक मिळाले.
 
डॉ. ब्रजमोहन, आपण काय सांगाल ?
 
डॉ. ब्रजमोहन - मी पन्नास किलोमीटर धावण्यासाठी गेलो होतो. मी शर्यत पूर्ण केली. आरतीबरोबर धावण्यासाठी कोणीतरी असावे म्हणून, इतक्या लांब जायचे आहेच म्हणून मी सहभागी झालो होतो.
 
तुम्हाला त्यात पदक मिळाले का?
डॉ. ब्रजमोहन - नाही, मी शर्यत पूर्ण केली.
डॉ. आरती - पुरुषांमध्ये स्पर्धा खूप कठीण असते. फेडरेशनतर्फे होणारी स्पर्धा स्त्रियांनी 3 तास 45 मिनिटांत पूर्ण केलेली असावी लागते, तर पुरुषांसाठी 3 तास 5 मिनिटांची अट असते. पुरुषांचा वेग स्त्रियांपेक्षा नेहमीच जास्त असतो.
 
डॉ. ब्रजमोहन - पण आजपर्यंत आम्ही ज्या-ज्या स्पर्धांमध्ये गेलो, तेथे ’कपल’ म्हणूनच गेलो आहोत. जूनमध्ये कॉमरडस मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आम्ही मराठवाड्यातील पहिलेच कपल होतो. इंडियन मेडिकल असोसिएशनमधील पहिलेच कपल होतो. आणि स्त्री म्हणून आरती पहिलीच.
 
म्हणजे मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होणारे लातूरमधील, मराठवाड्यातील पहिले जोडपे, इंडियन मेडिकल असोसिएशनमधील पहिले जोडपे, तसेच महाराष्ट्रातील पहिले जोडपे हा लौकिक तुम्ही मिळवलात. तुमचे स्वतःचे घर, लातूर, मराठवाड्याला हा बहुमान तुम्ही मिळवून दिलात.
 
 
डॉ. ब्रजमोहन - अनेक लोक म्हणतात की, आम्हाला व्यायामाला वेळ मिळत नाही. पण तसे नसते. वेळ काढावा लागतो. आमचे दोघांचे वेळापत्रक बघा. सकाळी साडेआठ-नऊ वाजल्यापासून आम्ही ऑपरेशन्सना सुरुवात करतो, ते एक-दीड वाजेपर्यंत चालते. मग त्यानंतर बाह्यरुग्ण विभाग संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत. त्यानंतर राऊंड असतो. घरी येतो सात वाजेपर्यंत.
 
आल्यावर कुटुंबियांबरोबर दोन तास घालवतो. रात्री 6-7 तासांची झोप पुरेशी होते. सकाळी दोन तास आपल्या छंदासाठी, आरोग्य राखण्यासाठी मिळू शकतात व प्रत्येकाने तसा वेळ काढायला हवाच. ढरीसशीं ेीळशपींशव असा आरोग्याच्या बाबतीत विचार करू नका. नेहमीसाठी विचार करा, जीवनशैलीत बदल करा. लोक एखादे ध्येय नजरेसमोर ठेवून व्यायामाला सुरुवात करतात. उदा. माझी शुगर 100च्या आत आली पाहिजे. आणि एकदा ते ध्येय गाठले की, व्यायामाकडे दुर्लक्ष करतात. त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. गेली तीन-चार वर्षे मी लातूरमध्ये आमच्या डॉक्टर मित्रांमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याला आता चांगला प्रतिसाद मिळतोय. आज आमचा लातूरमध्ये रनर्सचा मोठा ग्रुप तयार झाला आहे. रविवारी सकाळी तुम्ही बघितले तर रिंगरोडवर बरेच रनर्स धावताना दिसतील.
 
 
बँकॉकमधील स्पर्धेत तुम्हाला ब्रॉन्झ मेडल मिळाले. पहिल्या, दुसर्‍या आणि तुमच्या नंबरमध्ये किती अंतर होते?
 
डॉ. आरती- पहिला, दुसरा नंबर हे माझ्यापेक्षा वेगवान होते. पहिल्या नंबरला 9 तास 4 मिनिटे लागली तर दुसर्‍या नंबरला 9 तास 18 मिनिटे लागली. पण माझ्यामध्ये आणि चौथ्या नंबरमध्ये फारच कमी अंतर होते-अगदी एक-दोन मिनिटांचे अंतर पडत, होते. पण शेवटच्या टप्प्यात मी स्पीड पकडला आणि ते अंतर पाच मिनिटांपर्यंत वाढवले. आणि ते अखेरपर्यंत टिकवून ठेवले. माझी स्पर्धा तर तिसरा नंबर टिकवून ठेवण्यासाठीच होती.
 
 
ही स्पर्धा तुम्ही पूर्ण केली, भविष्यात तुमच्या डोळ्यांसमोर याच्यापेक्षा उच्च आव्हानात्मक असे काय आहे?
 
डॉ. आरती - तसं तर खूप काही मनात आहे. पुढच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियनशिपची स्पर्धा आहे, मला त्याचेही आमंत्रण येईल. पण मी त्याचा विचार केलेला नाही. 14 जूनला साऊथ आफ्रिकेची कॉमरॅडस् कॉम्पिटिशन आहे, मला ती पुन्हा एकदा करायची आहे. मुलांची अभ्यासाची महत्त्वाची वर्षे आहेत. जशी वेळ येईल तसा निर्णय घेईन.
 
 
पुढची पिढी-म्हणजे तुमच्या मुलांना व्यायामाची आवड आहे का? रनिंगमध्ये आहेत का? पुढे हा वारसा गेला आहे का?
डॉ. आरती - आमच्या संपूर्ण कुटुंबालाच आता व्यायामाचे महत्त्व पटले आहे. माझ्या सासूबाईंनी वयाची साठी ओलांडली आहे. परंतु त्या रोज चालायला जातात, जिममध्ये जाऊन व्यायाम करतात, योगासने करतात. माझ्या दोन्ही मुलांना खेळाची आवड लहानपणापासून आहे. आमचा मुलगा जिममध्ये व्यायामाला जातो. मुलगी जिम्नॅस्टिक्स करते, सुंदर योगासने करते. इतकेच काय माझी नणंद व नणंदेचा नवरा...सगळेजण पाळत आलेत. थोडक्यात आमची संपूर्ण फॅमिलीच सकारात्मक दृष्टीने बदलली आहे.
डॉ. ब्रजमोहन - व्यायामाचे महत्त्व सर्वांना पटले आहे. कुटुंबात ते रुजले आहे. धावणे हा प्रायमरी व्यायाम नाही. तो आमच्या जीवनशैलीचा भाग आहे. सकस, संतुलित आहार, झोपेच्या वेळा हे आम्ही सर्वजण पाळतो. प्रत्येकजण व्यायाम करतोच. कोणाला काय आवडेल तो व्यायाम करतात-मग कोणी धावत आहे, कोणी जिमिंग, कोणी सायकलिंग, स्विमिंग हे ज्याचे त्याने निवडले आहे. पण संतुलित आहार, नियमित व्यायाम व झोप हे आवश्यक आहे, हे कुटुंबात सर्वांना पटले आहे.
 
 
आजच्या युवक-युवतींना, पुढच्या पिढीला तुम्ही व्यायामाबद्दल काय सांगाल? डॉ. ब्रजमोहन- व्यायामासाठी वेळ मिळत नाही, ही तरुण पिढीची तक्रार असते, ती खरी नाही. वेळ काढावा लागतो. आपण सिनेमासाठी वेळ काढतो, पार्ट्यांसाठी वेळ काढतो, मग व्यायामासाठी वेळ कसा मिळत नाही? आहाराबद्दल लोक म्हणतात की आम्हाला कंट्रोलच होत नाही. माझ्या संतुलित आहाराचे महत्त्व आप्तेष्टांना,
 
मित्रपरिवाराला पटविण्यासाठी मला वर्ष-दोन वर्षे लागली. आता कोणी मला आग्रह करतच नाही. आहारात साखर व तेल याचे प्रमाण कमीत कमी ठेवा, म्हणजे वजन कमी होण्यास मदत होते. 15 ऑगस्टच्या भाषणात मोदीजींनी सांगितले की भारताला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न स्थूलतेचा आहे. म्हणून ’घर में तेल आयेगा तो तीस प्रतिशत कम ही आयेगा’, असे मोदीजींनी सांगितले. पंतप्रधान हे सांगतात तेव्हा ते नक्कीच महत्त्वाचे आहे. आपण हेल्दी राहिलो तरच पुढील पिढी निरोगी राहणार आहे.
 
 
डॉ. आरती - दुसरी गोष्ट म्हणजे जीवनशैलीत बदल केले तर असे करा की जे आपण नियमित आचरणात आणू शकू.
 
डॉ. ब्रजमोहन - आताची तरुण पिढी काय करते? एखाद्या डाएटिशिअनकडे जाते. ते आपल्याला असे काही प्रकार सांगतात की आपण एखाद्या लग्नसमारंभात गेलात, फिरायला-प्रवासाला गेलो तर आपल्याला ते सांभाळणे जमत नाही. रोज घरात जे अन्न शिजते, ते खाऊनही वजन आटोक्यात ठेवता येते. बाहेर गेल्यावर काही खावेसे वाटले तर खा, पण थोड्या प्रमाणात खा.
प्रश्न - तुमच्यासारखे अ‍ॅथलीट्स तयार व्हावेत म्हणून तुमचा काही प्लॅन आहे का? काही ठरवले आहे का? तुमच्याकडे बघून शिकणे हे वेगळे!
 
 
डॉ. आरती - आम्ही 2016 मध्ये रनिंग सुरू केलं. पण खरे रनिंग आम्ही गेल्या तीन वर्षांपासून करत आहोत. आता जे नवीन धावक आहेत, त्यांना आम्ही पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन करत आहोत. ज्या चुका आम्ही केल्या, त्या तुम्ही करू नका, असे आम्ही त्यांना सांगत आहोत, जेणेकरून दुखापती न होता, तुम्ही वेगाने पळू शकाल.
 
डॉ. ब्रजमोहन - मी एका अल्ट्रारनरला बोलताना ऐकले होते. जो म्हणाला होता की मृत्यू एकदाच येतो, आयुष्य रोज मिळतं. मी आमच्या स्टाफला शिकविण्याचा प्रयत्न करत आहे की सकस, संतुलित आहार कसा असावा? स्टाफला वारंवार चहा पिण्याची सवय असते. त्यातून किती साखर पोटात जाते. ते शरीराला घातक आहे. आपल्याकडून आहाराबद्दलचा हा चांगला संदेश कुटुंबाला व कुटुंबाकडून समाजापर्यंत जाणार आहे. निरोगी समाज तयार होण्यासाठी अशी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
 
शब्दांकन - नंदिनी सातारकर