‘संघप्रवासाची 100 वर्षं' : नवे क्षितिज’सरसंघचालकांचे उद्बोधन
विवेक मराठी 11-Feb-2026
Total Views |
पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची ‘संघप्रवासाची 100 वर्षे : नवे क्षितिज’ ही व्याख्यानमाला ही केवळ संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासाचा आढावा नाही, तर भारताच्या सामाजिक-सांस्कृतिक प्रवासाची आणि भविष्यातील दिशादर्शक विचारांची मांडणी आहे. नवी दिल्ली, बंगळुरु, कोलकाता यानंतर मुंबईत शनिवारी सरसंघचालकांचे उद्बोधन या व्याख्यानमालेतील शेवटचे पुष्प होते. या व्याख्यानमालेत संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा शतकपूर्तीचा प्रवास सांगताना, संघाने काळानुरूप स्वतःला कसे घडवले, समाजाच्या गरजांशी कसे एकरूप केले आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत आपली भूमिका कशी बजावली, याचा परिपक्व विचार दोन सत्रांतून मांडण्यात आला. ही मांडणी केवळ गौरवगाथा म्हणून नव्हे, तर आत्मपरीक्षण आणि आत्मविश्वास या दोन्हींचे संतुलन साधणारी आहे. त्यानिमित्ताने सरसंघचालकांच्या प्रथम सत्रातील उद्बोधनाचा संपादित भाग घेत आहोत.
मी बसून यासाठी बोलतो आहे की, मी आज भाषण करणार नसून, माहिती देणार आहे; तुमच्याशी संवाद साधणार आहे. हा संवाददेखील नवीन नसून, त्याबाबत कदाचित यापूर्वी तुम्ही ऐकलेही असेल. पण, त्यातील अनेक गोष्टी समजायला थोडासा वेळ लागतो. संघाचे कार्य हे निश्चितपणे जगावेगळे काम आहे. संपूर्ण जगात असे कार्य होत नसल्याचे आम्हीच याआधी म्हणत होतो; आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत आहे. संघाचे कार्य बघण्यासाठी देशविदेशांतून, पाच महाद्विपांतूनही आज लोक येत आहेत. देशातील घडामोडींमध्ये संघाचे सातत्याने नाव येत असल्याने संघकार्य बघण्यासाठी हे लोक येतात. संघाचे कार्य पाहून झाल्यावर ते अनेक प्रश्न विचारतात. त्यात शेवटचा प्रश्न जगातील सर्व नागरिकांचा समान असतो.
आफ्रिका, युरोप, अमेरिका, दक्षिण पूर्व आशिया असो किंवा मध्य-पूर्व आशिया असो, सर्वांचा प्रश्न सारखाच असतो. तो प्रश्न म्हणजे, आमच्या तरुणांनी असे काही करावे, अशी आमची इच्छा आहे, तर तुम्ही आम्हाला हे कसे करायचे, त्याची पद्धत शिकवाल का? आम्ही त्यांना सांगतो, आम्ही जे करत आहोत, त्याची कोणतीही दुसरी पद्धत नाही, हीच एकमेव पद्धत आहे आणि आपल्या देशाच्या इतिहासातही तथागत बुद्धांनंतर असे अखिल भारतीय काम झालेले नाही. त्यामुळे यासाठी तुलनात्मक ज्ञान कार्य उपलब्ध नाही. माणूस एखादी गोष्ट ज्ञात ते अज्ञात अशीच जाणून घेत असतो; पण आमच्या कार्यासाठी दुसरा ज्ञानस्रोत नाही.
गगनं गगनाकारं सागरः सागरोपमः॥
रामरावणयोर्युद्धं रामरावणयोरिव॥
आकाश हे आकाशासारखेच आहे, त्याला दुसरी कशाचीही उपमा देता येत नाही. जगात समुद्रासारखा दुसरा जलाशय नाही. राम आणि रावणाच्या झालेल्या युद्धासारखे दुसरे युद्ध झाले नाही. त्यामुळे अनेकदा लोक संघाला बाकी सुरू असलेल्या संस्था, पक्ष असे बरेच काम सुरू आहे, त्याच्याशी जोडू पाहात असल्याने गैरसमज होतात. तसेच, संघाला वरवर आणि दुरून पाहिल्यानेदेखील अनेकांचा गैरसमज होतो. तसेच, संघाचे कार्यक्रम पाहिल्यानेदेखील गैरसमज निर्माण होतात. आज तुमच्यासमोर मी हा एक कुर्ता आणि पायजमा घालून बसलो आहे; उद्या हा बदलेन आणि दुसरा घालेन. मात्र, याकडे लक्ष दिल्यास, तुम्ही माझ्या कपड्यालाच जाणून घेऊ शकता. माणूस जाणून घ्यायचे असल्यास थोडे अधिक सखोल अभ्यास करणे आवश्यक ठरते.
संघाचे स्वयंसेवक संचलन करतात. मात्र, संघ काही निमलष्करी दल नाही. संघाचे स्वयंसेवक लाठीकाठी विद्या शिकतात; मात्र संघ काही अखिल भारतीय आखाडा नाही. संघात भारतीय रागांवर आधारित घोषवादन होते, सांघिक गीत आणि वैयक्तिक गीतांचेही गायन होते. मात्र, संघ काही अखिल भारतीय संगीत विद्यालय नाही. संघाचे स्वयंसेवक राजकारणातही आहेत. म्हणून संघ काही राजकीय पक्ष नाही. त्यामुळे काही गोष्टी वरवर बघितल्या, तर निश्चितच गैरसमज होऊ शकतात. यासाठीच संघाला जाणून घ्यायचे असेल, तर संघात येऊन त्याचा अनुभव घ्यावा लागेल; संघात येऊन बघावे लागेल. साखर कशी आहे, त्यावर व्याख्यानमाला होऊ शकेल, प्रश्नोत्तरेदेखील करता येतील. मात्र, साखरेला जाणून घेण्यासाठी एक चमचा साखर खाल्ल्यास या सगळ्याची गरजच भासणार नाही. पण, असे काही सेवन करायचे असल्यास त्यापासून काही धोका नाही, हा विश्वास असणे आवश्यक आहे. यासाठी पुन्हा एकदा 100 वर्षांनी आम्ही सगळ्यांना सांगत आहोत की, संघ म्हणजे नेमके काय?
कारण, संघाचे कार्य संघासाठी नसून, ते देशासाठी आहे, भारतवर्षासाठी आहे. संघाला जाणून घ्यायचे असल्यास, संघ म्हणजे नेमके काय नाही, हे जाणून घेणे आवश्यक आहे. संघाची स्थापना कोणत्याही इतर संस्थेशी स्पर्धा करण्यासाठी झाली नसून, ती संघ आजही करत नाही. संघ कोणत्याही घटनेची प्रतिक्रियाही नाही. संघ कोणाच्याही विरोधात नाही. त्याचे कार्य ‘सर्वेषाम् अविरोधेन’ अर्थात कोणालाही विरोध न करता सुरू असते. संघाला लोकप्रियतेची गरज नाही; संघाला सत्तेचीही गरज नाही. आजवर देशात जी काही चांगली कामे झाली आणि यापुढेही होतील, ती व्यवस्थितपणे पूर्ण व्हावीत आणि ती करण्यासाठीच संघ आहे. यासाठी आपल्याला थोडे इतिहासात डोकवावे लागेल.
1857 मध्ये स्वातंत्र्ययुद्ध झाले. आमचे राजे होते, आमची सेना होती, सगळे काही होते. आमचा पराक्रम तेव्हापासून सर्वश्रुत आहे. तो त्याआधीपासून होताच, आजही आहे. मात्र, असे असूनही आम्ही आमच्याच घरामध्ये परकीयांकडून पराभूत झालो. त्यानंतर देशात विचारमंथन सुरू झाले की, हा पराभव कसा झाला? मूठभर माणसे समुद्र पार करून आली आणि आमच्यावर राज्य करू लागली. त्यांच्याविरोधात आम्ही एकत्र लढत आहोत; तरीही आमचा पराभव का होत आहे? या मंथनामध्ये सर्वांचे यावर एकमत असे झाले की, एकदा हरलो म्हणून काय झाले? लढाई हरलो आहोत, युद्ध थोडेच! पुन्हा एकदा हाती शस्त्र घेऊन प्रयत्न करू. त्यानंतर सशस्त्र इंग्रजांना भारतातून हुसकावून लावण्यासाठी क्रांतिकारी आंदोलन सुरू झाले. 1945 मध्ये सुभाषबाबूंचे निधन होईपर्यंत ही चळवळ सुरू होती.
1947 मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याने, त्यानंतर या चळवळीचे काही प्रयोजन उरले नाही. मात्र, या चळवळीने आपल्याला काही देदीप्यमान व्यक्तिमत्त्वे दिली, ज्यांच्या चरित्रातून देशाला आजदेखील प्रेरणा मिळते. तर दुसरे मत असे होते की, लढण्यासाठी आपल्याकडे सेना, राजा असे सर्व काही असून ब्रिटिशांकडून यामुळे पराभव पत्करावा लागला; कारण लोकांमध्ये राजकीय जागरुकता नव्हती. त्यामुळे सर्व समाजाला स्वातंत्र्यांच्या आंदोलनासाठी उभे करणारे राजकीय आंदोलनही सुरू झाले पाहिजे, असा विचार त्यातून निघाला. त्यातूनच पुढे सर अॅलन ह्यूम आणि ब्रिटिश सरकारच्या प्रेरणेने ‘सेफ्टी वॉल्व्ह’ म्हणून ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ या एका संस्थेची निर्मिती झाली. मात्र, आमच्या लोकांनी याच संस्थेला स्वातंत्र्याच्या चळवळीचे प्रभावी शस्त्र बनवले. पुढे या संस्थेच्या नेतृत्वामध्ये फार मोठे कार्य झाले. व्यापक प्रमाणात जनजागृती झाली. लोक स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरले. लोक जे काही करत होते, ते फक्त स्वातंत्र्यासाठीच होते.
‘चरखा चला चला के लेंगे, स्वराज लेंगे!’ लोक चालवत तर चरखाच होते; त्याने स्वातंत्र्य कसे येणार? स्वातंत्र्य येण्यासाठीच चरखा चालवतो, असे लोक त्यावेळी सांगत! असे एकूणच भारलेले ते वातावरण होते. एकीकडे क्रांतिकारी आंदोलन आणि दुसरीकडे जनआंदोलन त्याचे फळ म्हणून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पुढे राजकीय जागृतीची हीच चळवळ देशाची चळवळ झाली आणि पुढे ती विभक्त झाली. त्यामध्ये मतमतांतरे झाली. यालाही काही हरकत नाही. लोकशाहीमध्ये मतमतांतरे चालतातच. जेवढ्या व्यक्ती तेवढी मते. परंतु, शुद्धता आणि प्रभाव त्या चळवळीचा कायम राहिला नाही. त्याचे पतन होत होत ती चळवळ कुठे येऊन ठेपली आहे, याचे मी वर्णन करणार नाही; ते तुम्ही अनुभवत आहातच. असाच एक विचार होता. त्यानुसार इंग्रजांशी लढण्याच्या गोष्टी आपण करत आहोत, आपण खरंच त्यांची बरोबरी करू शकतो का? बाकी गोष्टी तर आपण करूच; पण समाज म्हणून आपण एक आहोत का? आपल्या समाजामध्ये एवढे भेद आहेत, अस्पृश्यता आहे, रुढी-परंपरांचा पगडा आहे, एकमेकांमध्ये समाज लढत आहे, समाजामध्ये स्वार्थ आहे, समाजामध्ये साक्षरता नाही, या सगळ्यांतून वर येऊन आपल्याला समाज उभा करावा लागेल. हे कार्य जोवर करत नाही, तोवर आपण इंग्रजांशी लढूच शकत नाही. आणि यासाठी, समाजसुधारणेची एक चळवळ सुरू झाली.
राजा राममोहन रॉय यांच्यापासून अनेक लोकांनी प्रामाणिकपणा, नि:स्वार्थबुद्धी आणि जीवनाचा त्याग करूनही लोकांनी समाजसुधारणेचे कार्य केले. परंतु, दुर्भाग्य माहीत नाही, पण ही चळवळ पूर्ण समाजामध्ये एक द्वीप होऊन राहिली. आमच्या नागपूरजवळच्या वर्ध्यातील मंगरूळमध्ये 37-38 जातींचे वास्तव्य होते. एक महात्मा 150 वर्षांपूर्वी तिकडे आले. त्यांनी तिकडे जातिनिर्मूलनाचे कार्य हाती घेतले. त्या महात्म्याचा सर्वजण तेव्हा सन्मान करत, आजही करतात. पण, आज परिस्थिती अशी आहे की, त्या 37-38 जाती तशाच आहेत; त्यात भर म्हणून जात न मानणार्यांची 39वी जात निर्माण झाली आहे! आता असे का झाले? याच्या कारणांमध्ये मी जाणार नाही. जातिनिर्मूलनाचे सर्व प्रयत्न प्रामाणिकपणाने, शुद्धतेने झाले; पण हे घडले.
पुढे चौथा प्रवाह असा होता, ज्याचे म्हणणे होते की, आपण आपल्या मूळ विचारांपासून भरकटलो आहोत. त्या मूळ विचारांकडे पुन्हा जाणे आवश्यक असल्याचे या प्रवाहाचे म्हणणे होते. स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद सरस्वती अशी मंडळी त्यामध्ये होती. हेदेखील कार्य त्यावेळी मोठ्या प्रमाणात चालले आणि आजही सुरू आहे. मात्र, कुठे ना कुठे देशामध्ये समाजाला दिशा देण्याचे, समाजामध्ये वातावरणनिर्मितीचे कार्य करण्याचे काम होत नसल्याचे लक्षात येते. ही आजचीच बाब नाही; हे कार्य सुरू होते, तेव्हा या चार प्रवाहांमध्ये काम करणारे जे मुख्य लोक होते, त्यांना एक बाब जाणवत होती. संघसंस्थापक हेडगेवार यांच्या ते लक्षात आले की, ते जन्मापासूनच देशभक्त होते. हे का सांगत आहे; कारण ते तिसरीमध्ये शिकत असताना, महाराणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचे शताब्दी वर्ष ब्रिटिश साम्राज्यात साजरे करण्यात आले.
आपला देश त्या साम्राज्याचा भाग असल्याने आपल्या देशातही ते साजरे झाले. आता सरकारी कार्यक्रम सरकारी शाळांमध्ये होणे स्वाभाविकच. यांच्याही शाळांमध्ये राणीच्या राज्यारोहण शताब्दी वर्षानिमित्ताने मिठाईचे वाटप करण्यात आले. ती मिठाई डॉ. हेडगेवार यांनी कचराकुंडीमध्ये टाकून दिली. त्यावेळी शिक्षकांनी त्यांना विचारले की, मिठाई न खाता टाकून का दिली? त्यावर ते म्हणाले की, मिठाई कुठे आहे? आम्हाला गुलाम करणार्या राणीच्या राज्यारोहणाचा उत्सव आमच्यासाठी उत्सव नसून, शोकदिवस आहे आणि अशा उत्सवाची मिळणारी मिठाई आमच्यासाठी विष आहे. प्राथमिक शाळेमध्ये शिकताना त्यांनी हे उत्तर दिले! यावरून त्यांच्या देशभक्तीचा अंदाज आपण लावू शकतो.
जेव्हा हेडगेवार 13 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या आई-वडिलांचे एका तासाच्या अंतराने निधन झाले. प्लेगच्या साथीमध्ये प्लेगच्या रुग्णांची शुश्रुषा ते करत असल्याने, या दोघांनाही प्लेगची लागण झाली होती. त्यातच त्या दोघांचाही मृत्यू झाला. त्यामुळे ही मुले अनाथ झाली. मोठी भावंडे त्यांना होती; पण अर्थार्जन करणारी नव्हती. मोठे भाऊ पैलवान होते, तर मधला भाऊ दुसरीकडे वास्तव्यास होता. हेडगेवारांचे कुटुंब निम्न-मध्यमवर्गीय कुटुंब होते. वडील पौरोहित्य करत असत. मात्र, त्यांचेही निधन झाले. त्यामुळे मोठ्या कठीण आर्थिक चणचणीतून त्यांना दिवस काढावे लागले. त्यामुळे पुढील आयुष्यात रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करणे, उपाशी राहणे अशा सर्व दिव्यांतून मार्गक्रमण करावे लागले. मात्र, याही अवस्थेत दोन गोष्टी त्यांच्या सुटल्या नाहीत, त्या म्हणजे, शिक्षणामध्ये प्रथम श्रेणी मिळवत पहिल्या दहा क्रमांकांत येणे आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी चारही प्रवाहांमध्ये जे काही काम सुरू होते, त्यामध्ये सक्रिय सहभाग घेणे. हा त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव होता.
यामुळेच जेव्हा ‘वन्दे मातरम् आंदोलन’ सुरू झाले, तेव्हा नागपूरच्या विद्यालयांमध्ये ते या आंदोलनाचे आयोजक होते. त्यावेळी शाळेमध्ये इन्स्पेक्टर जेव्हा पाहणीसाठी आले, तेव्हा त्यांचे स्वागत विद्यार्थ्यांच्या ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यानेच झाले. त्यामुळे त्या गोर्या साहेबांचा पारा चढला आणि त्यांनी याची वर तक्रार केली. परिणामी, सर्व शाळा बंद करण्यात आल्या. पुढे यामागचे सूत्रधार शोधण्याची मोहीम राबवण्यात आली. साधारण चार महिने शोध सुरू होता; पण कोणीही सापडले नाही. एवढे त्यांचे आयोजनाचे कौशल्य उत्तम होते. चार महिन्यांनंतर पालक वगैरे एकत्र येऊन, त्यांनी ठरवले की, मुलांच्या आयुष्याचे नुकसान होता कामा नये. करणारे करून गेले; मुलांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे एक सामान्य माफी मागण्याचे ठरवण्यात आले. यामध्ये शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षक मुलांना विचारतील की, चूक झाली ना? त्यावेळी मुलांनी मानेने किंवा तोंडाने हो असे उत्तर द्यावे. त्यानंतर विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश मिळेल, असे ठरले.
वर्ग सुरूही झाले. मात्र, त्यावेळी दोन विद्यार्थी नागपूरमध्ये असे होते, त्यांनी एवढे करण्यालाही विरोध केला. त्यांचे म्हणणे होते की, आम्ही आमच्या मातृभूमीला वंदन करणे आणि तिचा जयजयकार करणे हा अपराध आहे, असे आम्ही स्वप्नातदेखील कबूल करणार नाही आणि त्यासाठी सामान्य पद्धतीची माफीही आम्ही मागणार नाही, असे सांगितले. अखेर त्या दोन विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यामध्ये एक केशव हेडगेवार होते. अशा विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय विद्यालय चालवले जाई. यवतमाळमधील या विद्यालयामध्ये पुढे त्यांनी प्रवेश घेतला. मात्र, पुढे ब्रिटिशांनी तेदेखील बंद केले. अखेर बाहेरून परीक्षा देऊन, प्रथम श्रेणीमध्ये मॅट्रिक पास झाले. त्यांच्यामध्ये जी राष्ट्रभक्तीची ऊर्जा होती, ती पाहून नागपुरातील नेत्यांनी वर्गणी काढून, त्यांना प्रवासाचा खर्च आणि शैक्षणिक शुल्क असे जमा करून कोलकात्यात डॉक्टर होण्यासाठी पाठवले. अर्थात, हे फक्त एक कारण होते. खरे म्हणजे, देशातील क्रांतिकारकांची ‘अनुशीलन समिती’ नावाने मुख्य संस्था तेथे कार्यरत होती. त्यामुळे यांच्यावर कार्य सोपवण्यात आले की, डॉक्टरी अभ्यास करता करता या समितीशी संपर्क साधून देशाच्या पश्चिम भागात क्रांतिकार्याची सुरुवात करा. ही दोन्ही कामे त्यांनी उत्तमरित्या पूर्ण केली. चार वर्षे वैद्यकीय शिक्षणही घेतले. अर्थात, परिस्थिती बिकटच होती. गाठीशी पुंजी नव्हतीच. त्यामुळे दोन मित्र लॉजवर राहात होते. त्यांच्या खाटेच्या मधल्या जागेमध्ये अंथरुण घालून ते झोपत असत.
तसेच, तीन-चार मित्र विदर्भातून तिकडे गेलेले होते. त्यांचा जेवणाचा डबा येत असे. त्या चारांमध्ये हे पाचवे असत. मात्र, अशा परिस्थितीमध्येदेखील वैद्यकीय शिक्षण ते प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आणि क्रांतिकार्यात ‘अनुशीलन समिती’चे प्रमुख सदस्य झाले. त्यांचे सांकेतिक नाव ‘कोकेन’ असे होते. ‘कोकेनचंद्र’ नावाची व्यक्ती चंद्रनगरमध्ये राहात होती. त्यांचे नाव यांना देण्यात आले होते. त्यामुळे एकदा चंद्रनगरला जाऊन पोलिसांनी त्या कोकेनचंद्र यांनादेखील अटक केली होती. रासबिहारी बसू यांच्या चरित्रामध्ये याचा उल्लेख आला आहे. असे ते व्यक्तिमत्त्व होते. पुढे ते उत्तीर्ण झाल्यावर प्राचार्यांनी त्यांना विचारले की, बर्मा या देशामध्ये मासिक तीन हजार वेतनाच्या नोकरीची संधी आहे. त्यावेळी हेडगेवार यांनी सांगितले की, मी नोकरी करणार नाही. हे ऐकून प्राचार्यांनी विचारले की, मग घर कसे चालवणार? यावर त्यांनी सांगितले की, मी संसारही करणार नाही. या जन्मात देशाचा विचार करण्याची आणि पुढच्या जन्मात स्वतःचा विचार करण्याची मी प्रतिज्ञा केली आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर ते पुन्हा आले. तोवर सुरू केलेले क्रांतिकारी आंदोलन विफल झाले होते.
मात्र, त्याच वेळी लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली 1920-21 मध्ये असहकार आंदोलन सुरूच होते. याच्या प्रसारासाठी ते सर्वत्र फिरले. विदर्भातील गावागावांमध्ये जाऊन त्यांनी भाषणे केली. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा खटलादेखील चालवण्यात आला. आता न्यायव्यवस्था त्यांचीच असल्याने, न्यायदेखील तेच करणार होते. त्यावेळी नागपूरच्या एका वकिलांनी म्हटले की, ब्रिटिश सरकार अन्याय करणारे असल्याने, मी निषेध म्हणून बाजू मांडणार नाही. त्यावेळी डॉ. हेडगेवार यांनी स्वतःच स्वतःची बाजू न्यायालयात मांडली. यावेळी स्वतःच्या बचावाच्या भाषणाची सुरुवात करतानाच त्यांनी म्हटले की, स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार असल्याची मान्यता आहे. मग असा कोणता आंतरराष्ट्रीय कायदा आहे का, की ज्यानुसार ब्रिटिश इंग्लंडहून येऊन इथे आमच्यावर राज्य करत आहेत? अर्थात, असा कोणताही कायदा नसल्याने ब्रिटिशांचे भारतावर राज्य करणेच बेकायदेशीर आहे. त्यामुळे आपसूकच तुमची न्यायालये, तुमचे न्यायाधीशही बेकायदेशीर आहेत. त्यामुळे माझ्यावर खटला चालवण्याचा तुम्हाला अधिकार आहे, असे मी मानत नाही.
मी तुमचे राज्यच मानत नाही. स्वातंत्र्य हा लोकांचा मूलभूत अधिकार असल्याचे मी लोकांना सांगितले आणि ते स्वातंत्र्य मिळवण्यासाठीचे मार्गही सांगितले. यामध्ये गुन्हा तो कोणता? त्यामुळे त्यांना या खटल्यामध्ये एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा झाली. त्यावेळी न्यायाधीशांनी शेरा लिहिला की, हेडगेवारांचे बचावाचे भाषण त्यांच्यावरील मूळ आरोपाच्या भाषणापेक्षा अधिक देशद्रोही स्वरूपाचे आहे. असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते! यामुळेच असे काम करताना लोकमान्य टिळकजी, महात्माजी, सुभाषबाबू, डॉ. आंबेडकर साहेब, भगतसिंग या सर्वांशी चर्चा झाली. या सगळ्यांचाही अनुभव दांडगा होता. प्रत्येक क्षेत्रात प्रत्यक्ष कामाचा अनुभव होता. यावरून हेडगेवार यांच्या लक्षात आले की, जे मला वाटते, तीच बाब प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. प्रत्येकाने फक्त आपला आपला मार्ग आणि समस्या निवडून त्यामध्ये पूर्ण शक्तीने जीवन वेचले.
त्यामुळे या समस्या संपणार्या आहेत; मात्र त्या पुन्हा डोके वर काढणार नाहीत, याची खात्री काय? ब्रिटिश काही भारतावरील पहिले आक्रामक नव्हेत. त्यांचा क्रमांक सातवा किंवा आठवा आहे. सिकंदरच्या आधीपासून पश्चिम दिशेकडून भारतावर आक्रमण होणे, भारत गुलाम होणे, पुन्हा स्वतंत्र होणे, पुन्हा आक्रमण, पुन्हा गुलाम असे चक्रच होते. कोणत्याही क्षेत्रात आमच्यापेक्षा श्रेष्ठ नसलेले मूठभर लोक एकत्र येऊन आमच्यावर आक्रमण करतात आणि आम्ही पराभूत होतो, हे सातत्याने घडले आहे. त्यामुळे अजून एकदा आम्ही स्वातंत्र्य मिळवूच; पण पुन्हा गुलामी येणार नाही कशावरून? आपल्या समाजामध्ये काही उणिवा आहेत. प्रथम म्हणजे, आपण आपल्यातील एकताच विसरलो आहोत; दुसरे म्हणजे, आपण स्वार्थी झालो असून, आपल्यात गुणहीनता आली आहे. आपल्या जीवनामध्ये अनुशासन राहिलेले नाही. स्वच्छतेची उणीवदेखील समाजामध्ये आहे. तसेच दारिद्य्र, अज्ञानदेखील समाजामध्ये पसरलेले आहे. हे सगळे नीट करून, एका सशक्त समाजाची निर्मिती केल्याशिवाय हे आक्रमण आणि गुलामीचे चक्र थांबणार नाही. आमचा वेळ एका समस्येचे समाधान शोधण्यात गेला. आता आमच्याकडे वेळ नाही, पण कोणीतरी हे काम केले पाहिजे.
तेव्हा डॉ. हेडगेवार यांनी विचार केला की, यासाठी प्रयोग करून बघितला पाहिजे. त्यानंतर त्यांनी विविधतेने ग्रासलेल्या समाजाला गुणवान करण्यासाठी आणि एकतेच्या सूत्रात बांधण्यासाठी आठ-दहा वर्षे विविध प्रयोग केले. जेव्हा त्यांना याचे सूत्र मिळाले, तेव्हा त्यांनी विजयादशमी 1925 रोजी त्यांच्या घरामध्ये सहकार्यांची बैठक बोलवली. साधरणतः त्याकाळी सुरू असलेल्या चार प्रकारच्या चळवळींमध्ये लोकसहभाग असल्याने, त्यात सहभागी न झालेलेच त्यांच्याकडे आले. अर्थात, चर्चा सुरू होतीच. मात्र, त्या दिवशी त्यांनी सहकार्यांना सांगितले की, आजपासून हिंदू समाजाचे संघटन करणारा संघ सुरू होत आहे. त्यानंतर सहकार्यांनी विचारले, नेमके करायचे काय? यावर हेडगेवार म्हणाले, ते कोणी ठरवले आहे! एकत्र बसून ठरवूया. पुढे 14 वर्षे हेडगेवारांना सारे माहीत होते. त्यांचा प्रयोग सफल झाला होता. मात्र, चर्चेच्या माध्यमातून त्यांनी या गोष्टी साथीदारांपर्यंत पोहोचवल्या. नवीन कार्यकर्त्यांच्या हाती दिली. त्यांनी यावर काम करून पाहिले.
संघाची स्थापना 1925 मध्ये झाली; पण संघाची कार्यपद्धती 1939 मध्ये पक्की झाली. एक नैसर्गिक विकासाचा क्रम आहे. घरामध्ये येणार्या नवजात शिशूचे नाव आधीच ठरलेले नसते. पाश्चात्य देशात रुग्णालयात आधी नाव दिल्याशिवाय जन्माचा दाखलाच मिळत नाही. आपल्याकडे असे नाही. किमान 12 दिवस तरी थांबावेच लागते. संघाचेदेखील असेच झाले. संघ स्थापन झाला, तेव्हा संघाचे नाव निश्चित नव्हते, घटना नव्हती, समिती नव्हती. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली; ते पहिले सरसंघचालक आहेत. मात्र, त्यांच्या सरसंघचालकपदाची घोषणा संघाच्या स्थापनेनंतर चार वर्षांनी, म्हणजेच 1929 मध्ये करण्यात आली. अशा प्रकारे सामूहिक चिंतनाच्या आधारावरच संघाचा विकास झाला आणि त्याचा प्रवास सुरू झाला. बायबलमध्ये एक वाक्य आहे; तसे आपण संघाच्या बाबतीत म्हणू शकतो. ‘संघ इज कम टू फुलफिल, नॉट टू डिस्ट्रॉय.’ सर्व चांगल्या कामांची पूर्तता ज्यातून होईल, ते काम करणे हे संघाचे काम आहे.
संघाची जी ‘मेथडॉलॉजी’ आहे, ती म्हणजे ‘आरएसएस.’ तुम्ही ‘आरएसएस’ म्हणता, कसे म्हणता माहीत नाही. पण, तुम्ही म्हणता की, नरेंद्रभाई पंतप्रधान आहेत, ‘आरएसएस’चे. पण, त्यांचा एक ‘भारतीय जनता पक्ष’ नावाने राजकीय पक्ष आहे, तो वेगळा आहे. त्यामध्ये अनेक स्वयंसेवक आहेत; पण तो पक्ष संघाचा नाही. समाजाला संघटित करण्याचे काम प्रचंड वेळखाऊ असून, झोकून देऊन ते कार्य करावे लागते. त्यामुळे हे कार्य करणार्याला कोणतेही दुसरे काम करण्यासाठी वेळच मिळत नाही. आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आईला विचारा, त्या सांगतील, यांना घरी लक्ष देण्यासाठी वेळच नसतो. आमच्या एक मावशी होत्या. त्यांचा विवाह एका स्वयंसेवकाबरोबर झाला. एकदा पुन्हा आल्यानंतर त्यांनी म्हटले की, मला माहीत नव्हते की मला एक सवतदेखील आहे! ‘सवत’ शब्द ऐकून सगळेच दचकले. सगळ्यांनी विचारले कोण? त्यावेळी मावशी म्हणाल्या, संघ! एवढे झोकून देऊन काम करावे लागत असल्याने, दुसर्या कामासाठी वेळच उरत नाही.
त्यामुळे संपूर्ण समाजाला संघटित करण्याशिवाय संघ दुसरे कोणतेही काम करणार नसल्याचे संघाने आधीच निश्चित केले आहे. आणि एकदा का हे काम पूर्ण झाले की, दुसरे कोणतेही कार्य संघ करणार नाही. मग देशात ज्या एवढ्या गोष्टी व्हायच्या बाकी आहेत, त्या कोण करणार, असे लोक विचारत, तेव्हा डॉ. हेडगेवार सांगत की, संघ काहीही करणार नाही आणि स्वयंसेवक काहीही सोडणार नाहीत. ते सगळं करतील. ते जे सगळं काही करतील, ते त्यांचे स्वतंत्र आहे, स्वायत्त आहे, स्वावलंबी आहे. ते वेगळे आहे. 1 लाख, 30 हजारांपेक्षा अधिक सेवाकार्ये संघाकडून काहीही आर्थिक सहकार्य मिळत नसताना, समाजाच्या सहकार्यातून जिथे जेवढे आवश्यक आहे, तिथे स्वतःचा पैसा, घाम ओतून स्वयंसेवक करत आहेत. सगळ्या क्षेत्रांत स्वयंसेवक कार्यरत आहेत. मात्र, ही सगळी कार्ये त्यांच्या स्वतंत्र आणि स्वायत्तपणे सुरू आहेत. जशी चर्चा होते, तसा कोणताही ‘रिमोट कंट्रोल’ संघाचा त्यांच्यावर नाही. संघ कोणाला ‘कंट्रोल’ करू शकतो? संघाच्या हातात ‘कंट्रोल’ कुठे आहे? हे माझे सहकारी माझ्याबरोबर सभागृहात बसले आहेत, उद्या त्यांनी त्यांचे कार्य थांबवले, तर मी काय करू शकतो? मन, मर्जी आणि मैत्री यांच्यावर चालणारे आमचे कार्य आहे. त्यामध्ये ‘कंट्रोल’चा विषयच नाही. स्वयंसेवक आहेत; ते येत-जात असतात; गोष्टी होतात. काम चांगले असेल, तर आम्ही सगळ्यांनाच सहकार्य करतो, तसे त्यांनाही करतो.
आता आमची शक्ती आहे, तर आमचा राष्ट्राविषयी एक विचारही आहे. त्या विचारानुसार गोष्टी घडाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो. त्या विचाराशी साधर्म्य असणारे विचार ज्यांचे असतात, त्यांना लाभ होतो; ज्यांचे विचार तसे नाहीत, त्यांना तो लाभ नाही मिळत. आम्ही कोणालाही लाभ पोहोचवण्यासाठी काम करत नाही, आम्हाला वाटते, देशासाठी चांगले आहे; म्हणून आम्ही ते कार्य करतो. तेव्हा पहिल्यांदा हे ध्यानात घेतले पाहिजे की, विविध कार्यांत जे स्वयंसेवक दिसतात, त्यांमुळे हे कार्य संघाचे आहे, असे म्हटले जाते; तसे ते नाही. त्याला सोडून संघाकडे बघणे आवश्यक आहे. संघ म्हणजे ती ‘मेथडॉलॉजी’, ज्याला ‘शाखा’ म्हणतात. त्यामध्ये एक तास दररोज शरीर, मन आणि बुद्धीचा व्यायाम केला जातो. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करतात, शक्तीसाठी दररोज दोन वेळा आहार सेवन करतात, विद्यार्थी दररोज अभ्यास करतात. मग देशाचे काम करायचे असेल, तर त्यासाठीही योग्य व्हावे लागेल.
त्यासाठीही एक व्यायाम आहे. त्या व्यायामाला आम्ही ‘शाखा’ म्हणतो. त्यासाठी एक तासाचा वेळ काढून त्या काळामध्ये सगळं विसरून भगव्या झेंड्याखाली आपल्या भारताचा विचार मनामध्ये ठेवून, त्याविषयीचा भक्तिभाव मनामध्ये ठेवून जे कोणी येतात, त्यांची जात-पात, नाव, किती कमावतात, किती मोठे आहेत, असा कोणताही विचार न करता सगळे फक्त आपले आहेत, या एकच विचाराने शरीर, मन आणि बुद्धीला सशक्त करणारा व्यायाम दररोज करावा लागेल आणि असं तयार झाल्यानंतर समाजाच्या उन्नतीच्या कार्यासाठी आपली आवड, प्रकृती, क्षमतेनुसार क्षेत्र निवडून त्या कामात झोकून देणे. संघ चालवण्यासाठी जे लागतात, ते समाजाचे अंग आहेत. त्यामुळे संघ समजून घ्यायचा असल्यास संघाची शाखा बघा, संघाचे कार्यकर्ते बघा आणि त्या कार्यकर्त्यांची घरे आणि कुटुंब बघा; तेव्हाच तुम्हाला संघ समजेल. संघाचे अनेक कार्यक्रम होतात, अनेक शिबिरे होतात, त्यांचे शिक्षावर्ग होतात; हे बघण्यासाठीही आम्ही लोकांना बोलावतो. तिकडे या; दोन दिवस राहा; संघाचे काम आतून पाहा; जो हवा तो प्रश्न कोणालाही विचारा, जे काही समजून घ्यायचे असेल, ते समजून घ्या.
संघाचे लोक, शाखा वगैरे एक-दोन वर्षे पाहून, मग काय ते ठरवा. कारण, अजून एक समजण्यासाठी थोडा कठीण मुद्दा स्पष्ट करतो की, संघाला समाजामध्ये वेगळी संघटना निर्माण करायची नाही. अजून एका प्रभावी समूहाची निर्मिती संघाला करायची नाही. कारण, संघाचा पहिला सिद्धांत हाच आहे की, देशाच्या भाग्यामध्ये परिवर्तन तेव्हाच येते, जेव्हा त्याचा पूर्ण समाज एक आणि गुणवान असतो. नेतृत्व, घोषणा, नीती, पक्ष, अवतार, सरकार, विचार, महापुरुष, तत्त्वज्ञान हे सगळे घटक साहाय्यक असतात, ते कारण नाहीत. कारण जर काही असेल, तर तो म्हणजे समाज! समाज मालक असून समाजकार्य करण्यासाठी समाजानेच त्यांना उत्पन्न केले आहे. मालक जागृत नसेल, तर नोकर काय करेल, हे कोण सांगू शकेल? जर मालक जागृत असेल, तर सर्व कामे सुरळीत होतील. म्हणून त्यासाठी देशाच्या भाग्याच्या परिवर्तनाचा कारक समाज आहे. जेवढे देश मोठे झाले, काही पुन्हा पतनाच्या दिशेने गेले. आधुनिक काळातीलच चर्चा आहे ही.
यामध्ये अमेरिका, युरोप, ब्रिटन, फ्रान्स, जपान, चीन, क्युबा, जर्मनी या सगळ्यांच्या उदय-अस्ताचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास काढून बघा. यावर अनेक पुस्तके आहेत. तुमच्या लक्षात येईल, तिकडचा समाज आधी तयार झाला. तसे त्याला तयार करण्यात आले. मगच त्यांची प्रगती झाली. म्हणूनच, अनेकदा आपल्या देशातील व्यवस्थेबाबत तक्रारी असतात. मात्र, व्यवस्था बदलल्याने समाज बदलत नाही. लाल दिवा असल्याने लोक वाहतुकीचे नियम पाळतील, असे होत नाही. लोक ते नियम पाळतात, म्हणून लाल दिवा लागतो. मुंबई, कोलकाता, दिल्ली, बंगळुरु, चेन्नई येथे जाऊन तेथील वाहतूक बघा; प्रत्येक ठिकाणची वेगळी दिसते. प्रत्येक ठिकाणी लाल दिवा असतोच; मात्र लोकांच्या सवयी वेगवेगळ्या आहेत. आणि म्हणूनच, कोणालाही न वगळता संपूर्ण समाजाला संघटित करणे आवश्यक आहे. जे आज आमचा विरोध करतात, तेसुद्धा आमच्या याच समाजाचे अंग आहेत. त्यांनादेखील संघटित करायचे आहे. ते विरोध करतात, ते ठीक आहे. आम्ही कोणाचा विरोध नाही करत. प्रामाणिक विरोधाचा आम्हाला फायदाच होतो. जो प्रामाणिक विरोध करतो, त्याला नंतर सत्याचे ज्ञान होऊन ते विरोध करणे सोडतात.
आम्हाला सर्वांना संघटित करायचे आहे. त्यामुळे पुन्हा एक प्रश्न उभा राहतो की, आता तुम्ही म्हणता की, सर्वांना संघटित करणार आणि मगाशी म्हणालात की, फक्त हिंदू समाज. फक्त हिंदू समाज का? बाकीच्यांना तुम्ही का सोडले? इथे थोडे समजून घ्यावे लागेल. आमचे म्हणणे आहे की, भारतात फक्त हिंदूच आहेत, अन्य कोणीही नाही. याचा अर्थ काय, ‘हिंदू’ शब्दावरून त्याला धर्म म्हणून बघता कामा नये. पूजा, कर्मकांड मानू नये. ‘हिंदू’ विशिष्ट समुदायाचे नाव नसून, ‘हिंदू’ हे नाम अथवा संज्ञा नाही; ‘हिंदू’ हे विशेषण आहे. ‘हिंदू’ शब्द बाहेरून आलेला आहे. रामायण, महाभारत, वेद यांच्यामध्ये ‘हिंदू’ शब्द नाही. पारसी, इराणी लोकांनी आपल्याला ‘हिंदू’ म्हटले. त्याकाळी इराण आणि इस्रायल यांच्यात चांगला व्यापार होता. त्यामुळे यहुदी लोकांना ज्ञान झाले. आपलेही त्यांच्याशी व्यापारी संबंध होते. आपल्या पश्चिम किनारपट्टीवरून जहाजे घेऊन जाणारे व्यापारी होते, त्यांना पहिल्यांदा माहीत झाले की, आपल्याला ‘हिंदू’ म्हटले जाते. पण, ते व्यापारी असल्याने त्यांनी सौद्याकडे लक्ष दिले. त्यानंतर त्यावेळी तत्कालीन बुद्धिवादी लोकांपर्यंत हा शब्द पोहोचला आणि त्यानंतर ग्रंथांमध्ये आला. लोकांपर्यंत हा शब्द पोहोचला नव्हता. आपल्याकडे एकच शब्द होता, तो म्हणजे ‘मानव!’ धर्मशास्त्र लिहिले गेले, त्यांचे नाव ‘मानव धर्मशास्त्र’; ‘हिंदू धर्मशास्त्र’ अस्तित्वात नाही. जेव्हा लोकभाषेमध्ये एखादा शब्द येतो, संत त्याचा वापर करतात. कारण, संत लोकभाषेमध्ये बोलतात, तर ‘हिंदू’ या शब्दाचा पहिल्यांदा उपयोग करणार्या संतांचे नाव आहे, श्री गुरुनानक साहेब!
पंजाबवर बाबरचे आक्रमण झाले होते. तेव्हा शाहापुरा नावाच्या ठिकाणी गुरुनानकदेव उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी अत्याचार, नरसंहार पाहिला. त्याचे वर्णन त्यांनी लिहिले,
तुर्कस्तान अस्मान गया,
हिंदुस्थान डराया।
‘हिंदुस्थान’ शब्दाचा उपयोग इथे केला आहे.
सच की वाणी आँखे नानक
सच संभालक सच की बेला।
काया कप्पर टुकटुक होसी
हिंदुस्थान संभालसी मोहे॥
असे पुढे त्यांनी लिहिले आहे की, एवढे अत्याचार झाले की हिंदू महिलाओं का शील बचा, न मुस्लीम महिलांओ की अस्मत बची। कारण, बाबरचे आक्रमण झाले होते. सल्तनती झाल्या होत्या. 11 सुलतानशाह्या झाल्या होत्या. हिंदूचे मुस्लीम झालेल्यांनाही बाबरच्या आक्रमणाची झळ बसली. त्यामुळे दोघांच्याही महिलांवर अत्याचार झाले. आता बघा, जेव्हा आपण ‘मुस्लीम’ म्हणतो, त्यावेळी आपल्या लक्षात येते की, अल्ला, कुराण आणि पैगंबर या तिघांना मानावेच लागेल, अन्यथा तुम्ही मुस्लीम नाही. हेच सत्य आहे, बाकी चूक, अशी त्यांची मान्यता आहे. भक्तीमध्ये अशी निष्ठा असते. पण बाकीचे लोकही होते, विष्णूला मानणारे वैष्णव होते, शंकराला मानणारे शैव होते, जैन होते, बौद्ध होते, शाक्त, गाणपत्य, सौर सगळेच होते. मात्र, त्यांचा वेगळा उल्लेख गुरुनानकजींनी केलेला नाही. या सगळ्यांना एकाच नावामध्ये बांधले, ते म्हणजे ‘हिंदू!’ मग यामध्ये अंतर ते काय? अंतर एवढेच आहे की, या सगळ्यांचे विविध देवी-देवता आहेत, वेगवेगळी उपासनापद्धती आहे, वेगवेगळे गुरू असून या सगळ्यांवर त्यांची श्रद्धा आहे. पण यापलीकडे सगळे एक मान्य करतात की, माझी श्रद्धा माझ्यासाठी योग्य असून तुझी श्रद्धा तुझ्यासाठी चांगली आहे. त्यामुळे मी जिथे जाणार आहे, तिथेच तूदेखील येणार आहेस. वेळेमध्ये दोघांच्या बदल संभव आहे. दोघांपैकी कोणी लवकर पोहोचेल, कोणी उशिरा पोहोचेल, कुणाचा रस्ता कठीण, तर कुणाचा सोपा असेल. जेवढे मनुष्य, तेवढे रस्ते असू शकतात; मात्र सगळ्यांचे गंतव्य एकच आहे. ज्यांना शिवमहिम्न स्तोत्र लक्षात आहे, त्यांनी आठवून पाहा.
‘रुचीनां वैचित्र्यादृजुकुटिलनानापथजुषाम्।
नृणामेको गम्यस्त्वमसि
पयसामर्णव इव॥’
वेगवेगळ्या रुचीमुळे विविध प्रकारचे रस्ते असतात. मनुष्याला एकाच ठिकाणी जायचे असते. अर्थात, भगवंतापाशीच जायचे असते. कसे, तर जसे पृथ्वीवर समुद्राचे पाणी कुठेही पडले, तरी समुद्रात जाते, तसेच! तसेच सगळे भगवतांपाशीच पोहोचणार आहेत, कोणाचाही मार्ग चुकीचा नाही. सगळ्याचा स्वीकार करा; सगळ्यांचा सन्मान करा; मात्र स्वतःच्या श्रद्धेवर अढळ राहा; मिळून-मिसळून राहा; हीच मुख्य गोष्ट आहे. आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होणार नाही, असे राहा.
कोणतेही पाप करू नका. पाप काय असतं? ते असो. पण कुशलतापूर्वक, म्हणजे कोणालाही त्रास न देता स्वतःचे पोट भरा. असे राहून काय करायचे, तर स्वतःची चित्तशुद्धी करा. हेच हिंदूंचे अनुशासन आहे. हाच आमचा स्वभाव आहे आणि हा काही आजचा नाही, तो आदिकालापासून आहे. भारत राष्ट्र म्हणून या स्वभावमुळेच उभा राहिला आहे. आपण ‘नेशन’ म्हणतो, या ‘नेशन’ शब्दामागे ‘स्टेट’ असतो. ‘स्टेट’ बदलले, तर ‘नेशन’ बदलते. मात्र, भारताचा विकासक्रम अगदीच वेगळा आहे. आमच्या ऋषिमुनींना एक सत्य गवसले. त्यानुसार अस्तित्व जरी वेगवेगळे दिसत असले, तरी त्याचे मूळ मात्र एकच आहे. याचा अर्थ आम्ही एकमेकांचे आहोत, आमच्यातील व्यवहार ‘सौदा’ म्हणून होणार नाही. आपुलकीच्या भावनेने आम्ही जोडलेले आहोत. तुम्ही माझे भले केले, तरच मी तुमचे करेन, हा सौदा झाला. इकडे असे नसते. तुम्ही माझे भले करा अथवा नका करू, तुम्ही माझे आहात; त्यामुळे मी तुमचे भलेच चिंतणार. यामुळे नुकसान झाले, तरी आम्ही मार्ग बदलला नाही.
अनेक चढ-उतार, कठीण परिस्थिती आल्या, तरीही आम्ही नष्ट होण्याचा धोका पत्करून आम्ही आमचा स्वभाव कायम ठेवला. सगळं बदललं, पण हिंदुस्थानचा सनातन स्वभाव बदलला नाही. ऋषींनी विचार केला की, हे शाश्वत ज्ञान संपूर्ण जगाला द्यावे. हे काम एकट्या-दुकट्याचे काम नाही. यासाठी त्यांनी यंत्रणा उभारली आणि त्यानंतर गावागावांत जाऊन समाजाला जागृत केले, साक्षर केले आणि तशी जीवनपद्धती तयार केली. आज आपण ज्यांना ‘फिरस्ती’ म्हणतो, ती त्या काळात समाजाला शिकवण्यासाठी फिरणारी मंडळी होती. ते राष्ट्राच्या निर्मांत्यांपैकी एक होते, असे वाटते. त्यामुळेच त्यांनी विदेशी आक्रमकांसमोर पराभव स्वीकारला नाही, ते लढले. त्याची फळे ते आज भोगत आहेत आणि आजच्या अवस्थेला पोहोचले. मात्र, त्यांनी हे घेतलेले व्रत सोडले नाही. ते आजही आपले काम करण्यास जाताना पूजा करून जातात. त्याला ते स्वतःचा धर्म मानतात. भारत धर्मप्राण आहे. सगळे एक असल्याने सगळ्यांना सोबत चालायचे आहे.
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्॥
असे राहायचे असेल, तर शिस्तीची गरज आहे. एकटे राहणार्याला ती नसते. त्यासाठीच नियम आले. सगळ्यांच्या हिताचे आहे, ते करणे आणि स्वतःचे मत मागे ठेवणे आवश्यक आहे. सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हापासून नियम आहे, त्याला धर्मच म्हटले जाते. सृष्टीचे जन्म, संचालन आणि काम झाल्यावर पुन्हा जाणे, याचे नियम आहेत. ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द चुकीचा आहे, त्याऐवजी ‘पंथनिरपेक्षता’ हा शब्द पाहिजे.
कारण, धर्मामधून कोणाचीही सुटका नाही. जसे वाहाणे हा पाण्याचा धर्म आहे, त्याला कोणी रोखू शकत नाही. धर्म इहलोक परलोकात सुख देतो. धर्म सर्वांची उन्नती साधतो. धर्म ज्या सत्यावर उभा आहे, ते एकतेचे सत्य आहे. यासाठी आयुष्यात करुणा आवश्यक आहे. करुणा त्याच्याकडेच असते, ज्याचे चित्त शुद्ध आहे, त्याला विकारांचा स्पर्श झालेला नाही. त्यांच्याच संवेदना उत्कट असतात, त्यासाठी अंतर्बाह्य शुचिता आवश्यक आहे. त्यासाठी जीवनाचा तपस द्यावा लागेल. श्रीमद्भागवतात चार स्तंभ सांगितले आहेत - सत्य, करुणा, शुचिता, तपस. यावर धर्म उभा आहे. दुनियेला कोणताही अहंकार न बाळगता धर्माचे ज्ञान देण्यासाठी भारताचा जन्म आहे.
एतद्देश प्रसूतस्य सकाशदग्रजन्मनः
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्या सर्व मानवाः।
यासाठी जे व्रतस्थ होऊन चालतात ते हिंदू आहेत. हे आचरण प्रत्येक पिढीमध्ये चालावे यासाठी त्यांनी एक संस़्कृती विकसित केली.
लाख लाख पिढीया लगी
तब हमने ये संस्कृती उपजायी
कोटी कोटी सिर चढे
तभी इसकी रक्षा संभव हो पायी
संस्कृती आम्हां सर्वांना जोडून ठेवते. भाषा आमच्या अनेक आहेत, काही भाषा बाहेरूनही आलेल्या आहेत. देवीदेवता अनेक आहेत, काही बाहेरुनही आलेले आहेत. देशाचा भूगोल वेगळा आहे. एवढ्या प्रचंड मोठ्या कालखंडात हा फरक होणारच. यातील कोणतीच गोष्ट आम्हाला जोडत नाही, ही आमची विशेषता आहे आणि आम्हाला ते मान्य आहे. मात्र, त्यापलीकडे आमची एक ओळख आहे. त्यालाच आम्ही हिंदू म्हणतो. कारण, या ज्ञानाला ओळख करून देणारा तो एकच शब्द आहे, जो आमच्या समाजाला चिकटला आहे. मी कधी मुस्लीम, इसाई यांच्याशी संवाद साधतो की, तुम्ही हिंदू आहात का, तर ते नाही म्हणतात. मग कोण आहात विचारले, तर ‘हिंदवी’ म्हणतात. गोष्ट एकच होते. लोक आम्हाला सल्ला देतात ‘भारतीय’ म्हणा, आमचा कोणताच आक्षेप नाही, आम्ही सहमत आहोत. पण, तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, ‘हिंदवी’ होणे किंवा ‘भारतीय’ होणे म्हणजे फक्त त्या देशाचे नागरिक होणे नाही. भारताचा एक स्वभाव आहे, भारत एक भूगोलाचे नाव नाही, त्या स्वभावाचे नाव आहे. हा जोडण्याचा स्वभाव पुन्हा एकदा जागा करणे आणि सगळे मिळून एकत्र येऊन अनुशासनाच्या आधारे देशाला मोठे करणे. कारण, भारत मोठा झाल्यास जग मोठे होईल.
एतद्देश प्रसूतस्य सकाशदग्रजन्मनः
स्वं स्वं चरित्रं शिक्षेरन् पृथिव्या सर्व मानवाः।
जगात सर्वांत प्राचीन असल्याच्या नात्याने या देशात जन्मलेल्या लोकांची चरित्रे अशी पाहिजे, की बाहेरून लोक येतील या देशातील लोकांची चरित्रे अभ्यासतील आणि त्यांच्या देशात तसे घडवण्याचा प्रयत्न करतील. उदाहरणातून लोकांना शिकवले पाहिजे. याने आपण महाशक्ती नाही होणार. महाशक्ती दंडुका चालवते. आपण बघतोच आहोत. तसे आपल्याला करायचे नाही. आपल्याला ‘विश्वगुरू’ व्हायचे आहे आणि ते फक्त भाषणाने आम्ही साध्य करणार नाही. ‘वी लीड फ्रॉम विद इन वी लिड बाय एक्झाम्पल.’ आमचे भारतवर्ष असे आहे, असेच त्याचे चरित्र आहे. यासाठीच भारताचा जन्म आहे, जेव्हा जेव्हा संकट मोठे असते, भारत मोठा होतो हा आपला इतिहास आहे. आता तीच वेळ पुन्हा आली आहे.
2000 सालात अनेक प्रयोग करून विश्व अडखळते आहे. चार पैकी तीन गोष्टी त्यांच्याकडेही आहेत. एक गोष्ट त्यांच्याकडे नाही, ती जोडण्यासाठी महत्त्वाची असते. त्यांना अर्थ आणि काम माहीत आहे. याला कंटाळा आला की मोक्षदेखील त्यांना माहीत आहे. मात्र, अर्थ आणि काम या दोघांना साध्य करत मोक्षाकडे नेणारा धर्म त्यांना माहीत नाही. त्यांना ‘रिलिजन’ माहीत आहे, धर्म नाही. या दोन्ही संकल्पना वेगळ्या आहेत. व्यक्तीचे हित ‘इंडिव्युजलिजम’, समाजाचे हित ‘सोशलिजम’, निसर्गाचे हित पर्यावरण याचे ज्ञान आहे. मात्र, हे सगळे एकसाथ कोणाचाही कोणालाही त्रास न होता कसे साधायचे, ही ‘परमेष्ठी’ संकल्पना त्यांना ज्ञात नाही, ते आमच्याकडे आहे. या जोडणार्या गोष्टीच्या आधारे आपल्या राष्ट्राचे वैभवसंपन्न, सामर्थ्यसंपन्न आणि सर्वहितकारी स्वरूप उभे करणे, तरच, विश्वाचे अपूर्णत्व पूर्णत्वास जाईल, त्यांच्या समस्यांचे उत्तर त्यांना मिळेल. हेच आम्हाला ईश्वराने दिलेले कर्तव्य असून, यासाठीच देशाला मोठे करायचे आहे. इंग्रजांना हुसकावे लागलेच. कारण, पारतंत्र्यात काहीही होत नाही. मात्र, आम्ही स्वाधीन झालो. स्वतंत्र होण्यासाठी आम्हाला ‘स्व’ समजून घ्यावा लागेल. तो ‘स्व’ आम्हाला जोडतो. यासाठी हिंदू समाजाचे संपूर्ण संघटन आवश्यक आहे.
तुम्ही तुम्हाला काहीही म्हणा, तुम्ही भारतीय आहात, तर हा स्वभाव तुमच्यात आहे. भारतातील मुसलमान आणि ख्रिस्ती हे जगातील मुसलमान आणि ख्रिस्ती यांसारखे नाहीत. हा वेगळेपणा कुठून आला, तो भारतीय आहे. आज सगळ्यांचा प्रभाव सर्वांच्या जीवनावर आहे, हे मान्यच आहे. तीच विशेषता आहे. म्हणूनच म्हटलं जातं की, चार प्रकारचे हिंदू आहेत. एक म्हणजे, ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’, दुसरा आहे ‘आम्ही हिंदू आहोत आणि राहू ते गर्वाचे काय करायचे?’ तिसरे आहे ‘जोर से मत बोलो हम हिंदू हैं’ आणि चौथे आहेत ते विसरले आहेत. जे विसरले आहेत, त्यांनी ते विसरावे अशी व्यवस्था उभी करण्यात आली. अजून लोकांनी हे विसरावे आणि त्या प्रकारात सहभागी व्हावे, असे प्रयत्न सुरू आहेत. कारण, भारत मोठा झाल्यास जगातील स्वार्थी शक्तींची स्वार्थाची दुकाने बंद होतील.
म्हणून ते आपल्याशी मैत्रीही करतात आणि योग्य वेळी शत्रुत्वही दाखवतात. सामर्थ्यसंपन्न राष्ट्रच त्याचे एकमेव उत्तर आहे आणि अशा राष्ट्रासाठी गुणवान संघटित समाज आवश्यक आहे. हेच आपल्याला करायचे आहे. सोडायचे कोणालाच नाही. परीक्षेत चार प्रश्न आहेत, दोन सोपे आहेत, दोन कठीण आहेत. सोप्या प्रश्नांची उत्तरे आधी द्यावी, कठीण प्रश्न नंतर सोडवायचेच आहेत. यासाठीच हिंदू समाजाचे संघटन करण्याचे काम संघ करत आहे. ते काम कसे होणार तर समाज अनुशासनाने चालतो. चित्रपटात सलमान खानजी जे परिधान करतात, आमचे तरुण तेच परिधान करतात. त्यांना विचारले का घातले, तर सांगतात सलमान खानजी यांनी घातले म्हणून. आजकाल चांगल्या-वाईट गोष्टी फॅशनवर चालतात. या फॅशन निर्माण करणार्या व्यक्ती श्रेष्ठ, विश्वासपात्र, कीर्तीमान, असतात. त्यांना आपल्या भाषेमध्ये ‘महाजन’ असे म्हटले जाते.
भगवद्गीता सांगते,
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः।
महाजनो येन गतः स पन्थाः।
सामान्य माणूस एवढा विचार करत नाही. त्यांना ज्यांच्यासारखे व्हावेसे वाटते तसे ते वागतात. आपल्याकडे आदर्शांची कमी नाही. मात्र, एक इंग्रजी वाक्य आहे- ‘आयडल लाईक अ स्टार, व्हिच वी नेव्हर कॅन रिच, बट वी कॅन प्लोट अवर चार्ट अकॉर्डिंग टू देम.’ आपण छत्रपती शिवाजी महाराज होऊ नाही शकत, पण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करू शकतो. मात्र, त्यांचा मार्ग काटेरी आहे सोपा नाही, त्यामुळे सामान्य माणूस हिंमत करत नाही. त्यांची जयंती करू, पुण्यतिथी करू, सगळं करू,पण त्यांच्यासारखे आम्ही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज झाले पाहिजेत, अशी माझी इच्छा आहे. मात्र, ते माझ्या घरात नको एवढेच. जर कोणी आपल्यापेक्षा दोन पावले पुढे गेलेला दिसत असेल, माणसाचा स्थायीभाव तर चांगल्याकडेच असतो. त्यामुळेच तो त्यांच्यामागे जातो. आज समाजाला प्रत्येक गावामध्ये अशी उदाहरणे हवी आहेत. त्या गावामध्ये लोकांमध्ये राहणारे, अलौकिक गुण असूनसुद्धा सामान्य दिसणारे चारित्र्यसंपन्न, नि:स्वार्थ बुद्धी असणारे प्रामाणिक लोक.
देश, संपूर्ण समाजामध्ये कार्य करणार्या कार्यकर्त्यांचा समूह निर्माण करणे, हाच संघाचा प्रयत्न आहे आणि हे एक काम पूर्ण झाल्यावर अन्य कोणतेही काम करण्याची संघाला गरज नाही. कारण, एकदा असा समाज झाल्यावर तो स्वत:चे कार्य स्वत:च करण्यास सक्षम होईल, त्याला ‘कॉन्ट्रॅक्टर’ शोधण्याची गरज नाही. आज आम्ही देव, सरकार, संघ यांना स्वत:च्या उद्धारासाठी कंत्राट देतो. संघ यासाठी नाही. कोणीही तुमचा उद्धार करणार नाही, तर तो तुम्हीच केला पाहिजे, हे सांगण्यासाठी संघ आहे. यासाठीचे गुण संघ सांगू शकतो. संघाची स्वत:ची एक कार्यपद्धती आहे आणि त्याच्या आधारावर आम्ही असे चित्र उभे केले आहे. पण, हेच कार्य करणारे असंख्य लोक आहेत. अनेक संतमहात्मे हेच कार्य करत आहेत. नित्य सराव हाच एक मार्ग आहे त्यासाठी. दुनियेमध्ये चांगल्या मनुष्यांच्या निर्मितीसाठी दुसरा मार्ग नाही. त्यामुळे यावरच चालावे लागेल आणि त्याची एक विशिष्ट गती आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून कार्य करणे आवश्यक आहे. भारत एक स्वत: स्वभाव आहे. यासाठी समाजाकडे सातत्याने गेले पाहिजे. याआधीही तीन-चार वेळा गेलो आहे, मात्र ती परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी आमच्याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका असे.
द्वितीय सत्र
संपूर्ण समाज संघटित झाल्याशिवाय काहीही होणार नाही. श्रद्धा घेऊन आम्ही चालत आहोत आणि पाहात आहोत की असेच आहे. सर्व अनुभवांतून हेच लक्षात येते. जसजसा समाज उन्नत होत आहे, तसतशा बाकी सर्व गोष्टी ठीक होत आहेत. दुसरी गोष्ट आहे की, स्वयंसेवकांची समाजातील कार्यशीलता वाढली आहे. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सेवा चालू आहेत; अनेक गतिविधी चालू आहेत. गतिविधी त्या असतात, ज्या व्यवस्था परिवर्तनाचे कार्य करत नाहीत. अशी सर्वमान्य कार्ये, जी करताना मनुष्यदेखील बदलून जातो, जसे ग्रामविकासाचे कार्य आहे. मनुष्य हे कार्य त्याच्या गावासाठी करायला लागला, तर हळूहळू त्याचा स्वार्थ निघून जातो. भले करण्याच्या दिशेने त्याचे मन वळू लागते.
गोसेवा करताना मनुष्याच्या स्वभावात बदल होतो, हे प्रत्यक्ष दिसते. अशाच आमच्या सहा गतिविधी चालतात. अधिकदेखील सुरू होऊ शकतात. त्याचीदेखील शक्यता आहे. जसे की, ड्रग्सची समस्या आहे. त्याचा विचार आम्ही करत आहोत की काय करू शकतो. स्वयंसेवक वेगवेगळे कार्य करत आहेत. त्या सर्वांना एकत्र करून अधिक व्यापक काही होऊ शकते का, होऊ शकत असेल तर करणार. अजून त्यावर निर्णय झालेला नाही. विचार चालू आहे. अशा गोष्टी आहेत. हे कार्य आम्ही वाढवणार आहोत. विविध संघटना आहेत. त्या आपापल्या क्षेत्रात व्यवस्था परिवर्तनाचे कार्य करतात. त्यांची अन्य संघटनांसोबत स्पर्धादेखील असते. त्यामुळे एकमेकांमध्ये वाददेखील होतात; टीकाटिप्पणी होते; सर्व होते. आम्ही त्यामध्ये उतरणार नाही. तिसरी गोष्ट आहे की, हे सर्व करायचे आहे, तर जसे मी म्हणालो की, तुम्ही सर्व लोक सोबत असाल, तर हे कार्य गतीने होईल. मी संघाचे कार्य म्हणत नाहीये. समाजाची जी आवश्यकता आहे, संस्काराची गोष्ट तुमच्या मनात येते, सुरक्षेची गोष्ट तुमच्या मनात येते, समरसतेची गोष्ट तुमच्या मनात येते, तुम्ही त्यावर प्रश्न विचारणारच, हे मला माहीत आहे. परंतु, संघ काही सर्व गोष्टीचा ठेका घेण्यासाठी बसलेला नाही.
संघाला तर असे शिकवायचे आहे की, आपल्या हिताचा ठेका कुणाला देऊ नये. स्वतःचे काम स्वतः करा; त्यासाठी योग्य बना. त्यासाठी बाकी सर्व साधनांचा उपयोग आपण करू शकतो. नाहीतर, तीच साधने आपल्या विरुद्ध होतात. त्यामुळे समाजातली जी सज्जनशक्ती आहे, तिला सक्रिय व्हावे लागेल. थोड्या-फार प्रमाणात सक्रिय आहे. अधिक प्रमाणात सक्रिय व्हावे लागेल. आणि दुसरी गोष्ट आहे, सर्वांनी आपापले कार्य आपापल्या पद्धतीने करत एकमेकांना पूरक असावे, बाधक नसावे. असे जर केले, तर समाजात चांगले वातावरण निर्माण होते. समाजाचे वातावरण जर चांगले झाले, तर वाईट करणारे टिकू शकत नाहीत; एक तर बदलून जातील किंवा निघून जातील. कारण समाजाच्या पुढे कोणाचेच चालत नाही. परंतु समाजाला असे बनवण्यासाठी सज्जनशक्तीचे जागरण त्यांचे परस्परपूरक पुढे जाणे, याची आवश्यकता आहे आणि समाजामध्ये असे वातावरण पाहिजे की, लोक सज्जनशक्तीचे अनुसरण करतील.
हे करतील तर त्यांच्यातदेखील काही परिवर्तनाच्या गोष्टी व्हायला हव्यात, यासाठी ‘पंचपरिवर्तन’ हे जे तुम्ही ऐकत आहात, तो विषय आहे. पाच अशा कृती आहेत, विषयांच्या शीर्षकावरून त्याचे तत्त्वज्ञान तर तुम्हाला माहीत आहेच. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वबोध आणि स्वदेशी आणि नियम-कायद्यांचे पालन. ही शीर्षके ऐकून तुम्हाला वर्णन लक्षात आले, ते सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु, हे होणार कसे? समाजात हे प्रत्यक्ष होण्यासाठी भाषण देऊन होणार नाही. आपल्याला आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल. मी आणि माझे कुटुंब दैनंदिन यासाठी काय करतो, अशा सोप्या कृती आहेत, यासाठी कोणताही खर्च लागत नाही; वेगळा अधिकचा वेळ द्यावा लागत नाही. जे आपण जीवन जगत आहोत, त्यामध्येच हे करायचे आहे आणि हे सर्वचजण करू शकतात. जसे की, सामाजिक समरसता आहे.
जाती-पातीचा भेद मनात नसावा. जात-पात न पाहता, परस्परबंधुतेचा, समानतेचा व्यवहार असला पाहिजे. आपलेपणाने व्यवहार व्हायला पाहिजे. ही गोष्ट तर तुम्हाला माहीतही आहे, तुम्ही सांगतही असाल. जसे शक्य होईल तसे या पद्धतीने राहण्याचा प्रयत्नही करत असाल. परंतु एक सरळ कृती आहे, सर्वजण जे करू शकतात. आपापल्या कार्यक्षेत्रात, म्हणजे प्रत्येकाचे वावरण्याचे एक क्षेत्र ठरलेले असते, म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल की, मी मुंबईकर, तर मुंबई तुमचे वावरण्याचे क्षेत्र आहे, अशा क्षेत्रात जेवढ्या प्रकारचे हिंदू मानले जातात, आम्ही तर संपूर्ण हिंदू समाज एकाच प्रकारचा समजतो. आम्ही विचारतही नाही आणि आम्हाला माहीतही होत नाही, वर्षानुवर्षे एकत्र काम करूनही, कोण कोणत्या प्रकारचा हिंदू आहे. परंतु समाज तर मानतो. म्हणून समाजाच्या दृष्टीने जितक्या प्रकारचे हिंदू त्या भागात आहेत, त्या सर्व प्रकारच्या हिंदूंमध्ये आपले स्वतःचे मित्र असले पाहिजेत. प्रत्येक प्रकारच्या हिंदूंमध्ये किमान एक मित्र असावा आणि आपल्या कुटुंबाचे किमान मित्र कुटुंब त्या प्रत्येक प्रकारच्या हिंदूंमध्ये असले पाहिजे. ही करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही येथून निघाल्यानंतर लगेच याची सुरुवात करू शकता. यासाठी वेगळा काहीही खर्च येत नाही. तुमची मोठी इमारत असेल, पण जेव्हा तुम्ही बाहेर जाता, तेव्हा तुम्हाला पदपथावर एखादा चप्पल शिवणारा बसलेला आढळेल. किंवा बाहेर जाण्याचीदेखील गरज नाही.
तुमच्या घरात तुमच्या बागेची काळजी घेणारा एखादा माळी असेल, वाहनचालक असेल. हे सर्व कोण आहेत? ते आपले आहेत. आपले जीवन जगण्यास मदत करतात. ते मित्र व्हायला हवेत किंवा अशा भागात आपण जावे. जसे मित्रांबरोबर येणे-जाणे, एकत्र बसणे, एकत्र खानपान असते. तसा व्यवहार त्या मित्रांसोबत असला पाहिजे. त्या कुटुंबासोबत माझ्या कुटुंबाचा असला पाहिजे. जर आपण हे केले, तर ती थेट कृती आहे, एक सोपी कृती आहे, यामुळे समाजाला समरसता सांगण्याची गरज भासणार नाही. अनुभवाने लक्षात येईल की, आमच्यासोबत भेदभावविरहित आचरण होते. यामुळेच विषमतेचे दिवस होते, ते संपले. आता समानतेचे दिवस आले आहेत. हे आपोआप होईल. जर अशा लोकांचा थोडा प्रभाव वाढला, तर समाजाला पटवून देऊन मंदिर, पाणवठा आणि स्मशानभूमी या तीन ठिकाणी सर्व हिंदूंना प्रवेश दिला जाईल. हे पटवून देऊन करावे लागेल; लादून नाही आणि संघर्ष करून नाही. कारण, समरसता करण्यासाठी संघर्ष केला, तर अधिक मने दुखावतील, अंतर वाढेल. समजावून सांगून हळूहळू पटवून देऊन करावे लागेल. ही सामाजिक समरसता आहे, जे पहिले परिवर्तन आहे.
दुसरे म्हणजे कुटुंब प्रबोधन. आता आजची पिढी अशी झाली आहे, कालची पिढी अशी झाली आहे, आज-कालच्या लोकांना त्यांचा देश माहीत नाही, वगैरे वगैरे प्रश्न येतात. नवीन पिढी तर प्रश्न विचारणारच. आपली पिढी कदाचित अशी असेल, जिथे आपण वडीलधार्यांनी सांगितलेल्या गोष्टी डोळे झाकून करायचो. आता असं नाहीये. ते प्रश्न विचारतील. आपण त्यांना उत्तर देण्यास तयार असायला हवे. जर आपली संस्कृती, आपले आचरण अनुभवावर, सत्यावर, तर्कावर आधारित असेल, तर आपण प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. पण, चर्चाच पूर्णपणे थांबली आहे. एकतर ठेका देण्याची प्रवृत्ती आहे. तुम्हीही असा विचार करता, तुम्हीदेखील प्रश्न विचारता, ते काही प्रमाणात ठीकदेखील आहे. शिक्षणात संस्कार नाहीत, हे खरे आहे. आता ‘एनपी’मुळे येतील. परंतु अजूनपर्यंत नव्हते, ही वस्तुस्थिती होती. पण मी विचारतो, घरी संस्कार आहेत की नाहीत? समाजात संस्कार आहेत की नाहीत? शिक्षण म्हणजे फक्त शालेय शिक्षण नाही. शिक्षण ही एक आजीवन चालणारी प्रक्रिया आहे. पहिल्या 12 वर्षांमध्ये मनुष्य आईवडिलांकडून मोठ्यांकडून त्याच्या चारित्र्याचे अधिष्ठान पक्के करतो, जे कधीही बदलत नाही. त्या 12 वर्षांत त्याची प्रवृत्ती आणि स्वभाव आपण घडवतो; घडवतो की नाही? आपण तो कसा घडवतो? आपल्या घरातील रितीरिवाज आणि परंपरांची त्याला जाणीव होते. हे सांगून होत नाही, दाखवावे लागते.
मोठ्यांच्या आचरणात या गोष्टी आहेत की नाहीत? आज-काल मोबाईल फोनबद्दल बोलले जाते. घरातील वडीलधारेच, म्हणजे आईच मूल रडू लागले की पहिल्यांदा त्याला मोबाईल फोन देते. कधी घरात गेल्यावर दिसते की, पती-पत्नी दोघेही कामावर जातात. कार्यालयातून परत येतात, त्यावेळी मुलेही शाळेतून परतलेली असतात. त्यानंतर थोडेसे भोजन करतात आणि मग सर्वजण आपापले मोबाईल काढून बसतात. कोणीतरी बाहेर आले आहे, त्याकडेही लक्ष देत नाहीत. चर्चा व्हायला हवी; नाहीतर मुलांना एकटेपणा वाटतो. त्यामुळेच ते नंतर ड्रग्जच्या आहारी जातात. त्यामुळेच ते आत्महत्या करतात. त्यामुळेच ते असे खेळ खेळतात, जे त्यांना अशा गोष्टींकडे घेऊन जाण्यास प्रवृत्त करतात. आपल्याला ते कळतही नाही. घडल्यानंतरच आपल्याला समजते. त्यामुळेच एक पटकन होणारी कृती, जी तुम्ही तुमच्या घरात लगेचच करू शकता. तुमचे कुटुंब कितीही लहान असो, जरी ते दोन-बाय-दोनचे असले, तरी किंवा 10-12 लोकांचे असले, तरी चालेल. आठवड्यातून एक दिवस ठरवून एका निश्चित वेळी संध्याकाळी सर्वांनी घरात एकत्र या आणि आपल्या श्रद्धेनुसार घरात भजन करा. त्यानंतर कोणताही संकोच न करता, घरी बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घ्या आणि नंतर तीन-चार तास गप्पा मारा. गप्पांमध्ये तीन विषय असावेत, आपण कोण आहोत? आपले कुटुंब काय आहे? आपले कूळ काय आहे? त्या कुळाच्या चालीरिती काय आहेत? या कुळाचे पूर्वज कोण होते? त्यांनी कोणते चांगले काम केले? या रितीमध्ये जे कालसुसंगत आहे, जे कालबाह्य झालेले नाही, ते आपल्या घरात काय आहे? काय असले पाहिजे आणि ते कसे आणू शकतो.
तसेच काही कुरिती शिरल्या असतील, तर त्या कशा काढून टाकता येतील, यावर चर्चा करा; हुकूम देऊ नका; आदेश देऊ नका; घरात करायला सांगू नका. ज्याला-त्याला विचार करू द्यावा. मुलेही बोलतील आणि त्यांची मते ऐकली जातील आपण प्रतिसाद देऊ. जर कोणत्याही एका मुद्द्यावर एकमत झाले, तर ते लागू करावे. असाच आणखी एक विषय घ्यावा, आपला देश काय आहे? आपले पूर्वज कोण होते? त्यांच्या कथा काय आहेत? त्यांनी काय केले? आपल्या परंपरेत कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत? त्या आपल्या घरात आहेत का? कोणत्या नकारात्मक गोष्टी आत शिरल्या आहेत? त्या कशा दूर करायच्या? ज्यावर एकमत होईल, ते लागू करा. आणि तिसरा मुद्दा असा आहे की, मी दररोज स्वतःसाठी आणि माझ्या कुटुंबासाठी पैसे आणि वेळ खर्च करतो, प्रत्येक व्यक्ती करते. परंतु, ज्यामुळे मी आणि माझा परिवार आहे, तो म्हणजे आपला देश, समाज आणि राष्ट्र आहे. जेव्हा भारत कमकुवत होता, तेव्हा इदी अमीनसारखी व्यक्ती तीन दिवसांची नोटीस देऊन भारतीयांना हाकलून लावू शकत होती आणि भारतीयांना फक्त अंगावरील कपडे घालून निघून जावे लागत होते. का? कारण, भारताला काही महत्त्व नव्हते. आता भारत जसजसा उदयास येत आहे, स्वतःला सिद्ध करत आहे आणि बलवान होत आहे, तसतसे जगात सर्व भारतीयांची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता सुनिश्चित केली जात आहे. आपण त्या देशासाठी दररोज किती वेळ आणि पैसा समर्पित करतो? दररोज नाही करू शकत, वर्षातून एकदा खर्च करू; जे काही असेल.
प्रत्येकजण अगदी लहान मूलही काहीतरी करू शकते. आठवी इयत्तेत शिकणारा मुलगाही चौथी इयत्तेत असलेल्या आपल्या घरातील धुणीभांडी करणार्या स्त्रीच्या मुलाला शिकवू शकतो. वाढदिवस साजरा करताना प्रथम घरी देवाची पूजा करून, आई-वडिलांची पूजाकरून नंतर जवळच्या झोपडपट्टीत जाऊ शकतो. तिथे बसून सर्वांसोबत मिठाई खाऊ शकतो. आपली मुले आपल्याला या बाबतीत नवीन कल्पना देतील. ते जन्मापासूनच सद्प्रवृत्ती असतात. त्यांनी जग पाहिलेले नसल्याने जगाच्या विकृतींचादेखील प्रभाव त्यांच्या मनावर पडलेला नसतो. त्यामुळे यावर चर्चा करा आणि जे काही एकमत झाले आहे, ते अमलात आणा.
प्रत्येकाने दररोज काही वेळ प्रामाणिकपणे आणि निःस्वार्थ बुद्धीने, समाजाच्या हितासाठी घालवावा. निःस्वार्थ बुद्धी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. चांगले काम केल्यानंतर पावती मागण्याची प्रवृत्ती असते, ते करू नये. ही आपली पूजा आहे. समाजरूपी देवाला आपण आपली पूजा अर्पण केली आहे, या भावनेने करावे. जर ही चर्चा दर आठवड्याला झाली, तर घरातील वातावरण बदलेल. हा एक अनुभव आहे. आम्ही हे करून पाहिले आहे, म्हणून तुम्हाला सांगत आहोत. प्रत्येक आठवड्याला हा मंगल संवाद घरात व्हायला हवा. जर तुमच्या घरात असा संवाद होत असेल, तर कधी तुमच्या शेजार्यांना आपण काय करतो ते बघायला आमंत्रित करा. जर त्यांना ते आवडले, तर तुम्हीदेखील करा, असे सांगा. असेच उपक्रम अन्य लोकदेखील करत आहेत. स्वामीनारायण पंथाची शिक्षापत्री असते. घरी बैठका घेतल्या जातात. ‘मंगल कुटुंब’ आणि असे इतर उपक्रम सुरू आहेत. बरेच लोक ते करत आहेत. तुम्ही कदाचित ते करत नसाल, तर ते करायला सुरुवात करा.
तिसरी गोष्ट म्हणजे पर्यावरण. आता आपण ‘कार्बन प्रिंट’ आणि या सर्व गोष्टींचा उल्लेख करतो. ठीक आहे. पण, आपण काय करत आहोत? जग या चुकीच्या मार्गावर इतके पुढे गेले आहे की, अचानक जर मागे वळले, तर गाडी पलटी होईल. त्यामुळे त्याला खूप लांब वळण घेऊन मागे वळावे लागेल. त्यासाठी वेळ लागेल. पण, आपल्या घरात आपण पाणी वाचवू शकतो; प्लास्टिक टाळू शकतो. झाडे लावू शकत नाही का? नळ गळत आहे. अनेकदा तो 15-15 दिवस टपकत राहतो. किती पाणी वाया जाते? आमचे गोपाळजी इथे बसले आहेत. त्यांनी प्रत्येक थेंब मोजला आहे. 24 तास जर नळातून पाणी गळत राहिले, तर किती पाणी वाया जाते, हे ते आम्हाला सांगतात; ऐकूनच डोके चक्रावून जाते. त्यामुळे प्लम्बरला बोलवा आणि नळ दुरुस्त करून घ्यायला किती वेळ लागतो? तुम्ही किती वेळ शॉवरमध्ये अंघोळ करता? मोकळा वेळ असेल, तर तुम्ही दोन तास घालवता.
परंतु, शरीर स्वच्छ करण्यासाठी 15 मिनिटे पुरेशी आहेत. त्यामुळे आपण ऊर्जा आणि पाणी वाचवू शकतो. आपण घरात सर्वत्र पडदे लावतो आणि आत दिवे लावतो. बाहेर सूर्यप्रकाश आहे; देवाने दिलेला दिवा आहे. तो प्रकाश देत आहे आणि आपण त्याला आत येऊ देत नाही. आमचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत असताना आम्हाला थोडा वारा लागायला लागला; म्हणून आम्ही खिडक्या बंद केल्या. मग त्यानंतर गरम व्हायला लागले, म्हणून आम्ही पंखे चालू केले. ते आम्हाला म्हणाले, याला सभ्यता म्हणतात. आपण सभ्यतेच्या नावाखाली काय करत आहोत? हे दुरुस्त करा. केवळ एकदाच वापरता येणार्या प्लास्टिकचा वापर सोडून द्या. तुमच्याकडे जे आहे, त्याचे ‘इकोब्रिस’ किंवा काहीतरी बनवा. त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येते. नवीन खरेदी करू नका. वृक्षारोपण हा उपक्रम आहे. आपण सर्वजण त्यात सहभागी होतो. ही एक ‘फॅशन’ आहे आणि लोक ते करतात. पण, आपण आपल्या घरातदेखील हिरवळ निर्माण करू शकतो. कुंड्या लावा. गच्चीवर भाज्या लावल्याने आपल्याला विषमुक्त भाज्या मिळतील; ताज्या भाज्या मिळतील. अनेकदा भाज्या आपल्याला शेजार्यांना देता येतील, इतक्या प्रमाणात येतात. घरात हिरवळीमुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. आपण हे सर्व करू शकतो. यापासून सुरुवात करून तुम्ही पर्यावरणासाठी करता येणार्या इतर गोष्टींचादेखील विचार करू शकता, ज्या आपण प्रत्येक घरात सहजपणे करू शकतो. परंतु, या तीन गोष्टी प्रत्येक घरात करता येतात. प्रत्येकजण ते करू शकतो.
तसेच, स्वबोध आणि स्वदेशी हा एक विषय आहे. जर आपण भारताचे लोक आहोत, याचा अर्थ काय? आपण ‘इंडिया’चे लोक आहोत का? सामान्यनामाचे भाषांतर होते, विशेषनामाचे भाषांतर होत नाही. जर आपण भारताचे आहोत, तर आपल्या स्वतःच्या भाषा असतात. आपली स्वतःची भूषा आहे. किमान आपल्या घराच्या चौकटीच्या आत भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन आणि भ्रमण हे आपलेच असले पाहिजे; बरोबर ना? आपल्या शयनकक्षात डोके टेकवण्यासाठी उशी असते. त्यावर ‘वेलकम’ का लिहिलेले असते? तिथे ‘सुस्वागतम्’ का असू शकत नाही? आपल्या स्वतःच्या भाषेत लिहा. कागदावरची तुमची स्वाक्षरी परदेशी भाषेत असण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या मातृभाषेत तुमच्या भाषेच्या लिपीचा वापर करून सही करू शकता. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आज आपल्याला ज्या दैनंदिन जीवनात सामोरे जावे लागत आहे, त्यातही आपण या गोष्टींवर भर देऊ शकतो. घरामध्ये आपण मातृभाषेतच बोलले पाहिजे.
‘मम्मी’, ‘डॅडी’ का असावे? आई, बाबा होऊ शकत नाही का? ते शक्य आहे. ते जास्त जवळचे देखील आहे. आपण अनेकदा चिंतित असतो की, आपल्या संस्कृतीचे काय होईल? मुलांच्या वागण्यात भारताप्रती प्रेम नाही. अरे, पण याची सुरुवात तुमच्या घरातून करा. शिक्षण हे केवळ शाळेतच असते असे नाही. ते आपल्या घरातही आहे. आम्ही आधी ते केले पाहिजे आणि मग मुलांकडून करून घेतले पाहिजे. आपल्या श्रद्धेनुसार घरात पूजास्थळ असावे ना? अनेकदा जिन्याखाली जो त्रिकोण झालेला असतो, तिथे एका बाजूला देव आणि दुसर्या बाजूला चप्पल-बूट काढण्याचे ठिकाण असते, असे कसे चालेल? त्यामुळे आपली भाषा असावी. त्याचबरोबर भूषादेखील आपलीच असावी. ठीक आहे की, बाहेर आपल्याला विदेशी कपडे घालावे लागू शकतात. परंतु, आपल्या घराच्या आतमध्ये? किमान सण-उत्सवात तरी आपण भारतीय वेश वापरू शकतो. आपल्याला फुल पँट घालावी लागते हे ठीक आहे, परंतु आपण धोतर नेसू शकत नाही. हे कसे होऊ शकते? परदेशात होऊ शकते. मी एकदा संघशिक्षा वर्गासाठी केनियाला गेलो होतो, म्हणून तेथील शिक्षार्थ्यांनी ठरवले की, शेवटच्या आम्ही धोतर-कुर्त्यात असू, कोणालाही धोतर नेसायचे माहीत नव्हते, म्हणून मी धोतर कसे नेसावे याचे तीन वर्ग घेतले. ते तिथे शक्य नाही, हे संभव आहे. परंतु, आपल्या देशात आपल्याला हे येत नाही, असे कसे?
मी मणिपूरला गेलो होतो. मणिपूरमध्ये तुम्हाला दिसेल की त्या व्यक्तीची स्थिती काहीही असो, जेव्हा तो एखाद्याच्या घरी जेवणासाठी जातो किंवा सणाला जातो, तेव्हा तो पूर्ण मणिपुरी पोशाखच परिधान करतो. या गोष्टींचा स्वतःचा एक ‘स्व’ असतो, जो अशा छोट्या कृतींवर टिकून असतो. भजनाची देखील तीच स्थिती आहे. एकदा शेषाद्रीजी एका घरात गेले. घरातील छोटी मुलगी आली आणि गप्पागोष्टी करू लागली. तेव्हा शेषाद्रीजींनी भगवान कृष्णाच्या चित्राकडे बोट दाखवून तिला विचारले की, हे कोण आहे? तर तिने उत्तर दिले की, हा माझ्या आजीचा देव आहे. शेषाद्रीजी म्हणाले, आजीचा देव आहे, मग तुझा देव कोणता? म्हणून तिने क्रॉस दाखवला. जे ख्रिस्ती आहेत, त्यांच्या घरात येशू ख्रिस्ताचे भजन व्हावे. जे ख्रिस्ती नाहीत, कृष्णाचे भक्त आहेत, त्यांच्या घरात कृष्णाचे भजन व्हावे. आपले भवन म्हणजे घराची देखभाल केलेली असावी. आपल्या घरात लावलेली चित्रे विवेकानंदांची, टिळक, गांधी, सावरकर, आंबेडकरांची असावीत की नाही? मायकेल जॅक्सनची का असावीत? मुलांना चित्रे दिसली, तर ती कोण आहे विचारतात? आम्ही सांगू शकतो. हे अनायासे घडते.
भोजनदेखील घरगुती साधे अन्न घ्यावे. घरगुती अन्न विषमुक्त आहे. एखाद्या वेळी पिझ्झा खाणे, एखाद्या वेळी हॉटेलमध्ये जाणे ठीक आहे. दर रविवारी गेलेच पाहिजे असे नाही. तसेच भ्रमण या विषयाबद्दल आहे की, जग तर पाहिलेच पाहिजे. पॅरिस पाहा, युरोप पाहा, सिंगापूर पाहा, हे सर्व फिरा, पण कधीतरी चित्तोडगडला देखील जाऊन या. कधी रायगडदेखील पाहा. कधी आपल्या घराच्या मागे असलेल्या वस्तीत लोक कसे राहतात, हे सुद्धा तिथे जाऊन दोन-चार तास पाहा. भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन, भ्रमण हे आपल्या घरात आपल्या स्वतःचे असले पाहिजे. यातून ‘स्व’चा बोध जागृत होतो. ‘आम्ही कोण आहोत’ हे समजते.
अनेकदा काही गोष्टी पुढे येतात की, टिळा का लावावा, यासारखे प्रश्न येतात. त्यासाठी पुस्तकेदेखील निघाली आहेत. उत्तरेही उपलब्ध आहेत. हे देखील मुलांना सांगा. हा आहे ‘स्वबोध.’ ‘स्वदेशी’ म्हणजे आपल्या घरात जे बनते ते बाहेरून घ्यायचे नाही. खूप चांगले मसालेदार ताक किंवा लिंबाचा रस घरी बनवता येतो. तर बाहेरून का आणायचा? ते बाहेरून आणण्याचे एक कारण आहे की, त्यावर अनेकांचा रोजगार चालतो. मठ्ठा विकणारे आपले लोक आहेत, भारतीय कंपनी देखील आहे. त्यामुळे अडचण नाही. आपल्याकडे संक्रांतीनंतर भोगी येते. भोगीच्या वेळी आधी असे असायचे की, घरातील मातीची भांडी संध्याकाळच्या वेळी प्रत्येक जण उचलायचे आणि गावाबाहेर जाऊन ती फोडायचे. गावात परतताना ते कुंभाराच्या इथून सर्व नवी भांडी खरेदी करायचे. वर्षातून एकदा कुंभारांचा रोजगार सुनिश्चित करण्यात आला होता. अशी व्यवस्था होती. यापुढे ते जसेच्या तसे तर लागू होणार नाही. काळ बदलला आहे. परंतु, आपण इतके तर करू शकतो की, आपण जे काही खरेदी करू, त्यामुळे आपल्या देशाच्या रोजगारात वाढ होईल. परदेशातील अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यांच्याशिवाय आपले काम होऊ शकते. परदेशातील अनेक गोष्टींपेक्षा आमच्या इथे तयार केलेल्या वस्तू अनेकदा चांगल्या प्रतीच्या मिळू शकतात. जीवनाची अत्यावश्यक गोष्ट जिच्याशिवाय काम होऊच शकत नाही आणि ती परदेशातूनच येत असेल तर ते ठीक आहे. धोरणात्मक स्तरावर आम्ही असे म्हणू की, असा व्यवहार करावा लागेल. आंतरराष्ट्रीय व्यापारात आपण एकटे राहू शकत नाही. परंतु, आपण जे काही करू, ते कोणाच्या दबावाखाली नव्हे, तर स्वतःच्या इच्छेने करू. हे धोरण हळूहळू देशात चालू आहे, पण धोरण आपल्या गतीने बदलते. आपण आपल्या घरात हे लागू करा.
पाचवे आणि शेवटचे परिवर्तन म्हणजे नियम आणि कायद्यांचे पालन करणे. भारतीय संविधान आहे हे भारतीय मनामुळेच तयार केले गेले आहे. यामध्ये भारताचा स्वभाव आहे, मी म्हटले त्याप्रमाणे प्रत्येकाचा स्वीकार, प्रत्येकाचा आदर आहे. जेव्हा देशाचे विभाजन झाले, तेव्हा मुस्लीम आणि हिंदू या आधारावर झाले. परंतु, पाकिस्तान मुस्लीम राष्ट्र बनले. पाकिस्तानमधून बांगलादेश तयार झाला, तो देखील अखेरीस मुस्लीम देश बनला. आपण स्वतःला सर्वांचा देश म्हणून घोषित केले. कारण, आम्ही हिंदू आहोत. तीच चूक झाली असे म्हणणारे लोक देखील आहेत. पण, हेच घडले आहे, याचे कारण म्हणजे हिंदू आहे, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या स्वभावाने वागणारा. आपले संविधान एक प्रकारे धर्माचे आचरण युगानुकूल आहे. याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. संविधानाची प्रस्तावना, नागरिक कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांचे अधिकार हे चार प्रकरण आपल्या वाचनात असले पाहिजेत, वाचले पाहिजेत. संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन ते वाचले पाहिजे, ते लक्षात ठेवले पाहिजे. पूर्ण संविधानाचे हे दिग्दर्शक आहे आणि त्याअंतर्गत बनवलेल्या कायद्यांचे पालन करावे. छोट्या गोष्टी आहेत - लाल दिवा असताना त्याचा भंग करू नये. कर व बिल वेळेवर भरावे. परवाना काढून घ्यावा.
कोणत्याही परिस्थितीत नागरिक अनुशासनाचे पालन करणे. भगिनी निवेदिता सांगतात, स्वतंत्र देशात नागरिक अनुशासन आणि नागरिक संवेदना या दोन गोष्टींचे पालन करणे हेच देशभक्तीचे दैनंदिन रूप आहे, त्यामुळेच देशासाठी काय करायचे तर हे करावे. काही नियम असे आहेत, जे कुठेही लिहिलेले नाहीत. संविधानात नाहीत, कायद्यात नाहीत, तुम्ही पाळले नाहीत तर शिक्षा होऊ शकत नाही. कारण, तो गुन्हा नाही. वडीलधार्यांच्या पाया पडावे, हा गुन्हा नाही, जर तुम्ही ते केले नाही तर तो गुन्हा नाही तुम्हाला शिक्षा होणार नाही, परंतु जर तुम्ही असे केले तर ते तुम्हाला तुमचा अहंकार नियंत्रणात ठेवण्यास मदत करेल. त्यामुळे परंपरेतील काही गोष्टी अशा आहेत, ज्या आपल्याला चांगले मनुष्य बनवतात. हे सर्व आपल्या कुटुंबात शिकवले गेले पाहिजे आणि आपण सर्वांनी याचे पालन केले पाहिजे. आणि जेव्हा हे घडते, तेव्हा तो एक चमत्कारच असतो.
इंदूरला दरवर्षी देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित केले जात आहे. जर तुम्ही जाऊन ते पाहिले तर तुम्हाला कळेल. ते का घडले? कारण, इंदूरमधील प्रत्येक कुटुंबाने ठरवले की आम्ही आमच्या शहरात घाण होऊ देणार नाही. आम्ही असे करणार नाही, आणि कोणाला करूही देणार नाही. जर एखादा मोठा माणूस कागद फेकत असेल, तर जवळ खेळत असलेली मुले त्याला सांगतात की, काका, एकतर तो कागद आम्हाला द्या किंवा तिथे कचरापेटी आहे त्यात टाका. त्यामुळे प्रत्येकाची वागणूक बदलली आहे. म्हणून अशा प्रकारचे हे पाच परिवर्तन जे आहेत ते जर मनुष्य हे करू लागतील, मग त्यांच्या जीवनात एक राष्ट्रीय अनुशासन येईल. त्यांच्या जीवनात स्वबोध जागृत होईल. संस्कारांची परंपरा पुढेही कायम राहील.
पर्यावरणाबाबतचे कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडण्यास सुरुवात केली तर बरेच ओझे कमी होईल. कोरोना काळात कोणीही पर्यावरणासाठी मोहीम हाती घेतली नाही. पण, जर आपण जे काही करायचो ते सर्व थांबवले, तर सृष्टी किती स्वच्छ झाली आणि गेल्यानंतर 15 दिवसांच्या आत ती पुन्हा कशी झाली, आता लॉकडाऊन नाही, पण लॉकडाऊनशिवाय जे शक्य आहे ते आपल्याला करावेच लागेल. या पंचपरिवर्तनाची सुरूवात स्वयंसेवकांनी त्यांच्या घरी सुरू केली आहे. एका दिवसात 100 टक्के होणार नाही. ही एक स्थिर आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. जर आपण 10 पावले पुढे टाकलीत, तर शताब्दी वर्षानंतर आपण समाजाला हे करण्यासाठी बोलू शकतो. यामुळे समाजात चांगुलपणाचे वातावरण राहील. तिसरी गोष्ट आहे की, हिंदूंच्या ज्या चार प्रकारांवर मी बोललो. जे विसरले आहे, त्यांना भीती वाटते की जर आम्हाला हिंदू म्हटले तर आमची उपासना पद्धती नष्ट होईल. पण, तसे अजिबात होणार नाही. हे इतर देशांमध्ये घडले आहे.
पण, आपल्या देशात इस्लामच्या आक्रमणानंतर मुसलमान आले. अजूनही इस्लाम गेला नाही आमच्यासोबत आहे. ख्रिस्ती आले त्यांची ख्रिश्चन श्रद्धा देखील अबाधित आहे. एकमेकांशी वाददेखील होत असतात. कधी धोरणांबाबत मतभेद असतात, तर कधी सामाजिक धोरणांबाबत मतभेद असतात. तसेच वादही होतात. पण, देशाचे कधीही विभाजन झाले नाही. एकदाच देशाचे विभाजन झाले जेव्हा हिंदू स्वभावाचे विस्मरण झाले.
हिंदू भाव को जब जब भूले, आयी विपदा महान।
भाई टूटे, धरती खोई, मिटे धर्म संस्थान॥
हा आपला इतिहास आहे आणि हा आपला वर्तमानकाळ आहे आणि म्हणूनच हिंदुत्वाची भावना मान्य केल्याने आपले काहीही नष्ट होणार नाही. आपली पूजा, आपली भाषा केवळ हिंदुत्वातच संरक्षित राहू शकते. कारण, हा विचारच असा आहे आणि म्हणून मुक्त मनाने आपण हे स्वीकारूया की, उपासनेद्वारे आपण कोणीतरी आहोत, भाषेने आपण कोणी आहोत, कोणत्या प्रांताचे आहोत, कोणत्या देवतेची पूजा करतो, काही खाद्यसंस्कृती आहेत, शाकाहारी आहेत किंवा जे मांसाहारी आहेत, ते काहीही असो, परंतु आपण एक समाज म्हणून, एक राष्ट्र म्हणून, एक संस्कृती म्हणून एक आहोत. आम्ही त्यांना हिंदू म्हणतो. तुम्ही म्हणा अथवा म्हणू नका, पण तुम्ही वापरत असलेला शब्द समानार्थी आहे. तुम्ही भारतीय किंवा हिंदवी म्हणता ही एकच बाब आहे. शब्द कोणताही वापरा. आम्ही शब्दांवर वाद घालत नाही. आम्हाला कोणत्याही उपासना किंवा पद्धतीशी काही गैर नाही.
आम्हाला माहीत आहे की, हे सर्व परिस्थितीच्या गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारे उद्भवते आणि जोपर्यंत विश्वास आहे, तोपर्यंत लोक त्यावर चालत राहतात. आम्ही त्यावरून कधीही कोणाचा अपमान करत नाही. तो हिंदू स्वभाव नाही. पण, ते शिकण्याची गरज आहे. त्यामुळे संवाद होणे गरजेचे आहे. संवाद असायला हवा. शांतपणे बसून बोलावे लागेल. ही तुमची समस्या ही आमची समस्या असे चालणार नाही. आधी आपण एकत्र आले पाहिजे. मी अनेकदा म्हणतो की हिंदू-मुस्लीम एकता हा चुकीचा शब्द आहे. जे दोन आहेत, त्यांना एक करता येते. जे आधीच एक आहेत, त्यांच्याशी तुम्ही एकतेबद्दल कसे बोलता? आपण विसरलेली एकता आपण पुन्हा आठवली पाहिजे. या सर्वानंतरही आपण एक राष्ट्र म्हणून एक होतो. त्यामुळे अशफाक उल्ला खान फासावर गेले. त्यामुळे इब्राहिम गार्दी भाऊसाहेब पेशव्यांसोबत पानिपतला युद्धात गेले. परंतु, शरण नाही गेले. हे कशामुळे घडले? कारण, त्यांना समजले की आम्ही स्वीकारलेल्या बाहेरून पूजा बाहेरून स्वीकारल्या आहेत. त्या सोडू शकत नाहीत, त्याची आता सवय झाली आहे. ठीक आहे. आणि समाज म्हणून आपण कुठे आहोत? कोणत्या बाजूने आहोत? आम्ही इथे आहोत. एक चक्र उलटे फिरवणारा औरंगजेब होता आणि एक आपल्या प्राणांची आहुती देणारे कॅप्टन औरंगजेब होते. आता आपल्याला हे संभाषण करावे लागेल. जर काही प्रवृत्ती असतील, तर स्वतःला सुरक्षित ठेवण्याची ताकद असली पाहिजे. आम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही, पण आम्हाला शक्ती का हवी आहे? आमच्या प्रार्थनेत आम्ही म्हणतो, ‘अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्’ अशी शक्ती ज्यावर कोणीही विजय मिळवू शकत नाही. आम्ही असे म्हटले नाही की, ज्या शक्तीच्या आधारे आम्ही प्रत्येकाला जिंकू अशी शक्ती मागितली नाही.
हिंदूंना कोणाला जिंकावे वाटत नाही. त्याला सर्वांना जोडून ठेवायचे आहे. पण, त्याच वेळी त्याला हेही माहीत आहे की, जगात दुष्ट लोक आहेत. त्यामुळे ते आपल्याला जिंकतील असे होऊ नये. आम्ही सुरक्षित राहू. जगाला सुरक्षित जग बनवेल. या सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी काही संवादात्मक पुढाकारही घ्यावा लागेल. हळूहळू येणार्या काळात असे संवाद व्हायला हवेत आणि एका दीर्घ परंपरेत आपापसांत जे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे जे घडले आहे, त्याच्या खोल जखमा लोकांच्या हृदयावर आहेत. ते सर्व भरून यावेत आणि पुन्हा संस्कृती, राष्ट्र, देश, समाज म्हणून आपण सर्व एक आहोत, ़ही भावना घेऊन भारताने उभे राहावे. त्यामुळे या सर्व गोष्टीही चर्चेसमोर आहेत. समाजाच्या संघटित शक्तीच्या आधारे या देशाला सर्वोच्च गौरवाचे राष्ट्र बनवणे, हे एकमात्र कार्य घेऊन संघ पुढे जाईल. त्याला 100 वर्षे लागली. आशा आहे की, पुढे इतकी वर्षे लागणार नाहीत आणि तुम्ही सर्वजण यात सामील व्हाल, त्यामुळे काम आणखी वेगाने होईल आणि ‘एकत्र या’ असे सांगितल्यावर घाबरून जाऊ नका. एक मार्ग म्हणजे शाखेत येणे. शरीर, मन, बुद्धीचा एक तासाचा व्यायाम ज्यामुळे संस्कार आणि ऊर्जा मिळते. त्यानंतर तुमच्या आवडीच्या क्षमतेनुसार कामाची निवड करून ते समाजासाठी समर्पित करण्यासाठी उरलेले 23 तास देणे.
हा संघासोबत काम करण्याचा एक मार्ग आहे. तुम्हाला ते कठीण वाटत असेल, तरी काही फरक पडत नाही. स्वयंसेवक समाजाच्या फायद्यासाठी व्यवस्था बदलण्याच्या कार्याला जितका वेळ आणि रस द्यावा लागेल, तितका द्यावा ही आज संघाची भूमिका आहे. 50 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. जर तुमच्याकडे एक संघ असेल तर आमच्याकडे एक संघ आहे. आपली आजची परिस्थिती अशीच आहे. संघाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्कात राहून अनेक जण संघाचे काम करतात. काही संघामध्ये सामील न होता देखील संघाचे काम करतात. प्रामाणिक, निःस्वार्थ, बुद्धिमान, स्वयंपूर्ण, श्रीमंत आणि आपल्या धर्माच्या, संस्कृतीच्या आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित असणे, जे अगदी घरीदेखील होऊ शकते. इतर सर्व संतमहात्मेदेखील हे काम करत आहेत. अनेक संस्थादेखील चांगले काम करत आहेत. संघदेखील चांगले काम करत आहे. परस्परसहकार्य असले पाहिजे, जिथे जितक्या शक्ती आहेत, तितकेच परस्परसहकार्य असले पाहिजे, कधीही अडथळा येऊ नये. आणि चौथा प्रकार आहे की, तुम्ही तुमचे काम करत राहा, आम्ही संपर्कात राहू. अशी कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही म्हणालं, मी माझे काम करेन, ठीक आहे, आम्ही भेटू आणि तुमचे अभिनंदन करू. कारण, संघाचे काम हे संघाचे काम आहे.
त्यामुळे धर्म, संस्कृती आणि समाजाचे रक्षण करून हिंदुराष्ट्राची सर्वांगीण प्रगती शक्य आहे. तुम्ही असे काही काम करत आहात आणि जरी तुम्हाला संघाचे नाव माहीत नसले, तरी तुम्ही तुमच्या जागी जे करत आहात ते तुम्ही कराल, ते चांगले करा, ते प्रामाणिकपणे करा, ते निःस्वार्थ बुद्धीने करा. म्हणून आम्ही असे गृहीत धरतो की, तुम्ही स्वयंसेवक आहात. तुम्हाला माहीत नाही, परंतु आम्हाला विश्वास आहे.
विनोबाजी भावे संघाचे द्वितीय सरसंघचालक श्रीगुरुजी यांना भेटले होते. विनोबाजींनी गुरुजींनी सांगितले की, गुरुजी, मी तुमच्या संघाचा असभ्य सभ्य आहे. ‘असभ्य’ म्हणजे ‘अनसिव्हिलाईज्ड’ नाही, तर जो सभेला जात नाही तो. विनोबाजी म्हणाले, मी तुमच्या सभेला येत नाही, प्रार्थना करत नाही, गणवेशही घालत नाही. पण, स्वयंसेवक जसा असायला हवा, तसा मात्र मी आहे. त्यामुळे आपल्या भारतवर्षात अशा अनेक ‘असभ्य सभ्यां’च्या अस्तित्वाची आम्ही काळजी घेतो. त्यापैकी तुम्हीही एक बनू शकता.
एकूणच भारतवर्ष आपल्या स्वत्वाच्या आधारावर उभा राहून जगाला मार्गदर्शन करण्यात सर्वप्रकारे सक्षम व्हावा, म्हणून उत्कृष्ट पद्धतीने, प्रामाणिकपणे, नि:स्वार्थ बुद्धीने जर तुम्ही काम करीत आहात, तर आम्ही असे मानतो की, तुम्ही संघाचेच काम करीत आहात. संघात सहभागी होण्यासाठी असे हे पाच पर्याय आपल्याकडे आहेत. त्यापैकी कोणता पर्याय निवडायचा, ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. पण, त्यासाठी सगळ्यांना सक्रीय होण्याची गरज आहे, ती काळाचीही गरज आहे. आपल्यासमोर निश्चितच अनेक आव्हानेही आहेत. भारतवर्ष उभाच राहू नये, म्हणून जगातील स्वार्थी, एकाधिकारवादी शक्ती कार्यरत आहेत.
जनबलसंपन्न, धनबलसंपन्न, सत्ताबलसंपन्न अशा सगळ्या प्रकारच्या त्या शक्ती असून, त्या अशा षड्यंत्रांमध्ये तरबेज आहेत. या विकृत कौशल्याचा शेकडो वर्षांचा अनुभव त्यांनी उत्तमरीत्या विकसित केला आहे. त्यांच्याबरोबर आपला सामना आहे. परंतु, घाबरण्याची काहीएक आवश्यकता नाही. संपूर्ण हिंदू समाज अशाप्रकारे उभा राहिला, तर हिंदू समाजाची ही जी सात्विक शक्ती आहे, त्याच्यासमोर कुणीही टिकू शकत नाही. त्यांचे चांगले दिवस आता संपले आहेत. आताची लढाई ही बळाची लढाई आहे. आपण आपले काम करीत राहायचे, देशाला उभे करायचे, घातपातांपासून संरक्षण करायचे, असे केले तर त्यांचे सामर्थ्य तसेही संपुष्टात येणार आहे. पण, त्याच्यासाठी आवश्यकता आहे, ती आपण सगळ्यांनी मिळून कृती करण्याची. म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना हेच आवाहन करतो की, संघाविषयी ‘मन’ आणि ‘मत’ बनवायचे असेल तर ते संघाला बघूनच तयार करा. त्यासाठी मूळ स्रोतांचा आधार घ्या. आजकाल संघाविषयी जाणून घेण्यासाठी, आपल्यापैकी काहींनी निमंत्रण मिळाल्यानंतर असेही केले असेल की, संघाविषयी विकीपीडिया काय लिहिते वगैरे तपासणे. पण, या स्रोतांवर संघाविषयी बरीच उलटसुलट माहिती दिलेली आहे.
‘प्रपोगंडा’ आणि ‘परसेप्शन’च्या आधारावर संघ आपल्याला कधीही समजणार नाही, उलट त्यामुळे गैरसमज होण्याचीच शक्यता अधिक आहे. त्यामुळे थेट संघाकडेच बघा. म्हणजे संघाचे कार्यकर्ते, त्यांची घरे, संघाच्या शाखा, संघाचे कार्यक्रम... याकडे नीट पाहिले तर संघ नेमका काय आहे, याची आपल्याला अनुभूती प्राप्त होईल. मग त्याआधारावर तुम्ही तुमचे मत अवश्य बनवा. मग तुम्ही जे मत संघाविषयी तयार कराल, ते आमच्यासाठी ठीक असेल. मग तुम्ही पाचपैकी कुठला एक पर्याय निवडताय, तरी ठीक आहे. सगळे चांगले आहे, पण तुम्हाला तटस्थ राहायचे आहे, तरीही काहीच हरकत नाही. जर तुम्ही ठरवले की, यात काहीतरी गडबड आहे. विरोध करायला हवा. तथ्यांच्या आधारे जर तुम्ही संघाला विरोध केलात, तर आम्हाला सुधारणेसाठी त्याची नक्कीच मदत होईल. त्याचेही आम्ही स्वागतच करू. पण, सत्य नेमके काय आहे, ते संघात येऊन समजून घ्या.
आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे, त्या पाच पर्यायांपैकी एखादा पर्याय तुम्ही निवडा अथवा हे सारे समजून, हिंदुस्थान हिंदुराष्ट्र आहे म्हणजे नेमके काय आहे, आपण हिंदू आहोत म्हणजे काय आहोत, हे सगळे समजून घेऊन मग तुम्ही जे करताय, ते उत्कृष्ट रितीने, प्रामाणिकपणे, नि:स्वार्थी वृत्तीने, देशहितासाठी करा. हे आज करण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी यांपैकी कोणताही एक पर्याय निवडून तुम्ही प्रारंभ करावा. मी तुमच्यासमोर मांडून मी माझा विषय समाप्त करतो.