डॉ. हेमंत बेडेकर
9767200905
बांबू विकासाचे चिनी मॉडेल ही केवळ कृषी किंवा उद्योगाची कहाणी नसून दूरदृष्टी, शास्त्रीय अभ्यास आणि काटेकोर अंमलबजावणी यांचा आदर्श नमुना आहे. हजारो वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या बांबूला चीनने आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन संस्था आणि मजबूत पुरवठा साखळीच्या माध्यमातून जागतिक उद्योगात रूपांतरित केले. शेतकरी, संशोधक, उद्योग आणि सरकार यांची सुसूत्र सांगड घालून बांबू ग्रामीण समृद्धीचे, रोजगारनिर्मितीचे आणि परकीय चलनाचे प्रभावी साधन कसा ठरला, याचा प्रेरणादायी मागोवा या लेखात घेतला आहे.
यापूर्वी आपण बांबूबद्दल सर्वसाधारण माहिती, जगभरातले बांबूचे स्थान व त्याचे चक्रीय अर्थकारणातील महत्त्व पाहिले. आता प्रत्यक्ष चीनमधील बांबूकडे वळूया. यासाठी आपल्याला चीनमधील पुरातन काळातील बांबूचा आढळ व उपयोग याचा आढावा घ्यावा लागेल. चीनमधला बांबूचा प्रवास साधारणपणे ख्रिस्तपूर्व 200 च्या सुमारास सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. क्वीन राजाच्या कालखंडात केलेल्या वेगवेगळ्या काव्यात बांबू लागवडी संदर्भातील उल्लेख आढळतात. हे सगळे उल्लेख हे उत्तर चीनमधील आहेत. उत्तर चीनमध्ये शान्झी प्रांतातील ली झिन याने बांबूवर केलेलं कवित्व फार प्रसिद्ध आहे. पण त्या प्रांतात आता मोठ्या लागवडी अस्तित्वात नाहीत. चीनच्या बांबू इतिहासामध्ये डोकावताना असं लक्षात येते की, 5000 ते 6000 वर्षांपूर्वीपासून चीनमधील बांबूच्या लागवडीचे उल्लेख आणि त्यापासून विणकाम करून केलेल्या वस्तूंचे उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात. 3200 ते 3203 ख्रिस्तपूर्व या काळात बांबू विणकामात चीनी माणसांने उत्तम प्रगती केल्याचे आढळते. हे सगळे राजघराण्यांशी निगडित उल्लेख आहेत.
इ.स. 200-350 या काळात हान आणि जीन राजांच्या काळात बांबू वापरून तयार केलेल्या राजवाड्यांच्या बांधकामाचे उल्लेख आढळतात. त्याचवेळेस बांबूबद्दलची समग्र माहिती असलेले लेख आढळतात. यामध्ये बांबूच्या लागवडीचे तंत्र आणि उपयोग त्याचबरोबर वाळवलेल्या बांबूच्या कोंबाच्या वापराचे उल्लेख मोठ्या प्रमाणात आहेत. यामधील एक गमतीशीर उल्लेख खास आहे; ज्यामध्ये बांबू गवत पण नाही आणि वृक्ष पण नाही असा उल्लेख आहे. त्या काळातील बांबू अभ्यासकांना बांबूची खूप सखोल माहिती होती. आपणास माहीत आहेच की, कागदाचा शोध चीनमध्ये लागला. त्याअगोदर बांबूच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर चीनी मुळाक्षरे लिहिलेली आढळतात. त्याला बांबू टॅब्लेट्स असं म्हटलं गेलं. हा काळ आहे, 1600 ते 1100 ख्रिस्तपूर्व. टॅब्लेट्सपासून बनवलेली पुस्तके अनेकदा आढळतात. इसवी सन 25 ते 220 याकाळामध्ये बांबूचा लगदा तयार करणे आणि त्यापासून चांगल्या प्रतीचा कागद तयार करणे याबद्दलचे तंत्रज्ञान चीनी लोकांनी आत्मसात केलेले होते. अनेक सरकारी आज्ञा अशा चांगल्या पद्धतीने तयार केलेल्या कागदावर त्याकाळी लिहून दिल्या जात. बांबू कॅलिग्राफीसाठी चीन आजही प्रसिद्ध आहे. कॅलिग्राफीसाठी लागणारे ब्रश हे बांबू आणि घोड्याचे केस यापासून बनवले जात. याखेरीज अनेक प्रकारची वाद्ये चीनमध्ये तयार होत असत. प्राचीन चीनमध्ये बांबूचं गुणगान करणारी काव्य आणि बांबूवरचे अनेक लेख लिहिले जात असत. सु शी या सोंग डायनास्टीमधील कवीने एक प्रसिद्ध काव्य लिहून ठेवले आहे. त्यांनी केलेली एक प्रसिद्ध कविता बांबूची महती दोन ओळीत सांगते. तो म्हणतो की, एकवेळ मास न खाता माणसं जगू शकतील पण बांबूचा वापर न करणारी माणसे वाह्यात होतात. एकवेळ अशक्त माणसे धष्टपुष्ट होतील पण वाह्यात माणसे संवेदनशील नसतात.
चीनमधील बांबूचा औद्योगिक वापर
चीनचा बांबू इतिहास जरी 4000 वर्षांचा असला तरी खर्या अर्थाने चीनमधील बांबूचा औद्योगिक वापर 1980 पासून सुरु झाला. यापूर्वी लगदा करून कागद तयार करणे ही प्रक्रिया सोडली तर बहुतांश वेळा बांबूच्या वस्तू हाताने प्रक्रिया करूनच होत असत. बांबू कोंबाचा वापर सुद्धा गरजेपुरता होत असे. हे कोंब शेतकरी वाळवत असे किंवा मिठाच्या पाण्यात घालून स्वतः वापरत असे किंवा स्थानिक बाजारात विकत असे. 1080 मध्ये तैवानमधून आयात केलेली यंत्रे वापरून बांबूचा औद्योगिक स्तरावर मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. सोबत दिलेल्या नकाशाकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, आज चीनमधल्या दक्षिण आणि दक्षिणपूर्व समुद्रकिनार्यालगतच्या 8-10 प्रांतामध्ये बांबूची व्यापारी लागवड होते आणि त्यावर आधारित कारखाने आहेत. चीनमधल्या बांबूपैकी 80 टक्के बांबू उद्योग फुझियान, झीयान, शांक्सी आणि हुनान याच भागामध्ये एकवटलेला आहे. याचबरोबर सिचुआन, ग्वांगडोंग, ग्वांग्झी आणि युनान याही प्रांतात भरपूर बांबू आढळतो. यापैकी फुजियान या प्रांतामध्ये सर्वांत जास्त बांबू आढळतो. तसेच जिआंगसी एक मोठा बांबू उत्पादक प्रांत आहे. झिझियांग प्रांतामधील डोंगराळ प्रदेशामध्ये जगातील सर्वांत मोठा बांबू उत्पादक प्रदेश म्हणजेच अंजी काउंटी हा तालुक्याएवढा भाग आहे. हुनान, सिचुआन आणि युनान या प्रांतामध्ये बांबूची बहुविधता पाहायला मिळते.

याच भागामध्ये बांबू मोठ्या प्रमाणावर आढळण्याचे कारण काय? दक्षिण आणि अतिपूर्वेचे प्रांत यामध्ये बांबू वाढण्यासाठी अनुकूल असे मान्सूनचे हवामान आहे. याशिवाय पश्चिमेकडील दक्षिण पूर्व प्रांतातील डोंगराळ भागामध्ये बांबूला लागणारे हवामान उत्तम आहे. म्हणूनच हे प्रांत बांबूच्या उद्योगाचे, बांबू क्राफ्ट्सचे माहेरघर म्हटले पाहिजे. या प्रांतांशिवाय काही समशीतोष्ण हवामान असलेले प्रांत बांबूचे उत्पादन करतात. समशीतोष्ण प्रदेशामध्ये आपल्याला एकपाद बांबू म्हणजेच मोसो बांबू मोठ्या प्रमाणात आढळतो. चीनच्या बांबू उद्योगात मोसो बांबूचे सर्वांत जास्त प्राबल्य आढळते. म्हणजेच जरी चीनच्या बांबूचा इतिहास फार प्राचीन असला तरी प्रत्यक्षात बांबूचा व्यावहारिक उपयोग आणि त्याचा देशाच्या अर्थकारणाशी संबंध 1960 पासूनच्या काळात आला.
चीनने 1980 साली आपले शत्रुराष्ट्र असलेल्या तैवानमधून बांबूसाठीची यंत्रसामग्री विकत आणली आणि तेव्हापासून खर्या अर्थाने बांबूचा उद्योग म्हणून वापर व्हायला सुरुवात झाली. ही आणलेली यंत्रसामग्री आपल्याकडे उपलब्ध असलेल्या बांबूच्या वापरासाठी योग्य अशी बनवली गेली. या साठी सर्व तंत्रज्ञान संस्था आणि विद्यापीठे यातील शेकडो शास्त्रज्ञांनी सरकारी प्रोत्साहनाला दाद देत योग्य प्रकारच्या यंत्रसामग्रीचे उत्पादन सुरू केले. त्यांचा वापर करून नवनवीन वस्तूनिर्मिती सुरू झाली. त्यावर आधारित बांबू देशांतर्गत व्यापार आणि निर्यात सुरू झाली. या नवीन तयार केलेल्या यंत्रसामग्रीमुळे 1990 पासून 2007 सालापर्यंत व्यापार सात पट वाढला. हे सर्व बांबूवाढीसाठी अनुकूल असलेल्या दक्षिणेकडील आणि दक्षिण पूर्वेकडील प्रांतामध्ये घडले आणि आजही ते चालू आहे.
बांबू लागवड विस्तार
बांबू लागवडीचा हा विस्तार फक्त 12 प्रांतामध्ये झाला. चीनमध्ये 39 गणांमधील 500 प्रजातींचा आढळ आहे. यापैकी मोसो बांबूचा वापर जवळ जवळ 71 टक्के आहे. उरलेला बांबू प्रामुख्याने बेटांनी वाढणारा आहे. जरी अतिप्राचीन काळापासून चीनमध्ये बांबूचा आढळ असला तरी बांबू उद्योगाचा विस्तार आणि जगाच्या बांबू बाजारातील मिळवलेलं पहिलं स्थान ही प्रगती उण्यापुर्या 70-75 वर्षांतील आहे.
बांबूच्या इतर उत्पादनांबरोबर बांबूच्या कोंबांची निर्मिती लक्षणीय आहे. हे सर्व बांबूचे प्रक्रिया केलेले कोंब जपान, कोरिया, हाँगकाँग व तैवान या देशांबरोबरच अमेरिका आणि युरोपमध्ये निर्यात केले जातात. ही प्रगती करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे चीनने बारकाईने लक्ष पुरवले यामुळे बांबू उत्पादन क्षमता प्रचंड वाढली.
बांबूचा वनस्पतीशास्त्रीय अभ्यास करून उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी बांबूच्या विविध प्रजातींची वेगवेगळ्या हवामान विभागात लागवड करून त्यांचा तौलनिक अभ्यास करून कोणत्या प्रजाती कोणत्या हवामानात लावायच्या याचा निर्णय घेतला गेला. त्यामुळेच आपल्याला मध्य चीनजवळच्या प्रांतामध्ये मोसो बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड आढळते. कोणत्याही बांबूचा लागवडीसाठी योग्य वातावरण असल्याशिवाय त्याची उपयुक्त अशी फायदेशीर लागवड करणं शक्य नाही. यामुळेच चीन बांबू लागवडीमध्ये प्रगती करत गेला. तसेच प्रत्येक बांबूच्या प्रजातीवर कोणते रोग आणि किडी येतात यांची नोंद केली. रोग किंवा किडी येण्यापूर्वी औषधे फवारून उत्पादनावर परिणाम घडवून आला. बांबूच्या गुणधर्मांचा वेगवेगळ्या अंगांनी सखोल अभ्यास करून कोणत्या उपयोगासाठी कोणती प्रजाती हे ठरवण्यात आले. या सर्व अभ्यासाच्या आधारावर योग्य प्रजाती व त्यांना लागणारे खत, मशागत हे ठरवून शेतकर्यांना शिक्षित केले. त्यामुळे बांबूचे दर एकरी उत्पन्न वाढवले गेले. शेवटी दर एकरी उत्पन्न वाढल्याशिवाय कोणतीही लागवड व्यावसायिक होत नाही. काही प्रमाणात जनुकीय सुधारणा करून बांबूच्या सुधारित प्रजाती काढण्याचा प्रयत्न केला गेला. बांबूच्या वस्तूनिर्मितीसाठी करावयाच्या प्रक्रियांवर संशोधन करून प्रक्रिया तंत्रज्ञान विकसित करून शेतकर्यांच्या दारात पोचवले. प्रत्येक उद्योगाचा विचार करून हे ठरवलं गेलं. सहाजिकच नवीन उद्योग निर्माण होऊ शकले. बांबूच्या परंपरागत वापराचा विचार करून आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन कोंबांची प्रक्रिया पद्धती निश्चित केली गेली. या उद्योगांचा विस्तार करून परकीय चलन हस्तगत केले गेले.
दिशादर्शक
हे सर्व 1980 ते 1990 या काळामध्ये झाले. परंपरागत उद्योगांशिवाय इतर कोणत्या प्रकारे बांबूचा वापर करता येतो हे अभ्यासला गेले. त्यामुळे बांबूची पानं, त्यांचा अर्क व इतर उद्योगांमध्ये त्याचा वापर हे लक्षात घेऊन त्याचं उद्योगात रूपांतर झालं. वस्तू तयार करत असताना. साधारणपणे मुख्य वस्तू ही 10 ते 20 टक्के होते आणि 80 टक्के भाग वाया जातो. यामध्ये बांबूचा भुसा, साल, वाकडे-तिकडे असलेले भाग, निमुळती होत जाणारी टोक आणि पेरे यांचा समावेश होतो. प्रथमपासूनच 100 टक्के बांबूचा वापर व्हावा यावर भर दिला गेला. जर बांबूचा 100 टक्के वापर व्हायचा असेल तर एकही भाग वाया जाता कामा नये. वाया जाणारा सर्व भाग हा अनेक उद्योगांचा कच्चा माल म्हणून वापरता यावा यासाठी त्यापासून कशाकशाची निर्मिती होऊ शकते हे शोधले गेले.
मग भुशाच्या वापरातून स्वयंपाकघरातील वाट्या, ताटल्या, चमचे, पार्टिकल बोर्ड, कोळसा, उच्च प्रतीचा कोळसा, वीजनिर्मिती, शेगडीमध्ये जाळण्यासाठी कांडी कोळसा, बायोगॅस, सीएनजी गॅस, धागानिर्मिती आणि औद्योगिक अल्कोहोल असे अगणित पदार्थ औद्योगिक पद्धतीने तयार होऊ लागले. याच पदार्थांच्या निर्मिती प्रक्रियेत व्हिनेगर, टार असेही अनेक पदार्थ मिळाले. मग वाया जाणार्या फांद्या,पाने, जमिनीखालील कंद असे पदार्थही मिळू लागले. या नवीन वस्तूपासून उत्पन्नात भर पडली.
अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने सर्व स्तरावर विचारपूर्वक टाकलेली पावले बांबूला उर्जितावस्था देऊ शकली. यासाठी सर्वांत तळाचा असलेल्या शेतकर्यापासून ते गाव, स्थनिक स्वराज्य संस्था, संशोधन संस्था, शहर, तालुका, प्रांत आणि राष्ट्रीय सरकारे यांची सूत्रबद्ध साखळी तयार झाली. कोणत्या स्तरावर काय काम करावयाचे याचे नियोजन करून बांबू उद्योग उभा राहिला. तो जागतिक स्तरावर कसा वाढवायचा, यासाठी हजारो शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ एकत्र आले. शेतकर्यांना विविध प्रकारची प्रशिक्षणे दिली गेली. या नवीन तंत्रांचे शिक्षण शेवटच्या घटकापर्यंत दिले गेले. सूत्रबद्ध पद्धतीने सुधारित बांबू लागवड व त्याची शास्त्रशुद्ध तोड, त्यावर खेडे स्तरावर पूर्व प्रक्रिया, विविध उद्योगांची पुरवठा साखळी तयार करून तिची अंमलबजावणी करणे, तयार मालाला आंतरदेशीय व परदेशातील बाजारपेठा शोधणे असे प्रयत्न केले गेले व ते प्रत्यक्षात उतरवले गेले. नवीन तंत्रज्ञानाचा सर्वात खालच्या स्तरापर्यंत प्रसार हे चिनी बांबू उद्योगाचे खास वैशिष्ट्य आहे. बांबू उद्योगाला प्रोत्साहन मिळावे म्हणून विविध स्तरावर अर्थसाहाय्य पुरवले गेले. भविष्यात बांबू उद्योगात आपण काय करू शकतो, यासाठी पण विशेष प्रयत्न केले जातात.
मुख्य म्हणजे बांबूच्या विविध उद्योगांसाठी तगडी पुरवठा साखळी उभारणे हे महत्त्वपूर्ण काम तेथील विविध स्तरावरील सरकारांनी केले. परिणामतः बांबू उद्योगाने ग्रामीण स्तरावरील गरिबी हटवण्यासाठी मोलाची भर घातली. ग्रामीण स्तरावर लक्षावधी रोजगार उपलब्ध झाले, शेतकर्याचे उत्पन्न वाढले व देशाच्या सकल उत्पन्नात लक्षणीय भर पडली. चीनला जगाच्या बांबू व्यापारात अग्रगण्य स्थान मिळाले. आज जगाच्या बांबू उद्योगात चीन पहिला आणि भारत 14वा आहे. बांबू लागवडीने परकीय चलनाबरोबरच ग्रामीण हवामान बदल घडवून आणले. प्रस्तुत लेखकाने अंजी तालुक्यातील प्रवासात हे बदल अनुभवले.
समृद्ध वारसा लाभलेल्या देशाने बांबू उद्योगात प्रगती करण्यासाठी काय उपाय योजले व कोणती पथ्ये पाळली व देशाला जगात अग्रगण्य स्थान कसे मिळवून दिले हे पुढील भागात पाहू.
संचालक, वेणू वेध बांबू संशोधन संस्था, पुणे.