मनआरोग्याची त्रिमिती

विवेक मराठी    03-Nov-2026
Total Views |
@अदिती प्रभूघाटे-कामत
9867426574
 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या संस्था 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या आठवड्यात मानसिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करतात. यंदाचा मानसिक आरोग्य सप्ताह नुकताच पार पडला आहे. या निमित्ताने मनआरोग्याच्या कार्यासाठी वाहिलेल्या डोंबिवलीतील एका संस्थेची ओळख करून देत आहोत. सुप्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांच्या मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर या मानसोपचार केंद्रासोबत काम करणारी मनोदय ट्रस्ट ही ती संस्था.
अद्वैत पाध्ये यांनी 1998मध्ये मनोविकारतज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस सुरू केली. पुढे 2001मध्ये काळाची गरज ओळखत औषधे व समुपदेशन या दोन्ही गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटरची स्थापना केली.
 
या कालावधीत विविध वयोगट व आर्थिक स्तरांवरील मनोरूगण व त्यांच्या कुटुंबीयांना पडणारे प्रश्न व भविष्याविषयीची चिंता लक्षात घेऊन तसेच मानसिक आरोग्य संदर्भात जनजागृती व्हावी या दृष्टीने 2003साली डोंबिवलीतच स्किझोफ्रेनिया या आजाराशी सामना करणार्‍या रुग्णांच्या पालक/ कुटुंबीयांसाठी एक परिषद घेतली गेली. त्या काळी समाजात मानसिक आजारांविषयी विशेष जागृती नसल्याने केवळ एकच पालक यासाठी उपस्थित होते. परंतु नंतर हळूहळू उपस्थिती वाढू लागली. रुग्णांचे पालक ज्यांना ‘शुभंकर’ असे म्हटले जाते, आपली चिंता व्यक्त करू लागले. या गोष्टी लक्षात घेता आपण शुभार्थी काही उपक्रम राबवू शकतो, त्यांच्यासाठी काही अ‍ॅक्टिव्हिटीज तयार करून त्यांना काही काळ गुंतवून ठेवू शकतो जेणेकरून त्यांना काही कामाची, व एका दिनचर्येची सवय होईल व भविष्यात ते काहीतरी काम करून उपजीविका करू शकतील असा विचार पुढे आला. त्यातूनच हे सर्व उपक्रम राबविण्यासाठी 2008 मध्ये मनोदय ट्रस्टची स्थापना करण्यात आली.
 

Manas Psychological Health Center 
 
या ट्रस्टतर्फे सर्वप्रथम दोन स्वमदत गट सुरू करण्यात आले. एक शुभार्थी (स्किझोफ्रेनिया आजाराचे रुग्ण) :- फिनिक्स गट व या शुभार्थींना आधार देणार्‍या, त्यांची काळजी घेणार्‍या केअर गिव्हर्सचा म्हणजेच शुभंकरांचा आधारवड हा गट.
 
फिनिक्स गटामध्ये रोज शुभार्थी येऊन, दुपारी 1 ते 4 या वेळात काही अ‍ॅक्टिव्हिटीज करू लागले. या चार तासांचे सुनियोजित वेळापत्रक पाळले जाऊ लागले. सर्वप्रथम प्रार्थना, व्यायाम, योगासने, नंतर कागदी पिशव्या बनवणे, यासारख्या साध्या सोप्या अ‍ॅक्टिव्हिटीज व नंतर थोड्या वेळ गाणी, कोडी सोडवणे, थोडे बौद्धिक खेळ असा दिनक्रम ठरला. हळूहळू शुभार्थींची संख्या वाढू लागली. फिनिक्स गट चालवण्यासाठी काही वॉलेंटियर्स, काही शुभंकर यांनी रोज थोडा-थोडा वेळ देऊन शुभार्थींच्या या सर्व अ‍ॅक्टिव्हिटी घेण्यासाठी मदत केली. नवनवीन संकल्पना यातून पुढे येत गेल्या. हळूहळू अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये शिवणकाम, विविध सणांनुसार राख्या बनवणे-पणत्या रंगवणे असे उपक्रम, घरघंटीवर आंबोळी पीठ, कुळीथ पीठ, मिश्रधान्यांचे पूर्णान्न पीठ तयार करणे अशी विविध कामे शुभार्थींना शिकवून ती करून घेतली जाऊ लागली.
 
त्यांना प्रोत्साहन म्हणून ‘स्टायपेंड’ही देण्यास सुरुवात केली.
 
मोकळे वातावरण, विनाअट आजारासह, प्रेमाने होणारा स्वीकार, मिळणारे प्रोत्साहन, यामुळे शुभार्थींच्या मानसिक आरोग्यातही लक्षणीय सुधारणा होऊ लागली.
 
आता या गटातील शुभार्थी संख्या 25वर पोहोचली असून, इतरही काही उत्पादने, डान्स थेरपी, संगणक प्रशिक्षण या गोष्टींचाही समावेश झाला आहे. या सर्वांना रोज नेण्या-आणण्यासाठी मोफत वाहनाची सोय पण उपलब्ध केली आहे. अनेक दानशूरांच्या देणग्यातून हे शक्य होत आहे.
 

Manas Psychological Health Center 
 
फिनिक्ससोबत सुरू झालेला दुसरा गट म्हणजे शुभंकरांचा ‘आधारवड’ हा गट. दररोज शुभार्थींची काळजी घेणे, औषधे, डॉक्टरांचा फॉलोअप लक्षात ठेवणे, शुभार्थींचा मूड सांभाळणे आणि हे सर्व करत असतानाच घरातील इतर जबाबदार्‍याही पार पाडणे या सगळ्यात शुभंकरांची शारीरिक व मानसिक पातळीवर खूप दमछाक होत असते.
 
यातूनच केअरगिव्हर्सना बर्नआऊटचा त्रास होऊ शकतो. हे सर्व कमी करण्याच्या दृष्टीने, शुभंकरांना मानसिक आधार व शेअरिंगसाठी एक सुरक्षित जागा मिळावी या दृष्टीने शुभंकरांचा आधारवड हा स्वमदत गट, अर्थात सपोर्ट ग्रुप सुरू झाला. हा गट दर महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी असतो. गटाचे सदस्य एकत्र ठरलेल्या ठिकाणी भेटतात व शुभार्थींची स्थिती, आपला मानसिक ताण किंवा चिंता याविषयी व्यक्त होतात. याचा फायदा असा, की इथे येणार्‍या प्रत्येक व्यक्तीच्या घरात हीच समस्या असल्याने सर्वांचे म्हणणे ऐकून व समजून घेतले जाते. गरज पडल्यास काही कल्पना सुचवल्या जातात. परिस्थिती कशी हाताळता येईल यावर चर्चा होते. नेहमी सोल्यूशन मिळेलच असे नाही. पण, निदान शुभंकरांना बोलून मोकळे होण्याचे समाधान मिळते. केवळ अशा अडचणींविषयीच बोलले जाते असे नाही, तर इतर मनोरंजनात्मक कार्यक्रमही ठेवले जातात.
 
 
कधी बाहेरून कलाकारांना बोलवून, तर कधी स्वतः शुभंकर आपल्या कला सादर करतात. काही शुभंकर फिनिक्स गटासाठीही स्वयंसेवक म्हणून काम करतात. दरवर्षी डोंबिवलीतील उत्सवमध्ये मनोदय ट्रस्टच्या फिनिक्स गटाने तयार केलेल्या वस्तूंचा स्टॉल असतो. शुभंकर व शुभार्थी दोघेही पूर्ण दहा दिवस आळीपाळीने मनोदय टीमच्या बरोबरीने हा स्टॉल सांभाळतात. उत्पादने व ग्रुपबद्दलची माहिती आत्मविश्वासाने लोकांना सांगतात.
 
 
तसेच केअर गिव्हर्ससाठीचा अजून एक गट म्हणजे उत्तर रंग हा स्मृतिभ्रंश अर्थात डिमेन्शियाच्या पेशंटसाठी असलेला गट. हा गट ऑनलाईन पद्धतीने चालवला जातो. त्यातही गट चालवणारे समुपदेशक आजाराबाबतची माहिती देतात. पेशंटना कसे हाताळावे, स्वतःची काळजी कशी घ्यावी, यावरही समुपदेशकांकडून मार्गदर्शन मिळते. इतर केअरगिव्हर्सही एकमेकांना धीर देतात, एखाद्या प्रश्नावर आपण कसा मार्ग काढला, याबाबत अनुभव कथन करतात.
 
 
Manas Psychological Health Center
 
त्यातून एक दिलासा मिळायला मदत होते. सत्राची सुरुवात करताना किंवा शेवट एखादा मनोरंजनात्मक बौद्धिक खेळ घेतला जातो. यामुळे पेशंटना काय अ‍ॅक्टिव्हिटी देता येईल याची कल्पना केअरगिव्हर्सना येते व त्यांच्या स्वतःसाठी देखील प्रतिबंधात्मक उपयोजना (precaution) म्हणून याचा उपयोग होतो. या सर्व गोष्टी हसतखेळत पार पडत असल्याने सर्वजण दर महिन्याला या ग्रुपच्या एकत्र येण्याची वाट पाहत असतात. हा ग्रुप दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी असतो.
 
 
या दोन गटांसोबतच इतरही काही मानसिक आजारांसाठी सपोर्ट ग्रुप सुरू झाले. ते म्हणजे ओसीडीसाठी असलेला चिंतन ग्रुप, एपिलेप्सीच्या पेशंटसाठीचा प्रोत्साहन ग्रुप, स्किझोफ्रेनिया हा आजार असलेल्या परंतु आता व्यवस्थित नोकरी वगैरे करत असलेल्या पेशंटचा उडान ग्रुप, बायपोलार आजाराच्या पेशंटसाठीचा इंद्रधनुष्य ग्रुप असे गट वेगवेगळ्या आजारांशी सामना करणार्‍या पेशंटसाठी आहेत. या गटांमध्ये सदस्य एकत्र भेटतात व आपल्या प्रश्नांविषयी चर्चा करतात. प्रत्येक गटासाठी दोन समुपदेशकही असतात. यात सदस्यांना मनमोकळेपणाने बोलणे, आपले मत मांडणे शक्य होते. आत्मविश्वास वाढतो. आपल्यासारखेच इतरही लोक आहेत आणि या अशाच समस्या त्यांनाही येत आहेत हे कळते. एकमेकांना प्रोत्साहन दिले जाते. मित्र मिळतात. आजारामुळे बाहेरच्या जगात वावरताना येणार्‍या मर्यादा अथवा अडचणी यावर मात कशी करायची हे समजते. या ग्रुपमध्येही अधूनमधून मनोरंजनात्मक अ‍ॅक्टिव्हिटीज घेतल्या जातात. प्रत्येक सेशनच्या वेळी फक्त आजारांवर चर्चा न होता व्यक्तिमत्त्व विकास, भावनिक संतुलन यासाठी आवश्यक असलेल्या विषयांवरही बोलले जाते. कधी काही विषय चर्चेसाठी घेऊन त्यांचे मत व्यक्त करण्यास सांगितले जाते. त्यातून पेशंटला असलेली, सोशल अँग्झायटी कमी होण्यासाठी मदत होते. काही सदस्य असा अनुभव सांगतात की, आधी आम्हाला इतरांशी बोलताना भीती वाटायची, पण आता मी मिटिंगमध्ये प्रेझेंटेशन देतो/ देते किंवा नातेवाइकांच्या घरी सण-समारंभांना गेल्यावर सर्वांशी गप्पा मारू शकतो/शकते, जे पूर्वी शक्य व्हायचे नाही. आणि पेशंटच्या कुटुंबीयांच्याही हा बदल लक्षात येतो व त्यांनाही या सकारात्मक बदलामुळे समाधान मिळते. कधीकधी या गटांमध्ये पेशंट व केअरगिव्हर्स यांच्यासाठी एकत्र सेशनही घेतले जातात.
 
 
याशिवाय ज्येेष्ठ नागरिकांसाठी दर शनिवारी मेधावी हा गट घेतला जातो. यात ज्येष्ठ नागरिकांसाठी हलका व्यायाम, डान्स मोमेंट थेरेपी या अ‍ॅक्टिव्हिटीज होतात. तसेच इतर काही गोष्टींविषयी माहिती तसेच मोबाईल फोन संदर्भातील दैनंदिन जीवनात गरजेच्या असलेल्या टेक्निकल गोष्टी उदा: स्क्रीनशॉट घेणे, ऑडिओ/व्हिडिओ कॉल करणे, व्हाट्सअ‍ॅपवर स्वतःचा डीपी बदलणे/ठेवणे, व्हिडिओ अपलोड करणे, हेही शिकवले जाते. या वातावरणामुळे ग्रुपला येणारे सदस्य नेहमी खूश असतात व गटाला भरभरून प्रतिसाद मिळतो. हे सर्व गट मोफत चालवले जातात व उपचार जरी दुसर्‍या डॉक्टरकडे असतील तरी ते तसेच चालू ठेवून ते या गटात येऊ शकतात.
 
 
Manas Psychological Health Center
 
या स्वमदत गटांव्यतिरिक्त इतरही बरेच उपक्रम मनोदय ट्रस्टतर्फे राबवले जातात. यात विद्यार्थ्यांसाठी होणारे दोन उपक्रम म्हणजे, जाणीव ही पौगंडावस्थेत होणार्‍या शारीरिक व मानसिक बदलांबाबत प्रशिक्षण देणारी कार्यशाळा, व दुसरी, बुद्धिमत्तेच्या आठ पैलूंवर आधारित ‘मी अष्टपैलू’ ही स्पर्धा.
 
 
जाणीव, ही कार्यशाळा सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. यात वर उल्लेख केल्याप्रमाणे या वयात होणार्‍या शारीरिक व मानसिक बदलांना कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन केले जातेच शिवाय लैंगिक अत्याचार, व्यसनाधीनता, मानसिक समस्या, व त्यांचे निराकरण याविषयीही बोलले जाते. सत्राच्या शेवटी मुलांना प्रश्नोत्तरांसाठी शंका निरसनासाठी वेळ दिला जातो. सत्राच्या शेवटी मुलांच्या या विषयांबाबतीतला संकोच कमी होऊन, आपल्या समक्ष ही मुलं मोकळेपणाने सत्र घेणार्‍या समुपदेशकांना आपले प्रश्न सांगतात.
 
 
मी अष्टपैलू, ही बुद्धिमत्तेच्या आठ पैलूंवर आधारित असलेली स्पर्धा सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. यात सुरुवातीला शाळेतील शिक्षकांना निकष सांगून, काही विद्यार्थ्यांची निवड करण्यास सांगितले जाते. या मुलांना गुगल फॉर्म दिले जातात. यात स्वमत व्यक्त करायला प्रवृत्त करणारे प्रश्न असतात. या फॉर्मवरून काही विद्यार्थी निवडले जातात. पुढे या स्पर्धेत तीन फेर्‍या होतात. उत्स्फूर्त गटचर्चा, बुद्धिमत्तेच्या आठ पैलूंवर आधारित पाच पैलूंवर लेखी व तीन पैलूंवर मुलाखत, सादरीकरण अशी फेरी व तिसरी फायनल मुलाखतीची फेरी.
 
 
या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना स्वमत व्यक्त करणे, स्वतःमधील कौशल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न व स्वतःविषयी, स्वतःच्या क्षमतांविषयी ज्ञान मिळणे असे फायदे होतात. संपूर्ण स्पर्धा तणावविरहित वातावरणात हसत-खेळत पार पडते.
 
 
विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक क्षमतेचा शोध घेण्याच्या दृष्टीने स्पर्धा असल्याने यात पाठ्यपुस्तक किंवा शालेय अभ्यासक्रमाचा यात संबंध नसतो. कोणतीही वेगळी तयारी यासाठी करायची नसते. त्यामुळे त्यांची शाळा, अभ्यास, रुटीन यावर कोणताही परिणाम होत नाही. तसेच या मुलांसाठी एक मार्गदर्शन सत्रही घेतले जाते.
 
 
इतरही अनेक कार्यशाळा मनोदय ट्रस्टतर्फे घेतल्या जातात. यात 18 वर्षाच्या पुढील वयोगटांसाठी होणार्‍या भावनिक नियोजन, तणाव नियोजन, राग नियंत्रण, विवेकनिष्ठ विचारसरणी विषयीच्या कार्यशाळा, शिक्षकांसाठी कार्यशाळा, विविध वयोगटातील मुलांच्या पालकांसाठी होणार्‍या कार्यशाळा याचा समावेश आहे. या सर्व कार्यशाळांना उत्तम प्रतिसाद मिळतो. नुकतेच या दृष्टीने कॉर्पोरेट ट्रेनिंग पण सुरू केले आहे. विशेष मुलांच्या पालकांसाठी घेतल्या गेलेल्या अशाच एका कार्यशाळेतून नुकताच, सक्षम हा अजून एक विशेष मुलांच्या पालकांसाठीचा स्वमदत गट सुरू झाला आहे.
 
 
हे सर्व करत असतानाच मनआरोग्याविषयी जागृती होणेही गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन दरवर्षी जूनमध्ये मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटरच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मनोरंजनातून प्रबोधन करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम साजरा केला जातो. मानसिक आरोग्याशी संबंधित एखादा चित्रपट, शॉर्टफिल्म दाखवून नंतर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असते. यात आत्तापर्यंत माय डियर यश, गुडनाईट टेक केअर, अस्तु, वो लम्हे कदाचित माझी गोष्ट यासारखे चित्रपट दाखवले. मनोदयने याच उद्देशाने स्वत: वेध थिएटर्सच्या मदतीने डॉ. अद्वैत पाध्ये लिखित चार शॉर्टफिल्म्सही केल्या आहेत.
 
 
मुक्तीपत्र या डॉ. आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचे अभिवाचन, डॉ. अद्वैत पाध्ये लिखित, तितिक्षा पुस्तकावर आधारित तितिक्षा नाटकाचे सादरीकरण हे आणि असे अनेक उपक्रम घेतले गेले आहेत.
 
भाव-भावना व साहित्य यांचा जवळचा संबंध लक्षात घेता मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने साहित्य व मनोआरोग्य यांची सांगड घालत विविध साहित्यिक अथवा मराठी भाषेसाठी काही वेगळे करण्याचा, मराठी साहित्यात विविध प्रयोग करणार्‍या व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या जातात.
 

Manas Psychological Health Center 
 
या उपक्रमात आत्तापर्यंत डॉ.अनिल अवचट व डॉ. आनंद नाडकर्णी, दास्तांगोई हा उर्दू कथन प्रकार मराठीत आणणारे अक्षय शिंपी व धनश्री खंडकर, लेखक डॉ. आशुतोष जावडेकर, ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांच्या मुलाखती घेतल्या गेल्या आहेत.
काळाची पावले ओळखत जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मानसचित्र यूट्यूब चॅनल सुरू झाले. यावर भावनिक आरोग्याविषयी जागृती करणारे विविध व्हिडिओज, काउन्सिलिंग, मन-आरोग्याविषयी माहिती देणारे व्हिडिओज प्रसारित केले जातात. या चॅनलवर नुकत्याच प्रसारित झालेल्या उल्लेखनीय सिरीज म्हणजे कोलाज भावनांचा ही सीरीज व सहजीवन या विषयावरील पॉडकास्ट.
 
 
याशिवाय, जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने घेतले जाणारे विविध कार्यक्रम, गेल्या वर्षापासून सुरू झालेले फिल्मी व गैर फिल्मी हिंदी, मराठी गाण्यांचे सादरीकरण व त्यातील मनआरोग्याचा अर्थ उलगडणारे त्यावरील विवेचन असा, ‘मन मंदिरा’ या कार्यक्रमाचाही उल्लेख करता येईल.
 
 
या सर्व उपक्रमांमध्ये मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर व मनोदय ट्रस्टची सायकॉलॉजिस्ट व कौन्सिलर्सची टीम सक्रिय सहभागी होत असते. त्यांची साथ मोलाची आहे. त्यांच्यातील कल्पकता, झोकून देऊन काम करण्याची वृत्ती यातून मनोदय ट्रस्टच्या कार्याचा उत्तरोत्तर विस्तार होत जाईल व समाजाला याचा जास्तीत जास्त फायदा होत राहील यात शंका नाही. डिस्ट्रेस (जनजागृती), डिसऑर्डर (वैयक्तिक उपचार, मानसोपचार, स्वमदत गट, पुनर्वसन) व डेव्हलपमेंट (जाणीव, अष्टपैलू, कॉर्पोरेट ट्रेनिंग, पालकत्व, आरईबीटी कार्यशाळा इ.) या त्रिमितीवरचा उत्साही, भक्कम टीमबरोबरचा हा प्रवास असाच पुढे चालू राहिल याची खात्री आहे.ं
 
 
लेखिका मानस सायकॉलॉजिकल हेल्थ सेंटर येथे
समुपदेशक आहेत व मनोदय ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत.