राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महाराष्ट्र प्रांतातर्फे 14, 15 आणि 16 जानेवारी 1983 असे तीन दिवस पुण्यातील तळजाई येथे प्रांतिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मकर संक्रातीचा महिना होता, तेव्हा स्वयंसेवकांना जेवणात गुळाच्या पोळ्या द्याव्या, हा विचार आला. या गुळाच्या पोळ्या हे शिबिर घरोघरी पोहोचण्याचं माध्यम झालं होतं. या शिबिराने ’हिंदू सारा एक’ हा मंत्र महाराष्ट्राला दिला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक श्रीधरपंत फडके यांनी सांगितलेल्या आठवणींचे हे शब्दांकन.
हिंदू ऐक्य हे संघस्वयंसेवकांच्या विचारामध्ये व कृतीमध्ये असतोच. त्यासाठी शिबिरासारख्या वेगळ्या कार्यक्रमाचे निमित्त असावे लागत नाही. पण जेव्हा असा एखादा मोठा कार्यक्रम येतो, त्या वेळी आपल्या विचारांनुसार आपण केलेली कृती ही खरोखरच योग्य प्रकारे झाली आहे की नाही, याची समाजाकडून पावती मिळते. संपूर्ण पुणेकर जनतेकडून तळजाई शिबिराच्या वेळी अशी पावती मिळाली व ‘हिंदू सारा एक’ या महामंत्रावर संपूर्ण समाजाचे शिक्कामोर्तब झाले. ते दिवस होते 13, 14 व 15 जानेवारी 1983. या शिबिरात सुधीर फडके तसेच बाळासाहेब देवरस यांनी घुमवलेला ‘हिंदू सारा एक’ हा मंत्र अजूनही दुमदुमत आहे.
तळजाई शिबिर : गुळाच्या पोळ्या
तळजाई येथे होणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांतिक शिबिराची तयारी सुरू होती. मकर संक्रांत आहे, तर येणार्या पस्तीस हजार स्वयंसेवकांना जेवणात गुळाच्या पोळ्या देऊया असा विचार झाला. या निमित्ताने घरोघरी संपर्कही होणार होता. तत्कालीन माननीय प्रांत संघचालक आणि शिबिराचे संयोजक बाबाराव भिडे हे मात्र त्याला राजी नव्हते. शिबिर संघाचे, मग लोकांकडून पोळ्या कशासाठी गोळा करायच्या? असं त्यांचं म्हणणं होतं. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर गुळाच्या पोळ्या गोळा करण्याच्या उपक्रमाला त्यांनी मान्यता दिली. नंतर मात्र मा. बाबांनी लगोलग पुणेकरांना आवाहन करणारं एक पत्रही लिहून दिलं. ते पत्र मोडीतील होतं. त्याचं आम्ही लगेच भाषांतर करून घेतलं. बाबांची मोडी स्वाक्षरी पत्रात तशीच ठेवली. या पत्राचं शहरात घरोघरी वाटप करण्यात आलं.
प्रांतात हिंदुत्वाचा विषय पुढे नेण्यासाठी शिबिर ठरलं आहे. शिबिराला येणारे सर्व आपले पाहुणे समजून त्यांचं तोंड गोड करण्यासाठी गुळाच्या पोळ्या आपल्या घराजवळच्या संकलन केंद्रावर द्याव्यात,’ असं आवाहन या पत्रात होतं. शिबिराच्या तयारीत मग खातेवाटप झालं आणि गुळाच्या पोळ्या गोळा करण्याचं खातं माझ्याकडे आलं. मला सहाय्यक म्हणून वासुदेवराव कुंटे होते. काम सुरू करताना ‘मोतीबागे’त पहिली नगर कार्यवाहांची बैठक झाली. घरोघरी पत्र गेल्यामुळे प्रतिसाद यायला सुरुवात झाली. मात्र अनेक ठिकाणांहून असे निरोप आले की, गुळाच्या पोळ्या देण्याची इच्छा आहे; पण त्या कशा करायच्या याची माहिती नाही. मग त्यावर उपाय म्हणून गुळाच्या पोळ्या कशा तयार करायच्या याची माहिती सांगायची आणि त्याचं प्रात्यक्षिकही करून दाखवायचं, असा कार्यक्रम सुरू केला.
श्रीमती हेर्लेकर यांचा स्वयंपाक करून देण्याचा उद्योग होता. गुळाच्या पोळ्या करण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम नगरशः आयोजित केले. पोळ्या गोळा करून प्रत्यक्ष द्यायच्या कुठे, असा विचार पुढच्या टप्प्यात आला. मग त्यासाठी मुख्य पोळी संकलन केंद्र आणि उपकेंद्र अशी योजना तयार केली. दहा उपकेंद्रातील पोळ्या मुख्य केंद्रावर येतील आणि तेथून त्या शिबिरस्थानी पाठवल्या जातील, अशी संपूर्ण शहराची रचना उभी राहिली. प्रत्येक नगराला एक प्रमुख नियुक्त झाला. गुळाच्या पोळ्या संकलनासंबंधी सातत्यानं बैठका सुरू झाल्या. किती पोळ्या गोळा होणार याचे आकडे येऊ लागले. नगरांमध्ये निकोप स्पर्धाही सुरू झाली.
शिबिर पठारावर आहे. कदाचित पोळ्यांना मुंग्या लागतील, हे लक्षात घेऊन गुळाच्या पोळ्या पुठ्ठ्याच्या खोक्यांमधून न्यायच्या असं ठरलं. एवढी खोकी आणायची कुठून? मग पुण्यातील औषध विक्रेत्यांच्या बैठका सुरू झाल्या. त्यांना आवाहन केलं की, तुम्ही तुमच्याकडील खोकी द्या. ते अगदी लगेच तयार झाले आणि त्यांच्याकडून खूप मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रत्येक घरातून पाच पोळ्या याव्यात आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी अधिक द्याव्यात, अशी योजना होती. किती पोळ्या गोळा झाल्या याची अचूक माहिती मिळण्यासाठी प्रत्येक केंद्राला तक्ताही करून देण्यात आला होता. त्यात गुळाच्या पोळ्या किती, साध्या किती आणि भाकरी किती याची नोंद केंद्रप्रमुखांनी केली.
खडीवाले वैद्य एक हजार गुळाच्या पोळ्या देणार आहेत, असं आम्हाला समजलं. म्हणून मी आणि वासुदेवराव कुंटे त्यांना भेटायला गेलो. तर तातडीनं त्यांनी आमच्या पुढ्यात गुळाच्या पोळ्या आणल्या आणि म्हणाले, ‘खाऊन बघा, अशा पोळ्या चालतील नां.’ शिवाय हेही सांगितलं की, पोळ्या टोपल्यांमध्ये भरून त्या टेम्पोतून पाठवण्याची व्यवस्थाही मीच करणार आहे. असा प्रतिसाद सर्वत्र मिळत होता.
शिबिर ज्या भागात होतं, त्या भागाचे नगरसेवक शिवाजीराव ढुमे हेही एक हजार गुळाच्या पोळ्या देणार आहेत असं समजलं. म्हणून आम्ही त्यांनाही भेटायला गेलो. ते काँग्रेसचे नगरसेवक. त्यांना म्हटलं, ‘तुम्ही शिबिराला पोळ्या देत आहात म्हणून आम्ही मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोयं.’ तर ते म्हणाले, ‘अहो, शिबिर माझ्या वॉर्डमध्ये आहे. म्हणजे मी यजमान आहे शिबिराचा. माझ्याकडे लोक येणार, मग मी गुळाच्या पोळ्या द्यायला नकोत का? म्हणून मी पोळ्या देतोय.’ असा प्रतिसाद होता सर्वत्र. शहरात जिथे साध्या पोळ्यांची विक्री केली जायची तिथे शिबिराच्या आधीचे पाच-सात दिवस ‘तुम्ही गुळाच्या पोळ्या करून द्याल का’ अशी विचारणा सातत्यानं केली जात होती. या शिबिरावर लोकांनी अलोट माया केली. टेम्पो चालक असोत वा रिक्षा चालक कोणीही कोणत्याही वाहतुकीसाठी पैसे घेतले नाहीत.
असा होता प्रतिसाद
प्रत्यक्ष 13 जानेवारी 1983 रोजी गुळाच्या पोळ्यांचं संकलन संपूर्ण शहरातील केंद्रांवर सुरू झालं. मात्र अनेक घरांमधून 12 जानेवारीपासूनच पोळ्या यायला सुरुवात झाली होती. दिवसभर संकलन सुरू होतं. अनेक केंद्रांवर छान सजावट करण्यात आली होती. कमानी उभारण्यात आल्या होत्या. तळजाई शिबिर गुळपोळी संकलन केंद्र असे कापडी फलकही लावण्यात आले होते. छोट्या केंद्रांवर जमा झालेल्या पोळ्या मुख्य केंद्रांवर येत होत्या आणि तेथून त्या टेम्पोतून शिबिरस्थानी पाठवल्या जात होत्या. शहरात शिबिरमय वातावरण झालं होतं. नागरिक उत्साहानं पोळ्या आणून देत होते. रिक्षाचालकांनी त्यांच्या रिक्षांवर भगवे ध्वज लावले होते. शिबिरस्थान बघण्यासाठी आठ-दहा दिवस आधीपासूनच नागरिक मोठ्या संख्येनं येत होते. गुळाच्या पोळ्या हे शिबिर घरोघरी पोहोचण्याचं माध्यम झालं होतं. पोळी नुसती द्यायची नाही, हा संस्कार. त्यामुळे गुळाच्या पोळ्यांबरोबरही चटणी, साखर किंवा साध्या पोळ्यांबरोबर गुळाचा खडाही दिला जात होता.
पुण्यातील सर्व पेठा, सोसायट्या, बंगले, सर्व भाग आणि सर्व वस्त्यांमध्ये या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. अगदी गोखले नगरमधील चाळी, काशेवाडी, सोनावणे चाळ, वैदूवाडी, वडारवाडी येथील केंद्रांवरही पोळ्या मोठ्या संख्येत गोळा झाल्या. गोखलेनगर चाळींमधील कार्यकर्त्यांनी तर पोळ्यांच्या संख्येचा विक्रम करायचा असं पहिल्यापासूनच ठरवलं होतं. चंदू शेट्टी, अरविंद देवकर, सुरेश कुर्हाहडे असे काही कार्यकर्ते त्यात अग्रणी होते.
समाजाचं अलोट प्रेम
हा विषय सुरू होता, तेव्हा संघाचे वरिष्ठ अधिकारी आम्हाला म्हणायचे, एक लाख गुळाच्या पोळ्या गोळा झाल्या तर तुम्ही जिंकलात. प्रत्यक्षात शहरातून पावणेदोन लाख पोळ्या गोळा झाल्या आणि काही हजार गुळाच्या पोळ्या नागरिकांनी थेट शिबिरात आणून दिल्या. समाजाचं जे अलोट प्रेम संघाच्या कामावर आहे, त्याचीच तर ही प्रचिती होती. शिबिराला आलेल्या सर्वांना पुणेकरांनी आपलं मानलं आणि ‘हिंदू सारा एक...’ ही अनुभूती मिळाली.