भारताचा एकोणीस वर्षांखालील संघ, जो देशाचं क्रिकेटमधील भविष्य आहे, त्यांनी विक्रमी सहाव्यांदा युवा विश्वचषक जिंकून भारताचं भविष्य किती सुरक्षित आहे हे दाखवून दिलं आहे. भारताच्या एकोणीस वर्षांखालील संघाने इंग्लंडवर 100 धावांनी मात करत सहाव्यांदा आयसीसी युवा विश्वचषक उंचावला. आयसीसीची एखादी स्पर्धा सर्वाधिक सहावेळा जिंकणारा भारत हा पहिला संघ आहे. त्यासाठी जे निर्विवाद वर्चस्व, जिगर, कठोर मानसिकता, आत्मविश्वास मैदानावर दाखवावा लागतो, तो या युवा संघाने दाखवला आहे.
भारतीय खेळाडूंच्या जर्सीचा रंग निळा आहे आणि ज्या प्रकारचं निर्भीड, शिस्तबद्ध एकदिवसीय व टी-20 क्रिकेट भारतीय संघ सध्या खेळत आहे ते पाहता एका परदेशी वृत्तसंस्थेनंच भारतीय क्रिकेटला ‘भारतातील नीलक्रांती’ ही उपमा दिली आहे. आणि त्यांना ही उपमा सुचलीय ती एकोणीस वर्षांखालील भारतीय मुलांनी ज्या पद्धतीने युवा विश्वचषक जिंकला त्यामुळे. अंतिम फेरीत हरारे इथं भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध 9 बाद 411 अशी आतापर्यंतची आयसीसी अंतिम फेरीतील सगळ्यात मोठी धावसंख्या रचली. आणि त्यानंतर इंग्लंडला 311 धावांमध्ये गुंडाळत 100 धावांनी मोठा विजय मिळवला. अंतिम फेरीत प्रतिस्पर्ध्यांवर असा एकतर्फी विजय मिळवत भारतीय युवा संघाने आपली या प्रकारावरील हुकूमतच दाखवून दिली.
एकीकडे, ज्येष्ठांचा टी-20 विश्वचषक सुरू आहे. आणि टी-20 प्रकारात मागची दोन वर्षं भारतीय राष्ट्रीय संघाने असंच वर्चस्व दाखवलं आहे. सलग सर्वाधिक विजयांचा विक्रम सध्या भारताच्या नावावर आहे. भारतीय संघाने विश्वचषकात सलग 9 आणि एकूण सलग 12 टी-20 विजय मिळवले आहेत. दुसरीकडे, भारताचा एकोणीस वर्षांखालील संघ, जो देशाचं क्रिकेटमधील भविष्य आहे, त्यांनी विक्रमी सहाव्यांदा युवा विश्वचषक जिंकून भारताचं भविष्य किती सुरक्षित आहे हे दाखवून दिलं आहे. आताच्या टी-20 संघात अभिषेक वर्मा, ईशान किशन, संजू सॅमसन, शिवम दुबे, रिंकू सिंग, हार्दिक पटेल यांनी फलंदाजीतील जो घणाघात राष्ट्रीय संघात दाखवून दिला आहे. त्याचीच बीजं या युवा संघातही आहेत. इथं अभिषेकच्या जागी आहे तो वैभव सूर्यवंशी आणि या युवा संघाचा तितकाच ताकदीचा कर्णधार आहे आयुष म्हात्रे.
थोडक्यात, भारताचा राष्ट्रीय संघ आणि युवा संघ एकाच वेळी एकाच दर्जाचं क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्यांचा कल फक्त विजयाकडे नाही तर प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत आपला डंका पिटण्याकडे आहे. हे चित्र जास्त सुखावणारं आहे.
भारताच्या युवा संघाची विजयगाथा - भविष्याची चाहूल
हरारेमधील हा विजय हे सांगतो की, जगाच्या क्रिकेट नकाशावर भारताचे वर्चस्व आता केवळ वरिष्ठ संघापुरते मर्यादित राहिलेले नाही तर ते खोलवर रुजले आहे - शाळेच्या मैदानांपासून ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठांपर्यंत. भारताच्या एकोणीस वर्षांखालील संघाने इंग्लंडवर 100 धावांनी मात करत सहाव्यांदा आयसीसी युवा विश्वचषक उंचावला. आयसीसीची एखादी स्पर्धा सर्वाधिक सहावेळा जिंकणारा भारत हा पहिला संघ आहे. त्यासाठी जे निर्विवाद वर्चस्व, जिगर, कठोर मानसिकता, आत्मविश्वास मैदानावर दाखवावा लागतो, तो या युवा संघाने दाखवला आहे.
एरॉन जॉर्ज, वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे पासून ते वेदांत त्रिवेदी, अभिज्यान कुंडू आणि विहान मल्होत्रा यांची निर्भय फलंदाजी, शिस्तबद्ध गोलंदाजी आणि प्रसंगी विलक्षण संयम दाखवत या युवा संघाने संपूर्ण स्पर्धेत आपलं वर्चस्व कायम ठेवलं.
जागतिक क्रिकेट आता बदलतंय. ते अधिकाधिक आक्रमक होतंय. तोच बाणा या युवा भारतीय संघानेही दाखवून दिला. या खेळाडूंना भीती ठाऊक नाही. त्यांच्याकडे आक्रमकता आहे. पण, तिला शिस्तीची जोड आहे. आत्मविश्वासाबरोबरच ते संयमाचं महत्त्वही जाणतात. प्रतिस्पर्ध्यावर धावांच्याही आधी मानसिक आघाडी घेतात. फक्त अंतिमच नाही तर सर्व स्पर्धेत हे चित्र दिसलं. वैभव सूर्यवंशी सलामीला खेळायला आता तो 26 व्या षटकापर्यंत टिकला. तेवढ्यात खेळलेल्या 85 चेंडूंत त्याने तब्बल 175 धावा केल्या. आणि संघालाही 250 पर्यंत नेलं. आणि जम बसल्यावर तो बाद झाला तरी पुढच्या फलंदाजांना त्याची काळजी नव्हती. त्यांनी आक्रमकता जराही कमी होऊ दिली नाही आणि धावसंख्या 400 च्याही पार नेली. समोर तगडा आणि व्यावसायिक संघ असताना या वाघांना त्याची भीती नव्हती. म्हणून म्हटलं या विजयापेक्षाही महत्त्वाची होती संघाची मानसिकता आणि त्यांनी गाजवलेलं वर्चस्व.
कर्णधार आयुष म्हात्रे
अंतिम सामना : जेथे विजयी मानसिकता महत्त्वाची ठरली
मोठ्या आव्हानांना आणि मोठ्या क्षणांना जो पुरून उरतो, त्याला चॅम्पियन खेळाडू म्हणतात. सचिनची गुणवत्ता सर्वांनीच हेरली होती. पण, जेव्हा त्याने भारताबाहेर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेत धावा केल्या आणि शेन वॉर्न, ग्लेन मॅग्रा अशा तेव्हाच्या दिग्गज गोलंदाजांना आस्मान दाखवलं, तेव्हा त्याच्या चॅम्पियन असण्यावर शिक्कामोर्तब झालं. वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये आणि अलीकडे युवा क्रिकेटमध्ये खोर्याने धावा करतोय. त्याची भावी सचिन तेंडुलकर म्हणून चर्चाही होतेय. 14 व्या वर्षी अशी बेफाम कामगिरी तो कशी करू शकतो, यासाठी आश्चर्यही व्यक्त होतंय. पण, 15 षटकार आणि 15 चौकार ठोकत जेव्हा तो आपल्या फलंदाजीने मैदानात वादळ निर्माण करतो, तेव्हा काही बोलायचं नसतं, त्याचा खेळ फक्त अनुभवायचा असतो. इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात वैभवने तेच केलं.
इंग्लंडची गोलंदाजी दुबळी नव्हती. पण, वैभवचा धडाकाच और होता. तो मन मानेल तसे चेंडू भिरकावून देत होता आणि ते अगदी स्टेडिअमच्याही बाहेर जात होते. 35 चेंडूंत शतक ही गोष्ट नवीन पिढीला आता नवीन राहिलेली नाही. पण, वैभव अशी कामगिरी सातत्याने करून दाखवण्याची ताकद राखून आहे, हेच तो सुचवतोय. 14 वर्षांच्या या पोरसवद्या बिहारी खेळाडूला जसा आणखी अनुभव मिळेल तसा तो आंतरराष्ट्रीय कसोटीतही तावून सुलाखून निघेल. सध्या एक अनोखा विक्रम त्याने नावावर केला आहे. आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत 150हून जास्त धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे हे दोन खेळाडू असे आहेत जे आताच भारतीय संघाचा दरवाजा ठोठावतायत. आयुष म्हात्रेकडे तर फटकेबाजी आणि संयम यांचं चांगलं मिश्रण आहे. गरज असेल तेव्हा तो एक बाजू लावून धरण्याचं कामही चोख करतो.
इंग्लंडचा प्रतिकार आणि भारतीय शिस्त
412 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवातही वाईट नव्हती. कॅलेब फाल्कनर याने झुंजार शतक झळकावत संघाला स्पर्धेत ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु क्रिकेट हा वैयक्तिक नव्हे, तर संघिक खेळ असतो आणि येथेच भारताने आपली खरी ताकद दाखवली. 142 धावांवर केवळ दोन गडी बाद असताना, भारतीय गोलंदाजांनी संयम न सोडता अचूक मारा केला. अंबरिश आणि कनिष्क चौहान या दोघांनी अख्ख्या स्पर्धेतच नेटाने गोलंदाजी केली. आणि प्रतिस्पर्ध्यांना फारशी संधी दिली नाही. म्हणता म्हणता 177 धावांपर्यंत इंग्लंडचे सात गडी बाद झाले आणि सामना भारताच्या मुठीत आला. फाल्कनरच्या 67 चेंडूंत 115 धावांमुळे त्यांनी निदान तीनशेचा टप्पा ओलांडला. अखेर इंग्लंडचा डाव 311 धावांत संपुष्टात आला आणि भारताने 100 धावांचा दणदणीत विजय साकारला.
संघभावनेची ताकद : एका व्यक्तीपुरता मर्यादित नसलेला विजय
या विश्वचषक मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सामन्यात वेगवेगळे नायक पुढे आले. ही स्पर्धा एका खेळाडूची नव्हती; ती संपूर्ण संघाची होती. स्पर्धेची सुरुवात अमेरिकेविरुद्धच्या विजयाने झाली, जिथे हेनिल पटेल याच्या टिच्चून गोलंदाजीने प्रतिस्पर्ध्यांना गुडघे टेकायला लावले. बांगलादेशविरुद्ध विहान मल्होत्रा याच्या भेदक गोलंदाजीने सामना भारताच्या बाजूने झुकवला. न्यूझीलंडविरुद्ध आर. एस. आंब्रिश याने अष्टपैलू खेळ करत संघाची शान वाढवली.
पाकिस्तानविरुद्धच्या तणावपूर्ण सामन्यात कनिष्क चौहान याने दबावाखाली खेळी करत आपली मानसिक ताकद सिद्ध केली. उपांत्य फेरीत अफगाणिस्तानविरुद्ध भारताला कठीण आव्हान मिळाले, पण एरॉन जॉर्ज याच्या शतकी खेळीने आणि सूर्यवंशीच्या आक्रमक फलंदाजीने अंतिम फेरीचा मार्ग मोकळा झाला. संपूर्ण स्पर्धेत संघ जमून आलेला दिसला आणि कर्णधार आयुष म्हात्रेच्या हाकेला ओ देत खेळाडूंनी कामगिरी केली.
उदयोन्मुख तारे : भारतीय क्रिकेटचे भावी शिलेदार
1988 मध्ये पहिली युवा विश्वचषक स्पर्धा आयोजित झाली होती आणि तेव्हापासून स्पर्धेचा इतिहास नुसता बघितलात तर एक गोष्ट तुम्हाला ठळकपणे दिसून येईल. पहिल्याच स्पर्धेतून नयन मोंगिया, नरेंद्र हिरवाणी आणि वेंकटपथी राजू हे खेळाडू देशाला मिळाले होते. ही यादी उत्तरोत्तर वाढत गेली. पुढे 1998 मध्ये विरेंद्र सेहवाग, महम्मद कैफ आणि हरभजन गवसले. तर 2000 साली युवराज सिंगने आपली चुणूक दाखवून दिली. आणि 2006, 2008 मध्ये तर दस्तुरखुद्द रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी युवा संघाचं नेतृत्व केलं. पुढे या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काय केलं हे वेगळं सांगायला नको.
रवींद्र जाडेजाची ओळखही भारताला या स्पर्धेतूनच पटली. भारताने ही स्पर्धा नेहमीच गांभीर्याने घेतलीय. म्हणूनच सर्वाधिक 6 विजेतेपदं भारताकडे आहेत आणि त्यांनी पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय सीमोल्लंघनही केलं आहे. आताही आयुष म्हात्रे आणि वैभव सुर्यवंशीकडून भारताला तीच आशा असेल. किंबहुना 2008 मध्ये विराट कोहलीने जे केलं ते पुढे आयुष म्हात्रेनं करावं अशी अपेक्षाच मुंबईकरांची त्याच्याकडून आहे.
मुंबईजवळच्या नालासोपारा या छोट्या उपनगरातून पुढे आलेला हा जिद्दी क्रिकेटपटू आहे. 12व्या वर्षीपासून रोज एका दिशेनं 40 किलोमीटरचा प्रवास करून तो चर्चगेटला क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी जात होता. लोकलच्या गर्दीत हातातील क्रिकेट किट सांभाळत त्याने 6 वर्षं प्रवास केला आहे. त्याची फळं मागची दोन वर्षं त्याला मिळत आहेत. त्याच्या स्वभावातील धीरोदात्तता आणि आक्रमकता आणि संयम यांचा मिलाफ यामुळे भावी कर्णधार म्हणून आताच त्याच्याकडे बघितलं जात आहे. या विश्वचषक विजयानंतर सचिन तेंडुलकरने त्याला घरी बोलावून आपली कसोटी जर्सी भेट दिली आहे, तर त्याचा रणजी संघ चेन्नई सुपर किंग्जनेही त्याचं विशेष कौतुक केलं आहे. आता त्याला राष्ट्रीय जर्सीत पाहायला मिळावं, अशी इच्छा त्याच्या कुटुंबीयांनी बोलून दाखवली आहे.
दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी भारतीय संघाचे दरवाजे आधीपासून ठोठावत आहे. फक्त त्याचं वय आडवं येत आहे. 14व्या वर्षी घाई करून त्याला संघात घेऊ नये असं जाणकारांचं मत आहे. बाकी स्पर्धेत अंतिम फेरीनंतर सामनावीर आणि मालिकावीरही तोच ठरला यातच त्याचं स्पर्धेवरील निर्विवाद वर्चस्व दिसून येतं. क्रिकेटमधील मोठ्या आव्हानांसाठी तो तयार आहे, असं तो आपल्या कामगिरीने दाखवून देत आहे.
दिग्गजांचे कौतुक आणि प्रेरणा
टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी युवा संघाने हा विजय साकारला. यातून राष्ट्रीय संघालाही प्रेरणा मिळणार आहे. सध्या युवा खेळाडूंच्या कामगिरीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संघाचं कौतुक केलं. बीसीसीआयने 7.5 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. सचिन तेंडुलकरने गौरवौद्गार काढताना संघाच्या निर्भय बाण्याचा खास उल्लेख केला. तर विराट कोहलीने सातत्याने वर्चस्व राखण्याच्या वृत्तीकडे लक्ष वेधलं. गौतम गंभीरने तर आताच या संघाचा ‘उद्याचा संघ’ असं म्हटलं आहे.
मिताली राज यांनी सूर्यवंशीच्या खेळीला युवा क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळींपैकी एक म्हटले, तर आर. अश्विन यांनी संघाच्या रणनितीचे आणि धाडसी विचारसरणीचे विशेष कौतुक केले. युवा खेळाडूंसाठी आता कुठे ही सुरुवात आहे. इथून पुढे रणजी, सय्यद मुश्ताक अली आणि आयपीएल अशा स्पर्धांमध्ये ते आपल्याला दिसणार आहेत. महेंद्र सिंग धोणी आणि विराट कोहली, रोहित शर्मा या खेळाडूंनी देशासाठी विजयाची एक परंपरा आधीच निर्माण केली आहे. यशाची तीच बॅट आता या खेळाडूंना सांभाळायची आहे. लाल चेंडूवर दमदार कामगिरी करता करता त्यांनी पारंपरिक कसोटी क्रिकेटला विसरू नये, एवढीच इच्छा.