बुलढाणा ः दि. 13 नोव्हेंबर 2026 रोजी खामगाव (बुलढाणा) येथे साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून दीपावली मिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी साप्ताहिक विवेकच्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ’क्रीडा भारती’चे अखिल भारतीय अधिकारी प्रसन्न हरदास उपस्थित होते; तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खामगाव जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे उपस्थित होते. तसेच ’साप्ताहिक विवेक’चे पालक डॉ. दीपक पाचपोर व विभाग प्रतिनिधी दत्तात्रय कंझारकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. दत्तात्रय कंझारकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविकामध्ये विवेकचा वाटचालीचा आलेख सादर केला व घरोघरी विवेक असावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे विवेक वाढीसाठी ‘पालक योजना‘ कशी असते हेसुद्धा त्यांनी समजावून सांगितले.
प्रसन्न हरदास यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक उदाहरणे देऊन विवेकची वाढ कशी होऊ शकते, हे उपस्थितांना समजावून सांगितले व घरोघरी विवेक पोचविण्याकरिता आपण सर्वांनी कसे सहकार्य व प्रयत्न करावे हेसुद्धा सांगितले.
सा. विवेकचे पालक डॉ.दीपक पाचपोर यांनी सा. विवेकचा आगामी ‘समर्थ भारत, विकसित भारत-भविष्य वेध 2047‘ या ग्रंथाबाबत माहिती दिली. या ग्रंथातून काय काय साहित्य प्राप्त होणार आहे, हे विस्तृत सांगितले. त्याचबरोबर विवेक वाढीसाठी कसे प्रयत्न आम्ही करतो हेसुद्धा त्यांनी सांगितले. तसेच सा. विवेक कसा घरोघरी पोहोचेल यासाठी सुद्धा प्रयत्न करीत असतो असेही याप्रसंगी सांगितले.
बाळासाहेब काळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, सर्वांच्या घरी ’सा.विवेक’चा अंक असला पाहिजे. याकरिता सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
या कार्यक्रमांमध्ये ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, ’क्रीडा भारती’, ’अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’, ’बजरंग दल’, ’विश्व हिंदू परिषद’, ’राष्ट्रसेविका समिती’, ’भारतीय जनता पार्टी’, ’भारत विकास परिषद’, ’विद्याभारती’ अशा परिवारातील सर्व शाखांचे पदाधिकारी ’साप्ताहिक विवेक’चे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरेश कुळकर्णी यांनी केले; तर आभार प्रदर्शन माजी प्राचार्य किरणजी नगरनाईक यांनी केले.