राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा संघशताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘संघप्रवासाची 100 वर्षे ः नवे क्षितिज’ हा दोनदिवसीय कार्यक्रम मुंबईच्या नेहरू सेंटरच्या सभागृहात दि. 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे एका वाक्यात वर्णन करायचे तर,‘मुंबई महानगरीचे वातावरण सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध करणारा कार्यक्रम’, असे करावे लागेल.
मुंबईतील पर्यावरण खूप बिघडलेले आहे. दिवसभर आकाश धुळीकामय असते. त्यामुळे श्वसनाचे विकार ही मुंबईची समस्या झालेली आहे. वाहतूक कोंडी कुठे आणि केव्हा होईल हे कुणीही सांगू शकत नाही. याला भर म्हणून मुंबईचे राजकीय वातावरण गेले पाच-सहा महिने अतिशय गढूळ झाले आहे. अगोदर विधानसभा निवडणूक, नंतर महानगरपालिका निवडणूक त्यातील भाषणे, आरोप-प्रत्यारोप, भाषिक वाद, सांप्रदायिक तानेबाने, अशा कचाट्यात मुंबई सापडली होती. मोहनजींच्या दोन दिवसांच्या कार्यक्रमाने नैसिर्गक पर्यावरण जरी आहे तसेच राहिले तरी सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरण आल्हादायक झुळूक देऊन गेले.
मुंबईतील संघाच्या कामात माझी हयात गेली. शाखा कार्यवाह ते महानगर सहकार्यवाह अशा जबाबदार्या मी पार पाडल्या. या सर्व कालखंडात श्रीगुरूजींपासून ते सुदर्शनजी या सर्व सरसंघचालकांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत आणि बैठकांत सहभागी झालो. परंतु सरसंघचालक म्हणून मोहनजींचा हा कार्यक्रम अद्वितीय समजला पाहिजे.
यापूर्वीदेखील सरसंघचालकांच्या कार्यक्रमासाठी आम्ही कार्यकर्ते समाजाच्या सर्वक्षेत्रीय मान्यवरांना निमंत्रण देत असू. एखादा पुरोगामी तेव्हा म्हणे की, माझ्या घरी येण्याचे धाडस तुम्ही कसे केले? इथपासून ते आता मोहनजींच्या कार्यक्रमास मलाही निमंत्रण मिळाले पाहिजे, असे आलेले फोन असा सर्व संघप्रवास आहे. 25-30 वर्षांपूर्वी जे सामाजिक पर्यावरणीय वातावरण होते, त्यात आता फार महत्त्वाचा बदल झाला आहे. मोहनजींच्या कार्यक्रमात उद्योग, व्यापार, सिनेसृष्टी, न्यायपालिका, राजकीय नेते, इत्यादी समाजातील सर्व घटक दोन्ही दिवस पूर्णवेळ उपस्थित राहिले, हा समाजाच्या मानसिकतेत होत चाललेला बदल राष्ट्र्ाच्या दृष्टीने फारच सकारात्मक आहे.
दोन दिवसांत मोहनजी काय बोलले, कोणते विषय मांडले, कोणत्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली, हे सर्व यूट्यूबच्या विविध चॅनेलवर उपलब्ध असल्यामुळे आणि वृत्तपत्रांतून ते भरपूर आल्यामुळे त्याची पुनरावृत्ती येथे करत नाही. मोहनजींनी काही नवीन सांगितले असे नाही. सरकार्यवाह ते सरसंघचालक झाल्यापासून ते जे काही सांगत आहेत, तेच त्यांनी या कार्यक्रमात सांगितले. यापूर्वी श्रीगुरूजीदेखील हेच सांगत असत. आणि त्यानंतर झालेल्या सर्व सरसंघचालकांनीदेखील हेच सांगितले आहे. “संघाला काही नवीन सांगायचे नाही”, असे डॉ. हेडगेवार म्हणत असत. संघात काही नवीन नसतं, पण सर्वकाही नवीन असतं. नव्याने आलेल्यांना सर्व नवीन असते आणि संघात वाढलेल्यांना काहीच नवीन नसतं.
संघकार्य करीत असताना तरुण वयात एक प्रश्न मनात घर करून असे, तो प्रश्न असा की, आपले कार्य कुणाच्याही विरोधात नाही, सर्वांच्या कल्याणाच्या विचार घेऊन आपण काम करतो, कामातून मला काय मिळेल हा विचार करीत नाही, पूर्ण निःस्वार्थी भावनेने आपण काम करतो, तरीदेखील आपल्याविषयी अपप्रचार का होतो?, आपल्यावर वेगवेगळे आरोप का केले जातात?, समाज एवढे चांगले कार्य आपणहून का स्वीकारीत नाही?, त्यावेळेला या प्रश्नांची नक्की उत्तरे मिळत नसत, पण आता समाजच त्याची उत्तरे देऊ लागला आहे.
समाजाने संघ स्वयंसेवकांकडे बारकाईने बघितले, हे जसे बोलतात तसे वागतात का?, यांच्या मनातील हेतू कोणते आहेत?, यांना काही राजकीय स्वार्थ साधायचा आहे का?, यांची वृत्ती हिंसक आहे का?, आणि समाजानेच त्याची उत्तरे दिली की, संघ स्वयंसेवक असे नाहीत. आपल्या डोक्यात जे काही भरवले जाते ते काही खरे नाही आणि भरवणारे लोक स्वार्थी आणि लबाड आहेत, याचे आकलन समाजच्या सद्सद्विवेकबुद्धीला होत गेले. या सद्सद्विवेकबुद्धीचे प्रतिनिधित्व नेहरू सेंटर सभागृहात उपस्थित सर्व समाजाबांधव आणि भगिनींनी केले. श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडीजी म्हणत की, सगळा हिंदू समाज स्वयंसेवक आहे. जे संघात आले त्यांचे स्वयंसेवकत्व जागे झाले आणि जे बाहेर आहेत त्यांचे स्वयंसेवकत्व जागे होईल. या समाज स्वयंसेवकवृत्तीचे दर्शन 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी घडले. त्याचा आनंद आणि समाधान शब्दात पकडणे कठीण आहे.