फुटीरपणाला न्यायालयाची योग्य चपराक

08 Jan 2026 15:13:25

Lt Kamalesan 
लेफ्टनंट सॅम्युअल कमलेशन नावाच्या सैनिकी अधिकार्‍याने आपल्या रेजिमेंटच्या सर्वधर्मस्थळामध्ये प्रवेश करायला नकार दिला. तेव्हा रेजिमेंटमधले सैनिक चकित झाले. तेव्हा तो म्हणाला की, मी वेगळ्या धर्माचा आहे. वरिष्ठांनी आणि ज्येष्ठ सैनिकांनी त्याला समजावले की, ’तुझा धर्म वेगळा आहे हे मान्य. सैन्यात सर्वच धर्माचा आदर केला जातो. सैन्याची काही शिस्त आहे. परंपरा आणि संकेत आहेत. यानुसार अधिकार्‍याचा वैयक्तिक धर्म कोणताही असला, तरी त्याने आपल्या सैनिकांच्या धार्मिक भावनांना मानले पाहिजे, जपले पाहिजे.’ मात्र आठमुठेपणाने न्यायालयाची पायरी चढणार्‍या कमलेशनला न्यायालयानेच योग्य चपराक लगावली आहे.
आपल्याकडे सर्व कार्यालयांमधून वर्षातून एकदा सत्यनारायणाची महापूजा आवर्जून केली जाते. मग ते कार्यालय, सरकारी, निमसरकारी, खाजगी अगर आणखी कोणात्याही श्रेणीमधले असो. आणि अनुभव असा आहे की, सर्व धर्माचे कर्मचारी-अधिकारी या पूजेमध्ये अगदी आनंदाने सामील होतात. अनेक जण तर शिर्‍याचा प्रसाद खाण्यासाठी वार्षिक पूजेची वाट पाहात असतात.
 
 
पण अनुभव असा आहे की, तांदुळात खडे असावेत तसे या पूजेला ’हिंदबांची पूजा’ (पक्षी: हिंदूंची पूजा) किंवा ’पेगन राईट’ असे संबोधून तिच्यापासून कटाक्षाने लांब राहणारे काही लोकही असतात. आमच्या आस्थापनाच्या कार्यालयात असा एक माणूस होता. कर्मचार्‍यांपैकी कुणीतरी शिर्डीला, पंढरपूरला, तिरुपतीला वगैरे जाऊन येतात. आल्यावर सगळ्या स्टाफला लाह्या, बत्तासे, पेढे किंवा अन्य प्रसाद वाटतात. हे सर्वत्र सतत चालूच असते. पण हा उपरोक्त माणूस, असा प्रसाद घ्यायला नकार देत असे. वार्षिक महापूजेतही तो सामील होत नसे. याचे कारण तो सरळच सांगायची की, आमच्या चर्चच्या प्रमुखाने आम्हाला हे करण्यास मनाई केलेली आहे. ख्रिसमसचा केक मात्र तो सर्वांना देण्यासाठी आवर्जून आणायचा. सगळ्यांनी तो आनंदाने घेतल्यावर तो माणूस हिणवल्यासारखे आम्हाला म्हणायचा, ’मी तुमचा प्रसाद खाणार नाही. तुम्ही मात्र आमचा प्रसाद घेतला. कारण आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. आमचा देव हाच खरा देव आहे. तुमचा देव पेगन (म्हणजे रानटी) आहे.’ हे दोन-तीन वेळा झाल्यावर आमच्यापैकी एकाने हसत-हसत त्याला सुनावले, ’अरे, आम्ही तुझा केकच काय, तुलासुद्धा खाऊन टाकू, नाहीतरी आम्ही रानटीच आहोत ना! आणि मग कशाला राहतोस आमच्या रानटी देशात? जा कुठे तो गोर्‍या साहेबाच्या देशात.’ तेव्हा मात्र त्याचे तोंड वाकडे झाले.
 
 
एकंदर निरीक्षण असे आहे की, ही श्रेष्ठत्वाचा भयंकर अहंकार जास्त करून आपण ज्यांना मँगलोरियन ख्रिश्चन, केरलाईट ख्रिश्चन, इत्यादी नावांनी ओळखतो, अशा लोकांमध्ये जास्त आहे. हे सर्व आता आठवण्याचे कारण म्हणजे सॅम्युअल कमलेशन प्रकरण होय.
 
काय आहे हे सॅम्युअल कमलेशन प्रकरण?
 
 
आता आधी थोडा इतिहास पाहू. इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी व्यापार करण्याच्या मिषाने भारतात आली. व्यापारासोबतच यांनी हळूहळू लहानमोठी राज्ये बळकावयाला सुरुवात केली. राज्याच्या रक्षणासाठी लष्करी ठाणी हवीत आणि लष्करही हवे. तेव्हा मुंबई, मद्रास आणि कलकत्ता ही ठाणी इंग्रजांनी पक्की धरून ठेवली. तसेच भारतातल्याच लढाऊ लोकांना पगार देऊन नोकरीवर ठेवून इंग्रजांनी आपले सैन्य तयार केले. ईस्ट इंडिया कंपनीच्या या भारतीय सैन्यातली जुन्यात जुनी पलटण म्हणजे ’मद्रास रेजिमेंट’ होय. तिची स्थापना 1758 साली झाली.
 
 
पुढे क्रमश: ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य वाढत गेले. तेव्हा जाट, जपून, शीख, मराठा, महार, बलुच, गुरखा, कूर्ग, मद्रास, बंगाल अशा विविध नावांच्या रेजिमेंटस्मध्ये त्या-त्या प्रांतांमधले सैनिक असत. त्यांचे कमांडिंग ऑफिसर्स मात्र कटाक्षाने ब्रिटिशच असत. या पायदळ तुकड्यांसोबतच कॅव्हलरी म्हणजे घोडदळ पथके आणि लान्सर्स म्हणजे भालाईत पथकेही असत. आधुनिक काळात घोडे, भाले, तलवारी इत्यादी बाद झाले. कॅव्हलरी आणि लान्सर्स पथके रणगाडे, चिलखती वाहने, उखळी तोफा, इत्यादी आधुनिक यंत्रांनी सुसज्ज झाली. तरी नावे मात्र तीच राहिली.
 
 
स्वातंत्र्यानंतर ’रॉयल इंडियन आर्मी’चे ’इंडियन आर्मी’मध्ये परिवर्तन घडवून आणण्याचे अत्यंत किचकट, वेळखाऊ काम जनरल के. एम. करिअप्पा यांनी तडफेने पार पाडले. हे करताना त्यांनी व त्यांच्या सहायक अधिकार्‍यांनी असा निर्णय घेतला की, विविध रेजिमेंटस्ना त्यांच्या-त्यांच्या अशा परंपरा आहेत त्या तोडायच्या नाहीत, मोडीत काढायच्या नाहीत. उदा. 5 वी कॅव्हलरी रेजिमेंट आणि 8वी केव्हलरी रेजिमेंट या रणगाडा पथकांनी दुसर्‍या महायुद्धात खूप पराक्रम गाजवला आहे. त्यांना तोडण्याऐवजी एकत्र करून ’3 री कॅव्हलरी रेडिमेट’ हे नाव देण्यात आले. त्यांच्यामधले सैनिक पूर्वीप्रमाणेच, राजपूत, जाट आणि शीख हेच असतील, असे ठरवण्यात आले. यांचे कमांडिंग ऑफिसर्स मात्र अन्य कुणीही म्हणजे कोणत्याही प्रांतातले, कोणत्याही धर्माचे, कोणत्याही भाषेचे असू शकतील, असा निर्णय घेण्यात आला. ब्रिटिशांच्या काळापासूनच सैन्याच्या प्रत्येक रेजिमेंटचे एक सार्वत्रिक धर्मस्थळ असते. तिथे हिंदूंची एखादी देवमूर्ती, ख्रिश्चनांचा क्रॉस, मुसलमानांचे कुराण आणि शीखांचा गुरू ग्रंथसाहिब हे एकत्रच ठेवलेले असतात. रेजिमेंटच्या गरजेनुसार ब्राह्मण, पाद्री, मौलवी इत्यादी लोकांना ठेवले जाते. हे लोकही मुळात सैनिकच असतात. त्यांनाही परेड करणे आणि हत्यारे चालवणे, हे आवश्यक असतेच. शिवाय रेजिमेंटमधल्या सैनिकांना त्यांच्या धार्मिक गरजेनुसार धार्मिक-आध्यात्मिक सल्ला देण्याचेही काम यांच्यावर सोपवलेले असते.
 
 
त्याचप्रमाणे कमांडिंग ऑफिसर स्वतः कोणत्याही धर्माचा, प्रांताचा, भाषेचा असो त्याला आपल्या रेजिमेंटमधल्या सैनिकांची भाषा येणे आणि त्याने सैनिकांच्या धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांमध्ये सामील होणे, हे अत्यावश्यक असते. यामुळे एखाद्या रेजिमेंटच्या सर्वधर्मस्थळावर एखादा पंडित हवन करतो आहे, बाजूलाच मौलवी कुराण पढतो आहे, त्याच्या बाजूला पाद्री प्रेयर करतो आहे, तर ग्रंथी गुरु ग्रंथसाहेबाचा पाठ करतो आहे आणि भिख्खु त्रिपिटक वाचतो आहे, असे दृश्य सहजपणे दिसते.
 
 
आता या खर्‍याखुर्‍या धार्मिक एकात्मतेला लेफ्टनंट सॅम्युअल कमलेशन या दाक्षिणात्य प्रोटेस्टंट ख्रिश्चन अधिकार्‍याने बाध आणला. झाले असे की, 2017 साली सॅम्युअल कमलेशन याची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर निवड झाली. अधिकारी श्रेणीतली पहिली पायरी म्हणजे लेफ्टनंट हे पद. अधिकारी श्रेणीमध्ये लेफ्टनंट - कॅप्टन - मेजर - लेफ्टनंट कर्नल - कर्नल - ब्रिगेडियर - मेजर जनरल - लेफ्टनंट जनरल - जनरल अशी चढती भाजणी आहे. यांनाच कमिशन्ड ऑफिसर्स असेही म्हणतात.
 
 
तर या लेफ्टनंट सॅम्युअल कमलेशनची नेमणूक ’3र्‍या कॅव्हलरी रेजिमेंट’मध्ये झाली. त्याच्याकडे एका कंपनीच्या कमांडिंग ऑफिसरची जबाबदारी सोपवण्यात आली. ’3र्‍या कॅव्हलरी रेजिमेंट’मध्ये राजपूत, जाट आणि शीख सैनिक असतात, हे आधी सांगितले आहेच.
 
 
आता या रेजिमेंटच्या सर्वधर्मस्थळामध्ये फक्त हिंदू देवमूर्ती आणि गुरु ग्रंथसाहेबच होते. कारण तिथे अन्यधर्मीय सैनिक नव्हते. लेफ्टनंट सॅम्युअलने या धर्मस्थळात प्रवेश करायला नकार दिला. तेव्हा रेजिमेंटमधले सैनिक चकित झाले. त्यांनी याबाबत इतर अधिकार्‍यांना सांगितले. इतर अधिकार्‍यांनी या बाबतीत लक्ष घालून सॅम्युअलला विचारले, तेव्हा तो म्हणाला की, मी वेगळ्या धर्माचा आहे.’ वरिष्ठांनी आणि ज्येष्ठ सैनिकांनी त्याला समजावले की, ’तुझा धर्म वेगळा आहे हे मान्य. सैन्यात सर्वच धर्माचा आदर केला जातो. सैन्याची काही शिस्त आहे. परंपरा आणि संकेत आहेत. यानुसार अधिकार्‍याचा वैयक्तिक धर्म कोणताही असला, तरी त्याने आपल्या सैनिकांच्या धार्मिक भावनांना मानले पाहिजे, जपले पाहिजे. सैनिक आणि त्यांचा कमांडिंग ऑफिसर यांच्यात आपलेपणाची भावना असलीच पाहिजे, यासाठी या गोष्टी अत्यावश्यक आहेत.’
 
 
अशा आशयाची समजावणी - काउन्सेलिंग वारंवार करुनही लेफ्टनंट सॅम्युअल हट्ट सोडेना, तेव्हा अखेर चार वर्षांनी म्हणजे 2021 साली सैनिकी प्रशासनाने त्याला सैनिकी सेवेतून काढून टाकले. त्यावर तो पठ्ठ्या न्यायालयात गेला. मी कोणत्या धर्मावर श्रद्धा ठेवायची किंवा न ठेवायची याचे व्यक्तिस्वातंत्र्य मला भारतीय राज्यघटनेने दिले आहे. त्यामुळे माझ्या रेजिमेंटच्या धर्मस्थळात प्रवेश करायचा की नाही, याचे स्वातंत्र्य मला आहे, असा युक्तिवाद त्याने केला.
 
 
नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाने याचा युक्तिवाद अमान्य करीत सैनिकी प्रशासनाची त्याला सैन्यातून काढून टाकण्याची कृती योग्य ठरवली. ’कोणत्या श्रद्धेचा अवलंब करावा किंवा करू नये, याचे स्वातंत्र्य, सर्वच भारतीय नागरिकांना राज्यघटनेने नक्कीच दिलेले आहे. पण तुम्ही जेव्हा एखाद्या संस्थेमध्ये कार्यरत असता, तेव्हा या संस्थेच्या श्रद्धा, परंपरा एक शिस्त म्हणून पाळणे तुम्हाला अनिवार्य आहे, अशा आशयाचे उद्गार न्यायमूर्तींनी काढले.
 
 
त्यावर सॅम्युअल कमलेशन याने ’मी माझ्या शीख सैनिकांनी गुरु ग्रंथसाहेब ठेवलेल्या जागेपर्यंत जायला नकार देत होतो कारण माझ्यामुळे त्यांच्या पावित्र्याचा भंग होऊ नये, अशी माझी भावना होती,’ अशी मखलाशी करून पाहिली. पण न्यायालयाने ती साफ नामंजूर केली.
 
 
लेफ्टनंट सॅम्युअल कमलेशन तेवढ्यावर थांबला नाही. मग त्याने सर्वोच्च न्यायालय गाठले. पण न्यायमूर्तीनी, खटला दाखल करून घेण्याच्या पात्रतेचा नाही, असे म्हणून याचिका फेटाळून लावली.
 
 
न्यायालयाने या उपटसुंभाला योग्य ती चपराक लगावलेली आहे. या देशात जे सौहार्दाचे वातावरण आहे ते अनेक राष्ट्रविघातक प्रवृत्तींना खटकत असते आणि मग जे त्यांच्या भूलथापांना बळी पडून त्यांच्या मोहजालात अडकतात ते या वातावरणाला तडा जावा अशा प्रकारची कृती जाणूनबुजून करत असतात. अन्यथा, इतक्या वर्षांच्या परंपरेशी उभा दावा मांडण्याची कृती कमलेशन याने केलीच नसती. या प्रकरणावरून असा बोध घेतला जावा की, उगीच आपली बेगडी अस्मिता दुखावल्याचा कांगावा करून दुधात मीठाचा खडा टाकण्याची दुर्बुद्धी कुणी करू नये आणि होता होईल तो दुधात खडीसाखर बनून कसे समरस होता येईल याचाच विचार करावा. कारण अंतिमत: ते त्यांच्याच हिताचे असते.
Powered By Sangraha 9.0