मी ते वसुधैव कुटुंबकम् यातील सत्याचा शोध

विवेक मराठी    04-Oct-2026   
Total Views |
 
Truth
मी, आपण आणि आपले विश्व यांच्यात सुसंवाद करण्याच्या प्रयत्नात आपल्या विश्वाबाहेरील जगाविरोधात द्वेष निर्माण केला जात आहे. आपल्या समाजाला आत्मचिंतन करायला भाग पाडण्यापेक्षा इतर जगाला दोषी ठरवून प्रतिक्रियात्मक अस्मितावाद जागा करणे अधिक सोपे बनले आहे. यातून जगभर आक्रमक, प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादाचा प्रभाव वाढत आहे आणि त्यात व्यक्तिगत विवेकबुद्धीचा बळी जात आहे. त्यामुळे समूहमनाचा वाढता आदर्शवाद हा एका बाजूला व्यक्तिगत विवेकबुद्धीचा बळी देत आहे आणि दुसर्‍या बाजूला जागतिक शांततेला धोका निर्माण करीत आहे.
गेल्या काही वर्षांपासून, मुख्यतः 2014 साली सत्तांतर झाल्यापासून ‘वसुधैव कुटुंबकम्‘ या संकल्पनेवर गांभीर्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. आज जग अभूतपूर्व अशा संघर्षांच्या कोंडीत सापडले आहे आणि भारतही चीन, पाकिस्तान, बांगला देश आणि आता हळूहळू नेपाळही आपल्याशी संघर्षाच्या भूमिकेत आहेत. यात चीनशी प्राचीन काळात आपले सांस्कृतिक नाते होते आणि पाकिस्तान, बांगला देश 15 ऑगस्ट 1947 पर्यंत अखंड भारताचा एक भाग होते आणि अगदी काही वर्षांपर्यंत नेपाळला आपल्या सांस्कृतिक परंपरेचा एक भाग मानत होतो. परंतु आज स्थिती बदलली आहे. या पार्श्वभूमीवर ‘वसुधैव कुटुंबकम्‘ ही संकल्पना, त्यापुढील आव्हाने आणि त्यांची कारणमीमांसा यावर काही मूलभूत विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
 
हिंदू संस्कृतीचे अधिष्ठान
 
आठ-दहा हजार वर्षांपूर्वी मानवी संस्कृतीच्या प्रारंभकाळात जेव्हा इतर सर्व संस्कृती नैसर्गिक संकटांपासून स्वत:ला वाचविण्याकरिता निसर्गपूजनाचे विविध मार्ग शोधत होत्या आणि त्यांचे सामाजिक जीवन त्यांच्या टोळीजीवनापर्यंत मर्यादित होते, तेव्हा दार्शनिक हिंदू ऋषींनी आपल्या अंत:प्रज्ञेच्या बळावर तीन क्रांतिकारी संकल्पना मांडल्या. विश्वातील चल आणि अचल या सर्व गोष्टी विशिष्ट नियमांनी नियमित झालेल्या आहेत आणि त्याचे आकलन माणसाला करून घेणे शक्य आहे. या संकल्पनेला त्यांनी ‘ऋत‘ हे नाव दिले. तेव्हा जगाचा भूगोल केवढा होता, कसा होता, किती लोक, कसे राहत होते याची त्यांना किती कल्पना होती हे माहिती नाही. परंतु सर्व जग एका कुटुंबाप्रमाणे आहे असा आत्मानुभव त्यांनी घेतला आणि त्याला ‘वसुधैव कुटुंबकम‘ हे नाव दिले. माणसाने चित्तशुद्धी केली आणि सत्यशोधनाच्या प्रेरणेतून साधना केली तर या दोन्हीची अनुभूती येऊ शकते हे ध्येय त्यांनी सर्वांसमोर ठेवले. या सत्याच्या अनुभूतीचे वेगवेगळे मार्ग असू शकतात याही सत्याचा त्यांनी अनुभव घेतला. त्यामुळे ‘ऋत‘,‘वसुधैव कुटुंबकम्‘ आणि ‘साधनानाम अनेकता‘ हे तीन आपल्या संस्कृतीचे मूलभूत सिद्धांत आहेत.
 
 
संस्कृतीतील विविधता
 
सर्व मानवजातीच्या संस्कृतींचा जसजसा विकास होऊ लागला तसतसे भौतिक साधनांचा विकास होऊ लागला आणि विविध संस्कृती एकमेकांच्या संपर्कात येऊ लागल्या. हिंदू संस्कृतीच्या ‘ऋत‘,‘वसुधैव कुटुंबकम्‘ आणि ‘साधनानाम अनेकता‘ या संकल्पना मांडल्या त्याच संकल्पना वेगवेगवेळ्या स्वरूपात विविध संस्कृतींत आविष्कृत झाल्या. परंतु, या संकल्पना हिंदू संस्कृतीत अंतःप्रज्ञेच्या द्वारे एकात्म आणि समग्र स्वरुपात साक्षात्काराच्या रूपाने प्रकट झाल्या. मात्र, अन्य संस्कृतींमध्ये असा वारसा नसल्याने मानवी आकलनाच्या, बुद्धिच्या कक्षेत येतील अशा छोट्या छोट्या पावलांनी त्यांची वाटचाल झाली. या संकल्पना हिंदू संस्कृतीत विचारसृष्टीच्या आधारशीला होऊन राहिल्या, परंतु अन्य संस्कृतींनी जी वाटचाल केली त्यात या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आणल्या गेल्या. उदाहरणार्थ, विश्व नियम शोधण्याची प्रक्रिया विज्ञानाच्या द्वारे सुरू झाली आणि कारण व परिणाम यांच्या साखळीतून विज्ञानाचा जन्म झाला. ’वसुधैव कुटुंबकम्’सदृश प्रयत्न काही जणांनी साम्राज्याच्या रूपाने केले. यात काही साम्राज्यवादी शक्तींनी राजसत्तेच्या बळावर जग एका राजवटीखाली आणण्याचा प्रयत्न केला. ऐहिकापलिकडल्या मानवी जीवनाचे शोध घेणारे अनेक धर्म, संप्रदाय निर्माण झाले. त्यातील ख्रिश्चन आणि इस्लामने धर्माच्या आधारे जग एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. विज्ञानातून विकसित झालेल्या तर्कप्रज्ञेचा व्यावहारिक जीवनात उपयोग करून आधुनिक पाश्चात्य इहवादी तत्त्वज्ञान निर्माण झाले आणि त्यातून त्याच्या उदारमतवादी, लोकशाही आणि कम्युनिझम या संकल्पनांनी विसाव्या शतकातील जग प्रभावित केले. त्यातून विश्वशांती निर्माण करण्यासाठी युनो आणि अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांची निर्मिती झाली. स्वातंत्र्यानंतर भारताने शांततामय सहजीवनासाठी पंचशील ही संकल्पना मांडली. परंतु आजचे वास्तव हे वर वर्णन केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे हिंदू संस्कृतीच्या अगदी आरंभकाळात हिंदू ऋषिमुनींच्या जागृत अंत:प्रज्ञेतून निर्माण झालेली विश्वप्रज्ञा आणि आधुनिक तर्कप्रज्ञेच्या प्रवासातून निर्माण होणारी तर्कप्रज्ञा यांचा तुलनात्मक आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे.
 
Truth 
 
’मी’पणाचा विकास
 
आपण आपल्या नेहमीच्या व्यवहारात, मी - माझे, आपण - आपले हे शब्द वापरत असतो. परंतु एकदा आपण तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात गेलो की प्रत्येक संज्ञेची व्याख्या निश्चित करावी लागते. मी आणि माझे या संज्ञा जीवशास्रीय आणि नैसर्गिक आहेत. अगदी प्राणी जीवनातही बालपणी केलेले पालनपोषण, दिलेले प्रशिक्षण, आपल्या कुटुंबाचे संरक्षण अशी उदाहरणे दिसतात. मानवी समाजात ही कुटुंबाची संकल्पना विस्तारत जाते. माता आणि पिता या दोन्हीकडच्या अनेक पिढ्या विविध नातेसंबंधानी बांधलेल्या असतात. ही निसर्गनिर्मित समाजप्रक्रिया असते. पूर्वीच्या काळी आपल्याकडे सुतकांच्या दिवसाच्या आधारावर नातेसंबंध निश्चित करण्याची एक पद्धत होती. तो जैविक कुटुंब संकल्पनेचा विस्तार होता असे म्हणता येईल. परंतु जेव्हा कुटुंबापलिकडे जाऊन वेगवेगळे समाजघटक एकत्र येऊ लागले तेव्हा त्यातून खर्‍या अर्थाने समाजाच्या निर्मितीला सुरुवात झाली. प्रारंभी टोळीच्या स्वरूपात असलेला समाज गावे, शहरे, जनपदे, देश, मानव समाज असा विस्तारत गेला. मी, माझे यापलीकडे जाऊन त्यात आपण - आपले असे भावनिक नात्यांचे नवे सूत्र तयार झाले. आपलेपणाच्या अशा विभिन्न सूत्रांनी व्यक्ती समाजाशी बांधली गेली. या विभिन्न सूत्रांच्या आधारे आपल्या विविध ओळखी निर्माण होत जातात. मी कोणत्या गावचा, जिल्ह्याचा, भाषेचा, प्रांताचा, जातीचा, व्यवसायाचा, संघटनेचा, धर्म-संप्रदायाचा, श्रेणीचा अशा असंख्य ओळखी घेऊ. आपण समाजात जगत असतो. परंतु यातील एक कोणतीतरी ओळख ही बाकी सर्व ओळखींना आपल्या कवेत घेत असते. ती ओळख आपले व्यवहारातले जगण्याचे विश्व तयार करीत असते. त्या विश्वाचे नियम आपणाला बंधनकारक असतात.
 
 
तर्कानुभव
 
याच बरोबर आपण आपल्या भोवतालच्या विराट सृष्टीचक्राचाही एक भाग असतो. हे सृष्टीचक्रही आपल्या नियमांनी चालत असते आणि ते आपल्या नियंत्रणाबाहेरचे असते. दिवस, रात्र; उन, पाऊस; वेगवेगळे ऋतू, गुरूत्वाकर्षणासारखे परिणाम करणारे घटक अशा असंख्य गोष्टी आपल्याभोवती घडत असतात की त्याची आपण गणनाही करू शकत नाही. या घटनांवर आपले कोणतेही नियंत्रण नसते. परंतु विज्ञानाच्या साहाय्याने त्यातील नियमबद्धता आपल्याला समजून घेता येते. आपल्या आजवरच्या प्रवासात असंख्य विज्ञानशाखांच्या माध्यमातून असे अनेक निसर्गनियम शोधून काढले आहेत आणि त्यांचा उपयोग करून विविध तंत्रज्ञानांच्या सहाय्याने त्याचा उपयोग आपल्या जगण्याच्या सुविधा निर्माण करण्याकरिता केल्या आहेत. या विराट सृष्टीचक्राच्या अंतर्गत उभे केलेले मानवाचे हे स्वत:चे असे अंतर्विश्व आहे. या मानवी विश्वातील जग हे निसर्गनियमांवर मानवी बुद्धीचा संस्कार करून निर्माण केलेले वेगळे जग आहे. निसर्गात गुरूत्वाकर्षणामुळे वरची वस्तू खाली जमिनीकडे ओढली जाते परंतु मानवी विश्वात गुरूत्वाकर्षणावर मात करून जमीनीवरील वस्तू आकाशात उडवली जाऊ शकते. विज्ञानाच्या साहाय्याने मानवाने निसर्गावर अवलंबून राहतानाच, निसर्गाला आपल्या कामाला जुंपण्याचे कौशल्यही प्राप्त करून घेतले आहे.
 
 
व्यक्तिगत भावविश्व
 
 
याचबरोबर निसर्गाने मानवाला पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे आणि स्पर्शासाठी पाच ज्ञानेंद्रिये आणि त्याच सोबत मन, बुद्धी आणि आत्मा ही जाणीव दिली आहे. त्यातून प्रत्येक व्यक्तीचे एक आंतरिक भावविश्व तयार झालेले असते. या आंतरिक भावविश्वाच्या उभारणीमधूनच प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व तयार होत असते. आपली ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी आणि आत्मजाणीव यांच्या समन्वयातून आणि कर्मेंद्रियांच्या साहाय्याने दृश्यकला, चित्रकला, सुगंध, पाककला, स्पर्श संवेदना आदी विविध कलांच्या साहाय्याने निसर्गापेक्षा स्वत:चे वेगळे जग निर्माण केले आहे. त्याचबरोबर हात, पाय आणि वाक् शक्ती यांचा उपयोग करून त्याने अनेक कौशल्ये प्राप्त करून घेतली आहेत. यातूनच मानवी कला, क्रीडा आदी सांस्कृतिक भावविश्वाची निर्मिती झाली आहे. हे भावविश्व जसे व्यक्तिगत असते तसे सामूहिकही असते. त्यातून समाजाच्या सामूहिक भावविश्वाची निर्मिती होत जाते. त्यामुळे व्यक्ती व्यक्तिगत ते सामूहिक अशा भावविश्वांच्या अनेक पातळ्यांवर जगत असते. माणसावरील अशा भावविश्वांचा प्रभाव एवढा असतो की त्यातून त्याच्या मनाची अशी समांतर भावविश्व निर्मिती झालेली असते. आपल्या भोवतालच्या ज्या कुटुंबात, समाजात तो जगत असतो त्यापेक्षा वेगळे जग त्याने आपल्या मनात तयार केलेले असते. ते बाहेरच्यांना भासमान वाटते परंतु त्या व्यक्तीला त्याच्यापुरते ते वास्तव असते.
 
 
या सर्वाचा परिणाम म्हणून प्रत्येक व्यक्ती ही किमान तीन जगात जगत असते. पहिले, मी, माझे, आपण, आपले यातून तयार झालेले व्यावहारिक जग, विज्ञानाच्या सुविधातून तयार झालेले वैज्ञानिक जग आणि आपल्या व्यक्तिगत भावविश्वातून तयार झालेले भावविश्वांचे जग.
 
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात विशेषतः पश्चिम युरोपमध्ये आधुनिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेने आकार घ्यायला सुरूवात
Truth 
 
समानसमूह भाव
 
एक समाज म्हणून मानवजातीचा जो विकास झाला त्या प्रवासात अनेक प्रकारचे संस्थाजीवन निर्माण झाले. यात धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, वैचारिक अशा वेगवेगळ्या संस्थांच्या निर्मितीने समाजाला आकार आला. समाजनियमनासाठी विविध नियम, कायदे, रूढी, संकेत निर्माण झाले. व्यक्तीचे भावविश्व आणि समाजाचे भावविश्व यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा आणि त्यातून समान समूहभाव निर्माण व्हावा म्हणून समूहगान, समूह भोजन, सामूहिक क्रीडाकौशल्य प्रदर्शन असे अनेक उपक्रम केले जाऊ लागले. व्यक्ती चेतनेसोबतच समूह चेतनेचे जागरण करून समाजधारणेला पोषक वातावरण तयार केले जाऊ लागले. टोळीपासून या समूहजीवनाचा प्रवास सुरू झाला आणि अनेक प्रयोग करताकरता अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात विशेषतः पश्चिम युरोपमध्ये आधुनिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेने आकार घ्यायला सुरूवात केली. आज राष्ट्र हा सर्व जगाने मान्य केलेला अधिकृत सामाजिक घटक आहे. कोणतीही व्यक्ती राष्ट्राशिवाय राहू शकत नाही. जगातील लहान राष्ट्र असो की मोठे, त्या राष्ट्राच्या सार्वभौमत्वाच्या अनेक आणि समान अधिकाराच्या महत्त्वपूर्ण गोष्टी जगाने मान्य केल्या आहेत. यात आंतरराष्ट्रीय सीमांचा आदर, राष्ट्रप्रमुखांना सार्वजनिक ठिकाणी सन्मानाची वागणूक अशा अनेक बाबींचा समावेश आहे. आपण आणि आपलेपणाचा भाव एका विशिष्ट राष्ट्रीय भावनेमधे परिवर्तित होऊन प्रत्येक राष्ट्राचे स्वतःचे असे जगण्याचे विश्व तयार झाले आहे.
 
 
प्रत्येक राष्ट्राचे असे स्वतंत्र भावविश्व तयार होण्यास त्या त्या देशातील संस्कृती आणि इतिहासाचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण घटक कारणीभूत होतात. परंतु या सर्व वेगवेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण घटकांना छेद देत, समान नियमांच्या आधारे वैज्ञानिक विश्व आकार घेत असते. विज्ञानाचे नियम हे सर्वत्र समान असतात, ते कोणत्या देशात आहे त्यावर अवलंबून नसतात. परंतु त्या विज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे मात्र त्या त्या समाजाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते. मानवाला आगीवरील नियंत्रण, चाकाच्या शोधामुळे वाढलेली कार्यक्षमता अशा प्राथमिक अवस्थेपासून मध्ययुगात नकाशामुळे युरोपियन देशांचा वाढलेला व्यापार, बंदुकीच्या दारूमुळे झालेला साम्राज्य विस्तार अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी संस्कृतीच्या जडणघडणीत आणि संस्कृतीविस्तारात विज्ञानाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या तीनशे वर्षात तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर हा कोणत्याही समाजाच्या आर्थिक आणि लष्करी सामर्थ्याचा मूलभूत घटक बनला आहे. ज्या ज्या संस्कृतींनी विविध कारणांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासात अडचणी आणण्याचा प्रयत्न केला त्या संस्कृतींची जगाच्या स्पर्धेत पिछेहाट होत गेली. परंतु विज्ञानाच्या वाढत्या प्रसाराबरोबरच जगभरात विज्ञान समान वैचारिक दृष्टिकोन निर्माण करेल असे मानले जात होते, त्याचा मात्र पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. एवढ्या वैज्ञानिक शोधानंतरही जग अधिकाधिक सुरक्षित बनण्याऐवजी अधिकाधिक असुरक्षित बनत चालले आहे.
 
 
विवेकवादाचा उदय
 
या सर्व प्रक्रियेतून मानवासमोर काही मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत. ‘मी‘,’माझे’ म्हणून जगात काय आहे?‘, मला ‘नेमके काय हवे आहे?‘, आपण ‘नेमके कोण आहोत?‘, आपले ‘म्हणून नेमके काय आहे?’, यातूनच पुढे येणारे,‘माझ्या विश्वाचे स्वरूप काय आहे?’ आणि ‘ते आंतरिक भावविश्वाशी सुसंवादी आहे का?’ असेही प्रश्न त्यात अंतर्भूत आहेत. वास्तविक पाहता नेहमीच्या जगात मानवाच्या इतिहासात कधीही नव्हे एवढी सुरक्षितता मानवाला अनुभवायला मिळायला हवी होती. मानवाच्या प्रारंभीच्या अवस्थेत निसर्गाच्या लहरीवर त्याच्या जीवनाची सुरक्षितता अवलंबून होती. नंतरच्या काळात टोळीयुद्धे, विविध राज्यातील युद्धे, नैसर्गिक संकटे, पसरणारी रोगराई, राजकारणाचा लहरीपणा, विविध प्रकारची शोषणे यामुळे कशाचीच शाश्वती नाही असे व्यक्तिचे जीवन होते. परंतु हजारो वर्षांच्या मानवी इतिहासात नागरी, विज्ञान आणि कला क्षेत्रात माणसाने प्रचंड प्रगती केली आहे. अत्यंत असुरक्षित आणि अस्थिर अशा भटक्या टोळीजीवनापासून नागरिकांच्या सुरक्षेची, स्थिर आणि सन्मानपूर्ण जीवनाची हमी देण्यापर्यंत नागरी क्षेत्रात मानवाने प्रगती केली आहे. जरी जगातील अनेक देश आणि समाज वेगवेगळ्या अवस्थेत जगत असले तरी विकसित देशात मानवी मूल्यांच्या सन्मानासह सर्वसामान्य व्यक्तीला जगता आले पाहिजे ही गोष्ट मान्य झाली आहे.
 
त्याचबरोबर वैज्ञानिक प्रगतीने अचंबित करणारे प्रगतीचे शिखर गाठले असून त्यात नित्यनियमाने भर पडत आहे. एकेकाळी उच्चभ्रू लोकांपर्यंत मर्यादित असलेले कलाक्षेत्रही तंत्रज्ञानाने सर्वसामान्य व्यक्तीच्या आवाक्यात आलेले आहे. मात्र एवढे होऊनही माणसाच्या मनातील भय, एकाकीपण, त्याच्या मनावरील दडपण कमी झालेले नाही. कदाचित वाढलेलेच आहे. यांचे महत्त्वाचे कारण म्हणजे मी, आमचे आणि आमचे विश्व यात निर्माण झालेला संघर्ष.
 
 
राष्ट्रनिर्माणाची प्रक्रिया
 
यातील ‘मी आणि माझे‘ या जैविक संज्ञा आहेत. परंतु ‘आपण आणि आपले‘ या मानवनिर्मित संज्ञा आहेत. या संज्ञेचा प्राचीन टोळीजीवनापासून आजच्या राष्ट्र या संकल्पनेपर्यंत कसा प्रवास झाला याचा उहापोह एखाद्या लेखातून करता येणे शक्य नाही. परंतु आज जरी आंतरराष्ट्रीय व्यवहारात राष्ट्र ही संकल्पना वापरली जात असली तरी जगभरात तिच्यावरून संघर्षांचे वातावरण आहे. जवळजवळ सर्व आफ्रिकन देशात विविध टोळ्यांचा वर्चस्वासाठी संघर्ष सुरू आहे. कुर्दिश लोकांसारखे अनेक वंश गट आहेत जे स्वत:ला राष्ट्र म्हणवतात परंतु त्यांना राहण्याकरता एक देश नाही, ते विविध देशात विभागले आहेत. इस्लामिक ब्रदरहूडसारख्या अनेक संघटना धर्म प्रमुख मानतात, त्यांना राष्ट्राच्या सीमा मान्य नाहीत. परंतु त्या ब्रदरहूडमधे सुन्नी आणि शियांसहित विविध धर्मगटात संघर्ष आहेत. अनेक देशांना त्यांच्या शेजारच्या देशांबरोबरच्या सीमा मान्य नाहीत. त्यामुळे जगातले जवळजवळ सर्व देश कोणत्या ना कोणत्या संघर्षात गुंतलेले आहेत. जगावर प्रभाव टाकणारी अनेक तत्त्वज्ञाने अशी आहेत की ज्यांना राष्ट्र ही संकल्पनाच मान्य नाही. मार्क्सवाद हा भांडवलशाहीत होणार्‍या कामगाराच्या शोषणाला केंद्रस्थानी मानतो आणि राष्ट्रवादाला भांडवलशाहीचे समर्थक मानून विरोध करतो. आजच्या आधुनिक विचारविश्वावर कार्ल पॉपर यांचा अनुभवनिष्ठ प्रतिक्रियावाद आणि सोरोस यांनी या विचारांचे केलेले प्रत्यक्ष उपयोजन अशा दोघांचा पगडा दिसून येतो. कार्ल पॅापर आणि सोरोस यांचे तत्त्वज्ञानही राष्ट्रवादाला विरोध करणारे आहे. त्यांच्या दृष्टीने व्यक्तिवाद हे सर्वश्रेष्ठ मानवी मूल्य आहे. त्यामुळे आजच्या मानवी असुरक्षिततेच्या कारणातील नैसर्गिक, आरोग्य आणि अन्य कारणे कमी झालेली असली तरी त्याच्या समूहओळखीच्या संघर्षातून निर्माण झालेले प्रश्न अधिक गंभीर झाले आहेत.
 
कार्ल पॅापर आणि सोरोस यांचे
राष्ट्रवादाला विरोध करणारे तत्त्वज्ञान
Truth 
 
जसजशी मानवी संस्कृती विकसित होत गेली तसे ‘मी‘पणाचे ‘समूह‘मनात रूपांतर होण्याची प्रक्रिया अधिकाधिक प्रभावी होत गेली. भाषा, समान प्रशासन व्यवस्था आणि विविध सामाजिक संस्था हे त्यासाठी प्रभावी माध्यम होतेच, परंतु समूहमानस घडविण्याकरिता कलाक्षेत्राचा प्रभावी वापर करण्यात आला. राष्ट्रगीते, समूहगान, वीरकथा, चित्र-शिल्पांच्या विशिष्ट शैली, विविध समाजउत्सवातील समान पक्वान्ने, समान व्रत, परंपरा, आदर्श आणि कर्मकांडे, सामूहिक संचलने, क्रीडा महोत्सव , समान देवदेवता, आदर्श नायक अशा विविध माध्यमातून आपण एक आहोत हा आपलेपणाच्या भावाचा संस्कार करण्याचे मार्ग समाजजीवनाचा नैसर्गिक भाग बनले. समाजाला एकत्र बांधून ठेवणार्‍या सामूहिक प्रतीकांविषयी आदर निर्माण करण्याचे संकेत निश्चित करण्यात आले. त्यामुळे ‘मी‘चे अस्तित्व ‘आम्ही‘ किंवा ‘आपण‘ यामध्ये विसर्जित होण्याचा सामाजिक दबाव निर्माण झाला. परंतु त्यात अडचण अशी की जगाच्या व्यवहारात राष्ट्र या समूह कल्पनेला मान्यता दिली गेली तरी व्यवहारात अनेक संकल्पना व्यक्तीवर कार्य करत आहेत. भाषा, जात, प्रांत, लिंग, सामाजिक वर्ग अशा अनेक कल्पना सांगता येतील की ज्या एकाच वेळी एखाद्या व्यक्तीवर कार्य करीत असतात. त्यांच्या प्रभावामुळे विविध प्रकारचे मानसिक आणि सामाजिक तणाव निर्माण होत जातात. या सर्व कल्पनांची तत्त्वज्ञाने, कर्मकांड निर्माण होत जातात आणि आपण कोण यासंबंधीचा व्यक्तीचा संभ्रम वाढत जातो. यातून निर्माण होणारी भावविश्वे परस्परांना छेद देत जातात. हे समाजाच्या भावनिक आजारांचे मोठे कारण बनते.
 
 
जागतिकीकरणाचे परिणाम
 
विज्ञान आणि विशेषत: संपर्क तंत्रज्ञानातील प्रगतीचा परिणाम सर्व जग एका भावविश्वात कोंडण्यात होत आहे. त्याचबरोबर जगाचे परस्परावलंबीपणही वाढले आहे. यामुळे जगातील एका भागात कोणतीही घटना घडली तरी त्याचा जगावर परिणाम होत आहे. समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे मी, माझ्या, आपण, आपल्या यांच्या अस्मिता टोकदार होत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर व्यक्ती किंवा समाजाचे भावविश्व न विस्तारल्यामुळे, या लादलेल्या जागतिकीकरणामुळे आणि वाढत्या तंत्रज्ञानाच्या वर्चस्वामुळे नवनवी संकटे निर्माण होत आहेत. करोनासारख्या संकटाची ते येण्याआधी कोणी कल्पनाही केली नसेल. आपले जीवन एवढे तंत्रज्ञानाच्या अधीन झाले आहे की त्यात हस्तक्षेप करून एखादा समाज, देश सहजपणे उद्ध्वस्त करता येऊ शकेल. मोसादने आणि इस्लामी दहशतवादाने त्याची जगाला चुणूक दाखवून दिली आहे. परस्पर संवाद, सहकार्य आणि परस्पर द्वेष आणि संघर्ष या मानवी मनाच्याच दोन बाजू आहेत. मी, आपण आणि आपले विश्व यांच्यात सुसंवाद करण्याच्या प्रयत्नात आपल्या विश्वाबाहेरील जगाविरोधात द्वेष निर्माण केला जात आहे. आपल्या समाजाला आत्मचिंतन करायला भाग पाडण्यापेक्षा इतर जगाला दोषी ठरवून प्रतिक्रियात्मक अस्मितावाद जागा करणे अधिक सोपे बनले आहे. यातून जगभर आक्रमक, प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादाचा प्रभाव वाढत आहे आणि त्यात व्यक्तिगत विवेकबुद्धीचा बळी जात आहे. त्यामुळे समूहमनाचा वाढता आदर्शवाद हा एका बाजूला व्यक्तिगत विवेकबुद्धीचा बळी देत आहे आणि दुसर्‍या बाजूला जागतिक शांततेला धोका निर्माण करीत आहे. यातूनच कार्ल पॅापर आणि जॅार्ज सोरोस यांच्या मुक्त जगाच्या कल्पना निर्माण झाल्या आहेत.
 
 
कार्ल पॅापर आणि जॅार्ज सोरोस हे दोघेही मानवी बुद्धीची कक्षा मर्यादित आहे असे मानतात. आपण आतापर्यंतच्या चर्चेत पाहिले की ‘मी‘ आणि ‘माझे‘ या जैविक संकल्पना आहेत आणि त्या माणसापाशी जन्मजात असतात. परंतु ‘आपण‘ आणि ‘आपले‘ या संकल्पना मानवनिर्मित आहेत. कोणत्याही एका मानवगटाला किंवा मानवसमूहाला मानवी हिताचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. त्यामुळे मानवी बुद्धीतून निर्माण झालेले सर्व आदर्शवाद हे अपूर्ण आहेत. हे अपूर्ण आहेत हे मानवी विवेकबुद्धीला समजू नये म्हणून समूहवादाच्या प्रभावाखाली तिला दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे अपूर्ण क्षमतेच्या मानवी बुद्धीतून निर्माण झालेला सामूहिक आदर्शवाद एका बाजूने बाजूने माणसाची व्यक्तिगत विवेकबुद्धी नष्ट करतो तर दुसर्‍या बाजूने जग अशांत करत जातो.
 
 
त्यामुळे ही दोन्ही तत्त्वज्ञाने समूहमनापेक्षा व्यक्तिगत विवेकबुद्धीला अधिक महत्त्व देतात. तिला समूहवादाच्या प्रभावाखाली दडपून टाकण्यापेक्षा विवेकबुद्धीच्या आधारावर केलेल्या छोट्याछोट्या प्रयोगांनी जगात अधिक सुधारणा होईल असे ते मानतात. या दोन्हींच्या प्रत्यक्ष कार्यवाहीत थोडा फरक आहे. कार्ल पॉपरचे तत्त्वज्ञान असे सांगते की माणूस चुका सुधारत जगत असल्याने आपल्या सामूहिक कृतीतील सतत चुकांचे विश्लेषण करत राहिले पाहिजे. यामुळे त्याचा आदर्शवादाला विरोध आहे. परंतु व्यवहारात यातून आत्मपरीक्षण करण्यापेक्षा समाजातील सामूहिक आत्मविश्वास कमी होत जातो. सोरोस याच्या पुढे जातो. मानवी ज्ञान आणि दृष्टिकोन हे दोन्ही अपुरे असल्याने आपण या अपुरेपणातून जे निर्माण करत असतो, नवे वास्तव घडवत असतो, त्याच्या अपुरेपणाचे भान आपणाला असले पाहिजे. त्यामुळे कोणत्याही समूहमनाच्या निर्बंधापलिकडे जाऊन व्यक्तिगत विवेकबुद्धीच्या आधारे केलेल्या कृतींचे परिक्षण करूनच आपण आपल्यात सुधारणा करीत असतो. त्यामुळे निर्बंधरहित समाजात जे बदल होत जातात, त्यांच्या परिक्षणातूनच अधिक चांगल्या जगाची निर्मिती करता येईल. पॉपरची भूमिका ज्ञानाच्या अपूर्णतेची चिकित्सा करण्याची आहे तर सोरोसची भूमिका कृतीच्या परिणामांची तपासणी करण्याची आहे.
 
राष्ट्रवादाच्या पलिकडे जाणार्‍या तत्त्वज्ञानाच्या शक्यता अधोरेखित करणारे भारतीय तत्त्वज्ञ 
 
Truth
 
आक्रमक राष्ट्रवाद
 
गेल्या अडीचशे वर्षात राष्ट्र ही व्यक्तीची सामूहिक ओळख आहे याला सर्वमान्यता मिळालेली आहे. या जगात कोणताही व्यवहार करायचा असेल तर कोणत्या ना कोणत्या देशाचे नागरिक असणे भाग असते. अनेक उद्योगपती आपली अटक चुकविण्याकरिता अशा अनेक लहान आणि नगण्य देशांचे नागरिकत्व घेत असतात. कारण कोणत्यातरी देशाचा पासपोर्ट असल्याशिवाय जगात प्रवास करता येत नाही. परंतु मार्क्स, पॉपर आणि सोरोस वेगवेगळ्या कारणांसाठी याला विरोध करतात. या तिघांच्याही मते राष्ट्रवाद ही मानवनिर्मित समूहमनाची कृत्रिम संकल्पना आहे. परंतु त्याची चिकित्सा करण्याची या तिघांचीही कारणे भिन्न आहेत. राष्ट्र हे भांडवलदार आणि राजकारणी यांनी एकमेकांशी हातमिळवणी करून शोषित जनतेची पिळवणूक करण्याचे हत्यार असल्याचे मार्क्स मानतो. पॉपर आणि सोरोस हे राष्ट्र ही मानवी समूह मनाची अंतिम अवस्था न मानता, राष्ट्रवादाचा अतिरेकी आग्रह व्यक्तीची विवेकशक्ती संपवून तिचे आत्मबळ नष्ट करण्याचे साधन मानतात. या दोघांच्या विश्लेषणात थोडा फरक आहे, परंतु या लेखात त्यात जाण्याचे कारण नाही. वरवर पाहता, ज्या प्रकारे जगात राष्ट्रवादाचा विकास झाला त्यात या तिघांच्याही विचारात तथ्य आहे असे वाटू शकते. मध्ययुगीन युरोपियन राष्ट्रवादाचा परिणाम भांडवलशाही साम्राज्यवादात झाला. मार्क्सने हा अंदाज अचूकपणे व्यक्त केल्यामुळे मार्क्सवादाचा परिणाम जगातील सर्व विचारवंत आणि राजकीय चळवळींवर झाला. दुसर्‍या महायुद्धानंतर विविध राष्ट्रे ही अमेरिका - युरोपियन पद्धतीची लोकशाही आणि साम्यवाद यांच्या शीतयुद्धात सामील झाली. त्या काळातही विविध राष्ट्रे या विचारांची वाहक बनली आणि स्वाभाविकपणे नागरिकही त्यात ओढले गेले. आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावाने जे सक्तीचे जागतिकीकरण लादले गेले आहे, त्याचा परिणाम जवळजवळ सर्व देशात प्रतिक्रियात्मक राष्ट्रवादात झाला आहे. या राष्ट्रवादाची भूमिकाच इतर जग नाकारण्याची असल्याने त्यातून अनेक सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाले आहेत.
 
 
विवेकवादी संघर्ष
 
सामूहिक राष्ट्रभावनेतून तयार झालेला आक्रमक समूहवाद हा व्यक्तिगत विवेकबुद्धीच्या विरोधात असतो आणि त्यातून ‘आपण‘ आणि ‘ते‘ अशी जगाची विभागणी केली जाते असे विश्लेषण पॉपर करतो आणि त्यामुळे राष्ट्रवादाच्या मर्यादांची सतत चिकित्सा करत राहिली पाहिजे असा तो आग्रह धरतो. सोरोस त्याला प्रत्यक्ष कृतिरूप देतो आणि त्यातून जगभरात राष्ट्रवादाच्या विरोधात होणार्‍या चळवळींना पाठिंबा देणारी ’ओपन सोसायटी’ या नावाची मोठी चळवळ सोरोस याच्या प्रयत्नातून उभी राहिली आहे. ’डीप स्टेट’ या नावे ती ओळखली जाते. तिचा वैचारिक चेहरा हा आक्रमक राष्ट्रवादापासून व्यक्तिगत विवेकबुद्धी वाचविण्याचा आहे. त्यामुळे अनेक विद्वान, अभ्यासक त्याकडे ओढले गेले आहेत. परंतु पॉपर किंवा सोरोस यांनी राष्ट्रवादातील त्रुटी सांगितल्या तरी आदर्श मनावतावादावर आधारित विश्व कसे असेल हे ते स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे ती चळवळ राष्ट्रवादाच्या प्रतिक्रियेपुरती मर्यादित राहिल्यामुळे व्यक्तिगत विवेकवादी व्यक्तींच्या सहाय्याने हिंसक, धार्मिक पुनरूज्जीवनवादी अतिरेकी शक्तींना त्यातून बळ मिळत आहे. कारण सामाजिक आणि राजकीय प्रभाव निर्माण करण्याकरिता आवश्यक असे संख्याबळ हे त्यांच्याचपाशी आहे. याचा परिणाम म्हणून सोरोस यांच्या डीप स्टेटमधून छद्म - मानवतावादी आणि अराजकवादी शक्ती प्रबळ होत चालल्या आहेत. मार्क्सने राज्यविरहित आदर्श समाज ही संकल्पना मांडली होती, परंतु त्याचे तपशील दिले नव्हते. परंतु त्याचा परिणाम राज्य अधिक प्रबळ होऊन ते सर्वंकष शोषणाचे यंत्र बनण्यात झाला. तशीच गत सोरोस यांच्या चळवळीची होत आहे. खरा प्रश्न राष्ट्रवादाने संकुचित झालेल्या मानवी सांस्कृतिक विश्वाचा नसून मानवाच्या इतिहासांत विविध टप्प्यामधून जाऊन, मानवी संस्कृतीने जो राष्ट्रवादाचा टप्पा गाठला आहे त्या पलिकडच्या विश्वाचा वेध घेण्याचा आहे. मागे येऊन यांचे उत्तर शोधण्याचा नसून पुढच्या टप्प्याचा विचार करण्याचा आहे.
 
 
विरोधविकास-वाद आणि चिती
 
याकरिता राष्ट्रवाद या संकल्पनेचा आपण विचार कसा करतो यावर पुढचे निष्कर्ष अवलंबून रहातात. हेगेल या जर्मन तत्त्वज्ञाने चैतन्यवादी राष्ट्रवादाची भूमिका मांडून व्यक्तींचा ‘मी‘ ‘माझे‘ यापासून ‘राष्ट्र‘ या संकल्पनेपर्यंतचा चैतन्यवादी बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक प्रवासही स्पष्ट केला होता. त्याच्या मते राष्ट्रकारण म्हणजे आत्म्याने राष्ट्ररूप झालेल्या नेत्याचे कर्तृत्व व्यासपीठ. जिथे हिंसाचारसुद्धा उदात्त आणि उन्नत स्वरूप घेतो. अशा प्रकारचा उन्नत राष्ट्रवाद हा एखाद्या गुंडाने केलेली हिंसा आणि एखाद्या क्रांतिकारकाने केलेली हत्या यात गुणात्मक फरक करतो. परंतु मार्क्सने हेगेलचेच सूत्र वापरून राष्ट्रवादाच्या चैतन्यवादाला जडवादी बनविले आणि राष्ट्रवाद म्हणजे ‘एखाद्या समाजाच्या ऐहिक हितसंबंधांची घटनेने बांधलेली मोळी‘ असे स्वरूप प्राप्त झाले. यामुळे त्या पलिकडचे सांस्कृतिक अवकाश शोधण्याच्या शक्यता नष्ट झाल्या. परंतु आधुनिक काळात पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी दैशिक शास्त्रातील ‘चिती‘ आणि ‘विराट‘ या संकल्पना मांडून आणि त्याचा एकात्म मानव दर्शनाशी असलेला संबंध उलगडून राष्ट्रवादाच्या पलिकडे जाणार्‍या तत्त्वज्ञानाच्या शक्यता अधोरेखित केल्या आहेत. हेगेल विरोधविकासवादातून व्यक्तींचा राष्ट्राकडे जाणारा विकास स्पष्ट करतो तर दीनदयाळजी तोच आत्म्याच्या विकासक्रमातून स्पष्ट करतात. हेगेलचा सिद्धांतही चैतन्यशाली, उन्नत राष्ट्रवादाकडे जाऊन थांबतो. त्यामुळे हेगेलच्या अनेक टीकाकारांनी त्याच्यावर हिंसक, आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता म्हणून टीका केली आहे. परंतु दीनदयाळजींच्या ‘चिती‘ आणि ‘विराट‘ या राष्ट्रवादाच्या संकल्पना राष्ट्रवाद ओलांडून मानवतावाद आणि ‘वसुधैव कुटुंबकम्‘ इथपर्यंत जातात.
 
 
तुलनात्मक अभ्यासाची आवश्यकता
 
आज आपण इतिहासाच्या अशा वळणावर आहोत की व्यावहारिक जगात जो राष्ट्रवादाचा प्रवास झाला आहे तो आपल्याही वाट्याला आला आहे आणि त्या बंधनांनी आपण बांधले गेलो आहोत. त्यामुळे जगभरात राष्ट्रवादाच्या मर्यादांची, दोषांची जी चिकित्सा होते आहे तिचा आपणही एक भाग आहोत. पाश्चात्य विचारपरंपरेत आणि ज्ञान परंपरेत ज्याच्या बौद्धिक विचारांची जोपासना झाली आहे त्यांचे विचार स्वाभाविकपणे पॉपर, सोरोस यांच्या मार्गाने जाणार यात आश्चर्य नाही. रोग्याच्या आरोग्याच्या तपासणीत रोग्याच्या आरोग्यापेक्षा डॉक्टरांच्या ज्ञानाची तपासणी होत असते. त्यामुळे ज्याला रोग्याचे आरोग्यच माहिती नाही, त्याचे ज्ञान कितीही अधिक असले तरी त्या विद्वत्तेचा रोगी बरा होण्याशी काही संबंध नसतो. त्यामुळे आपल्यापुढे असलेला मूळ प्रश्न ही रोग्याच्या प्रकृतीची माहिती असलेले तज्ज्ञ डॉक्टर कसे आणायचे असा आहे. असे प्रयत्न करण्यासाठी प्रथम त्याची जाणीव व्हावी लागते, त्यानंतर तशी योजना बनवावी लागते, ती निर्धारपूर्वक अंमलात आणावी लागते, आणि त्यासाठी तेवढ्या क्षमतेचे व चिकाटीचे मनुष्यबळ लागते. यातला पहिला टप्पा, ‘जाणीव होणे‘ हा जेमतेम पार पडला आहे. त्यातून भारतीय ज्ञानप्रणाली विकसित केली पाहिजे यावर चर्चा सुरू झाली आहे. परंतु या क्षेत्रात काय घडत आहे या संबंधी त्या क्षेत्राची माहिती असलेल्या व्यक्तींशी थोडीफार चर्चा केली तरी पुरेसे आहे. ज्ञानाच्या क्षेत्रात अभिनिवेश मारक असतो आणि याबाबत प्राचीन काळापासून आपण जागरूक होतो. ज्ञानाचा प्रकाश सर्व बाजूंनी आला पाहिजे, सुभाषित लहान मुलाकडून आले तरी ग्रहण करावे अशी कितीतरी सुभाषिते आपल्या परंपरेत आहेत. परंतु आता आपण ज्ञानाचा अधिकारपदाशी संबंध जोडला आहे. राष्ट्रवादाची युरोपियन ज्ञानशाखा आणि भारतीय राज्यशास्त्राची ज्ञानशाखा याचा आधुनिक घडामोडींशी तौलनिक अभ्यास करणारे अधिकारपदच नसल्याने या विषयाचा कोणी वारसदारच नाही.
 
तर्कप्रज्ञेचा विकास
 
हा तौलनिक अभ्यास करण्यापूर्वी पाश्चात्य ज्ञानशाखा आणि भारतीय ज्ञानशाखा यांच्या वैशिष्ट्यांचा विचार करावा लागेल. आधुनिक राष्ट्रवादांच्या विचारांचे युरोप आणि अमेरिकेत जे बीजारोपण झाले त्यावेळी तिथे अनेक क्षेत्रातील घटना एकाच वेळी घडत होत्या. राज्यशास्त्र, मानवी मूल्ये, अर्थविचार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आधुनिक शिक्षण देणारी विद्यापीठे, ग्रंथ आणि वृत्तपत्र प्रसार यातून तिथे नवे जग अवतरत होते. त्यालाच युरोपचे प्रबोधन पर्व म्हणतात. या सर्व घडामोडींमागे एकच व्यक्ती, घटना किंवा देश कारणीभूत नसतो. तरीही द्यायचेच असेल तर रे देकार्तने जी युरोपमधे बौद्धिक क्रांती घडवून आणली त्याला काहीसे हे श्रेय द्यावे लागेल. ख्रिश्चन धर्मपीठाच्या प्रभावाखाली युरोपमधे अंधारयुग आले होते. या पार्श्वभूमीवर ’ख ींहळपज्ञ ींहशीशषेीश ख रा’, ‘विचार हे माझ्या अस्तित्वाचे कारण आहे‘, या त्याच्या उक्तीने युरोपचे वैचारिक वातावरण बदलून टाकले. जग तर्कशुद्ध गणिती नियमांनी बांधले आहे हे त्याला सांगायचे होते. त्यातून युरोपमधे तर्कप्रज्ञेचा विकास झाला आणि त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रात झाला. निरीक्षण, माहितीचे संकलन, विश्लेषण व त्यातून निष्कर्ष, त्यांची पुन्हा तपासणी हे सत्यशोधनाचे साधन बनले. न मोजता येणार्‍या भावनेपेक्षा, उपयुक्ततावादाला अधिक महत्त्व आले. धर्मावलंबी राजसत्तेपेक्षा इहवादी लोकशाहीवादाला महत्त्व आले. धार्मिक मूल्यापेक्षा मानवतावादी मूल्यांना महत्त्व आले. जुन्या प्रथा, परंपरा वैज्ञानिक बुद्धीच्या तर्कवादावर तपासल्या जाऊ लागल्या. याच प्रक्रियेत विविध संस्था माध्यमातून उदारमतवादी लोकशाही राष्ट्रवाद युरोप-अमेरिकेत स्थिरपद झाला. युरोपियन साम्राज्यवादाने ही मूल्ये, समाजव्यवस्था जगभर पसरवली. त्यातून सर्व जगभरात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली. हा सर्व तर्कप्रज्ञेचा विकास होता. त्यातूनच इहवाद, लोकशाही, साम्यवाद, समाजवाद अशी वेगवेगळी तत्त्वज्ञाने निर्माण झाली.
 
 
अंतःप्रज्ञेचा विकास
 
हिंदू तत्त्वज्ञानाचा प्रामुख्याने विकास हा अंत:प्रज्ञेने झाला आहे. अंतःप्रज्ञा ही आतून येणारी स्पष्ट जाणीव असते. तर्कप्रज्ञेसाठी बुद्धीचा विकास आणि मनाची अलिप्तता याची गरज असते, तर अंतःप्रज्ञा जागृत होण्यासाठी विशिष्ट विषयाशी तादात्म्य होण्याची गरज असते. सहज मनात येणारी कल्पना म्हणजे अंत:प्रज्ञा नव्हे, त्या पातळीवर जाण्याकरिता चित्तशुद्धी करावी लागते आणि अशी चित्तशुद्धी करण्याचे अनेक मार्ग आहेत. तर्कप्रज्ञा तर्काने सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते तर अंतःप्रज्ञा सत्य अनुभवते.
तर्कप्रज्ञेमधे जशी माहिती बदलते तसे सत्य बदलत जाते. त्यामुळे पॉपर आणि सोरोस म्हणतात त्यातले तथ्य स्पष्ट होते. त्यांच्या मते मानवाजवळची माहिती कधीच परिपूर्ण नसल्याने त्याला समजलेले सत्यही अपूर्णच असेल. अंत:प्रज्ञेतही अशा सत्याच्या वेगवेगळ्या पातळ्या अनुभवायला मिळतात परंतु सत्यशोधकाला त्याची जाणीव असल्याने तो त्याबाबत नम्र असतो. म्हणून हिंदू विचारपद्धतीत दर्शन ही संज्ञा आहे. ही केवळ तर्काने रचलेली मुद्द्यांची इमारत नाही, तर सत्याचे झालेले साक्षात दर्शन आहे. त्यामुळे तत्त्वज्ञ आणि दार्शनिक यांच्यात फरक आहे. त्यामुळे वेद किंवा उपनिषदे ही केलेली तर्कशुद्ध रचना नाही तर अंत:प्रज्ञेचे विस्फोट आहेत. परंतु इथे प्रश्न असा पडतो की तर्कप्रज्ञेने शोधलेल्या सत्याचे स्वरूप तर्काच्या पद्धतीवरून तपासता येते, परंतु अंत:प्रज्ञेतील सत्य एकालाच जाणवत असल्यामुळे ते सत्य आहे की नाही हे जाणवायचे कसे?
 
 
समन्वयाची आवश्यकता
 
इथे तर्कप्रज्ञा आणि अंत:प्रज्ञा यांच्यात महत्त्वाचा फरक आहे. तर्कप्रज्ञेच्या विकासात तर्क आणि तो करणारी व्यक्ती यांच्यात द्वैत असते. त्यामुळे एखाद्याला वाटलेले सत्य तो सांगेल तसेच त्याने वर्तन केले पाहिजे यावर तो स्वत:ला बंधन घालून घेत नाही तर अंत:प्रज्ञेतून जे सत्य जाणवते त्याचे त्याच्या जीवनात दर्शन घडले पाहिजे. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले‘ हे संत तुकारामांनी सांगितलेले सत्य त्याच प्रचितीतून आले आहे. त्यामुळे हिंदू हे केवळ तत्त्वज्ञान नसून तो जीवनमार्ग आहे असे म्हटले जाते. या पार्श्वभूमीवर पाश्चात्य राष्ट्र कल्पना आणि चिती यातील संबंधाचा विचार करावा लागेल. पाश्चात्य दृष्टिकोनातून राष्ट्रवाद म्हणजे घटनादत्त कर्तव्य तर हिंदू जीवनदृष्टीकोनातून चिती म्हणजे जो आजवरचा सामूहिक सांस्कृतिक स्मृतिसंचय आहे त्याच्याशी होणारी तादात्म्यता. ही जसजशी वाढत जाते तसतसे त्याचे समाजाप्रती असलेले समर्पण वाढत जाते. संघाचे ज्येष्ठ प्रचारक शिवराय तेलंग म्हणत, ‘संघ हे मत नाही, जीवनमार्ग आहे‘. या सांस्कृतिक स्मृतींचे अधिष्ठान ‘ऋत‘ या वेदकालीन संकल्पनेत आहे. ‘ऋत‘ ही हिंदू ज्ञानपरंपरेतील अंत:प्रज्ञेने गाठलेली सर्वोच्च अनुभूती म्हणता येईल. ऋत म्हणजे विश्व रचनेतील आंतरिक सुसंवादाचा साक्षात्कार. विश्वामधे वरवर पाहता अनेक प्रकारचा विसंवाद दिसत असला तरी त्यामागे सूक्ष्मपणे पाहिले तर त्यातील आंतरिक सुसंगतीच्या आंतरिक जाणीवेची अधिकाधिक स्पष्टता होत जाते. हाच ‘ऋत‘चा साक्षात्कार. त्यामुळे हिंदू दृष्टीकोनातून राष्ट्रभक्तीचा विकास म्हणजे ऋतचा क्रमाक्रमाने होत जाणारा साक्षात्कार. तोच अंतिम सत्याचा शोध. त्यामुळे हिंदू विचारपद्धतीतून विकसित होत जाणारी राष्ट्रभक्ती ही बहिर्मुखी, कोणाच्या विरोधात जाणारी नसून ती समन्वयवादी, विविधतेतून एकत्व तत्त्वाचा शोध घेणारी अशी आहे. त्यामुळे पाश्चात्य भूमिकेतून जी राष्ट्रभक्तीची कल्पना करून भारतातील वाढत्या राष्ट्रवादाच्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली जाते ती वस्तुस्थितीशी विसंगत आहे.
 
 
हिंदू राष्ट्र संकल्पनेचे वेगळेपण
 
त्यामुळे राष्ट्र ही संकल्पना समान वाटत असली तरी विविध संस्कृतीत तिचे अर्थ भिन्न होतात. ज्या पार्श्वभूमीवर ती युरोपमधे विकसित झाली त्यातून साम्राज्य विस्तार, विचारसरणीची वाहक किंवा आता प्रतिक्रियात्मक जागतिकीकरणविरोधी असे राष्ट्रवादाने स्वरूप धारण केले आहे. मार्क्सचा आक्षेप राष्ट्रवाद हा भांडवलशहांच्या हातात हात घालून तो शोषणकर्त्यांना सहभागी होतो हा आहे तर पॉपर आणि सोरोस यांच्या मते तो प्रबळ झाला तर व्यक्तिगत विवेकबुद्धीचा विरोधक बनतो. या उलट हिंदू राष्ट्रवाद हा ऋतच्या अधिष्ठानावर असलेला चितीचा अविष्कार आहे. मार्क्स राज्यरहित समाजाची संकल्पना मांडतो आणि पॉपर व सोरोस व्यक्तिनिष्ठ विवेकबुद्धीवर आधारित मानवतावादाची भाषा बोलतात, परंतु प्रत्यक्ष अनुभव त्याच्या उलट येतो. या पार्श्वभूमीवर हिंदू राष्ट्रवादाची वैचारिक मांडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी या दोन्ही संकल्पनांत असलेली वैचारिक दरी सांधून त्यावर कसा पूल बांधायचा याचा विचार करावा लागेल.
 

Truth 
 
पाश्चात्य राष्ट्रकल्पना ही तर्कप्रज्ञेवर आधारित आहे तर हिंदू राष्ट्र संकल्पना ही अंत:प्रज्ञेवर आधारित आहे. त्यामुळे मुका आणि बहिरा एकत्र आले तर जी अवस्था होईल तशी आज वैचारिक स्थिती बनली आहे. मुक्याला बोलता येत नाही आणि आंधळ्याला दिसत नाही, मग संवाद कसा होणार? भारतीय ज्ञानप्रणालीसमोरचे खरे आव्हान ही दरी कशी दूर करायची हा आहे. आपल्या देशासाठी चितीच्या जागृतीसाठी सांस्कृतिक स्मृतींच्या कालसापेक्ष जागरणाचे आहेच, पण त्या पलिकडे जाऊन हिंदू सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि पाश्चात्य राष्ट्रवाद यांच्यात वैचारिक पूल निर्माण करण्याचे आहे. हे काम अत्यंत आव्हानात्मक आहे आणि केवळ स्वमताच्या अभिनिवेशातून टीका करण्यातून साध्य होणारे नाही.
 
 
हिंदुत्ववादी विचारवंतांसमोरील आव्हान
 
यासाठी प्रथम तर्कप्रज्ञा आणि अंत:प्रज्ञेचा विवेकपूर्ण समन्वय असलेले, आत्मप्रज्ञा जागृत अभ्यासक निर्माण करावे लागतील. या दोन्ही प्रज्ञांच्या विकासाचा मार्ग वेगवेगळा असला तरी तो परस्परपूरक आहे याची जाणीव ठेऊन अभ्यास करावा लागेल. विशिष्टाकडून पूर्णत्वाकडे आणि पूर्णत्वाकडून विशेषत्वाकडे असे ते दोन मार्ग आहेत. आपला देश हा जागतिक सत्तासंघर्षाचा भाग आहे. जोवर तर्कप्रज्ञेचा विकास होणार नाही तोवर ज्या संघर्षातून आपण जात आहोत त्याचे स्वरूप लक्षात येणार नाही. त्याचबरोबर जोवर अंत:प्रज्ञेचा विकास होणार नाही तोवर हिंदू राष्ट्रवादाच्या अंतिम उद्दिष्टाकडे जाण्याचा रस्ता स्पष्टपणे दिसणार नाही. जर जागतिक सत्तासंघर्षात टिकलो नाही तर भविष्याचा विचार करायला आपण शिल्लकच उरणार नाही, परंतु त्याचबरोबर त्याच सत्ता संघर्षात आपण हरवून गेलो तर आपले अंतिम उद्दिष्ट गाठता येणार नाही. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारवंतांवर ही दुहेरी जबाबदारी आहे. परंतु आत्मप्रज्ञेचा विकास हे केवळ पुस्तकी शिक्षण नाही. तो आचरणात आणण्याच्या मूल्यपद्धतीचा एक भाग आहे. त्या मूल्यपद्धतीचे पूर्ण साक्षात्कार होण्यासाठी आत्मप्रज्ञेला विश्वप्रज्ञेचे अधिष्ठान असावे लागते. त्या प्रज्ञेतूनच ऋतचा बोध होऊ शकतो. त्यामुळे तर्कप्रज्ञेतून आजच्या भौतिक जगाचे आकलन तर विश्वप्रज्ञेतून ऋत नियमांचा साक्षात्कार असा हा आधुनिक काळाला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य असणारे ज्ञानवर्तुळ बनू शकते. लेनिनने मार्क्सवादावर आधारित क्रांती करण्यासाठी व्यावसायिक क्रांतिकारकांची संकल्पना मांडली होती. क्रांतिकार्य हा फावल्या वेळी जमेल तसा करण्याचा उद्योग नसून त्यामागची संकल्पना समजावून घेऊन ती यशस्वी करण्यासाठी सर्व व्यावसायिक गुण संपादन करणारा वर्ग तयार करण्याची त्याची कल्पना होती. हिंदू राष्ट्रसंकल्पनेचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी तशाच ज्ञानसाधकांची फळी निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
 

Truth 
 
आधुनिक दार्शनिक परंपरा
 
सुदैवाने त्यासाठी यासंदर्भात आपल्याकडे गेल्या दीडशे वर्षांची चांगली परंपरा आहे. स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, लो. टिळक, म. गांधी, डॉ. आंबेडकर, स्वा. सावरकर, रविंद्रनाथ टागोर अशा काही विश्वप्रज्ञेपर्यंत पोचलेल्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचा आढावा घेतला तरी भारतीय ज्ञानपरंपरेला कोणत्या पायावर आपली इमारत बांधायची आहे याची स्पष्टता येईल. या सर्वात एक घटक समान आहे आणि तो म्हणजे या सर्व व्यक्तिमत्त्वांचा प्रारंभिक वैचारिक पाया हा तर्कप्रज्ञेतून घडला होता. विवेकानंदांचे शिक्षण स्कॉटिश चर्च महाविद्यालयातून झाले होते. तिथे मिल, ह्यूम, स्पेन्सर आदि पाश्चात्य तत्त्वज्ञांचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यानंतर ते ब्राह्मो समाजाचेही सदस्य बनले. या सर्वांमुळे सामाजिक सुधारणा, तीक्ष्ण तर्कप्रज्ञा यांचा वारसा घेऊन ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडे गेले. योगी अरविंदांना भारतातील संस्कृतीचे प्रदूषण होऊ नये म्हणून लहानपणीच सातव्या वर्षापासून इंग्लंडला पाठविण्यात आले. त्यांनी आयसीएस परिक्षा उत्तीर्ण केली परंतु त्यांना शासकीय अधिकारी व्हायचे नव्हते म्हणून घोडेस्वारीच्या परिक्षेला ते अनुपस्थित राहिले. भारतात आले तेव्हा त्यांना कोणतेही औपचारिक भारतीय संस्कृतीचे किंवा भाषेचे शिक्षण मिळाले नव्हते. लो. टिळक हे गणित आणि कायद्याचे तज्ज्ञ होते. आपणाला केसरीच्या माध्यमातून मार्क्सचा परिचय करून देण्याचे श्रेय डांगे टिळकांना देतात. टिळकांचा पाश्चात्य विचारवंतांचा किती गाढा अभ्यास होता त्याचा परिचय त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथातून येतो. म. गांधींचे कायद्याचे शिक्षणही इंग्लंडमधे झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पदवी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यात होती. त्यानंतरचे त्यांचे शिक्षण अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये झाले. स्वा. सावरकरांनी इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होण्याचे शिक्षण घेतले होते. रविंद्रनाथ टागोर यांचे प्राथमिक शिक्षण हे ओरिएंटल सेमिनरी आणि नंतर कलकत्त्यातील सेंट झेविअर स्कूलमधून झाले होते आणि नंतर ते इंग्लंडला युनिव्हर्सिटी कॉलेजमधे कायद्याच्या अभ्यासासाठी होते.
 
 
या सर्वांनी भारतीय प्रबोधन पर्वात भारताच्या सांस्कृतिक जागरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पाश्चात्य विचारातून त्यांची तर्कप्रज्ञा सर्वोच्च पातळींवर पोचल्यानंतर त्यांची जी अंत:प्रज्ञा जागृत झाली आणि त्या प्रकाशात त्यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संपन्नतेचा वेध घेतला. या त्यांच्या आत्मजागरणातून त्यांनी जो आत्मप्रज्ञा ते विश्वप्रज्ञा हा प्रवास केला तोच आज आपल्यापुढे आधुनिक परिवर्तनाचा आदर्श म्हणून उभा आहे. त्यांची व्यक्तिमत्त्वे आणि त्यांचे तत्त्वज्ञान हा प्राचीन आणि आधुनिक सांस्कृतिक युगाला जोडणारा दुवा आहे. भारताचे उद्दिष्ट केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यापुरते मर्यादित नसून जगापुढे सांस्कृतिक आदर्श निर्माण करायचे आहे याची जाणीव त्यांनी भारताला करून दिली. दुर्दैवाने भारताच्या स्वातंत्र्यानंतर ही तर्कप्रज्ञा आणि अंत:प्रज्ञा यांचा समन्वय नाहीसा झाला आणि वैचारिक क्षेत्रावर फक्त तर्काधारित पाश्चात्त्य विचार पद्धतीचा अर्धवट प्रभाव निर्माण झाला. त्यातून जुनी ओळख पुसली गेली आणि नवी निर्माण झाली नाही. त्या सांस्कृतिक अंधारात अजूनही आपण चाचपडत आहोत. त्यामुळे आपल्यापुढचे पहिले आव्हान जो स्वातंत्र्यानंतर तुटलेला वैचारिक धागा आहे तो जोडण्याचे आहे. ते काम केवळ त्यांच्या गौरवगानातून होणार नाही तर त्याकरिता नवी अभ्यासपूर्ण तर्कप्रणाली निर्माण करण्याची आवश्यकता आहे. या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वांचा तर्कप्रज्ञा ते विश्वप्रज्ञा हा प्रवास कसा झाला तो वैचारिक प्रवासच आपल्या प्राचीन आणि आधुनिक विचार परंपरांच्या समन्वयाचा रस्ता दाखवू शकतो.
 

Truth 
 
 
संघाचे योगदान
 
आपल्या समृद्ध सांस्कृतिक संचिताच्या आधारावर चितीचे जागरण करून हिंदू समाजाचे समूहमन जागृत करण्याचा महान प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली शंभर वर्षे चालविला आहे. पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी चिती आणि विराट अशा दोन संज्ञांचा वापर केला आहे. चिती ही राष्ट्राची आत्मदिशा आहे तर विराट ही त्या आत्मदिशेची सामूहिक कार्यशक्ती आहे. परंतु ही सामूहिक कार्यशक्ती पाशवी, विद्ध्वंसक, हुकूमशाही, दडपशाहीकडे झुकणारी होऊ नये म्हणून चितिच्या जागृतीतून जी सामूहिक कार्यशक्ती जागृत होईल त्याची चित्तशुद्धी करण्यासाठी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रार्थ कर्मयोग अशा अध्यात्मातील भक्ती आणि कर्मयोगाच्या संकल्पनाही संघाच्या कार्यपद्धतीत अंतर्भूत केल्या आहेत. यातून समाजाची विराट कार्यशक्ती जागृत झाली आहे. या कार्यशक्तीमधे जागतिक भविष्याला वळण देण्याची मूलभूत क्षमता आहे. आध्यात्मिक साधनेत एक धोका असतो. साधनेच्या मार्गावर काही सिद्धीही मिळत जातात. साधक त्या सिद्धीत अडकला तर त्याच्या साधनेचा पुढचा मार्ग बंद होतो. त्याप्रमाणेच, झालेली सत्ताप्राप्ती ही अशीच एक वाटेवर मिळालेली सिद्धी आहे. खरे लक्ष्य त्यापुढचे आहे. ते गाठायचे असेल तर त्याकरिता तर्कप्रज्ञा ते विश्वप्रज्ञा असा प्रवास करण्याची क्षमता असणार्‍या ज्ञानवंतांची मालिका निर्माण व्हावी लागेल. परंतु, त्याला कोणत्या संस्कृतीतून कोणत्या गोष्टी घ्यायच्या याची विवेकपूर्ण चिकित्सा करावी लागेल. तसे झाले नाही तर श्री गुरुजींनी आपल्या ’परिपूर्ण मानव’, या भाषणात म्हटल्याप्रमाणे ’जगातील निरनिराळ्या लोकांशी संबंध आल्यावर जीवनपद्धतींची थोड्याफार प्रमाणात देवाणघेवाण होणे हे तर चालतेच. तशी देवाणघेवाण अजिबात झाली नाही. जी काही झाली झाली ती केवळ घेवाणच झाली. जे घेण्यायोग्य नाही ते देखील आम्ही त्यांच्यापासून घेत आहोत. आम्ही इंग्रजांपासून त्यांची देशभक्ती, त्यांची कर्तव्यनिष्ठा, त्यांचा विशिष्ट स्वभाव, त्यांचा कामसूपणा हे गुण घेतले तर त्यात तक्रार करावयास कोणतीही जागा राहिली नसती. परंतु आम्ही त्यांचे हे गुण घेतले नाहीत. अवगुण मात्र नेमके उचलले. त्यांची दिखाऊ राहणी आम्ही स्वीकारली आणि आम्ही आमच्याच स्वत्वाचा निषेध करू लागलो. या मार्गदर्शक सूत्रावर चिंतन करून पुढील मार्गावर निर्धारपूर्वक चालण्याची वेळ आली आहे.

दिलीप करंबेळकर

दिलीप दामोदर करंबेळकर

मूळ गाव : पट्टणकुडी

शिक्षण    : बीएस्सी, एम.बी.ए.

 

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कोल्हापूर व गोव (1976-1980) कालावधीत होते.

मराठी साप्ताकिक विवेक, दैनिक मुंबई तरुण भारत,शिल्पकार चरित्रकोश प्रकल्प यांचे प्रबंध संपादक आहेत, तसेच त्रैमासिक ज्येष्ठपर्व, वैद्यराजचे ते सल्लागार आहेत.

विवेक व्यासपीठ व सेवाभावी आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे विश्वस्त.

सामाजिक अभ्यास आणि समाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण यासाठी कार्यरत असणाऱ्या स्पार्क या संस्थेचे संचालक

विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटर या स्वयंसेवी संस्थेचे संचालक

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष.

श्रीरामजन्मभूमी  लढयाचा अन्वयार्थ विकृत मानसिकतेचा पंचनामा व भारत - पाकिस्तान: एक सांस्कृतिक युध्द ही पुस्तके प्रकाशित.