खत नको, जमीन सशक्त करा...

विवेक मराठी    11-Feb-2026
Total Views |
@डॉ. गुरूनाथ थोन्टे
94216 95448

krushivivek
शेतीत उत्पादन वाढवायचे असेल तर केवळ खतांचा मारा नव्हे, तर जमिनीचे आरोग्य समजून घेणे गरजेचे आहे. सेंद्रिय कर्ब, सूक्ष्मजीव आणि मातीचा संतुलन बिघडल्याने आज शेती तोट्यात जात आहे. या पार्श्वभूमीवर माती परीक्षण व अन्नद्रव्य व्यवस्थापन नव्याने विचारात घेणे अपरिहार्य ठरते.. यासाठी भूसूक्ष्मजीव मोजमाप करणार्‍या प्रयोगशाळा जागोजागी उभारणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागेल.
जमिनीतून पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये पुरेशा प्रमाणात मिळाली, तरच शेतकर्‍याला किफायतशीर आणि टिकाऊ उत्पादन मिळू शकते. मात्र ही अन्नद्रव्ये थेट उपलब्ध होण्यासाठी भूसूक्ष्मजीवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मातीच्या प्रत्येक प्रतिग्रॅममध्ये किमान 20 लाख उपयुक्त सूक्ष्मजीव असावेत, असे भूसूक्ष्मजीव शास्त्रज्ञांचे ठाम मत आहे. या सूक्ष्मजीवांचे मुख्य ऊर्जास्रोत म्हणजे सेंद्रिय कर्ब. हा कर्ब सेंद्रिय पदार्थांपासून निर्माण होतो आणि जमिनीत त्याचे प्रमाण किमान 1 टक्का आवश्यक आहे. दुर्दैवाने आज बहुतांश जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण केवळ 0.2 ते 0.4 टक्क्यांपर्यंत घसरले आहे. याचाच थेट परिणाम असा की, सध्या वापरल्या जाणार्‍या रासायनिक खतांची कार्यक्षमता केवळ 25 टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिली आहे, असे कृषी तज्ज्ञ सांगतात. म्हणजेच शेतकरी जेवढा खर्च रासायनिक खतांवर करतो, त्यातील तब्बल 75 टक्के खर्च अक्षरशः वाया जातो.
 
 
पीक उत्पादनासाठी संतुलित व सजीव जमीन हीच यशाची गुरुकिल्ली आहे. ज्या जमिनीत 5% सेंद्रिय पदार्थ, 45% मूलद्रव्ययुक्त माती, 25% ओलावा आणि 25% हवा असते, अशी जमीन पीक उत्पादनासाठी सर्वोत्कृष्ट मानली जाते. विशेष म्हणजे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण 5% वर स्थिर ठेवले, तर ओलावा आणि हवेचे व्यवस्थापन आपोआप संतुलित होते.
 
 
पीक उत्पादनासाठी एकूण पाच पायाभूत घटक अत्यावश्यक असतात आणि या प्रत्येकाचा उत्पादनात 20 टक्के समान वाटा असतो. यात जमीन, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीव, सूर्यप्रकाश, ओलावा आणि हवा या सर्वांचा समतोल महत्त्वाचा आहे. या समतोलासाठी माती व पाणी तपासणी ही अत्यंत आवश्यक प्रक्रिया आहे. राज्यातील जिल्हास्तरीय प्रयोगशाळा, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे तसेच खाजगी प्रयोगशाळा येथे माती व पाण्याची शास्त्रीय तपासणी केली जाते. या तपासणीत मूलद्रव्ये, क्षारता, सामू (pH) आणि सेंद्रिय कर्ब यांचे विश्लेषण केले जाते. या निष्कर्षांच्या आधारे अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या अचूक शिफारशी दिल्या जातात. शेतकर्‍यांना माती नमुना घेण्याचे प्रशिक्षण दिले जाते, उपलब्ध स्वरूपातील मूलद्रव्यांचे निदान केले जाते आणि पुढील पिकाची गरज लक्षात घेऊन योग्य रासायनिक खतांची मात्रा निश्चित केली जाते.
 
 
अन्नद्रव्यांची उपलब्धता याबाबत शास्त्रज्ञांमध्ये भिन्न मते आढळतात. भूसूक्ष्मजीव शास्त्रज्ञांच्या मते, जमिनीत अन्नद्रव्ये थेट उपलब्ध स्वरूपात नसून ती मोठ्या प्रमाणात स्थिर साठ्यात असतात. या स्थिरीकरणाच्या प्रक्रियेत एका विशिष्ट सूक्ष्मजीव समूहाची महत्त्वाची भूमिका असते. तर दुसरा एक सूक्ष्मजीवांचा गट हा जमिनीत सतत कार्यरत राहून, या स्थिर साठ्यातील मूलद्रव्ये उपलब्ध साठ्यात रूपांतरित करतो. त्यानंतरच पिके ही अन्नद्रव्ये शोषून घेतात. मात्र प्रत्यक्षात माती नमुना पिक नसलेल्या कालावधीत घेतला जातो. या काळात बहुतांश अन्नद्रव्ये स्थिर स्वरूपात असतात. त्यामुळे प्रयोगशाळेचा परीक्षण अहवाल हा केवळ उपलब्ध साठ्यावर आधारित असतो. यामुळेच या अहवालांच्या अचूकतेबाबत काही प्रमाणात शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण सूक्ष्मजीवांच्या क्रियेशिवाय स्थिर साठ्यातील अन्नद्रव्ये पिकांसाठी उपलब्धच होत नाहीत. सन 2015-16 पासून ‘जमीन आरोग्य पत्रिका’ शेतकर्‍यांना वितरित केली जात आहे. राज्यासाठी दरवर्षी 8 ते 10 लाख माती नमुने तपासण्याचा लक्षांक निश्चित केला जातो. त्याचबरोबर गावनिहाय सुपीकता निर्देशांकाचे फलक लावले जातात. गावशिवारात कोणत्या मूलद्रव्याची कमतरता आहे, कोणते खत किंवा सुधारक वापरावेत, याबाबत मार्गदर्शन केले जाते.
 
 
जमिनीची क्षारता, सेंद्रिय कर्ब आणि सामू (pH) हे घटक पीक उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या घटकांचा विचार करूनच रासायनिक खतांची शास्त्रीय शिफारस होणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात तसे होताना फारसे दिसत नाही. सुपीकता निर्देशांकानुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन शेतकरी बहुतांश वेळा करत नाहीत. जे थोडेफार करतात, त्यांचाही अनेकदा खर्च वाया जातो आणि जे करत नाहीत, त्यांचाही. यामागचे मूळ कारण एकच, जमिनीत सेंद्रिय पदार्थांची कमतरता. सेंद्रिय पदार्थ कमी असल्याने सेंद्रिय कर्बनिर्मिती मर्यादित राहते. सेंद्रिय कर्ब नसल्यास सूक्ष्मजीवांना आवश्यक ती ऊर्जा मिळत नाही. परिणामी अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारा उपयुक्त सूक्ष्मजीवांचा गट निष्क्रिय किंवा कमी कार्यक्षम ठरतो. त्यामुळे दिलेली खते अपेक्षित परिणाम देत नाहीत.
 

krushivivek 
 
 
वातावरणात नत्राचे प्रमाण तब्बल 78.2 टक्के आहे. मात्र हे नत्र एलिमेंटल (मूलद्रव्य) स्वरूपात असल्याने वनस्पती त्याचा थेट उपयोग करू शकत नाहीत. पिकांना नत्र मिळण्यासाठी जमिनीत त्याचे स्थिरीकरण (Nitrogen Fixation) होणे आवश्यक असते. हे काम जैविक बीजक्रियेद्वारे केले जाते. मात्र नत्र स्थिरीकरणासाठी तीन ते चार वेगवेगळ्या जिवाणूंचा समन्वय आवश्यक असतो आणि हे जिवाणू जमिनीत कार्यक्षम असणे तितकेच गरजेचे आहे.
 
 
या जिवाणूंच्या प्रभावी कार्यासाठीही सेंद्रिय कर्ब हा मूलभूत आधार आहे. सध्या मात्र अनेक ठिकाणी फक्त एका जिवाणूची बीजक्रिया केली जाते आणि त्यातून पीक उत्पादन 10 ते 15 टक्क्यांनी वाढते, असा प्रचार केला जातो. याबाबत स्वाभाविकपणे शंका निर्माण होते. कारण केवळ बीजक्रिया करून हे जिवाणू आपोआप कार्यरत होत नाहीत. जिवाणूंना कार्यक्षम होण्यासाठी जमिनीत अनुकूल वातावरण असणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पुरेसे सेंद्रिय पदार्थ, योग्य प्रमाणात हवा व ओलावा, जमिनीचा सामू (pH) व क्षारता संतुलित पातळीवर असणे गरजेचे आहे.
 
 
जमिनीत अनेकदा सूक्ष्म मूलद्रव्यांची कमतरता आढळते. ही कमतरता भरून काढण्यासाठी ग्रेड-2 खतांचा वापर केला जातो. मात्र वास्तव असे आहे की, ही खते बहुतांश वेळा पावडर स्वरूपात असतात. मातीच्या थेट संपर्कात आली की, या सूक्ष्म मूलद्रव्यांचे स्थिरीकरण होते आणि ती पिकांना अपेक्षित प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब असणे अत्यावश्यक आहे. प्रत्यक्षात जमिनीत आधीपासूनच अनेक मूलद्रव्ये स्थिर स्वरूपात साठलेली असतात. ही अन्नद्रव्ये सूक्ष्मजीवांच्या माध्यमातूनच पिकांना उपलब्ध होतात. मात्र जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीव नसतील किंवा ते निष्क्रिय असतील, तर दिलेल्या खतांचे परिणाम दिसून येत नाहीत. परिणामी पिकांवरील कमतरतेची लक्षणे तशीच कायम राहतात.
 
 
यावर एक प्रभावी आणि व्यवहार्य उपाय उपलब्ध आहे. त्यासाठी- प्रथम एक बैलगाडीभर शेणखत घ्यावे. त्यात आवश्यकतेनुसार रासायनिक खत मिसळावे. नंतर सलग 8 दिवस दररोज थोडेसे पाणी शिंपडून हे मिश्रण सेंद्रिय प्रक्रियेस चालना द्यावी. त्यानंतर हे खत पिकाला दिल्यास, सूक्ष्मजीव सक्रिय होतात आणि खतांचे परिणाम सकारात्मक व ठळकपणे दिसून येतात.
 
 
माती नमुना तपासणीत मूलभूत बदल आवश्यक
 
आजच्या घडीला मृद्चाचणी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत, जिथे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या (Microbial Count) तपासण्याची क्षमता निर्माण करता येऊ शकते. यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. यासाठी अतिशय मोठा खर्च येत नाही. साधारणतः 3 ते 4 लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच वनस्पती विकृतिशास्त्रातील तज्ज्ञ कर्मचारी असणेही आवश्यक आहे.
 
 
राज्यात अनेक शासकीय व खाजगी कृषी महाविद्यालये असून, त्या ठिकाणी वनस्पती विकृतिशास्त्र विभाग आधीपासून कार्यरत आहेत. याच ठिकाणी आवश्यक सुविधा विकसित करता येऊ शकतात. त्यासाठी शासनाकडून लक्ष्यित अनुदान दिल्यास, माती परीक्षण अधिक शास्त्रीय, परिणामकारक आणि शेतकर्‍यांसाठी प्रत्यक्ष उपयोगी ठरेल.
 
 
भविष्यात माती नमुना तपासणीच्या पद्धतीत मूलभूत बदल करणे अपरिहार्य आहे. यामध्ये सेंद्रिय कर्ब, क्षारता आणि सामू (pH) हे घटक केंद्रस्थानी ठेवावे लागतील आणि त्यांना जमिनीत स्थिर व संतुलित पातळीवर राखणे आवश्यक ठरेल. यासाठी शेतकर्‍यांवर आर्थिक ओझे न टाकता विनामूल्य व शास्त्रीय उपाययोजना राबवणे गरजेचे आहे. यासंबंधीच्या स्पष्ट व व्यवहार्य शिफारशी ‘जमीन आरोग्य पत्रिका’वर असायलाच हव्यात.
 
 
फक्त सेंद्रिय खतांच्या वापराने सेंद्रिय कर्बाची पातळी दीर्घकाळ स्थिर ठेवता येत नाही. यासाठी शून्य मशागत (Zero Tillage) या संकल्पनेवर लक्ष केंद्रित करावे लागेल. ही पद्धत केवळ शेतातच नव्हे, तर कृषी अभ्यासक्रमाचा अविभाज्य भाग म्हणून समाविष्ट करणे काळाची गरज आहे.
 
 
पिकांच्या वाढीसाठी एकूण 18 मूलद्रव्ये आवश्यक असतात. त्यापैकी कार्बन (C), हायड्रोजन (H) आणि ऑक्सिजन (O) ही तीन मूलद्रव्ये निसर्गाकडून विनामूल्य मिळतात. उर्वरित सर्व मूलद्रव्ये जमिनीतूनच उपलब्ध होतात आणि त्यासाठी विविध सूक्ष्मजीवांची सतत व सक्रिय क्रिया आवश्यक असते. या सर्व सूक्ष्मजीवांचे एकमेव ऊर्जास्त्रोत म्हणजे सेंद्रिय कर्ब..
 
 
आज मात्र जमिनीत हजारो टन रासायनिक खतांचा मारा केला जातो. त्यातील सुमारे 75 टक्के खते जमिनीचा क्षारपणा आणि pH वाढवतात, तर काही मूलद्रव्यांचे स्थिरीकरण होते. या प्रक्रियेत खत उत्पादक किंवा वितरक नुकसानात जात नाहीत; खर्‍या अर्थाने भरडला जातो तो शेतकरीच. शेतकरी दोन प्रकारे नुकसान सहन करतो.
 
1. जमिनीचा पोत व आरोग्य बिघडते,
 
2. उत्पादन खर्च प्रचंड वाढतो. परिणामी शेती कायमस्वरूपी तोट्यात जाते. याउलट, जर जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण 5 टक्क्यांपर्यंत राखले, तर रासायनिक खतांची कार्यक्षमता 80 टक्क्यांपर्यंत वाढते, उत्पादन खर्चात 30 टक्क्यांपर्यंत बचत होते आणि त्याच प्रमाणात नफ्यात वाढ साधता येते. यामुळे जमीन सशक्त होते, पिकांची प्रतिकारशक्ती वाढते.
 
 
याचबरोबर कीड-रोग व्यवस्थापनातील रसायनांचा वापर कमी होतो. परिणामी रेसिड्यू-फ्री फळे, भाजीपाला व अन्नधान्य उत्पादन घेणे शक्य होते. अन्नसाखळीच्या माध्यमातून सजीवांमध्ये होणार्‍या विविध व्याधींना आळा घालता येतो, तसेच पर्यावरणाची हानीही टाळता येते. आता आपल्याला जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या जाणून घेणे अत्यावश्यक झाले आहे. कारण मोजमाप झाल्याशिवाय ती वाढवण्यासाठी योग्य उपाययोजना करता येणार नाहीत. आवश्यक प्रमाणात सूक्ष्मजीव वाढले, तर जमिनीची सुपीकता आपोआप वाढेल.
 
 
आपल्या पूर्वजांनी आपल्याला सुपीक जमीन वारशाने दिली आहे. तीच जमीन तितक्याच सक्षम अवस्थेत पुढील पिढीकडे सुपूर्त करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यासाठी भूसूक्ष्मजीव मोजमाप करणार्‍या प्रयोगशाळा जागोजागी उभारणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागेल. कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा लागेल, कृषी विज्ञान केंद्रांनी मागणी लावून धरावी लागेल.
 
लेखक कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, लातूर येथील माजी प्राचार्य आहेत.