राज्यातील दुष्काळी स्थिती गंभीर असली तरी शेतकरी, शेतमजूर आणि गाव-शहरांच्या पाणीव्यवस्थापनात शासनाने तातडीने पावले उचलली आहेत. राज्याचे मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. ‘जलयुक्त शिवार’ योजनेचा तिसरा टप्पा यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्राच्या विकासाच्या वाटचालीत जलसुरक्षेचा प्रश्न हा केवळ नैसर्गिक आव्हानाचा विषय नाही, तर तो शेतीची उत्पादकता, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि गावांच्या शाश्वत विकासाशी जोडलेला आहे. राज्यात पावसाचे प्रमाण आणि वितरण यांमध्ये मोठी भौगोलिक विषमता आहे. काही भागांत अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो, तर दुसरीकडे पावसातील खंड आणि भूजलसाठ्याची घट यांमुळे वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे महाराष्ट्रापुढील खरे आव्हान केवळ पावसाचे पाणी उपलब्ध होण्याचे नाही, तर उपलब्ध पाण्याचे शास्त्रीय नियोजन, साठवणूक आणि पुनर्भरण करण्याचे आहे.
या आव्हानाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज ओळखून 2015मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ’जलयुक्त शिवार अभियान’ सुरू करण्यात आले. पावसाचे पाणी गावाच्या शिवारातच अडविणे, ते जमिनीत मुरविणे, स्थानिक जलस्रोतांची क्षमता वाढविणे आणि जलव्यवस्थापनात ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग निर्माण करणे, हा या अभियानाचा केंद्रबिंदू होता. जलसंधारणाची कामे शासनाच्या योजनांपुरती मर्यादित न ठेवता त्यांना लोकसहभागाची जोड देण्याचा हा प्रयत्न होता. आज राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत ’जलयुक्त शिवार-3.0’च्या माध्यमातून या विचाराला अधिक व्यापक आणि शास्त्रीय स्वरूप दिले जात आहे.
महाराष्ट्रात पावसाचे वितरण भौगोलिकदृष्ट्या असमान आहे. कोकण आणि सह्याद्रीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो; तर मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांना पावसाच्या अनिश्चिततेचा सामना करावा लागतो. अनेकदा कमी कालावधीत मोठा पाऊस पडतो; मात्र, पाणलोट क्षेत्राचे योग्य नियोजन नसल्यास त्यातील मोठा हिस्सा वाहून जातो. परिणामी, पावसाळ्यानंतर काही महिन्यांतच भूजलसाठ्यांवर ताण निर्माण होतो. विहिरींची पाणीपातळी घटते, सिंचनाची उपलब्धता कमी होते आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कठीण बनते.
2026मध्ये राज्याला पुन्हा गंभीर दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. ’एल निनो’च्या प्रभावामुळे राज्याच्या जवळपास 90% क्षेत्रात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, 358पैकी 310 तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. पिकांचे नुकसान, चार्याची उपलब्धता आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न यांमुळे अनेक भागांमध्ये आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत शासनाला तातडीच्या उपाययोजना कराव्या लागतात. शेतकर्यांना आर्थिक मदत, पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था, चारा उपलब्धता आणि कर्जविषयक सवलती या उपाययोजना आवश्यक असतातच; परंतु अशा उपाययोजनांबरोबरच दुष्काळाची तीव्रता कमी करणारी कायमस्वरूपी जलसंधारण व्यवस्था उभी करणे अधिक महत्त्वाचे आहे.
2012 ते 2015 या काळातील दुष्काळाने राज्यातील जलव्यवस्थापनाच्या मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. अनेक गावांमध्ये पाऊस पडूनही पाण्याची उपलब्धता टिकत नव्हती. पारंपरिक जलस्रोतांची क्षमता कमी झाली होती आणि भूजलावरील अवलंबित्व वाढत होते. या पार्श्वभूमीवर 5 डिसेंबर 2014च्या शासन निर्णयानुसार 2015मध्ये जलयुक्त शिवार अभियान सुरू करण्यात आले. पाच वर्षांत 25 हजार गावे जलपरिपूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले.
’शिवारातील पाणी शिवारात’ हे या अभियानाचे मूलभूत सूत्र होते. नाला खोलीकरण आणि रुंदीकरण, सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, शेततळी, गाळ काढणे, पाझर तलाव आणि इतर जलसंधारणाच्या कामांद्वारे पावसाचे पाणी स्थानिक पातळीवर अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पाणलोट क्षेत्राचा विचार करून गावातील नैसर्गिक जलप्रवाह आणि उपलब्ध जलस्रोत यांचा एकत्रित अभ्यास करण्यावर भर देण्यात आला.
या अभियानाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला मिळालेला लोकसहभाग. जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून गावाच्या सामूहिक भविष्याशी संबंधित बाब आहे, ही जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायती, शेतकरी, युवक मंडळे, सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ एकत्र आले. लोकवर्गणी उभी राहिली, श्रमदानातून कामे झाली आणि कंपन्यांनी सीएसआरच्या माध्यमातून योगदान दिले. काही ठिकाणी मंदिर संस्था आणि स्थानिक दानशूर व्यक्तींनीही पुढाकार घेतला.
तलावातील गाळ काढण्याच्या कामाला या लोकसहभागाची विशेष जोड मिळाली. काढलेला गाळ शेतकर्यांनी आपल्या शेतात नेला. त्यामुळे जलसाठ्यांची क्षमता वाढण्याबरोबरच शेतजमिनीची गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली. एका गावात जलसंधारणाचे काम सुरू झाले की, त्याचा परिणाम केवळ त्या संरचनेपुरता मर्यादित राहत नव्हता. त्यातून आसपासच्या विहिरींच्या पाणीपातळीवर, जनावरांसाठी उपलब्ध पाण्यावर आणि शेतीच्या नियोजनावरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता निर्माण होत होती. याहून महत्त्वाचा बदल सामाजिक पातळीवर झाला. गावातील पाणी कुठे उपलब्ध आहे, कोणत्या भागात पाणी अडविता येईल, कोणते जलस्रोत पुनरुज्जीवित करता येतील आणि उपलब्ध पाण्याचा वापर कसा करायचा, यावर सामूहिक चर्चा सुरू झाली. ग्रामसभांमध्ये पाण्याचे नियोजन हा विषय बनला. गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणे आणि पाणलोट क्षेत्राच्या आधारे कामांचे प्राधान्य निश्चित करणे याला महत्त्व प्राप्त झाले.
अशा प्रकारे जलयुक्त शिवार अभियानाने जलसंधारणाला तांत्रिक कामांच्या चौकटीतून बाहेर काढून सामाजिक सहभागाची जोड दिली. गावाच्या विकासाचा आणि भविष्यातील पाणी उपलब्धतेचा प्रश्न ग्रामस्थांनी स्वतःच्या जबाबदारीचा मानावा, हा या अभियानाचा महत्त्वाचा परिणाम होता. पहिल्या टप्प्यात 22,593 गावांमध्ये 6,32,896 कामे पूर्ण झाली. या कामांसाठी सुमारे 9,731 कोटी रुपये खर्च झाल्याची नोंद आहे. या अभियानामुळे 27 लाख टीसीएम जलसाठा क्षमता निर्माण झाल्याचे शासनाच्या आर्थिक सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्याने जलसंधारणाच्या कामांचा मोठा विस्तार केला; परंतु जलव्यवस्थापन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हेही स्पष्ट झाले. एकदा बांधलेला बंधारा किंवा खोदलेला तलाव कायमस्वरूपी उपयोगी राहण्यासाठी त्याची नियमित देखभाल आवश्यक असते. गाळ साचल्यास तो काढणे, खराब झालेल्या संरचनांची दुरुस्ती करणे आणि नव्या गरजांनुसार जलसंधारणाच्या कामांचा विस्तार करणे गरजेचे असते.
याच अनुभवातून 3 जानेवारी 2023 रोजी ’जलयुक्त शिवार अभियान-2.0’ सुरू करण्यात आले. पहिल्या टप्प्यात किंवा अन्य पाणलोट विकास कार्यक्रमांत समाविष्ट न झालेल्या पात्र गावांमध्ये कामे करण्याबरोबरच जुन्या संरचनांचे पुनरुज्जीवन, अतिरिक्त जलसंधारण आणि जलसाक्षरतेवर भर देण्यात आला. 29 एप्रिल 2026पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, दुसर्या टप्प्यात 5,858 गावांमध्ये 1,44,698 कामे प्रस्तावित होती. त्यापैकी 1,32,174 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती आणि 1,10,114 कामे पूर्ण झाली होती. या टप्प्याचे महत्त्व केवळ कामांची संख्या वाढविण्यात नाही, तर उपलब्ध जलस्रोतांचा अधिक कार्यक्षम वापर करण्यामध्ये आहे. जलसंधारणाची नवी कामे उभारण्याबरोबरच जुन्या जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन, भूजल पुनर्भरण आणि पाण्याचा काटकसरीने वापर या बाबी एकत्रितपणे हाताळण्याची दिशा यातून मिळाली.
2026मधील दुष्काळी परिस्थितीत महसूलमंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या निर्णयांमधून जलसंधारणाला प्रशासकीय प्राधान्य देण्याचा प्रयत्न दिसून येतो. या निर्णयांचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे उपलब्ध जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि पाण्याच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाही.
नवीन जलस्रोत निर्माण करण्याइतकेच अस्तित्वात असलेल्या जलस्रोतांची क्षमता पुन्हा वाढविणे महत्त्वाचे आहे. अनेक गावांमध्ये जुन्या विहिरी, पारंपरिक बारव, तलाव, पाझर तलाव आणि बंधारे गाळ साचल्यामुळे किंवा देखभालीअभावी उपयोगात राहिलेले नाहीत. अशा जलस्रोतांची दुरुस्ती, गाळ काढणे आणि त्यांचे पुनरुज्जीवन केल्यास तुलनेने कमी खर्चात पाण्याची उपलब्धता वाढविता येऊ शकते.
24 सप्टेंबर 2026 रोजी झालेल्या आढावा बैठकीत बावनकुळे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील जुने आणि बंद पडलेले जलसाठे तातडीने पुनरुज्जीवित करण्याचे निर्देश दिले. शिवकालीन बंधारे आणि अन्य पारंपरिक जलसंधारण संरचनांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. या संदर्भात पारंपरिक बारव आणि जुन्या जलरचनांचे पुनरुज्जीवन हा स्वतंत्र महत्त्वाचा विषय ठरतो. राज्याच्या पुरातत्त्व विभागाने पहिल्या टप्प्यात 75 ऐतिहासिक बारवांचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखली असून त्यासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दुष्काळाच्या काळात शेतकर्यांच्या खासगी विहिरींचा वापर सार्वजनिक पाणीपुरवठ्यासाठी केला जातो. अशा वेळी संबंधित शेतकर्यांना योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांत पाणीटंचाईच्या काळात वापरलेल्या खासगी विहिरींची प्रलंबित थकबाकी 20 नोव्हेंबरपर्यंत अदा करण्याचे निर्देश दिले आहेत.
दुष्काळात फळबागांचे संरक्षण करण्यासाठीही विशेष निर्णय घेण्यात आले. फळबागा उभ्या करण्यासाठी शेतकरी अनेक वर्षे मेहनत घेतात. संत्रा, मोसंबी आणि इतर फळपिकांचे नुकसान झाल्यास त्याचा परिणाम अनेक वर्षांच्या उत्पन्नावर होतो. त्यामुळे निवडक भागांत शेतीच्या कामांसाठी नवीन बोअरवेल आणि विहीर खोदण्यावरील निर्बंध 15 डिसेंबर 2026पर्यंत शिथिल करण्यात आले. ही सवलत शेतीविषयक कामांसाठी आहे. त्यासोबत विहीर आणि बोअरवेल पुनर्भरणासारख्या जलसंधारणाच्या उपाययोजनाही बंधनकारक करण्यात आल्या आहेत. याबरोबरच दुष्काळी परिस्थितीचा फायदा घेऊन बोअरवेल खोदण्यासाठी अवाजवी दर आकारण्याच्या तक्रारींवरही लक्ष देण्यात आले. साधारण 70 हजार रुपयांच्या आसपास खर्च अपेक्षित असलेल्या कामासाठी 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंत मागणी होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. शासनाने जिल्हाधिकार्यांना अशा दरांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहे.
या निर्णयांमधून दुष्काळ निवारणाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोन स्पष्ट होतो. जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, शेतकर्यांच्या मालकीच्या जलस्रोतांचा योग्य मोबदला, फळबागांचे संरक्षण आणि पाणीपुरवठ्याच्या कामांतील अवाजवी दरांवर नियंत्रण या सर्व बाबी जलसुरक्षेचाच भाग आहेत.
’जलयुक्त शिवार’ अभियानाचा तिसरा टप्पा हा पहिल्या दोन टप्प्यांतील अनुभवांचा अधिक व्यापक उपयोग करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. 19 नोव्हेंबर 2026 रोजी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ’जलसंचय जनभागीदारी : कॅच द रेन 2026’ अभियानाच्या आढावा बैठकीत महाराष्ट्रातील 18 हजार गावांमध्ये ’जलयुक्त शिवार-3.0’ राबविण्याचा निर्णय जाहीर झाला.
या टप्प्यातील महत्त्वाचा बदल म्हणजे कामांची निवड अधिक शास्त्रीय पद्धतीने करणे. कोणत्या गावात किती पाणी उपलब्ध आहे, पाणलोट क्षेत्राची स्थिती काय आहे, भूजल पातळी किती आहे, कोणते जलस्रोत पुनरुज्जीवित करता येतील आणि कोणत्या ठिकाणी नवीन संरचना आवश्यक आहेत, याचा अभ्यास करून कामांचे नियोजन केले जाणार आहे.
मे 2027पर्यंत राज्यात 34 लाख 83 हजार 940 भूजल पुनर्भरण संरचना उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हा केवळ जलसाठा निर्माण करण्याचा कार्यक्रम नसून पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजलसाठ्याची दीर्घकालीन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आहे.
पहिली दिशा म्हणजे जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन. गावांमधील जुने तलाव, पाझर तलाव, पारंपरिक विहिरी, बारव, मृत बंधारे आणि इतर जलसाठ्यांची क्षमता पुन्हा वाढविण्यावर भर असेल. आपल्या पूर्वजांनी स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन अनेक पारंपरिक जलरचना निर्माण केल्या होत्या. त्यांचे पुनरुज्जीवन म्हणजे केवळ ऐतिहासिक वारशाचे जतन नव्हे, तर स्थानिक जलव्यवस्थापनाला पुन्हा कार्यक्षम बनविणे होय. एक तलाव पुन्हा कार्यरत झाला, तर त्याचा लाभ परिसरातील विहिरी, शेती आणि पशुधनाला मिळू शकतो.
दुसरी दिशा म्हणजे भूजल पुनर्भरण. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुनर्भरण संरचना उभारल्या जाणार आहेत. शेततळी, पुनर्भरण खड्डे आणि नाला उपचार यांच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीखाली साठविण्यावर भर असेल. यामुळे विहिरींची पाणीपातळी टिकविण्यास आणि भूजलावरील ताण कमी करण्यास मदत होऊ शकते.
तिसरी दिशा म्हणजे नदी आणि वनक्षेत्रांचे जलव्यवस्थापन. पावसाळ्यात पाणी वाहून नेणार्या, मात्र इतर काळात कोरड्या पडणार्या 50 किलोमीटर किंवा त्याहून अधिक लांबीच्या नद्यांच्या पुनरुज्जीवनाची योजना आहे. वनक्षेत्रात वनबंधारे आणि वनतळी निर्माण करण्यावरही भर दिला जाणार आहे. यामुळे जलसंधारणाचा विचार केवळ शेतशिवारापुरता मर्यादित न राहता संपूर्ण पाणलोट क्षेत्राशी जोडला जाईल.
चौथी दिशा म्हणजे शहरी भागांचा सहभाग. जलसुरक्षेचा प्रश्न ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांसाठी महत्त्वाचा आहे. शहरांमध्ये वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी लक्षात घेता शासकीय इमारती आणि खासगी घरांमध्ये छतावरील पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याच्या व्यवस्था उभारण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे जलसंधारण ही केवळ शेतकर्यांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिक आणि संस्थेची सामूहिक जबाबदारी आहे, हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविता येईल.
पाचवी दिशा म्हणजे विभागीय समन्वय आणि लोकसहभाग. जलसंधारणाची कामे कृषी, वन, ग्रामीण विकास, सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास अशा अनेक विभागांशी संबंधित असतात. त्यामुळे ’प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’, ’रोजगार हमी योजना’, राज्य शासनाच्या विविध योजना, सीएसआर आणि लोकप्रतिनिधींच्या निधीची सांगड घालण्यात येणार आहे. जिल्हाधिकार्यांच्या समन्वयातून कामांचे नियोजन आणि अंमलबजावणी केली जाणार आहे. गावांना या कामांत सहभागी करण्यासाठी स्पर्धा आणि पुरस्कारांची व्यवस्थाही केली जाणार आहे. मुख्यमंत्री स्तरावर नियमित आढावा घेण्याची व्यवस्थाही महत्त्वाची ठरणार आहे.
पाणी अडविणे आणि साठविणे हा जलसुरक्षेचा एक भाग आहे. उपलब्ध पाण्याचा वापर कसा होतो, यावरही त्याचे दीर्घकालीन यश अवलंबून असते. एखाद्या गावात मोठ्या प्रमाणावर जलसाठा निर्माण झाला; पण भूजलाचा अनियंत्रित उपसा सुरू राहिला किंवा उपलब्ध पाण्यापेक्षा अधिक पाणी लागणारी पीकपद्धती कायम राहिली, तर काही वर्षांत पुन्हा टंचाई निर्माण होऊ शकते.
त्यामुळे गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणे, उपलब्ध पाण्याला प्राधान्यक्रम निश्चित करणे, पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता राखणे, ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर वाढविणे आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकपद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. ’जलयुक्त शिवार-3.0’मध्ये या बाबींना लोकसहभागाच्या माध्यमातून अधिक प्रभावी करता येईल.
जलसंधारणाच्या प्रत्येक कामाचा परिणाम केवळ बांधलेल्या संरचनेतून मोजता कामा नये. भूजल पातळीत झालेला बदल, सिंचनासाठी उपलब्ध झालेले पाणी, पिकांचे संरक्षण आणि गावाच्या पाणीटंचाईत झालेली घट यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील टप्प्यात कामांच्या संख्येबरोबरच त्यांच्या प्रत्यक्ष परिणामांचे मूल्यमापनही महत्त्वाचे ठरणार आहे.
जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्याने जलसंधारणाला लोकसहभागाची जोड दिली. दुसर्या टप्प्याने देखभाल, पुनरुज्जीवन आणि अधिक शाश्वत नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. तिसर्या टप्प्यात शास्त्रीय नियोजन, भूजल पुनर्भरण, पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि विभागीय समन्वय यांचा व्यापक समावेश केला जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या ’जलयुक्त शिवार’ अभियानाचा हा प्रवास केवळ एका योजनेचा विस्तार नाही, तर महाराष्ट्राच्या जलव्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातील परिवर्तन आहे. त्याला आता दुष्काळ निवारणाच्या तातडीच्या निर्णयांची जोड मिळत आहे.