चौदाव्या शतकातील समाजजीवनाचा आरसादत्तभक्तांची कामधेनू - श्रीगुरुचरित्र

विवेक मराठी    27-Nov-2026   
Total Views |

Shri Gurucharitra
भारतीय ज्ञान परंपरेतील बहुतेक सर्वच ग्रंथ हे संवादरूप आहेत. याला ’गुरुचरित्र’ ही अपवाद नाही. गुरुचरित्र हा ‘संवादात्मक ओवीबद्ध’ ग्रंथ आहे. सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातून तो अक्षररूप झालेला आहे. गुरुचरित्र म्हणजे ’केवळ चमत्कार कथा’ असा अनेकांचा समज आहे; परंतु तो चौदाव्या व पंधराव्या शतकातील महाराष्ट्र समाजजीवनाचा आरसा आहे. त्याकाळात वर्णानुसार समाज आपली विहित कर्मे करीत होता. विविध कारणांनी दुभंगलेल्या समाजाला श्रीगुरुचरित्राने एक केले. अशा श्रीगुरुचरित्राच्या मूळ उगमाविषयी जाणून घेतलेच पाहिजे.
चौदाव्या शतकातील मध्ययुगीन साहित्यातील एक अनन्य ग्रंथ म्हणून ‘सरस्वती गंगाधर’ लिखित ‘श्रीगुरुचरित्र’ ओळखला जातो. बहमनी बादशहाच्या बिकट राजवटीत हिंदू आचारधर्मांचे पालन व रक्षण करण्याचे ऐतिहासिक कार्य या ग्रंथाद्वारे घडलेले आहे. चौदाव्या शतकातील मराठी ओवीचे स्वरूप दर्शन या ग्रंथातून होते. हा ग्रंथ सांप्रदायिक श्रद्धावंतांना वेदासारखा पूज्य असून भक्ताच्या मनोकामना पूर्ण करणारा ’कल्पवृक्ष’, ’कामधेनू’ अशी या ग्रंथाबद्दल श्रद्धा दिसून येते. भगवान दत्ताचे प्रथम अवतार श्रीपादश्रीवल्लभ आणि द्वितीय अवतार नृसिंहसरस्वती या विभूतींच्या चमत्कारांनी भरलेल्या चरित्रलीला, हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. 53 अध्यायाचा हा ग्रंथ सरळ, साध्या, प्रासादिक अशा 7385 ओव्यांचा आहे. या ग्रंथाचा लेखक कन्नड भाषिक होता, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
अंतःकरण असता पवित्र।
सदा वाचावे गुरुचरित्र॥
मध्ययुगीन काळामध्ये मराठी भाषेत अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यातील बहुसंख्य ग्रंथ हे पारमार्थिक, आध्यात्मिक विषयावरील आहेत. विविध धर्मसंप्रदाय व पंथांच्या कडून ते लिहिले गेले. महाराष्ट्र भूमीत ’नाथ संप्रदाय’, ’महानुभाव’ आणि ’वारकरी’ या तीन प्रमुख भक्तिसंप्रदायांबरोबरच ’श्रीदत्त संप्रदाय’पण भक्तिप्रचारार्थ कार्यरत आहे. खरे तर भगवान दत्तात्रेयांची भक्ती प्राचीन काळापासून होत होतीच, बाराव्या शतकात महानुभाव पंथांच्या पंडितकवींनी इष्टदेवता श्रीकृष्णाबरोबरच भगवान दत्तात्रय यांचेही गुणगान भक्ती केलेली आहे; पण श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेने दत्त संप्रदायाचे संघटन अधिक सुदृढ झाले. श्रीपाद श्रीवल्लभ यांची भगवान दत्तात्रेयांचा प्रथम अवतार आणि नृसिंहसरस्वती यांचा दत्ताचा द्वितीय अवतार म्हणून श्रद्धावंतांच्या मनमंदिरात स्थापना झाली. अशा दोन दिव्य अवतारी सत्पुरुषांच्या साक्षात्कारी जीवनाचे ‘गुरुचरित्र’ रूपात अक्षर दर्शन ‘सरस्वती गंगाधर’ या अनुग्रहीत लेखकाने केले. विशेष गोष्ट म्हणजे ग्रंथ लेखक ‘सरस्वती गंगाधर’ हा कन्नड भाषी आहे, मराठी नीट येत नसल्याचा स्पष्ट उल्लेख त्याने स्वतःच ग्रंथात केलेला आहे. तो ग्रंथ दत्तसांप्रदायिकांचा गीता-भागवतासारखा परमपावन ग्रंथ मानला जातो. एवढेच नव्हे तर त्या ग्रंथाला दत्तभक्तांचा ‘वेद’ असे अत्युच्च स्थान आहे.
 
तत्कालिन समाज जीवनाचा आरसा
गंगाधराचा नंदन। सरस्वती विनवी नमून।
ऐका तुम्ही समस्त जन। भजा भजा हो श्रीगुरुसी॥
 
‘श्रीगुरुचरित्राचे’ ज्ञानेश्वरीप्रमाणेच दत्तभक्त तीन दिवसांत, सात दिवसांत पारायण करतात. ही पोथी मराठी साहित्यातील चौदाव्या शतकातील ओवीचे रूप दर्शवते. तसेच त्या काळातील समाजजीवन, त्यांच्या धार्मिक कल्पना, आचार, श्रद्धा-विश्वास यांचे या ग्रंथात नेमकेपणाने शब्दचित्रण केलेले आहे. ‘गुरुचरित्र’ लेखक गंगाधर सरस्वती हे श्रीनृसिंहसरस्वती यांचे पट्ट शिष्य सायंदेवांचे पणतू होते. श्रीनृसिंहसरस्वती यांच्या समाधीनंतर सुमारे 100 वर्षांनी त्यांचे ओवीबद्ध चरित्र लिहिण्याची प्रेरणा ‘सरस्वती गंगाधर’ यांना झाली आणि गुरुकृपेनेच त्यांच्या हातून ‘गुरुचरित्र’ पोथीचे लेखन झाले. ‘सरस्वती गंगाधर’ हे ग्रंथकाराचे नाव नसून ते त्याने श्रद्धेने स्वीकारलेले नाव आहे. या नावातील पहिले ‘सरस्वती’ हे नाव नृसिंहसरस्वतींचे आहे तर दुसरे ‘गंगाधर’ हे नाव लेखकाच्या वडलांचे आहे. वडील हेच लेखकाचे गुरू आहेत. लेखकाचे अडनाव साखरे आहे. चौदाव्या शतकाच्या उत्तरकाळात ही पोथी लिहिली गेली असावी, असे इतिहासकारांचे मत आहे. पोथीचा अधिकृत लेखन काळ पोथीत नमूद नाही म्हणून तो विषय विवादास्पद आहे.
‘गुरुचरित्र’ पोथीचे स्वरूप
‘श्रीगुरुचरित्र’ ही ओवीबद्ध पोथी 52 अध्यायांची आहे. काही प्रतींमध्ये त्रेपन्नावा अध्याय जोडल्याचेही आढळते. त्रेपन्नावा अध्याय ’अवधूत कथा’ म्हणून आहे. तो सर्व प्रतींत समाविष्ट दिसत नाही. या ग्रंथाची ओवी संख्या सुमारे 7,385 आहे. गुरुचरित्र पारायणाच्या दोन पद्धती दिसतात. काही जण 52 अध्यायाच्या, तर काही जण 53 अध्यायांच्या पोथीचे पारायण करतात. गुरुचरित्रातील पहिला अध्याय मंगलाचरणाचा प्रास्ताविक स्वरूपाचा आहे. त्यामध्ये परंपरेनुसार प्रथम गणेश वंदना, मग सरस्वती नमन आणि नंतर श्रीगुरुस्तुती असा क्रम आहे. पहिले नऊ अध्याय श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्रलीला असून अकराव्या अध्यायापासून 52 अध्यायापर्यंत श्रीनृसिंहसरस्वती यांचे चरित्र विविध कथांच्या द्वारे वर्णित केलेले आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म इ.स.1320मध्ये आंध्रप्रदेशातील पीठापूर येथे झाला. ते उपजत ज्ञानी असेे दिव्य बालक होते. उपनयन (मुंज) संस्कार होताच त्यांनी घर सोडले आणि तपाचरण करीत भक्तिप्रचार केला, धर्म रक्षण केले. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी, श्रीशैल्यम ज्योतिर्लिंग क्षेत्रात कर्दळीवनातील कुरवपूर येथे ते अंतर्धान पावले अशी लोकश्रद्धा आहे. त्यांनीच साधकांना ‘दिगंबरा दिगंबरा....’ हा नामजप मंत्र दिला.
गुरुचरित्राचे दुसरे नायक म्हणजे ‘नृसिंहसरस्वती’. त्यांचे मूळ नाव नारायण. त्यांचा जन्म इ.स.1378च्या सुमारास विदर्भातील कारंजा (लाड) येथे झाला. ते जन्मतः मुके होते. ॐकार म्हणताच त्यांना वाचा प्राप्त झाली. त्यांनी आठव्या वर्षी काशीक्षेत्री ‘श्रीकृष्ण सरस्वती’ यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली. त्यानंतर ते नारायणचे ‘नृसिंह सरस्वती’ झाले. भारत भ्रमण करून ते महाराष्ट्रात ‘गाणगापूर’, ‘औदुंबर’, ‘वाडी’ या गांवी रमले. त्यांनी सुमारे 80 वर्षे दत्तभक्ती, साधनेचा प्रचार केला. इ.स.1458मध्ये कर्दळीवनात ते अंतर्धान पावले. या दोन दत्तावतारी सत्पुरुषांबद्दल थोडक्यात सांगायचे तर श्रीपाद श्रीवल्लभ यांनी दत्तभक्तीचा पाया रचला आणि नृसिंहसरस्वती यांनी त्यावर कळस चढविला.
या दोन्ही संतांची चरित्रे अनेक अतर्क्य चमत्कार कथांनी भरलेली आहेत. त्या कथालीला गुरुचरित्रात सरस्वती गंगाधर यांनी भक्तिभावाने वर्णिलेल्या आहेत. हे चमत्कार त्यांनी केले नसून ती त्यांची तपपूर्ती अशी सहज क्रिया आहे. त्या घटनांमागचा कार्यकारणभाव न समजल्याने ते चमत्कार वाटतात; पण या चमत्कार कथांमागील आशय महत्त्वपूर्ण आहे असे म्हणतात. त्या कथांपेक्षा त्यामागील सामाजिक मूल्ये जतन, रक्षण करणारा आशय समजून घेतला तर गुरुचरित्र हे नित्यनूतन आहे.
सिद्ध म्हणजे नामधारकासी।
अपूर्व झाले परियेसी।
गुरुचरित्र विस्तारेसी। सांगता संतोष होत असे॥
गुरुचरित्र हा ‘संवादात्मक ओवीबद्ध’ ग्रंथ आहे. सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातून तो अक्षररूप झालेला आहे. भारतीय ज्ञान परंपरेतील बहुतेक सर्वच ग्रंथ हे संवादरूप आहेत.
गुरुचरित्राचे महत्त्व व समज
गुरुचरित्र म्हणजे केवळ चमत्कार कथा असा अनेकांचा समज आहे; परंतु चौदाव्या व पंधराव्या शतकातील महाराष्ट्र समाजजीवनाचा तो आरसा आहे. तेव्हा महाराष्ट्र धर्मांध मुस्लीम बादशहांच्या पारतंत्र्यात आहे. हिंदूंच्या पूजापाठ, भजन, पारायणे, यात्रा, उत्सव यांवर सार्वजनिक बंदी होती. कडक निर्बंध होते. धार्मिक उत्सव व यात्रासाठी बादशहाला जबर कर द्यावा लागत असे. त्यामुळे हळूहळू हिंदू समाज धर्माचरणापासून दूर गेला होता. धर्माच्या खर्‍या सात्विक रूपाचा लोप पावून बहुसंख्य समाज पीर-फकिरांच्या नादी लागून अंधश्रद्ध झालेला होता. अशा काळात वर्ण, धर्म, व्यवस्थेचे रक्षण करण्याचे कार्य गुरुचरित्राने केले. त्यावेळी वर्णव्यवस्था हा समाजव्यवस्थेचा मुख्य भाग होता. वर्णानुसार समाज आपली विहित कर्मे करीत होता. वर्ण होते; पण त्यात सामाजिक सलोखा होता, द्वेष नव्हता. विविध कारणांनी दुभंगलेल्या समाजाला गुरुचरित्राने एक केले. समाजात सौहार्द निर्माण करून आत्मविस्मृत समाजात नामभक्ती, साधनेचे बीजारोपण केले. ज्या सर्वसामान्य वर्गाकडे पैसा नाही, शिक्षण नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही; कोणा राजाचे वा इष्टमित्र आप्तांचा आधार नाही अशा निराधार, निराश्रित आणि असाहाय्य हतबल समाजातील धर्मबांधवांमध्ये गुरुचरित्राने ‘गुरू हाच एकमेव आधार’ असा विश्वास जागवला आणि स्वत्वबोध करून कर्मरत केले.
गुरू संकल्पनेचे माहात्म्य, मनाचे स्वास्थ्य, स्थैर्य, नैतिक मूल्याची गरज, कर्माकर्म विवेक या गोष्टीचे गुरुचरित्रातून सदैव मार्गदर्शन लाभू शकते. तरी समाजात स्त्रियांनी हा ग्रंथ वाचावा का? याबद्दल विवादास्पद मतमतांतरे आहेत. या ग्रंथातील कथांमध्ये वर्णभेदाचे ठायी ठायी होणारे दर्शन, प्रतिपादन आजच्या आधुनिक सामाजिक समतेच्या दृष्टीने प्रतिगामी आहे, असेही अभ्यासकांचे मत आहे. असे बरेच आक्षेप चर्चेत असले तरी गुरुचरित्र नित्य वाचणार्‍यांची-पारायण करणार्‍यांची संख्या खूप मोठी आहे. कदाचित चमत्काराविषयी असलेले सकल समाजातील अनाकलनीय कुतूहल, आकर्षण या गोष्टीसुद्धा गुरुचरित्राच्या लोकप्रियतेची कारणे असू शकतात, असे समीक्षक म्हणतात. असो.
गुरुसंस्थेचे, गुरुतत्त्वाचे अगाध माहात्म्य सांगणार्‍या या ग्रंथाने बहमनी बादशहाच्या बिकट काळात हिंदू आचारधर्माचे पालन रक्षण करण्यात बजावलेली भूमिका ऐतिहासिक आहे. मराठी भाषेतील भक्ती साहित्यात या ग्रंथाचे स्थान अनन्य स्वरूपाचे आहे.
लेखक संतसाहित्याचे गाढे अभ्यासक व उपासक तसेच ’साईलीला’ आणि ’एकता’ या मासिकाचे माजी संपादक आहेत.

विद्याधर मा. ताठे

संत साहित्याचे अभ्यासक असून, एकता मासिकाचे माजी संपादक आहेत.