‘शिल्पसंवाद’ या पाक्षिक सदरात आपण भारतभरातील प्राचीन मंदिरांमधील काही निवडक मूर्ती आणि शिल्पे समजून घेणार आहोत. शैव, वैष्णव, शाक्त आगमग्रंथ, शिल्पशास्त्र, पुराणे आणि प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य परंपरा यांचा आधार घेऊन ह्या शिल्पांचा, ह्या मूर्तींचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. श्रद्धेला ज्ञानाची जोड, दर्शनाला दृष्टीची खोली, आणि कलेला अर्थाचा आधार देऊन दगडात कोरलेल्या समृद्ध भारतीय शिल्पपरंपरेशी संवाद सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे.
बरेचदा आपण जेव्हा एखाद्या प्राचीन मंदिरात जातो तेव्हा गाभार्यातल्या देवापुढे हात जोडतो, त्याचे दर्शन घेतो. पण त्या मंदिरावर कोरलेल्या शिल्पांकडे, आतल्या मूर्तींकडे लक्षपूर्वक कितीदा पाहतो? मूर्तींपुढे आपण नतमस्तक होतो, क्वचित कधी एखाद्या मूर्तीपुढे थबकतो, बरेचदा नमस्कार करून पुढे निघून जातो. पण त्या मूर्ती, ती शिल्पे आपल्याशी बोलू पाहतायत, हजारो वर्षांपूर्वी ह्या मूर्ती ज्यांनी कोरल्या ते अनाम शिल्पकार त्या मूर्तींद्वारा आपल्याशी आजही संवाद साधू इच्छितात. ‘शिल्पसंवाद’ हे या अंकापासून सुरू होणारे पाक्षिक सदर. या पाक्षिक सदरातून त्या मूर्तींचा, त्या शिल्पांचा मौनसंवाद तुमच्यापर्यंत पोचवण्याचा एक छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न होणार आहे.
भारताच्या मंदिरांमधील शिल्पे आणि मूर्ती ह्या केवळ दगडात कोरलेल्या देवप्रतिमा नाहीत तर भारतीय तत्त्वज्ञानाची दृश्य भाषा आहेत. विविध आगमग्रंथ, शिल्पशास्त्र, परंपरा, आणि शेकडो वर्षांची भारतीय संस्कृतीची वाटचाल आपल्याला भारतभरातल्या ह्या शिल्पांतून, मूर्तींमधून गोठवलेली दिसते. ह्या शिल्पांच्या विषयवस्तू असलेल्या पुराणातल्या कथा, मूर्तींची ठेवण, हातांच्या मुद्रा, आयुधे, उभे राहण्याची ठेवण, मुखावरील भाव, त्यांची वाहने, मंदिरावरची त्या त्या मूर्तीची जागा, त्यांच्या अंगावरचे वस्त्रालंकार, ह्यातले काहीही ‘मनात आले, कोरून काढले’ अशा प्रकारचे नाही. प्रत्येक मूर्तीमागे एक तत्त्वज्ञान आहे, प्रत्येक शिल्पपट्टाला एक निश्चित अर्थ आहे.
हिंदू मंदिर स्थापत्यावरील एक आद्य संदर्भ ग्रंथ मानल्या जाणार्या ‘दि हिंदू टेंपल’ ह्या ग्रंथात ग्रंथलेखिका स्टेला क्रॅमरिश म्हणतात की, ‘हिंदू मंदिरात जे काही दिसते, त्यातील एकही तपशील अपघाताने आलेला किंवा अनावश्यक असा नाही. प्रत्येक घटकाला त्याचे निश्चित स्थान आहे आणि तो मंदिराच्या संपूर्ण रचनेचा अविभाज्य भाग आहे. हिंदू मंदिर म्हणजे शास्त्रग्रंथांमधल्या मूलकथेच्या आधारावर रचलेल्या स्थापत्यविधींचा एकत्रित परिणाम आहे.’
शिल्पसंवाद या पाक्षिक सदरात आपण भारतभरातील प्राचीन मंदिरांमधील काही निवडक मूर्ती आणि शिल्पे समजून घेणार आहोत. शैव, वैष्णव, शाक्त आगमग्रंथ, शिल्पशास्त्र, पुराणे आणि प्राचीन भारतीय मंदिर स्थापत्य परंपरा यांचा आधार घेऊन ह्या शिल्पांचा, ह्या मूर्तींचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. श्रद्धेला ज्ञानाची जोड, दर्शनाला दृष्टीची खोली, आणि कलेला अर्थाचा आधार देऊन दगडात कोरलेल्या समृद्ध भारतीय शिल्पपरंपरेशी संवाद सुरू करण्याचा हा प्रयत्न आहे.
ह्या मूर्ती, ही शिल्पे शांत आहेत, मूक आहेत, पण त्या मौनात खूप काही दडलेले आहे. मूर्तिपूजा हे हिंदू उपासना पद्धतीचे एक अत्यंत सूक्ष्म, पण खोलवर रुजलेले वैशिष्ट्य आहे. मूर्तिशास्त्र ही अमूर्त तत्त्वज्ञानाला मूर्त करणारी दृश्य भाषा आहे. ही भाषा फक्त हिंदुधर्मापुरती मर्यादित नाही. जैन व बौद्ध परंपरेतल्या तीर्थंकर व बुद्ध यांच्या मूर्ती, शीख परंपरेतली गुरूंची चित्रे व गुरु ग्रंथसाहिबाला दिलेला प्रतीकात्मक मान हे सिद्ध करतो की, भारतीय आध्यात्मिक दृष्टीमध्ये मूर्तिपूजेला अनन्यसाधारण स्थान आहे. इतकेच नव्हे तर मूर्तिपूजा न मानण्याचा दावा करणार्या धर्मांमध्येही अमूर्त तत्त्वांना प्रतीकांच्या स्वरूपात का होईना पण मूर्त रूप देण्याचा प्रयत्न झालेला आहे. ख्रिस्ती धर्मातील क्रूस, ख्रिस्त व मेरीच्या मूर्ती, इस्लाममधले मक्केला जाऊन काब्याला प्रदक्षिणा घालणे आणि तिथल्या भिंतीत बसवलेल्या एका विवक्षित दगडापुढे नतमस्तक होणे ह्या पूजापद्धतीदेखील एका मूर्त प्रतीकाभोवती फिरणार्या दृश्यमान भक्तीचीच रूपे आहेत.
फरक इतकाच आहे की, हिंदू धर्मात ही प्रतीकात्मकता अत्यंत स्पष्टपणे, आणि मूळ तत्त्वज्ञानाच्या गाभ्याशी प्रामाणिक राहून मांडली गेली आहे. शास्त्रांमध्ये असे म्हटलेय की निर्गुण, निराकार ब्रह्म ही संकल्पना सामान्य उपासकांना समजायला कठीण जात असल्याने त्यांच्यासाठी सगुण, साकार रूपांची उपासना सांगितली गेली. ही संकल्पना स्पष्ट करताना राम तापनीय उपनिषद अत्यंत नेमके शब्द वापरते;
‘चिन्मयस्याद्वितीयस्य निष्कलस्याशरीरिणः ।
उपासकानां कार्यार्थं ब्रह्मणो रूपकल्पना ॥’
परब्रह्म हे चिन्मय, अद्वितीय, निष्कल आणि शरीरातीत आहे; पण उपासकांच्या साधनेसाठी त्याची रूपकल्पना केली जाते. म्हणजेच मूर्तिपूजा ही अमूर्त संकल्पनांना इंद्रियगोचर करण्याची एक शास्त्रसंमत उपासना पद्धती आहे. सामान्य मानवी बुद्धी तत्त्वज्ञानात सांगितलेल्या अमूर्त तत्त्वांना थेट कवेत पकडू शकत नाही; म्हणूनच दर्शन, रूप, प्रतीक आणि विधी यांच्या माध्यमातून आपण ही तत्त्वे समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतो.
मूर्ती किंवा शिल्पे म्हणजे ईश्वर नाहीत, पण ईश्वरतत्त्वाकडे नेणारी बोधचिन्हे आहेत. मुख, मुद्रा, आयुध, दिशा, आसन, वस्त्रालंकार, विषयवस्तू हे सारे शिल्पांचे वा मूर्तींचे घटक योगायोगाने नाही, तर आगम, शिल्पशास्त्र आणि दर्शन यांच्या आधारे ठरवलेले आहेत. म्हणूनच हिंदू मंदिरातील मूर्ती व शिल्पे ही केवळ श्रद्धेचा विषय न राहता, ज्ञान, साधना आणि तत्त्वचिंतन यांचा एकत्रित आविष्कार ठरतात. या ठिकाणी मूर्तिशास्त्राचा थोडा इतिहास समजून घेणे आवश्यक ठरते. कारण मूर्ती किंवा शिल्प ही केवळ कलावंताची कविकल्पना नसून, ती एका शास्त्रबद्ध परंपरेतून जन्मलेली संरचना आहे. भारतात मूर्तिशास्त्राची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. वेदकाळातच प्रतिमा, प्रतिमा-विधान, प्रतिष्ठा यांसारख्या संकल्पना अस्तित्वात होत्या. पुढे ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे आणि नंतर पुराणे व आगमग्रंथ यांमधून मूर्तिपूजेची तत्त्वमीमांसा अधिकाधिक स्पष्ट होत गेली.
मूर्तिशास्त्राचा सुसंगत विकास आपल्याला पुढे विशेषतः आगम परंपरेत झालेला दिसतो. शैव, वैष्णव आणि शाक्त आगमांमध्ये वेगवेगळ्या मूर्ती बनवताना त्यांचे प्रमाण, मापन, अंगसंरचना, मुद्रा, आयुधे, भाव, आसन, दिशा, प्रयोजन आणि परिणाम या सर्व गोष्टी अत्यंत तपशीलवारपणे सांगितल्या आहेत. कामिकागम, सुप्रभेदागम, अंशुमद्भेदागम, करनागम, विहारागम यांसारखे शैव आगम; तसेच पाञ्चरात्र आणि वैखानस परंपरेतील वैष्णव आगम हे सर्व ग्रंथ भारतीय मूर्तिशास्त्राचे मूलाधार आहेत. याखेरीज मयमतम्, मानसार, शिल्परत्न, विश्वकर्मप्रकाश यांसारखे निखळ शिल्पशास्त्रीय ग्रंथ मंदिर स्थापत्य, शिल्पकला आणि मूर्तिनिर्मितीची संपूर्ण शास्त्रीय चौकट मांडतात.
या ग्रंथांमधील एक महत्त्वाचा मुद्दा असा की मूर्ती ह्या प्रत्यक्ष देवता स्वरूप नसून त्या त्या देवतेचे अधिष्ठान आहेत.
प्राणप्रतिष्ठाविधीपूर्वी मूर्ती ही फक्त दगड किंवा धातू असते पण प्राणप्रतिष्ठेनंतर ती त्या त्या देवतत्त्वाच्या उपस्थितीचे स्थान बनते हा विचार आगमांमध्ये स्पष्टपणे मांडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक मूर्तीचा प्रत्येक अवयव, प्रत्येक रेषा, प्रत्येक भाव हा अर्थवाही असतो. उदाहरणार्थ, डोळ्यांची उघडण्याची पद्धत, हातातील आयुधांचे स्थान, पायांची ठेवण, उभे राहण्याची, बसण्याची ढब, हातांच्या मुद्रा या सगळ्यांचे तात्त्विक अर्थ निश्चित केलेले आहेत.
गुप्तकाळात भारतीय मूर्तिशास्त्राला आणि शिल्पकलेला एक अभिजात स्वरूप आले, जे पुढे गुर्जर प्रतिहार, सोमवंशी चांदेल, बंगालचे पाल, ओडिशाचे कलिंग राजघराणे ह्यांच्या काळात बहरत गेले. पुढे दक्षिण भारतातल्या चालुक्य, पल्लव, राष्ट्रकूट, चोल ह्या विविध राजवंशाच्या काळात मूर्तिशास्त्र आणि मंदिर स्थापत्य अधिकाधिक प्रगत होते गेले आणि शिल्पकलेच्या वेगवेगळ्या स्थानिक शैली निर्माण झाल्या. दुर्दैवाने उत्तर भारतात इस्लामी आक्रमणानंतर मोठ्या प्रमाणात हिंदू, जैन आणि बौद्ध मंदिरे उद्ध्वस्त केली गेली, त्यात मूर्ती आणि शिल्पांचे खूप नुकसान झाले. पण दक्षिण भारतात मात्र सुदैवाने आगमाधिष्ठित मंदिरपरंपरा अखंड चालू राहिली. मूर्ती, मंदिरे बनत राहिली त्यामुळे दक्षिणेकडील प्राचीन मंदिरांमध्ये आढळणारी मूर्तिभाषा ही केवळ ऐतिहासिक अवशेष नसून आजही जिवंत असलेली एक अखंड, प्रवाही परंपरा आहे.
भारतीय मूर्तिशास्त्राचा प्रवास समजून घेताना एक समजून घेतले पाहिजे की भारतीय कलाविचार कधीही सार्वत्रिक एकसारखेपणावर भर देत नाही, मग ती कला संगीत असो, नृत्य असो, चित्रकला असो वा शिल्पकला. स्थान, काळ, परंपरा, उपासना पद्धती यानुसार रूपभेद हे भारतात नेहमीच मान्य केले गेले आहेत. म्हणूनच एकाच देवतेची मूर्ती उत्तर भारतात वेगळी दिसते, दक्षिणेत वेगळी दिसते, पूर्वेकडे वेगळी दिसते आणि पश्चिम भारतात वेगळी, पण त्या मूर्तीमागचे तत्त्व व धर्मविचार एकच असतो. हाच भारतीय सौंदर्यशास्त्राचा गाभा आहे, एक तत्त्व, अनेक रूपे.
म्हणूनच मंदिरातील मूर्तींकडे व शिल्पांकडे पाहताना त्या केवळ रंजनासाठी किंवा उपासनेसाठी घडवलेल्या कलाकृती म्हणून न बघता, त्या मागची शास्त्रपरंपरा, तत्त्वज्ञान आणि साधनेची सलग परंपरा लक्षात घेतली, तर आपली मूर्तींकडे, शिल्पांकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. मग आपण फक्त एका मूर्तीपुढे नतमस्तक होत नाही, तर आपण एका अखंड बौद्धिक आणि आध्यात्मिक परंपरेसमोर नतमस्तक होतो. शिल्पसंवाद ह्या पाक्षिक सदरातून मी मूर्तींकडे बघायचा हाच बदललेला दृष्टीकोन देण्याचा प्रयत्न करणार आहे. हजारो वर्षांपासून अनेक अनाम शिल्पकारांनी दगडात कोरून ठेवलेली भारतीय शिल्पे आणि मूर्ती वरकरणी मौन वाटतात, पण ज्याला ऐकायचे आहे, त्याच्याशी ही शिल्पे, ह्या मूर्ती अजूनही बोलू इच्छितात, फक्त हा शिल्पसंवाद ऐकायची आपली तयारी मात्र पाहिजे!