भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र, गोवा व गुजरात प्रातांचे संघटनमंत्री श्रीरंग उर्फ दादा लाड यांनी कापूस आणि ज्वारीत अभिनव तंत्र विकसित करून शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट केले. लाल कंधारी गायींच्या संवर्धनातून पशुपालनाला नवी दिशा दिली. शेतकरीकेंद्री प्रयोग, अनुभवाधिष्ठित ज्ञान आणि व्यवहार्य तंत्र या सर्व योगदानापोटी दादा लाड यांना केंद्र सरकारने नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या संशोधनामुळे शेतकर्यांना अधिक उत्पादन, कमी खर्च आणि शाश्वत शेतीचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
जपानमध्ये, नव्वद एक वर्षांपूर्वी, मासानोबु फुकुओका नावाचा एक तरुण शास्त्रज्ञ आपल्या गावी परततो आणि निसर्गाशी सुसंगती साधत शेती कसायला सुरुवात करतो. त्याच्या मेहनतीमुळे भाताचे दर हेक्टरी उत्पादन जबरदस्त वाढते. त्याच पद्धतीने, कला शाखेत पदवीसह शिक्षित, संघटन, संघर्ष आणि संरचना या त्रिसूत्रीवर आधारित भारतीय शेतकर्यांचे दायित्व उचलणारे श्रीरंग उर्फ दादा देवबा लाड यांनी कृषी संशोधनात अभूतपूर्व योगदान दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे कापूस आणि ज्वारी उत्पादनात क्रांती घडली असून, शेतकर्यांचे उत्पन्न आणि जीवनमान यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे.
दादा लाड यांचा जन्म 1 जानेवारी 1947 रोजी परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथे एका साध्या शेतकरी कुटुंबात झाला. वारकरी परंपरेचा संस्कार लाभलेल्या या कुटुंबात दादांचे बालपण घडले. दोन भावांसह वाढताना समाज, शेती आणि संस्कार यांची बीजे त्यांच्या मनात रुजली. शिक्षणासाठी परभणी गाठल्यानंतर मराठवाडा विद्यालयात शिकताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा परिचय झाला. आठवीचे शिक्षक देशमुख, तसेच प्रचारक बापूराव सारोळकर, जनुभाऊ रानडे आणि बाळासाहेब नाईक यांच्या विचारांनी दादांचे जीवनध्येय ठरले. शिवाजी महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत असताना मिळालेली सरकारी शिक्षकाची नोकरी त्यांनी निर्धारपूर्वक सोडली आणि 1970 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून पूर्णवेळ कार्यरत झाले.
आणीबाणीच्या कठोर काळात (1975-1980) देवगिरी प्रांतात कार्य करताना त्यांनी संघटनकौशल्य, धैर्य आणि निष्ठेची कसोटी यशस्वीरीत्या पार पाडली. 1982 पासून दादांवर भारतीय किसान संघाची जबाबदारी सोपविण्यात आली. मराठवाडा व देवगिरी प्रांतातून सुरू झालेला हा प्रवास आज व्यापक स्वरूप धारण करून ते भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या तीन राज्यांचे संघटनमंत्री म्हणून शेतकरी संघटन मजबूत करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत.
दादा लाड यांचे संशोधन
कापूस उत्पादक शेतकर्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ व्हावी, या ध्येयाने दादा लाड यांनी कापूस पिकासाठी गळफांदी छाटणीची एक अभिनव व शास्त्रशुद्ध पद्धत विकसित केली. या तंत्रामुळे पिकाची अनावश्यक वाढ नियंत्रित होते आणि त्याचा थेट परिणाम बोंडांची संख्या व वजन वाढण्यात दिसून येतो, असे त्यांनी प्रत्यक्ष प्रयोगांतून सिद्ध केले. या संशोधनाच्या उपयुक्ततेची दखल घेत 2024 मध्ये झालेल्या 52व्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समिती (अॅग्रेस्को) बैठकीत या तंत्रज्ञानाला अधिकृत मान्यता देण्यात आली. आज हे तंत्रज्ञान देशातील 8 राज्यांत यशस्वीरीत्या स्वीकारले गेले असून लाखो शेतकरी कापसातून अधिक उत्पादन व नफा मिळवत आहेत.
हे संशोधन कशाच्या आधारे सिद्ध केले? याविषयी सांगताना ते म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. आमच्या कुटुंबाची आर्थिक नाळ कापसाच्या पिकाशी घट्ट जोडलेली होती. त्यामुळे कापूस हे पीक कधी आणि कसे माझ्या जिव्हाळ्याचा विषय झाले, हे मलाही कळले नाही; पण ते आपोआपच माझ्या चिंतनाचा केंद्रबिंदू बनले. कापसाच्या उत्पादनात घट झाली की त्याचा भार थेट घरावर आणि मनावर पडायचा. शेतकरी आणि कापूस उत्पादक असलेले वडील उत्पन्न कमी झाल्यावर अस्वस्थ होत, त्यांच्या चेहर्यावरची चिंता माझ्या मनात खोलवर रुतायची. त्या क्षणांनीच शेतकर्याच्या वेदनांशी माझे नाते अधिक घट्ट झाले. कापूस हा माझ्या चिंतनाचा केंद्रबिंदू बनल्याने मी अनेकदा कापसाच्या शेतात जाऊन थेट कापसाच्या झाडाजवळ बसत असे आणि त्याचे बारकाईने निरीक्षण करत असे. ते काही आंबा, संत्रा, मोसंबी, चिकू किंवा पेरूचे झाड नव्हते की ज्याखाली सहज वेळ घालवावा; तरीही त्या एका कापसाच्या झाडाजवळ तासन्तास बसणे मला समाधान देत असे. सतत प्रवास करणारा कार्यकर्ता असल्याने गावं बदलत होती, शेतकरी बदलत होते; पण शेत मात्र कापसाचेच असायचे.

एकदा एका कार्यकर्त्याने विचारले, कापसात एवढा वेळ बसून काय करत आहात? त्यावेळी मला जाणवले की, निरीक्षणातूनच उत्तर मिळते. कापसाच्या एकाच झाडावर दोन प्रकारच्या फांद्या असतात. एकाच झाडाच्या असूनही त्यांच्या लक्षणांमध्ये स्पष्ट फरक दिसून येतो. तेथूनच माझ्या चिंतनाला दिशा मिळाली. चिंतन हे वाहत्या पाण्यासारखे असते; ते पुढे सरकत राहते. जिथे अडथळा जाणवतो, तिथे असे का? हा प्रश्न मनात उभा राहतो. त्या प्रश्नाचे उत्तर पूर्ण समाधान देईपर्यंत मन थांबत नाही. प्रश्नातून शोध, शोधातून नवे प्रश्न आणि पुन्हा चिंतन अशा प्रवासातून अखेर अचूक उत्तर सापडते.
हा शोध पूर्ण झाल्यावर मनात जो आनंद निर्माण होतो, तो शब्दांत मांडणे कठीण असते. जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे असा तो अनुभव असतो. सरस्वतीच्या कृपेने कापूस पिकात मी विकसित केलेल्या तंत्रामुळे आज शेतकर्यांना पूर्वीपेक्षा तिप्पट उत्पन्न मिळू लागले. विशेष म्हणजे, आय.सी.ए.आर., नवी दिल्ली यांनी या तंत्राला मान्यता देत त्यावर शास्त्रशुद्धतेचा शिक्का उमटवला. हाच तो क्षण माझ्या जीवनातील परम आनंदाचा.
कापूस उत्पादनात वाढ करणारे आपले नेमके तंत्र काय आहे? याविषयी दादा लाड सांगतात, कापसाच्या झाडाची रचना नीट समजून घेतली, तर भरघोस उत्पादनाचा मार्ग आपोआप खुला होतो. कापसाच्या झाडावर दोन प्रकारच्या फांद्या असतात.(1) गळफांदी (मोनोपोडिया) आणि (2) फळफांदी (सिम्पोडिया).एकाच झाडाच्या असल्या, तरी या दोन्ही फांद्यांची लक्षणे, भूमिका आणि परिणाम पूर्णपणे वेगळे असतात. गळफांद्या झाडाच्या सुरुवातीलाच खोडापासून सरळ वर वाढतात. साधारण दोन-तीन, तर नवीन वाणांत चार गळफांद्या असतात. या फांद्या उंच, जाड आणि अत्यंत हावर्या असतात. झाडाला दिलेल्या एकूण खतापैकी सुमारे 70 टक्के खत या गळफांद्या स्वतःच घेतात. त्या जास्त जागा व्यापतात, त्यामुळे एकरी रोपांची संख्या कमी ठेवावी लागते. एवढी उंची व जाडी असूनही या फांद्यांवर फक्त पाच-सहा बोंडे लागतात. अन्नरस घेतात, पण तो बोंडापर्यंत पोहोचवत नाहीत. परिणामी बोंडाचे वजन अपेक्षेइतके वाढत नाही. दुसरीकडे, फळफांद्या खोडापासून आडव्या, जमिनीला समांतर वाढतात. एका झाडावर साधारण 12 ते 15 फळफांद्या असतात. या आकाराने बारीक असल्या, तरी त्या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. स्वतःची वाढ न करता मिळालेला अन्नरस थेट बोंडाला देतात जणू आईच्या भूमिकेत. पण गळफांद्या बहुतांश अन्नरस शोषून घेत असल्याने फळफांद्यांना पुरेसे पोषण मिळत नाही. त्यामुळे फांद्या अपेक्षित लांबीपर्यंत वाढत नाहीत, पाते गळतात आणि एका फळफांदीवर फक्त दोन-तीनच बोंडे तयार होतात. त्यांचे वजनही चार-पाच ग्रॅमपुरतेच मर्यादित राहते.
प्रयोगातून उलगडलेले सत्य विशद करताना दादा सांगतात, माझा निष्कर्ष स्पष्ट होता, कापसातील भरघोस उत्पादनाचा सर्वांत मोठा अडसर म्हणजे गळफांदी. हे सिद्ध करण्यासाठी मी दोन झाडांवर प्रयोग केला. एक झाड आहे तसेच ठेवले, तर शेजारच्या झाडावरील गळफांद्या काढून टाकल्या. परिणाम थक्क करणारे होते. गळफांद्या काढलेल्या झाडावर प्रत्येक फळफांदीवर 8-9 बोंडे लागली आणि त्यांचे वजन 7-8 ग्रॅम झाले. ज्या झाडावर गळफांद्या होत्या, त्या झाडावर फळफांद्या खुंटल्या, बोंडे तीनपेक्षा जास्त लागली नाहीत आणि वजन पाच ग्रॅमच राहिले.
वजाबाकी नव्हे, बेरीजचे गणित
सुरुवातीला एक भीती होती तीन गळफांद्या काढल्यास त्यावरील बोंडे कमी होतील. पण प्रयोगाने सिद्ध झाले की, हे वजाबाकीचे नव्हे, तर बेरीजचे गणित आहे. गळफांदी ठेवली तर प्रत्येक फळफांदीवर तीनपेक्षा जास्त बोंडे मिळत नाहीत आणि वजन चार ग्रॅमच्या आसपास राहते. गळफांदी काढली, तर प्रत्येक फळफांदीवर किमान 6-7 बोंडे लागतात. एका झाडावर आठ-दहा फळफांद्या असल्याने एकूण उत्पादन लक्षणीय वाढते. गळफांद्यांवरील बोंडे वजा केली, तरी झाडावर किमान आठ बोंडे जास्त मिळतात. गळफांद्या नसताना एका झाडावर सुमारे 920 ग्रॅम कापूस, तर गळफांद्या असताना फक्त 288 ग्रॅम कापूस मिळतो. म्हणजे जिथे एकरी 6-7 क्विंटल मिळायचे, तिथे आता 16-18 क्विंटल सहज मिळू लागला, आणखी वाढीची संधीही आहे, असेही ते सांगतात.
टॉपींग : वजन वाढवण्याची किल्ली
लाड यांच्या तंत्राचा भर बोंडांची संख्या वाढवण्यावर नाही, तर बोंडाचे वजन वाढवण्यावर आहे. गळफांद्या काढल्यावर बोंडाचे सरासरी वजन 3 ग्रॅमवरून 6 ग्रॅमपर्यंत गेले. पुढची किल्ली म्हणजे टॉपींग-झाडाची उंची साडेतीन फुटांपर्यंत रोखणे. झाड जितके उंच, तितका अन्नरस वर वाया जातो. उंची रोखली, तर अन्नरस खालच्या फळफांद्यांकडे वळतो आणि प्रत्येक बोंडाचे वजन 1 ते 1.5 ग्रॅमने वाढते. केवळ 1 ग्रॅम वाढ झाली, तरी एकरी 3 क्विंटल कापूस जास्त मिळतो.
खर्च कमी, फायदा जास्त
या तंत्रामुळे कापूस शेतकर्यांसाठी शाप न राहता वरदान ठरतो. याविषयी बोलताना दादा म्हणाले, 3:1 अंतरावर लागवड केली तरी कापूस दाट होत नाही. रोपांची संख्या एकरी 12,600 पर्यंत वाढते. गळफांद्या काढल्याने खतांची गरज कमी; स्वतंत्र युरिया लागत नाही. झाडे ठेंगणी असल्याने औषध व फवारणीचा खर्च कमी होतो. याखेरीज सूर्यप्रकाश झाडाच्या बुंध्यापर्यंत पोहोचतो, बोंड सडत नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच कापूस संपतो, पुढील पीक घेण्यास वेळ मिळतो.
दर्जेदार कापूस, खात्रीशीर उत्पादन
या तंत्रात खालच्या पहिल्या फांदीवरील आणि शेवटच्या फांदीवरील बोंडाचे वजन समान असते. बोंडे मोठी, भरदार असतात; कवडी कापूस होत नाही. बोंडे सहज निघतात आणि खुरकुटीत कापूस राहत नाही. कापसाच्या झाडावरील गळफांदी हीच खरी ‘ग्यानबाची मेख’ आहे. ती ओळखली आणि योग्य वेळी काढली, तर कापूस शेतकर्याच्या जीवनात नक्कीच नवे सोने पिकवतो, असेही लाड यांनी सांगितले. गळफांदी छाटून बोंडाचे वजन वाढवून कापसाच्या उत्पादनात आमूलाग्र बदल घडवून आणणार्या या अभिनव पद्धतीला आज ‘दादा लाड तंत्र’ म्हणून ओळखले जाते. हे तंत्र महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांत झपाट्याने रुजले आहे. आज हजारो शेतकरी हे तंत्र अवलंबून कमी खर्चात अधिक, दर्जेदार व नफ्याचे उत्पादन घेत आहेत.
सुधारित ज्वारी तंत्र
दादा लाड यांचे संशोधन केवळ कापसापुरते मर्यादित न राहता ज्वारीसारख्या पारंपरिक पिकालाही नवे आयाम देणारे ठरले आहे. आजही अनेक शेतकरी ज्वारीची लागवड जुन्याच पद्धतीने करतात. एकरी सुमारे 40 किलो बियाणे वापरून केवळ 7 ते 8 क्विंटल उत्पादन घेतात. या वास्तवावर सखोल अभ्यास करत दादा लाड यांनी सुधारित ज्वारी तंत्र विकसित केले. या तंत्रात टोकण पद्धतीचा अवलंब करून केवळ 5 किलो बियाण्यात एकरी पेरणी केली जाते. टोकणीनंतर लगेच ठिबक सिंचन दिल्याने उगवण एकसारखी व जोमदार होते. कोळपणीद्वारे आंतरमशागत सुलभ होते आणि वाफसा स्थितीनुसार फुलोर्यापासून दाणे भरण्यापर्यंत पिकाला आवश्यक पाण्याचे संरक्षण मिळते. ठिबकामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असून, प्रवाही पाणी देण्याच्या तुलनेत दुप्पट क्षेत्रावर पेरणी शक्य होते.
या शास्त्रशुद्ध पद्धतीमुळे एकरी 28 क्विंटलपर्यंत उत्पादन घेता येते, हे दादा लाड यांनी प्रत्यक्ष प्रयोगातून सिद्ध करून दाखविले आहे. परिणामी, शेतकर्यांचा उत्पादन खर्च घटून नफा लक्षणीय वाढत असून ज्वारी पुन्हा एकदा फायदेशीर पीक ठरत आहे.
लाल कंधारी गोवंश कार्य
केवळ कापूस व ज्वारीच नव्हे, तर पशुधनासाठीही त्यांनी मोठे काम केले आहे. देशी गाईचे महत्त्व ओळखून त्यांनी मराठवाड्यातील ’लाल कंधारी’ गाईच्या संवर्धनासाठी आणि प्रचारासाठी विशेष प्रयत्न केले. दादा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली लाल कंधारी गोवंशाचे जतन व संवर्धन ही माळसोन्ना गावाची ओळख ठरली आहे. शुद्ध देशी वंश टिकवण्यासाठी नैसर्गिक रेतन, शास्त्रशुद्ध संगोपन व निवडक पैदास यावर भर देण्यात आला. परिणामी लाल कंधारी गायींची संख्या वाढली, मजबूत व कार्यक्षम बैलजोड्या उपलब्ध झाल्या आणि गोर्हे-कालवडी विक्रीतून शेतकर्यांना स्थिर उत्पन्नाचा पर्याय मिळाला. रोगप्रतिकारक, तापमान, सहनशील आणि कमी खर्चात उपयुक्त अशा या गोवंशामुळे शेती व पशुपालनाचा समन्वय साधला गेला आणि माळसोन्ना देशी गोवंश संवर्धनाचे प्रेरणास्थान बनले आहे.
कृषी क्षेत्रातील त्यांच्या अखंड तपश्चर्येची आणि शेतकरीहितासाठी केलेल्या मोलाच्या कार्याची दखल घेत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने त्यांना नुकतीच ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करून गौरवले. त्यानंतर आता केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर करून त्यांच्या कार्यावर राष्ट्रीय पातळीवर कृतज्ञतेची आणि मान्यतेची मोहोर उमटवली आहे. शेतकरी संशोधनाला सन्मान देणारा हा गौरव क्षण ठरला आहे.
या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे त्यांचे संशोधन केवळ गौरवापुरते मर्यादित न राहता, देशभरातील अधिकाधिक शेतकर्यांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुभवाधिष्ठित ज्ञान, शेतकरीकेंद्री तंत्रज्ञान आणि व्यवहार्य प्रयोग यांचा लाभ आता व्यापक प्रमाणात मिळणार असून, शेतीला नवी दिशा आणि शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीस नवी आशा मिळणार आहे.