@ज्योत्स्ना शशिकांत सरदेशमुख
9552529433
बालपणी भावाच्या शाखेपासून सुरू झालेला संघाचा परिचय विवाहानंतर पतीच्या कार्यातून अधिक दृढ झाला. प्रचारकांच्या सहवासातून घर संघकार्याशी जोडले गेले आणि त्याच संस्कारातून मुलांच्या आयुष्याची वाटचाल घडत गेली. आज पुढची पिढीही व्यवसाय, कुटुंब आणि सामाजिक जबाबदार्या सांभाळत संघकार्याशी जोडलेली आहे.
’जिवेत् शरदः शतम्’ याप्रमाणे खरोखरच संघाला आता शंभर वर्षे पूर्ण झाली आणि त्यानिमित्ताने मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळत आहे. माझा जन्म धाराशिव जिल्ह्यातील भूम या गावी झाला. माझा मोठा भाऊ संघाच्या शाखेत जात असे. खाकी चड्डी, पांढर्या बाह्या, मुडपलेला शर्ट, काळी टोपी व हातात दंड घेऊन तो निघाला की, मला उगाच त्याचा अभिमान वाटायचा. त्याच्यासोबत अनेकदा प्रचारक व इतर स्वयंसेवक घरी यायचे. ते सर्व एकत्र आले की, त्यांचे संभाषण, चर्चा ऐकून त्यातून बर्याच गोष्टी समजत व उमगत होत्या.
लग्नानंतर मात्र या गोष्टीला चांगलेच खतपाणी मिळाले, कारण माझ्या सासरी म्हणजेच परंडा या गावी आल्यानंतर माझे पती शशिकांत सरदेशमुख हे लहानपणापासूनचे स्वयंसेवक असल्याचे मला समजले. सरकारी नोकरी असूनसुद्धा त्यांनी हे काम थांबू दिले नाही.
येणार्या प्रचारकाची, विस्तारकाची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आमच्याकडेच केली जात असे आणि मला ह्या गोष्टीची जाणीव होती की, संघाचे प्रचारक हे स्वतःचे घरदार, प्रपंच या सर्वाचा त्याग करून केवळ देशसेवा, समाजसेवा, धर्मरक्षण यासाठी बाहेर पडले आहेत. आणि त्यातूनच मला एक गोष्ट लक्षात आली की, केवळ पुरुषांनी संघकाम न करता घरच्या महिलांनी यात सहभाग घेतला पाहिजे. त्यातूनच आपल्या मुलांवरही तेच संस्कार होतात. आपले आचार विचार बदलतात. देशाभिमान जागृत होतो. प्रामाणिकपणा, समर्पण, खर्या-खोट्याची जाण, निःस्वार्थ सेवा अशा अनेक गोष्टी शिकावयास मिळतात.
या सर्व गोष्टींचा विचार करूनच आम्ही आमच्या मुलाला (स्वप्नील) लहानपणापासूनच शाखेत पाठवण्यास सुरुवात केली. तिसरीत असल्यापासूनच शाखेच्या शिबिराला पाठवत होतो. हळूहळू करत आमचे घरच जणू संघाचे झाले. येणारे प्रचारक विस्तारक किंवा कार्यकारिणी सभासद यांचे वरचेवर आमच्याकडे येणे होत असल्याने माझी लहान मुलगी डॉ.स्मिताही त्यातूनच घडत गेली.
पण हे सगळे होत असताना एक खंत होती ती म्हणजे आमच्या गावात मात्र समितीची (महिलांची) शाखा भरत नव्हती; पण त्यानंतर जेव्हा आम्ही सोलापूर, जिल्ह्यातील बार्शी या गावी मुलांच्या शिक्षणासाठी शिफ्ट झालो तेव्हापासून आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ लागल्या. मग तेथे राष्ट्र सेविका समितीची शाखा घेणे, प्रचारिका बोलावून त्याप्रमाणे मार्गदर्शन घेणे, शिबिर घेणे, मुलीला शिबिराला आणि वर्गाला पाठविणे या गोष्टी घडत गेल्या.
त्याच दरम्यान नागपूरला 2005मध्ये अखिल भारतीय महिला समितीचे शिबिर झाले. त्या शिबिराला जाण्याची संधी मिळाली. तीन दिवसीय शिबिराची व्यवस्था, मोठ्या मोठ्या व्यक्तीचे बौद्धिक, योगासने अशा अनेक गोष्टी बघून मी तर भारावूनच गेले. आल्यानंतर मला खूप गोष्टी नव्याने गवसल्या. ...म्हणजे मी मला नव्याने गवसले. या सर्वांमधूनच माझी मुले घडत गेली.
पुढे मुलांची शिक्षणे झाली. मोठा मुलगा स्वप्नील इंजिनियर झाला. तो सध्या पुण्यातील एका मोठ्या कंपनीत कार्यरत आहे. मुलगी स्मिता डॉक्टर झाली आहे. ती सध्या पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करते. माझी दोन्ही मुले आपापल्या व्यवसायात कमालीची बिझी असूनही त्यांनी अजूनही संघाची साथ सोडली नाही. मुलगा नियमितपणे व्यावसायिक शाखेत जातो. संचलन व संघाचे सर्व उत्सव यामध्ये त्याचा विशेष सहभाग असतो. त्याचेच फळ म्हणजे तो सध्या पुण्यासारख्या ठिकाणी भाग कार्यकारणी (जिल्हा कार्यकारणी) सदस्य म्हणून कार्यरत आहे.
विशेष म्हणजे माझी सून अनुजा ही नांदेडची असून ती भारतरत्न नानाजी देशमुख यांची पणती आहे. त्यामुळे या कार्यात तिचाही खूप मोठा वाटा आहे. तिची माझ्या मुलाला संघ कार्यासाठी पूर्णपणे साथ असते.
माझी मुलगी स्मिता डॉक्टर असूनसुद्धा स्वतःचा व्यवसाय सांभाळून तिच्या मुलींसह शाखेत जाते. संघाच्या विविध उत्सवात सहभागी होते.
या निमित्ताने मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. कोरोना काळामध्ये आम्ही पुण्यात राहत असताना जे विद्यार्थी गावी न जाता पुण्यात अडकून पडले होते अशा विद्यार्थ्यांना दोन्ही वेळचा जेवणाचा डबा देण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. मला शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, आपल्याला आपली मुले सुसंस्कारी, बलशाली, प्रामाणिक घडवायची असतील तर प्रत्येक पालकांनी मुलांना संघ शाखेत पाठवलेच पाहिजे. मग बघा भावी पिढी अगदी सर्वगुण संपन्न घडेल.