आपले समाजोपयोगी नित्यकर्म हीच साधना आणि कर्तृत्वसंपन्न समर्पित जीवन हेच साध्य अशी जीवनमूल्ये उराशी बाळगत प्रत्यक्ष जगत आलेली अशी ही दुर्मीळ व्यक्तिमत्त्वे हे सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभच आहेत! ज्ञान प्रबोधिनीची समाजात वेगळी ओळख निर्माण करणार्या पिढीची, दुसर्या फळीची ही दोन अग्रणी व्यक्तिमत्त्वे आहेत.
संस्था अथवा संघटना या संस्थापकांच्या पिढीच्या पश्चात दृढपणे उभ्या राहणे, त्यांचा गुणवत्तापूर्ण विस्तार होत राहणे ही काही साधारण सोपी बाब नव्हे. किंबहुना ती काळाने घेतलेली एक कठोर परीक्षाच असते. फार थोड्या मोजक्या संस्था या कसोटीला उतरू शकतात.नुसते भूतकाळाचे वर्णन न करता आपल्या पूर्व लौकिकाला साजेसे काम वर्तमानकाळातही करत राहतात. अशा मोजक्या संस्थांपैकी एक अशी पुण्यातील ’ज्ञान प्रबोधिनी’ ही संस्था आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे संस्था स्थापनेनंतर तेथे उभी राहिलेली तोलामोलाची दुसरी फळी! या दुसर्या फळीचे अग्रणी शिलेदार वि.श. तथा सुभाषराव देशपांडे आणि विश्वनाथ तथा विसुभाऊ गुर्जर याद्वयींनी संस्थेसाठी खूप मोलाचे व भरीव योगदान देत वयाची पंचाहतरी नुकतीच पार केली आहे.
सुरुवातीच्या ’प्रबोधशाळा’ या अनौपचारिक रचनेतून तरुण जाणत्या वयात जोडले गेलेले सुभाषराव देशपांडे आणि विसुभाऊ गुर्जर हे आज सहा दशकानंतरही प्रबोधिनीशी जोडलेले आहेत. विविध जबाबदार्या सक्षमपणे पार पाडत, आपणच घडविलेल्या पुढच्या सक्षम पिढीकडे हा वारसा निर्लेपवृत्तीने सोपवून आता नित्य दैनंदिन कामांमधून हळूहळू निवृत्त होत आहेत. वाट्याला येईल ते काम करत विद्यार्थीदशेतील ’कार्यकर्ता’ या भूमिकेपासून ते अनेक उपक्रमांचे, विभागांचे प्रमुखपद या दोघांनी सक्षमपणे व निष्ठापूर्वक अनेक वर्षे सांभाळले. ज्ञान प्रबोधिनीच्या मध्यवर्ती रचनांची मोठ्या जबाबदारीची पदेही अत्यंत समर्थपणे सांभाळली. तरुण पिढीची वैचारिक जडणघडण करणे, प्रत्यक्ष कामाची जबाबदारी घेणार्या पुढील कार्यकर्त्यांचा संच उभा करणे हे त्यांचे प्रबोधिनीतील योगदान अनन्यसाधारण आहे! लौकिकरीत्या प्रापंचिक जीवनाचा सरधोपट मार्ग न स्वीकारता त्यांनी अविवाहित राहून परिव्राजक वृत्तीने आयुष्यभर श्रद्धापूर्वक काम केले व प्रबोधिनीचे आजचे जनमानसातील स्थान निर्माण करण्यात मोठे योगदान दिले.
विसुभाऊ गुर्जर - बहुआयामी व्यक्तिमत्त्व
विसुभाऊ यांचे वडील हे पुण्यातील ऐतिहासिक ‘खुन्या मुरलीधर मंदिरा’मध्ये प्रवचनकार होते. पुण्यातील निष्णात कीर्तनकार म्हणूनही ते प्रसिद्ध होते. यातून विसुभाऊ यांच्यावर आध्यात्मिकतेचे संस्कार बालवयातच झाले. लवचीक शरीरामुळे मोठ्या बंधूंप्रमाणे विसुभाऊ हेही जिम्नॅस्टिक्समध्ये विशेष गती व प्रावीण्य असलेले होते. पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात (नूमवि) त्यांचे शालेय शिक्षण झाले. या दरम्यान 1963मध्ये प्रबोधशाळेच्या माध्यमातून ते ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक वं.आप्पासाहेब पेंडसे यांच्या निकट संपर्कात आले व त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. ठरवून कला शाखेत प्रवेश घेत त्यांनी फर्ग्युसनमधून शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी कोयना भूकंपात प्रबोधिनीने भूकंपग्रस्तांसाठी केलेल्या मदतकार्यात ते हिरीरीने सहभागी झाले. सलगपणे तिथे राहिले होते.
संगीताचे शास्त्रशुद्ध धडे गिरवलेल्या विसुभाऊंनी प्रबोधिनीत अनेक पद्यांना चाली लावल्या व त्या विद्यार्थ्यांना, कार्यकर्त्यांना शिकविल्या. अभंगही ते अत्यंत भावपूर्णरीतीने गात असत. संस्कृतमधील प्रावीण्य व त्या भाषेचे जाणकार हीदेखील विसुभाऊ यांची एक वेगळी ओळख आहे. संस्कृतमधील ‘सिद्धांतकौमुदी’ या व्याकरणविषयक ग्रंथाचे त्यांनी व्यासंगपूर्वक अध्ययन केले होते. एम.ए.ला पुणे विद्यापीठात संस्कृत विषयात सुवर्णपदकासह प्रथम क्रमांक पटकावणार्या विसुभाऊ यांनी प्रशालेत 25 वर्षे संस्कृतचे अध्यापन करत चार वर्षे प्राचार्यपदही भूषविले होते. त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये पैकीच्यापैकी मार्क मिळविले, यात विशेष ते काय? ज्ञान प्रबोधिनीच्या ’संत्रिका’ विभागाचे नेतृत्व करताना अनेक संस्कार पोथ्यांचे त्यांनी अधिकारवाणीने कालसुसंगत संपादन केले. नवीन भरही घातली. स्त्रियांनी फक्त संस्कृत शिकण्यापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता पौरोहित्यही केले पाहिजे, असे त्यांना वाटत असे. त्यासाठी अनेक स्त्री पुरोहितांना त्यांनी प्रोत्साहन व शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही दिले.
आपल्या कारकिर्दीतील अंतिम टप्प्यात त्यांनी कामाची गरज म्हणून प्रबोधिनीच्या हिशेब व्यवस्थापनाची अर्थात लेखा विभागाची गुंतागुंतीची, काहीशी किचकट अशी जबाबदारी स्वीकारली व लीलया निभावली. यातील औपचारिक शिक्षणाचा गंध नसतांनादेखील अनेक बारकावे शिकत त्यांनी यातही गती प्राप्त केली व दोन तपांहून अधिक काळ या विभागाचे प्रमुखपद सांभाळले. प्रदीर्घकाळ म्हणजे 29वर्षे त्यांनी ज्ञान प्रबोधिनीचे सहकार्यवाह म्हणूनही कार्य केले आहे. असे असले तरी त्यांचा स्वाभाविक पिंड हा चिंतकाचा आहे. महाविद्यालयीन काळापासून त्यांचा योगी अरविंदांच्या तत्त्वज्ञानाकडे ओढा होता. त्याचे ते नित्य अभ्यासक व चिंतक आहेत. आजही याबाबतचा एक अभ्यासगट ते आवडीने चालवितात. विद्यार्थीदशेत असतांना 1974मध्ये दीड महिना ते पाँडिचेरी आश्रमात जाऊनही राहिले आहेत.
सुभाषराव देशपांडे यांचा समृद्ध जीवनप्रवास
पुण्यातील शुक्रवार पेठेत राहणारे सुभाषराव देशपांडे हे घराजवळील सरस्वती मंदिर प्रशालेचे विद्यार्थी होते. प्रबोधशाळेत येण्याच्या निमित्ताने त्यांचा ज्ञान प्रबोधिनीशी 1965मध्ये संपर्क आला. तोच आयुष्याला निर्णायक वळण लावणारा ठरला. हा ऋणानुबंध आजतागायत टिकून आहे हे विशेष! शाळेत असतांना ते खो-खोचे पट्टीचे खेळाडू होते.गो.नी.दांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या रायगड मोहिमेत ते सहभागी झाले होते. पुढे प्रबोधिनीतर्फे कल्याण गावात बांधलेल्या दगडी बंधार्यासाठीच्या श्रमदान कार्यात ते महाविद्यालयात असतांना सहभागी झाले होते. विसुभाऊ यांच्याप्रमाणे एक वर्ष तेदेखील वं.आप्पासाहेब पेंडसे यांच्या घरी राहिले होते. समाजशास्त्रातील एम.ए. ही पदवी त्यांनी पुणे विद्यापीठातून तृतीय क्रमांक प्राप्त करत मिळवली तर एम.बी.ए. ही पदवी विद्यापीठातून प्रथम क्रमांक प्राप्त करत मिळविली. याच दरम्यान त्यांनी खेड शिवापूर येथील दारुबंदी आंदोलनात हिरीरीने सहभाग घेतला. दारू गाळणार्या कंजारभाटांच्या हिंसक आव्हानालाही न डगमगता सामोरे गेले.
फक्त देणगीदारांवर अवलंबून न राहता प्रबोधिनी ही आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाली पाहिजे या भूमिकेतून 1970च्या सुमारास प्रबोधिनीत विद्युतधारक(कपॅसिटर)निर्मिती व विक्रीचा उपक्रम चालू झाला. तांत्रिक विषयातले औपचारिक शिक्षण घेतलेले नसले तरी सुभाषराव यांनी अल्पावधीत कामाचे सर्व बारकावे आत्मसात करून पुढील सात वर्षे याचे उत्पादनप्रमुख म्हणून काम पाहिले. त्यानंतर प्रबोधिनीच्या वेल्हे तालुक्यातील खांडसरी साखर कारखान्याच्या धाडसी प्रयोगात ते चार वर्षे सहभागी झाले. पाठोपाठ शिवापूर येथील यंत्रशाळेत ते जवळपास एक तप जबाबदारीपूर्वक सक्रिय होते. काही काळ प्रबोधिनीतील मुद्रण विभागाचेही प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले. या सर्व उद्योगांच्या भरभराटीचा काळही त्यांनी अनुभवला आणि आक्रसत जाणार्या अप्रिय काळालाही तेच सामोरे गेले. कोर्टकचेर्या, कामगारांचा राग व नाराजी पत्करत हे सर्व उद्योग मूळ न्यासाच्या शैक्षणिक कामावर प्रतिकूल परिणाम न होऊ देता विधिवत बंद करण्याचे दीर्घकालीन चिवट काम त्यांनी न कंटाळता हातावेगळे केले! सलग 28 वर्षे ज्ञान प्रबोधिनीच्या कार्यवाह पदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.
ग्रामीण विकासाच्या कामांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम केले. पंचवीसहून अधिक वर्षे त्यांचा ’ग्रामीण भागातील पाणीप्रश्न’ हा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. पिण्याच्या पाणी प्रश्नाबाबत व शेतीसाठी पाणीवापर संस्था स्थापन करण्याबाबत त्यांनी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी आवडीने अनेक वर्षे भटकंती केली आहे. उद्योजकता हा विषय प्रबोधिनीच्या ग्रामीण कार्यात रूजण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे प्रयत्न केले. विशेषतः सामाजिक उद्योजकता हा त्यांचा सध्याचा आवडीचा व चिंतनाचा विषय आहे.
आपले समाजोपयोगी नित्यकर्म हीच साधना आणि कर्तृत्वसंपन्न समर्पित जीवन हेच साध्य अशी जीवनमूल्ये उराशी बाळगत प्रत्यक्ष जगत आलेली अशी ही दुर्मीळ व्यक्तिमत्त्वे हे सामाजिक क्षेत्रातील दीपस्तंभच आहेत! ज्ञान प्रबोधिनीची समाजात वेगळी ओळख निर्माण करणार्या पिढीची, दुसर्या फळीची ही दोन अग्रणी व्यक्तिमत्त्वे आहेत. संस्थाजीवन समृद्ध करणारी ही ऋषितुल्य व अनुकरणीय व्यक्तिमत्त्वे समाजातील विविध संस्थानांही निश्चितपणे मार्गदर्शक व प्रेरक ठरणारी आहेत.