स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिन हे आपण राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे केले पाहिजेत. हे उत्सव साजरे करताना ज्याप्रमाणे आपण सर्वजण श्रद्धापूर्वक एकत्र येऊन धार्मिक उत्सवांचे पावित्र्य जपतो, तेथे राजकारण आणत नाही. तशीच मनस्थिती या राष्ट्रीय उत्सावांप्रती आपली तयार झाली पाहिजे. ही काळाची गरज आहे.
आपल्या उद्देशिकेचे अंतिम शब्द,‘आमच्या संविधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.’ असे आहेत. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस देशभर ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो. या संविधान दिनाचा कसा विचार करावा लागतो, हे आपण या लेखात पाहूया.
त्यासाठी शेवटच्या परिच्छेदातील काही शब्दांचा आपण विचार करूया. ‘आमच्या संविधानसभेत’ या दोन शब्दांचा कोणता अर्थ होतो, हे समजून घेण्यासाठी उद्देशिकेच्या पहिल्या शब्दांकडे जावे लागेल. पहिले शब्द आहेत,‘आम्ही भारताचे लोक’. म्हणून ‘आम्ही भारताचे लोक आमच्या संविधानसभेमध्ये’ अशा प्रकारे हे वाक्य वाचावे लागते.
पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच या उद्देशिकेचा मसुदा तयार केला. या मसुद्यात ते असे म्हणत नाहीत की, मी भीमराव रामजी आंबेडकर हे संविधान भारतीय जनतेला अर्पण करीत आहे. ते म्हणतात,‘आम्ही भारताचे लोक...आमच्या संविधानसभेत...वगैरे’
संविधान निर्मितीचे सर्व श्रेय भारतीय जनतेला देण्याचे फार मोठे कारण आहे. ते कारण असे की, देशाचे संविधान हे देशातील सर्व जनतेच्या सामूहिक इच्छा आणि आकांक्षाचे प्रतिबिंब असते. संविधान म्हणजे दोन-चार लोकांच्या मनात आलेल्या संकल्पनांचे प्रतिबिंब नव्हे. साहित्यकाराची कांदबरी, नाटक, कविता ही त्याची स्वतःची असते. संविधानाचे तसे नसते. संविधान हा जसा सर्वोच्च कायदा असतो, त्याप्रमाणे प्रत्येक संविधान हे सर्वोच्च जीवनमूल्यांवर आधारित असते. ही मूल्ये संस्कृतीतून येतात. ती निर्माण करण्याचे श्रेय एखाद-दुसर्या व्यक्तीला देता येत नाही. जेव्हा बाबासाहेब असे म्हणतात की, ‘आम्ही भारताचे लोक’ तेव्हा त्याचा अर्थ होतो की, हजारो वर्षांपासून प्राप्त झालेली जीवनमूल्ये जगणारे आम्ही भारताचे लोक आहोत.
अशा लोकांची संविधानसभा आहे. या संविधानसभेची निर्मिती 1946ला झाली. फाळणीपूर्व संविधानसभेत 389सभासद होते. त्यातील 296 ब्रिटीशशासित भारतातील होते आणि 93 संस्थानिकांचे प्रतिनिधी होते. फाळणीचा निर्णय झाल्यानंतर संविधानसभेची सदस्य संख्या 299 झाली. त्यात 229 सभासद ब्रिटीशशासित भारतातील आणि संस्थानिकांचे प्रतिनिधी 70 होते. या संविधानसभेचे कामकाज दोन वर्षे, अकरा महिने, अठरा दिवस चालले. संविधानसभेच्या चर्चेसाठी प्राथमिक संविधानाचा मसुदा बेनेगल नरसिंह राऊ यांनी तयार केला. त्यावर 165 दिवस चर्चा झाली. या चर्चेतून जे विषय पुढे आले, त्याधारे संविधानिक कलमांचे पुनर्लेखन म्हणजे ड्राफ्टिंग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. म्हणून आज जे संविधान आपल्यापुढे आहे, त्याच्या निर्मितीचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना देण्यात येते.
उद्देशिकेतील शेवटच्या परिच्छेदातील पुढील महत्त्वाची वाक्ये अशी,‘याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत’. यातील ‘अंगीकृत’ आणि ‘अधिनियमित’ या दोन शब्दांचा विचार करू. अंगीकृत याचा सामान्य अर्थ ‘स्वीकारीत आहोत’ आणि खोलवरचा अर्थ ‘जीवनाचा अविभाज्य भाग बनवीत आहोत’. याला अंगागीभाव म्हणतात. हात, पाय, कान, डोळे वगैरे अवयव शरीराचे भाग असतात, तसे हे संविधान आमच्या सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनाचे अंग आहेत. म्हणजे आम्ही ते अंगीकृत करीत आहोत.
पुढचा महत्त्वाचा शब्द आहे,‘अधिनियमित’ करीत आहोत. अधिनियमित याचा अर्थ या संविधानाला कायद्याचा दर्जा देत आहोत. कायद्याचा दर्जा कोण देणार आहेत?, उत्तर आहे,‘आम्ही भारताचे लोक‘. त्याचा अर्थ असा होतो की, कायद्याचा उगम आम्ही भारतीय लोक यांच्या इच्छाशक्तीतून होतो. कायद्याचा उगम अन्य कुणाकडून होत नाही. एकेकाळी कायद्याचा उगम राजाकडून होत असे आणि तो म्हणत असे की, मी ईश्वराचा प्रतिनिधी आहे, म्हणून माझा कायदा हा देवाचा कायदा आहे. ही संकल्पना आपले संविधान स्वीकारीत नाही.
अंगीकृत आणि अधिनियमित करीत आहोत, याचा आणखी एक अर्थ असा होतो की, आम्ही प्रजातंत्र स्वीकारणारे लोक आहोत. प्रजातंत्रामध्ये सर्व सत्तेचा उगम ही प्रजा असते. सार्वभौमत्व प्रजेकडे असते. त्या प्रजेने निर्माण केलेला संविधानिक कायदा लोकशाही पद्धतीने म्हणजे सर्वानुमते, बहुमताने नव्हे तर सर्वमताने स्वीकृत झालेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. बहुमत, अल्पमत, एकमत, सार्वमत असे अनेक शब्द आहेत. जेव्हा आपण म्हणतो की,‘आम्ही भारताचे लोक..हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करीत आहोत, तेव्हा ते सर्वांचे मत होते.
पुढचे शब्द आहेत,‘स्वतःप्रत अर्पण करीत आहोत’. त्याचा अर्थ असा होतो की, या संविधनाचे निर्माते आम्हीच आहोत आणि हे संविधान आम्ही आमच्यासाठीच निर्माण केलेले आहे. हे संविधान इतर कोणत्याही मानवसमाजासाठी निर्माण केलेले नसून ते आमच्यासाठीच आम्ही केलेले आहे. लौकिक जीवनातील उदाहरण घ्यायचे तर आपण जमीन विकत घेतो आणि त्या जमिनीवर घर बांधतो. ते घर इतर लोकांसाठी नसते, तर ते आपल्या परिवारासाठी सुखाने राहण्यासाठी असते. तसे हे संविधान आम्ही स्वतःप्रत अर्पण करीत आहोत, म्हणजे ते अर्पण करून आम्हालाही आमच्या घरात म्हणजे आमच्या देशात सुखासमाधानाने आणि आनंदाने राहायचे आहे.
आम्हीच त्याचे निर्माते असल्यामुळे या संविधानाचे रक्षण करणे, संवर्धन करणे, कालानुरूप त्यात सुधारणा करणे ही सर्व जबाबदारी आमचीच आहे. आम्ही सार्वभौम आहोत, म्हणजे आम्ही आमचे मालक आहोत. एवढी मोठी जबाबदारी एका सार्वभौमत्वाने आपल्या खांद्यावर येते. जबाबदारीचे पालन कर्तव्यभावनेने करावे लागते. सारासार विवेकशक्ती जागी ठेवावी लागते. संविधानासंबंधी निरंतर जागरूक रहावे लागते.
संविधानाविषयी वेगवेगळ्या राजकीय चर्चा चालू असतात, त्या रोखणे अशक्य आहे. मग शक्य काय आहे, तर सर्व चर्चा शांतपणे ऐकून घेतल्या पाहिजेत आणि त्याचा निर्णय आपला आपण केला पाहिजे. अमुक नेता मला आवडतो, अमुक पक्ष मला आवडतो, म्हणून त्यांचे म्हणणे मी प्रमाण मानणार असा विचार म्हणजे स्वत:चे सार्वभौमत्व गंगार्पण करण्यासारखे आहे. म्हणून अंगीकृत आणि अधिनियमित करीत आहोत, याच्या अर्थाचा सातत्याने विचार करीत राहिले पाहिजे.
आपण जे संविधान निर्माण केले आहे, त्याने स्वतंत्र न्यायपालिका, मूलभूत अधिकार, मूलभूत अधिकाराच्या रक्षणाची व्यवस्था, देश चालविण्याची राज्यपद्धती, देशाचे स्वरूप, देशाचा राष्ट्रध्वज, राष्ट्रगान, राष्ट्रभाषा, इ. अनेक विषय निश्चित केले आहेत. आणि जेव्हा आपण म्हणतो की, हे संविधान आम्ही अंगीकृत आणि अधिनियमित करीत आहोत, तेव्हा वर दिलेल्या सर्व संकल्पना आपण स्वीकारीत आहोत. नुसत्या स्वीकारीत आहोत असे नसून त्या आमच्या राष्ट्रीय जीवन जगण्याच्या भाग करीत आहोत, हे लक्षात ठेवायला पाहिजे.
संविधान दिवस हा गंभीरपणे साजरा करण्याचा दिवस आहे. आपण वृत्तीने धर्मप्रधान लोक आहोत, त्यामुळे आपल्या गावच्या देवीची यात्रा, गणेशचतुर्थी, चारधाम यात्रा, तसेच बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन, मुसलमान, या धर्मगटांच्या धार्मिक यात्रा-विधी यांचे पालन आपण काटेकोरपणे करीत राहतो, तो आपला स्वभाव आहे.
कालानुरूप त्यात आता काही नवीन गोष्टींची भर घातली पाहिजे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिन हे आपण राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरे केले पाहिजेत. हे उत्सव साजरे करताना ज्याप्रमाणे आपण सर्वजण श्रद्धापूर्वक एकत्र येऊन धार्मिक उत्सवांचे पावित्र्य जपतो, तेथे राजकारण आणत नाही. तशीच मनस्थिती या राष्ट्रीय उत्सावांप्रती आपली तयार झाली पाहिजे. ही काळाची गरज आहे. आणि काळानुसार बदलत जाणे, तसेच नवीन संकल्पनंचा स्वीकार करणे हे देखील आपल्या रक्तबीजात आहे. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधानिक पावित्र्याचा दिवस म्हणून सर्वत्र साजरा व्हावा, अशी अपेक्षा केल्यास ती चूक आहे असे म्हणता येणार नाही.