@ अर्चित गोखले
आपण ज्या सूर्यमालेत राहतो, तिच्याविषयी गेल्या अनेक शतकांपासून खगोलशास्त्रज्ञ विविध प्रकारचे संशोधन करीत आहेत. सूर्याभोवती फिरणारे ग्रह, त्यांचे उपग्रह, लघुग्रह, धूमकेतू आणि त्यापलीकडे असणारे असंख्य बर्फाळ खगोलीय घटक यांचा अभ्यास सातत्याने सुरू आहे; मात्र, आधुनिक दुर्बिणी आणि संगणकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही सूर्यमालेतील अनेक वस्तूंचा शोध लागणे बाकी आहे. याच पार्श्वभूमीवर, प्लुटोच्या कक्षेपलीकडे असलेल्या एका मोठ्या खगोलीय घटकाचा शोध लागला असून, त्याला संभाव्य बटुग्रह म्हणून ओळखण्यात आले आहे. अमेरिकेतील ’व्हेरा सी.रुबिन’ या वेधशाळेने केलेला हा शोध सूर्यमालेच्या बाह्य प्रदेशातील संशोधनासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.
या नव्या खगोलीय घटकाला ‘2026 ईडी138’ (2026 ED138), असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे. 27 ऑक्टोबर 2026 रोजी आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेच्या ’लघुग्रह केंद्राने’ या शोधाची अधिकृत घोषणा केली. प्राथमिक निरीक्षणांनुसार, हा घटक आकाराने मोठा आणि तेजस्वी असून, त्याचा व्यास साधारण 600 ते 1500 किलोमीटर असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. त्याचे वस्तुमान स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याला गोल आकार देण्याइतके असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शास्त्रज्ञांनी त्याला ’संभाव्य बटुग्रह’ हा दर्जा दिला आहे; मात्र, त्याचे प्रत्यक्ष आकारमान आणि स्वरूप निश्चित करण्यासाठी अद्याप अधिक निरीक्षणांची आवश्यकता आहे.
’2026 ईडी138’ हा घटक सध्या सूर्यापासून सुमारे 46 खगोलीय एककांच्या अंतरावर आहे. एक खगोलीय एकक म्हणजे पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील सरासरी अंतर, म्हणजेच सुमारे 15 कोटी किलोमीटर. तुलनेसाठी सांगायचे झाल्यास, प्लुटो सूर्यापासून सरासरी 40 खगोलीय एककांच्या अंतरावर असतो. यावरून हा नवा घटक प्लुटोपेक्षाही अधिक दूरवर असल्याचे स्पष्ट होते.
नेपच्यूनच्या कक्षेपलीकडे सूर्याभोवती फिरणार्या अशा खगोलीय वस्तूंना ‘नेपच्यूनपलीकडील वस्तू’ (Trans-Neptunian Objects -TNOs) असे म्हणतात. या प्रदेशात अनेक लहान-मोठे बर्फाळ घटक अस्तित्वात आहेत. त्यापैकी काहींचा आकार आणि वस्तुमान इतके मोठे असू शकते की, स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्यांना जवळजवळ गोलाकार आकार प्राप्त होतो.
येथे ’बटुग्रह’ आणि ’सामान्य लघुग्रह’ यांच्यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेच्या व्याख्येनुसार, बटुग्रह हा सूर्याभोवती परिभ्रमण करणारा, स्वतःच्या गुरुत्वाकर्षणामुळे जवळजवळ गोलाकार प्राप्त केलेला घटक असतो; मात्र त्याने आपल्या कक्षेच्या आसपासचा प्रदेश इतर वस्तूंपासून पूर्णपणे मोकळा केलेला नसतो. प्लुटोला 2006मध्ये ग्रहांच्या यादीतून वगळून बटुग्रहाचा दर्जा देण्यात आला होता.
सध्या आंतरराष्ट्रीय खगोलीय संघटनेने पाच बटुग्रहांना मान्यता दिली आहे. त्यात प्लुटो, सेरेस, एरिस, हौमिया आणि मेकमेक यांचा समावेश होतो. ’2026 ईडी138’ हा घटक बटुग्रह असल्याचे निश्चित झाल्यास या यादीत आणखी एका सदस्याची भर पडू शकते.
या शोधामागे हार्वर्ड-स्मिथसोनियन खगोलभौतिकी केंद्रातील संशोधक मॅथ्यू होलमन यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी रुबिन वेधशाळेने 2026मध्ये जमा केलेल्या निरीक्षणांची माहिती एका विशेष संगणकीय प्रणालीच्या साहाय्याने तपासली. ही प्रणाली केविन नेपियर यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. आकाशातील अब्जावधी निरीक्षण नोंदींची तुलना करून एकाच खगोलीय घटकाशी संबंधित वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या प्रतिमा आणि निरीक्षणे एकत्र ओळखण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे.
13 ऑक्टोबर रोजी या माहितीचे विश्लेषण करताना होलमन यांना 2026 ईडी138च्या अस्तित्वाचे संकेत मिळाले. त्याचे तेज आणि सूर्यापासूनचे अंतर पाहता हा घटक असामान्यपणे मोठा असावा, असे त्यांच्या लक्षात आले. सुरुवातीला या निष्कर्षाबाबत खात्री करण्यासाठी त्यांनी निरीक्षणांमधील संभाव्य चुका तपासण्यास सुरुवात केली.
यानंतर रुबिन वेधशाळेच्या नोंदवहीतील आणि प्रतिमांमधील जुन्या निरीक्षणांचा शोध घेण्यात आला. त्यातून या घटकाची आणखी 20 निरीक्षणे मिळाली. रुबिन वेधशाळेच्या सिमोनी सर्वेक्षण दुर्बिणीने 4 मार्च ते 11 जुलै 2026 या कालावधीत 20 वेगवेगळ्या रात्री एकूण 30 वेळा या घटकाचे निरीक्षण केले होते.
विशेष म्हणजे, यापूर्वीच्या निरीक्षणांचा मागोवा घेताना 2016पर्यंतच्या जुन्या प्रतिमाही उपलब्ध झाल्या. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या डार्क एनर्जी कॅमेर्याने टिपलेल्या प्रतिमांमधून ही माहिती मिळाली. त्यामुळे 2026 ईडी138च्या कक्षेचा दहा वर्षांहून अधिक काळाचा मागोवा घेणे शक्य झाले.
या शोधाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 2026 ईडी138 आकाशगंगेच्या प्रतलाजवळील अतिशय गर्दीच्या आकाशभागात आढळला आहे. या प्रदेशात लाखो तारे आणि इतर खगोलीय वस्तू दिसत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एखाद्या दूरवरच्या, मंद प्रकाशाच्या घटकाची ओळख पटवणे अत्यंत कठीण असते. अनेक दुर्बिणींच्या निरीक्षणांत हा घटक पार्श्वभूमीवरील असंख्य तार्यांमध्ये हरवून जाण्याची शक्यता होती.
मात्र, रुबिन वेधशाळेची निरीक्षणक्षमता आणि संगणकीय विश्लेषणाची ताकद यामुळे हा घटक शोधणे शक्य झाले. एखाद्या विशिष्ट क्षणी घेतलेल्या प्रतिमेपेक्षा एकाच आकाशभागाचे वारंवार निरीक्षण करणे अधिक महत्त्वाचे ठरते. कारण तारे तुलनेने स्थिर दिसत असताना सूर्यमालेतील घटकांची स्थिती पार्श्वभूमीच्या तुलनेत बदलत असते. वेगवेगळ्या वेळच्या प्रतिमांची तुलना केल्यास ही हालचाल ओळखता येते आणि त्या आधारे संबंधित घटकांचा मागोवा घेता येतो.
2026 ईडी138च्या कक्षेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती सूर्यमालेच्या प्रमुख प्रतलाच्या तुलनेत जवळजवळ 25 अंशांनी कललेली आहे. या कक्षेमुळे त्याचे वर्गीकरण ‘हॉट क्लासिकल नेपच्यूनपलीकडील वस्तू’ या गटात करण्यात आले आहे.
सूर्यमालेतील बहुतांश ग्रह सूर्याभोवती जवळजवळ एकाच प्रतलात परिभ्रमण करतात; मात्र, बाह्य सूर्यमालेतील अनेक लहान घटकांच्या कक्षा अधिक कललेल्या किंवा लंबवर्तुळाकार आहेत. यामागे गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून यांसारख्या महाकाय ग्रहांचे गुरुत्वाकर्षण कारणीभूत असू शकते. विशेषतः नेपच्यूनच्या गुरुत्वाकर्षणामुळे अनेक बर्फाळ घटकांच्या मूळ कक्षांमध्ये बदल झाले असावेत.
या वस्तूंच्या कक्षा, आकारमान आणि रासायनिक रचनेचा अभ्यास केल्यामुळे सूर्यमालेच्या निर्मितीनंतरच्या उत्क्रांतीचा इतिहास समजण्यास मदत होते. ग्रहांची निर्मिती कशी झाली, महाकाय ग्रहांनी आपल्या कक्षा कशा बदलल्या आणि त्या प्रक्रियेत लहान खगोलीय वस्तूंचे वितरण कसे बदलले, याविषयी महत्त्वपूर्ण माहिती या संशोधनातून मिळू शकते.
चिलीमधील सेरो पाचोन पर्वतावर उभारण्यात आलेली व्हेरा सी.रुबिन वेधशाळा हा आधुनिक खगोलशास्त्रातील एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय विज्ञान प्रतिष्ठान आणि ऊर्जा विभाग यांच्या संयुक्त आर्थिक पाठबळातून उभारण्यात आलेल्या या वेधशाळेत जगातील सर्वात मोठ्या डिजिटल खगोलीय कॅमेर्याचा वापर केला जातो. या वेधशाळेचे नामकरण प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ व्हेरा रुबिन यांच्या सन्मानार्थ करण्यात आले आहे. आकाशगंगांमधील तार्यांच्या हालचालींच्या अभ्यासातून अदृश्य पदार्थाच्या अस्तित्वाचे महत्त्वपूर्ण पुरावे समोर आणण्यात त्यांचे योगदान होते.
या वेधशाळेचा प्रमुख प्रकल्प म्हणजे ‘लेगसी सर्व्हे ऑफ स्पेस अॅण्ड टाइम’ (ङडडढ). या प्रकल्पांतर्गत पुढील दहा वर्षे दक्षिण गोलार्धातील संपूर्ण आकाशाचे वारंवार निरीक्षण केले जाणार आहे. या निरीक्षणांमधून विश्वाचा अतिविस्तृत आणि तपशीलवार कालानुक्रमिक नकाशा तयार होणार आहे. आकाशातील बदलणार्या वस्तू, स्फोटक घटना, दूरवरच्या आकाशगंगा, कृष्ण पदार्थ आणि सूर्यमालेतील लहान-मोठे घटक यांचा अभ्यास करण्यासाठी हा माहितीचा प्रचंड साठा उपयोगी ठरणार आहे.
रुबिन वेधशाळेने मुख्य सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वीच एप्रिल 2026मध्ये आंतरराष्ट्रीय लघुग्रह केंद्राकडे 11 हजारांहून अधिक नव्या लघुग्रहांची निरीक्षणे सादर केली होती. त्यामध्ये सुमारे 380 नेपच्यूनपलीकडील वस्तूंचा समावेश होता. 2026 ईडी138चा शोध ही या मोठ्या संशोधन मोहिमेची सुरुवात असल्याचे मानले जात आहे.
या घटकांचा अचूक आकार निश्चित करण्यासाठी अवरक्त तरंगलांबीवरील पुढील निरीक्षणांची आवश्यकता आहे. त्याच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणार्या सूर्यप्रकाशाबरोबरच त्यातून उत्सर्जित होणार्या उष्णतेचा अभ्यास केल्यास त्याच्या प्रत्यक्ष आकारमानाचा अधिक अचूक अंदाज घेता येईल. त्यानंतरच त्याला बटुग्रहाचा दर्जा मिळण्याची शक्यता स्पष्ट होईल.
प्लुटोपलीकडील या नव्या संभाव्य बटुग्रहाचा शोध हा केवळ एका नव्या खगोलीय घटकाच्या नोंदीपुरता मर्यादित नाही. सूर्यमालेच्या दूरवरच्या प्रदेशात अजूनही अनेक अज्ञात वस्तू लपलेल्या असण्याची शक्यता या शोधामुळे अधोरेखित झाली आहे. आगामी दशकभर रुबिन वेधशाळा सातत्याने आकाशाचे निरीक्षण करणार असल्यामुळे अशा अनेक अज्ञात जगांचा शोध लागू शकतो. मानवाने सूर्यमालेच्या सीमांबद्दल मिळवलेले ज्ञान कितीही व्यापक असले, तरी विश्वाच्या या अथांग पसार्यात अजून कितीतरी रहस्ये उलगडण्याची प्रतीक्षा करत आहेत, याचीच जाणीव हा शोध करून देतो.
लेखक खगोलशास्त्राचे अभ्यासक आहेत.