मृदुला नाख्ये - व्यावसायिक ते सक्रिय राजकारण.. नवी इनिंग

09 Jan 2026 18:00:37

BJP
राजकारणात चांगल्या लोकांनी आले पाहिजे, त्यातही तरुण, महिला यांचा सहभाग वाढायला पाहिजे, असे सर्वच म्हणत असतात. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही घटकांची संख्या अधिक दिसली. फारसा अनुभव नसला तरी विचारांची बैठक, काम करण्याची उमेद खूप महत्त्वाची असते. महापालिका निवडणुकांमधूनच नवीन नेते तयार होत असतात. सुसंस्कृत व सामान्य घरातून आलेली, स्वतःच्या घरातील व्यवसाय सांभाळणारी स्त्रीही सक्रिय राजकारणात उतरू शकते आणि स्वतःला सिद्ध करू शकते हे मृदुला नाख्ये यांच्या उमेदवारीवरून स्पष्ट दिसते.
समाजकारण आणि राजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राजकारण हे साधन आहे तर समाजकारण हे त्याचे उद्दिष्ट. या दोन्हीचा मेळ साधणे लोकशाहीसाठी आवश्यक आहे. राजकारण हे फक्त सत्तेसाठी नाही तर समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी केले पाहिजे. त्यासाठी समाजातल्या चांगल्या लोकांनी राजकारणात यायला हवे हे आपण कायम ऐकतो. आज चांगल्या लोकांची समाजाला आणि राजकारणाला गरज आहे. सध्या सर्वत्र महापालिका निवडणुकांची चर्चा आहे. एकतर तब्बल नऊ वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने सगळीकडे उमेदवारीसाठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अनेक नेत्यांनी आपल्याच घरात उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. एकंदर गोंधळ आपल्याला दिसत असला तरी, लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की, अनेक ठिकाणी राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी समाजसेवेची पार्श्वभूमी असलेल्या काही चांगल्या लोकांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यातील एक नाव म्हणजे मृदुला उमेश नाख्ये. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत डोंबिवली पश्चिममधून प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे.
 
डोंबिवलीत राहणार्‍या मृदुला या चारचौघींसारखं आयुष्य जगणार्‍या साध्यासरळ गृहिणी. राजकारणाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी मृदुलाताईंना समाजसेवेचे बाळकडू बालपणापासून मिळाले आहे. त्यांचे वडील श्रीकांत तांबवेकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून आई योगिता या कारसेवक म्हणून रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनात सहभागी होत्या. वडील स्वयंसेवक असल्याने संघाचे अनेक स्वयंसेवक, पदाधिकारी, प्रचारक घरी यायचे. त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा कायम कानावर पडायच्या. मृदुला यांनीही काही वर्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम केले आहे. संघाच्या विचारांशी व समाजसेवेशी त्यांचा पहिल्यापासून जवळून परिचय आहे.
 
डोंबिवलीतील प्रसिद्ध नाख्ये परिवारात मृदुलाताई लग्न होऊन आल्या. नाख्ये परिवार हा डोंबिवलीतील प्रसिद्ध उद्योजक परिवार. मृदुला नाख्ये यांचे सासरे केशव नाख्ये यांना सगळे आप्पा म्हणून ओळखतात. चुलत सासरे सखाराम नाख्ये (मामूकाका या नावाने सुपरिचित) आणि अशोक नाख्ये हे प्रसिद्ध व्यावसायिक. डोंबिवलीतील समाजकार्यात त्यांचा मोठा सहभाग असायचा. डोंबिवलीतील गरजू लोकांसाठी अनेक आजारांवर केशव (आप्पा) नाख्ये मोफत औषध द्यायचे. डोंबिवलीतील प्रसिद्ध एव्हरेस्ट हॉलची मॅनेजमेंट पाहायचे. मृदुला नाख्ये यांचे पती उमेश नाख्ये यांचाही अनेक वर्षांपासून डोंबिवलीत केटरिंगचा व्यवसाय आहे. लग्नानंतर मृदुलाताई घरच्या केटरिंगच्या व्यवसायात उतरल्या. लॉकडाऊन काळातही मृदुलाताईंनी टिफिन सर्व्हिस सुरू ठेवली होती. माहेरच्या संघ वातावरणामुळे आणि सासरच्या व्यवसायामुळे त्यांचा डोंबिवलीत जनसंपर्कही उत्तम आहे.
 

BJP
 
आपण राजकारणात कधी येऊ असे वाटले नव्हते पण आज ती संधी मिळाली, पक्षाने विश्वास दाखवला. राजकारणापेक्षा समाजसेवा मोठी या विचारात वाढले असल्याने आणि सासरीही तेच वातावरण असल्याने समाजसेवेच्या व्रताचा तोच वारसा मी नगरसेवक म्हणून निवडून आले तर पुढे चालवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
आज समाजात वेगवेगळ्या समस्या आढळतात. त्यामुळे संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे काम मी करत आहे. शाळाशाळांमध्ये जाऊन आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो. रामायण, महाभारत, क्रांतीगाथा आणि संतकथा मुलांपर्यंत पोहोचवतो. लहान मुलांसाठी चित्रकला, वक्तृत्व, नाटुकली अशा स्पर्धांचे आयोजन करतो. आपली हिंदू संस्कृती लहान वयापासूनच गोष्टी स्वरूपात मुलांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आज त्याची गरज आहे म्हणून आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम घेतो. त्याचबरोबर प्रभागात पाण्याची आणि खड्डयांची खूप समस्या आहे. त्या समस्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. प्रभागातील प्रत्येक घटकाची समस्या सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत याची जाणीव ठेवूनच मी उभी राहण्याचा निर्णय घेतला, असे मत मृदुला नाख्ये यांनी व्यक्त केले.
 
कुटुंबाच्या पाठिंब्याविषयी बोलताना मृदुलाताई म्हणाल्या, राजकारण म्हणजे 24 तासांची ड्युटी. लोकांच्या सेवेसाठी तुम्हाला कायम तत्पर राहावे लागते. अशावेळी घर, व्यवसाय सांभाळून निवडणुकीच्या रिंगणात उतरणे माझ्यासाठी अवघड होते. पण संपूर्ण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे ते सहज शक्य झाले. माझे पती उमेश नाख्ये व्यवसाय सांभाळून पूर्णपणे माझ्याबरोबर खंबीरपणे उभे आहेत. दीर, जाऊ, नणंद यांचीही उत्तम साथ आहे. संपूर्ण कुटुंबाची भक्कम साथ आहे म्हणूनच मी हा निर्णय घेऊ शकले. उमेदवारी मिळणे ही पहिली पायरी आहे. पुढे निवडून आली तरी कुटुंबाची साथ असल्याने ही जबाबदारी पेलणे शक्य होईल हा विश्वास आहे. प्रचारासाठी गेल्यावर लोकांचा सुद्धा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतो, आपुलकी, प्रेम अनुभवायला मिळत आहे. हे सुद्धा माझे कुटुंबच आहे. निवडून आल्यावर माझ्या याच कुटुंबासाठी मला चांगले काम करायचे आहे.
 
राजकारणात चांगल्या लोकांनी आले पाहिजे, त्यातही तरुण, महिला यांचा सहभाग वाढायला पाहिजे. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही घटकांची संख्या अधिक दिसली. अनुभव नसला तरी विचारांची बैठक, काम करण्याची उमेद खूप महत्त्वाची असते. महापालिका निवडणुकांमधूनच नवीन नेते तयार होत असतात. सुसंस्कृत सामान्य घरातून आलेली, स्वतःच्या घरातील व्यवसाय सांभाळणारी स्त्रीही सक्रिय राजकारणात उतरू शकते आणि स्वतःला सिद्ध करू शकते हे मृदुला नाख्ये यांच्या उमेदवारीवरून स्पष्ट दिसते.
शब्दांकन - बागेश्री पारनेरकर
Powered By Sangraha 9.0