साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन उत्साहात संपन्न

विवेक मराठी    12-Oct-2026
Total Views |
dombivali 
 
“मायमराठी म्हणजे आपली अस्मिता, ओळख आणि अभिमान” - रविंद्र चव्हाण

साहित्यनगरी डोंबिवलीत अकरावे नांदी संमेलन उत्साहात संपन्न
डोंबिवली : ‘’अमृतातेही पैजा जिंकणारी मायमराठी ही आपली अस्मिता, ओळख आणि अभिमान आहे. हे संमेलन म्हणजे साहित्य, तंत्रज्ञान आणि नव्या पिढीच्या विचारविश्वाला जोडणारा संवादमंच आहे,” असे मत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.
 
 
सांस्कृतिक आणि साहित्यनगरी अशी ओळख असणार्‍या डोंबिवलीत अकरावे ‘नांदी संमेलन’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण हे नांदी संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. या संमेलनात ‘माहिती तंत्रज्ञान, एआय आणि साहित्य’ या विषयावर आधारित चर्चासत्रे आणि परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या नांदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ए.आय.मुळे बदलते दैनंदिन जीवन, करिअरच्या संधी आणि रोजगारविश्वावर या संमेलनात महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. तसेच तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषा-साहित्याच्या स्थानावर मान्यवरांचे मंथन यशस्वीरित्या पार पडले. यावेळी डोंबिवलीकर साहित्यप्रेमी, युवा वर्ग आणि नागरिकांचा नांदी संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 
 
या प्रसंगी समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, साहित्यिक अरुण शेवते, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, माधव जोशी, प्रा.डॉ. विनय भोळे, महाराष्ट्र साहित्य परिषद डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. धनश्री साने, डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे, कल्याण-डोंबिवलीचे उपमहापौर राहुल दामले, भाजपा जिल्हाध्यक्ष नंदू परब, गटनेते शशिकांत कांबळे, खूशबू चौधरी, दिपाली काळे, यासह साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.