‘तपस्वी’ ग्रंथाचे प्रकाशन

विवेक मराठी    16-Nov-2026
Total Views |
‘तपस्वी’ ग्रंथाचे लातूरमध्ये प्रकाशन
 
 
vivek
 
लातूर ः “काँग्रेसच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तीन वेळा बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता; परंतु प्रत्येक वेळा संघाने त्यावर मात केली आहे. इंदिरा गांधी यांनी लोकशाही आणि संविधानाचा गळा घोटणारी जी आणीबाणी जाहीर केली होती, त्या आणीबाणीच्या विरोधात देशभर जो संघर्ष झाला त्या संघर्षात संघाचे लाखो स्वंयसेवक सक्रिय सहभागी होते. देशात आज जी लोकशाही आणि संविधान जिवंत आहे, त्याचे कारण हे रा.स्व.संघच आहे. संघाच्या कार्याचा आधार हा गृहस्थी कार्यकर्ता आहे,”असे प्रशंसोद्गार माजी क्षेत्रीय प्रचारक, भाजपाचे माजी संघटन मंत्री रवींद्र भुसारी यांनी ’तपस्वी’ या ग्रंथाच्या प्रकाशनानिमित्ताने काढलेे.
 
 
रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील शंभर संघ स्वयंसेवकांची लघुचरित्र असणार्‍या ’तपस्वी’ या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. या ग्रंथाचे प्रकाशन मंगळवार दिनांक 27 ऑक्टोबर 2026 रोजी सांयकाळी 6.30 वाजता त्रिपुरा महाविद्यालय, साईमंगल कार्यालयाजवळ येथे झाले. त्यावेळी प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून रा.स्व.संघाच्या लातूर विभागाचे विभाग संघचालक सी.ए. संजय अग्रवाल, ग्रंथाचे संपादक तसेच ’साप्ताहिक विवेक’च्या प्रकाशन विभागाचे संपादक रवींद्र गोळे, या समारंभाचे संयोजक ’श्री त्रिपुरा महाविद्यालया’चे संस्थापक प्रा.उमाकांत होनराव आदि मान्यवर उपस्थित होते.
’तपस्वी’ ग्रंथ निर्मितीमागील विवेकची भूमिका संपादक रवींद्र गोळे यांनी मांडली. ”संघशताब्दी वर्षाच्या निमित्ताने संघ प्रचारकाच्या आयुष्याचा जीवनपट उलगडणारा ’समिधा’ हा ग्रंथ ज्यावेळी प्रकाशित करण्यात आला त्या कार्यक्रमात ’श्री रामजन्मभूमी न्यास’चे पदाधिकारी गोविंद देव गिरीजी यांनी गृहस्थी स्वंयसेवकाच्या योगदानाला उजाळा देणारा ग्रंथ प्रकाशित करण्याची सूचना केली होती. त्यानुसार या ग्रंथाची निर्मिती करण्यात आली आहे. देवगिरी प्रांतातील 25 गृहस्थी स्वयंसेवकांचा यात समावेश असून लातूर जिल्ह्यातील ’भारतीय किसान संघ’चे ज्येष्ठ कार्यकर्ते दिवंगत अ‍ॅड.दयानंद हुरदळे, भारत विकास परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते उद्योजक दिवंगत विश्वास लातूरकर यांचाही समावेश आहे.” अशी माहिती त्यांनी दिली.
 
प्रमुख भाषणात रवींद्र भुसारी यांनी संघकार्याचा आढावा घेतला. संघ स्वंयसेवक किती संकटांवर मात करीत काम करीत असतो हे सांगताना त्यांनी केरळ प्रांतातील कामाची सविस्तर माहिती दिली. बंधुभाव हा जसा संघाचा मंत्र आहे, तसाच संघाच्या कार्याचा आधार हा गृहस्थी कार्यकर्ता असून तो कामाचा कणाही असल्याचे भुसारी यांनी स्पष्ट केले.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ’साप्ताहिक विवेक’चे प्रतिनिधी विलास आराध्ये यांनी केले. व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत उमाकांत होनराव, नामदेव व्यंजने, पत्रकार अरुण समुद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. उमाताई देशपांडे यांनी केले तर अशोक मठपती यांनी वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमाला तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती, हे आवर्जून नमूद करण्याजोगे!
--------------------------------
 
तपस्वी ग्रंथाचे दिमाखदार प्रकाशन
 
 

vivek 
 
संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ‘सा. विवेक’ने ‘समिधा‘ हा ग्रंथ प्रकाशित केला. आजीवन संघकामासाठी आपले जीवन वाहून घेणार्‍या प्रचारकांची ओळख त्यातून करून देण्यात आली होती. केवळ संघकाम हाच जीवनोद्देश घेऊन हजारो प्रचारकांनी संघविस्तारासाठी काम केले आणि अशा प्रचारकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ते गृहस्थी कार्यकर्ते होते. असे प्रपंच आणि संघकाम यांचे संतुलन राखत जीवन जगणारे हजारो कार्यकर्ते आज प्रत्येक राज्यात कार्यरत आहेत.. हे गृहस्थी कार्यकर्ते संघकामाचा कणा आहेत. अशा असंख्य गृहस्थी कार्यकर्त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘तपस्वी‘ या ग्रंथाची निर्मिती सा. विवेकने केली आहे.
 
या ग्रंथाचा मुंबईतील प्रकाशन सोहळा मंगळवार दि. 27 ऑक्टोबर 2026 रोजी साप्ताहिक विवेकच्या कार्यालयात संपन्न झाला. या ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी सेवा सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर मोघे, पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री मा. पंकजा गोपीनाथ मुंडे, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री रमेश पतंगे, रा.स्व.संघाच्या पर्यावरण गतिविधीचे प्रमुख अभिजित देशपांडे, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे कार्यवाह डॉ.नंदकिशोर जोशी, ‘विवेक’ समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर आदि मान्यवर उपस्थित होते.
 
 
भाजपचे दिवंगत नेते आदरणीय गोपीनाथजी मुंडे यांचा राजकीय वारसा मिळालेल्या व स्वतःच्या कामातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणार्‍या मंंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थितांशी हृद्य संवाद साधला. “संघशताब्दीच्या पार्श्वभूमीवर साप्ताहिक विवेकने प्रकाशित केलेल्या तपस्वी ग्रंथाच्या प्रकाशनात मी सहभागी आहे याचा मला आनंद होत आहे. केवळ राष्ट्रासाठी त्याग आणि समर्पणातून तपस्वी जीवन जगणार्‍या महापुरुषांच्या जीवनचरित्राचा हा ग्रंथ भावी पिढीला प्रेरणा देणारा आहे.“ अशा शब्दांत त्यांनी तपस्वी ग्रंथाच्या निमिर्तीविषयी गौरवद्गार काढले. यावेळी त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी गृहस्थी प्रचारक म्हणून केलेल्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की,“बाबांनी त्यांच्या महाविद्यालयीन काळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जनसंघाच्या विचारसरणीपासून प्रेरणा घेऊन आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचा ग्रामीण भागात विस्तार करण्यासाठी आणि पक्ष मजबूत करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.”
हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी आपल्या भाषणात संघ प्रचारकांच्या आठवणींना उजाळा देतांना, स्व. गोपीनाथजी मुंडे आणि सा. विवेकचे कसे जिव्हाळ्याचे संबंध होते. याची उदारहरणे दिली. आपल्या कार्यकाळात स्व.मुंडे यांनी ‘सा. विवेक’ला वेळोवेळी मदत केली आहे याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. सामाजिक समरसता विषयातसुद्धा मुुंडे जातीने लक्ष घालून विविध कार्यक्रमांना मदत करायचे, विविध आयामांना प्रोत्साहन द्यायचे असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
 
‘सेवा सहयोग फाउंडेशन’चे अध्यक्ष किशोर मोघे यांचेही प्रसंगोचित भाषण यावेळी झाले.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘सा.विवेक’ डिजिटलच्या बागेश्री पारनेरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ‘सा.विवेक’चे मंत्रालय प्रतिनिधी कृष्णात कदम यांनी केले.