अशी साकारली नव्याने संघप्रार्थना...

विवेक मराठी    12-Feb-2026
Total Views |
sangh prarthana
sangh-prarthana 
एखाद्या प्रार्थनेचे शब्द जितके उदात्त तितकी ती प्रार्थना स्थळ, काळ, भाषा, संस्कृती याची बंधनं ओलांडून माणसांच्या हृदयापर्यंत पोहोचते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना अर्थासह सर्वांसमोर आली पाहिजे हे काम नामवंत संगीतकार राहुल रानडे यांनी करायचं ठरवलं त्याचं कारण हेच होतं. ते सांगतात, ’या प्रार्थनेचा अर्थ ऐकून मी ही रोमांचित झालो होतो. गेली पंचाऐंशी वर्षे ही प्रार्थना अनेकांच्या मनात देशाबद्दल, समाजाबद्दल, भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाची ज्योत तेवती ठेवून आहे. अनेक पिढ्यांनी या प्रार्थनेतून प्रेरणा घेऊन प्रत्यक्ष कृतिरूपाने भारताच्या उत्कर्षासाठी आपले सर्वस्व अर्पिले आहे. एखादा कलाकार समाजासाठी, देशासाठी काय करू शकतो तर आपल्या कलेच्या रूपानेच तो आपलं योगदान देऊ शकतो.’ संगीतकार म्हणून संघाच्या या प्रार्थनेला नवीन रूप कसं देता येईल? या विचाराने आणि नंतर तो विचार प्रत्यक्षात आणायला सुमारे तीन वर्षे ज्या अनेकांनी अथक प्रयत्न केले त्याची ही गोष्ट राहुल रानडे यांच्याच ओघवत्या शब्दांत...
- राहुल रानडे (नामवंत संगीतकार)
rahul@rahulranade.com
शब्दांकन : अदिती जोगळेकर- हर्डीकर
adjos28@gmail.com
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थना नव्या रूपात अर्थासह ध्वनिमुद्रित करून त्याला दृकश्राव्य रूप द्यायचं ही कल्पनाच मुळात अत्यंत अभिनव अशी होती. गेली पंचाऐंशी वर्षं जी प्रार्थना अनेक पिढ्यांनी गायली आहे त्या प्रार्थनेला नवा साज देण्यासाठी वैचारिक आणि सांगीतिक तयारी करावी लागणार होती. टीम जमवावी लागणार होती. आणि या टीमच्या कामाचं नियोजन व कार्यवाही ठरल्याप्रमाणे होईल याकडे लक्ष द्यावं लागणार होतं. त्यातून ती रा. स्व. संघाची प्रार्थना असल्यामुळे खूप जबाबदारीचं काम होतं. आजच्या डिजिटल युगात युट्यूबवरून ही दृकश्राव्य प्रार्थना प्रसारित करून जगभरात ती अनेकांपर्यंत पोहोचावी असा मानस होता. त्यामुळे हा प्रकल्प माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखा होता!!
 
 
तीन डिसेंबर 2022 ला शंकर महादेवनचा एक कार्यक्रम मी मुंबईत आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध निवेदक, लेखक आणि दैवी आवाजाची देणगी लाभलेले हरीश भिमाणी आले होते. दुसर्‍याच दिवशी मला त्यांचा फोन आला, कार्यक्रम छान झाला वगैरे सांगितल्यानंतर ते म्हटले, राहुल एक काम है, जो सिर्फ आप ही कर सकते हो! हरीशजींनी हे म्हटल्यावर मला फार संकोचून जायला झालं. इतका मोठा माणूस काय काम सांगणार आहे? या विचाराने मला उत्सुकताही वाटली. ते पुढे म्हणाले, ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की जो प्रार्थना है, वह संस्कृत में है. जब मैंने प्रार्थना के अर्थ का अभ्यास किया, तब जाना कि इसका अर्थ बहुत गहरा है. प्रार्थना संस्कृत में होने के कारण यह अर्थ सामान्य जनों तक नहीं पहुंचता है. इस का अर्थ हमें सब को समझाना चाहिये. आप इस के बारे में सोचिये.’
 
 
‘संघाची प्रार्थना नीट ऐकून त्यावर जरा विचार करतो. मग बोलू’. असं मी त्यांना सांगितलं आणि माझ्या डोक्यात चक्र सुरू झाले. तोपर्यंत नमस्ते सदा वत्सले मातृभूमे.. या ओळीशिवाय प्रार्थनेच्या पुढच्या ओळी काय आहेत हे मला माहीत नव्हतं. पण मला संघप्रार्थनेवर नव्याने काम करायची कल्पना मुळातच आवडली होती. हरिशजी साधंसुधं काम माझ्याकडे आणणार नाहीत असंही वाटत होतं. काहीतरी मोठं काम यातून होऊ शकतं आणि ते आपण करू शकतो असं माझ्या मनाने घेतलं.
 
 
sangh-prarthana
 
माझा आणि संघाचा थेट संबंध कधी आला नव्हता. संघशाखेत जाताना मी अनेकांना पाहिलं होतं. पण याआधी संघाच्या कोणत्याही उपक्रमात मी कधी सहभागी झालो नव्हतो. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना मी एका कार्यक्रमात पूर्वी भेटलो होतो. समाजासाठी आपलं आयुष्य झोकून देऊन संघाचे लोक काम करतात, याबद्दल मला माहिती होती आणि संघप्रचारकांबद्दल कायमच आदर वाटे.
 
 
या प्रकल्पाची पूर्वतयारी म्हणून मी सर्वप्रथम प्रार्थनेची माहिती घेतली. 1939 साली नरहर नारायण भिडे यांनी ही प्रार्थना लिहिली होती, आणि यादवराव जोशी यांनी प्रार्थनेला स्वरसाज चढवून 23 एप्रिल 1940 साली पुण्यातल्या शिबिरात पहिल्यांदा ही प्रार्थना म्हटली होती. यूट्यूबवर विविध लोकांनी अपलोड केलेले संघप्रार्थनेचे व्हिडिओ होते ते मी पाहिले. यातले बहुसंख्य व्हिडिओ सांगीतिक दृष्टीने मला फारसे भावले नाहीत. या प्रार्थनेचं संगीत वेगळ्या प्रकारे कसं करता येईल, याचा विचार मी करायला लागलो. अचानक माझ्या मनात आलं की, प्रार्थनेची फिलहार्मोनिक अरेंजमेंट केली तर? सिंफॉनिक स्वरूपाची? म्हणजे चाल तीच ठेऊन त्याला पाश्चात्त्य शास्त्रीय सुरावटीचं कोंदण दिलं तर? पण ही पाश्चात्य वाद्य वाजवायला बोलवायचं कोणाला? पाश्चात्त्य शास्त्रीय वादन करणारा तुटपुंजा ऑर्केस्ट्रा भारतात चेन्नईत आहे. भारताबाहेर हंगेरी, व्हिएन्ना, लंडन या देशातले ऑर्केस्ट्रा नामचीन आहेत.
 
 
इंग्रजांचं राज्य असताना ही प्रार्थना पहिल्यांदा गायली गेली होती. स्वातंत्र्यलढ्यात संघाने सहभाग घेतला होता. स्वत:च्या देशाबद्दल अभिमान व्यक्त करणारी, स्वराज्याची ओळख सांगणारी, आणि भारताच्या उत्कर्षासाठी लोकांमध्ये चेतना जागवणारी ही संघाची प्रार्थना आपण इंग्रजांच्या देशात जाऊन त्यांच्याकडूनच रेकॉर्ड करून का घेऊ नये? असा एक हटके विचार माझ्या डोक्यात चमकून गेला. लंडनच्या अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या रॉयल फीलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या वाद्यवृंदाबरोबरच संघाची प्रार्थना ध्वनिमुद्रित केली तर? हा विचार माझ्या मनात येता क्षणी मी त्या दिशेने हातपाय हलवायला सुरुवात केली. एका वैयक्तिक लंडन सफरीमधे रॉयल फिलहार्मोनिकच्या ऑफिसला मी भेट देऊन या विषयी चाचपणी केली. लंडनस्थित अ‍ॅबी रोड स्टुडिओशी संपर्क केला. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्यासोबत मी गेली अनेक वर्षं काम करतो आहे. संघाची प्रार्थना अशी वेगळ्या पद्धतीने करायचं डोक्यात आहे. तुझ्या आवाजात ध्वनिमुद्रित करायची का? हे विचारल्यावर त्यानेही आनंदाने संमती दिली.
....त्याआधी पाच-सहा वर्षांपूर्वी...
पुण्याच्या एस. पी. कॉलेज मैदानावर संघाच्या घोष विभागाची प्रात्यक्षिकं होती. माझा मावसभाऊ नितीन सोनटक्केने मला ते ऐकायला बोलावलं. हे ऐकण्यासाठी पुण्यातली विविध क्षेत्रातली मंडळी बोलावलेली होती. घोष विभागाचा तो कार्यक्रम कसा वाटला यावर प्रतिक्रियाही द्यायच्या होत्या. तेव्हा माझी आणि मा. मोहनजींची पहिल्यांदा ओळख झाली होती.
 
 
 
त्यामुळे संघाशी माझा सगळ्यात जवळचा कनेक्ट होता माझा भाऊ नितीन सोनटक्के. त्याला मी सगळ्यात पहिल्यांदा ही प्रार्थनेची कल्पना ऐकवली. ही जानेवारी 2023 च्या आसपासची गोष्ट असेल. त्याने मला डॉ. प्रवीण धबडगाव (पश्चिम महाराष्ट्र-प्रांत कार्यवाह) यांना भेटण्यास सांगितलं. धबडगाव यांनी संस्कार भारतीचे संघटन मंत्री दादा गोखले यांचं नाव सुचवलं. मग मी मुंबईत संघ कार्यालयात दादांना भेटलो. तेव्हा त्यांच्यासोबत पश्चिम क्षेत्र प्रचारक सुमंतजी आमशेकर हे सुद्धा होते. सुरुवातीपासून या दोघांनी मला वेळोवेळी मदत केली. या दोघांनाही लंडनला जाऊन प्रार्थना रेकॉर्ड करण्याबद्दल उत्सुकतापूर्ण आश्चर्य वाटलं होतं.
 
 
संघाची शिस्त, कामाची पद्धती याची मला फारशी कल्पना नसल्यामुळे माझ्या अनेक छोट्या-मोठ्या प्रश्नांची उत्तरं विचारायला मी या दोघांना अनेकदा फोन करायचो. या प्रकल्पाचा एकूण आवाका मोठा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत लागणार होती. त्यासाठी काय करता येईल? यासाठी मी अनेकांना भेटत होतो. लंडनला जाऊन रेकॉर्डिंग करायचं तर आर्थिक पाठबळही खूप लागेल, पण आपण प्रयत्न करू असं दादांनी म्हटल्यामुळे माझी उमेद वाढली.
 

sangh-prarthana 
 
माझे मित्र असलेल्या पत्रकार सुधीर जोगळेकरांनी मला एक वेगळीच गोष्ट सुचवली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेसोबत हिंदू स्वयंसेवक संघाची प्रार्थनाही करण्याबद्दल. हिंदू स्वयंसेवक संघ हा भारताबाहेरचा स्वयंसेवक संघ आहे. जसा भारतातला आर.एस.एस, तसा भारताबाहेरचा एच.एस.एस. भारतीय मूल्यांची ओळख बाहेरच्या देशात वाढणार्‍या मूळ भारतीयांच्या पुढच्या पिढ्यांना व्हावी म्हणून एच.एस.एस.तर्फे अनेक उपक्रम घेतले जातात. त्या त्या देशात स्थानिक पातळीवर शिक्षण, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात हिंदू स्वयंसेवक एच.एस.एस.चे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने काम करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर एच.एस.एस.ची प्रार्थना पण कर, असं मला जोगळकरांनी सुचवलं. त्यासाठी भारताबाहेर राहणारी मंडळी निधी उभा करू शकतील असं त्यांचं म्हणणं होतं.
 
 
एच.एस.एस.ची प्रार्थना वेगळी आहे. कारण ही संघटनाच भारताबाहेर राहात असलेल्या लोकांची असल्यामुळे प्रार्थनेच्या आशयातही फरक आहे. ही गोष्ट तोवर मला माहिती नव्हती. मग त्यांनी मला एच.एस.एस.चे पूर्णवेळ कार्यकर्ते असलेल्या विश्व विभागाचे संयोजक म्हणून जबाबदारी असलेल्या सौमित्र गोखले यांचं नाव सुचवलं. सौमित्रजींना मी संघ आणि एच.एस.एस., अशा दोन्ही प्रार्थना अर्थासह ध्वनिमुद्रित करण्याच्या प्रकल्पाबद्दल सांगितलं. त्यांना ही कल्पना आवडली. प्रकल्पासाठी निधी उभा करायचा आपण प्रयत्न करू, असं सौमित्रजी म्हटले. त्यांनी भारताबाहेर राहणार्‍या अनेक जणांशी माझा परिचय करून दिला. एच.एस.एस.ची प्रार्थनेसाठी परदेशातल्या अनेक स्वयंसेवकांनी निधी उभा केला, त्यातून पूर्णत्वाला गेली.
 
 
प्रार्थनेवर सांगीतिक दृष्टीने काम करायचं असेल तर ती आधी स्पष्ट व बिनचूक उच्चारणासहीत कशी असावी? यासाठी दादा गोखलेच तुम्हाला मदत करतील, असं धबडगावांनी सांगितलं असल्यामुळे मी दादांना स्टुडिओत येऊन प्रार्थना गायची विनंती केली आणि ते आले देखील. दादांनी त्यांच्या दमदार आणि सुरेल आवाजात मूळ चाल योग्य उच्चारणासह ऐकवली. त्यामुळे प्रार्थनेचे प्रमाणसिद्ध असे रूप ध्वनिमुद्रित झाले. त्यावरून सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजात ती नंतर ध्वनिमुद्रित होणार होती.
 
 
दादांनी प्रार्थनेच्या अर्थाच्या दृष्टीनेही मला मार्गदर्शन केलं. त्यानुसार मी तीन भागांत ती विभागली. प्रार्थनेच्या पहिल्या आठ ओळीनंतर पुढच्या ओळींमध्ये गाण्याची म्हणजे शब्दांची लय न वाढवता मागच्या सुरावटींची लय वाढवली आणि त्यानंतरच्या शेवटच्या आठ ओळींमागच्या वादनाची लय अजून वाढवली तर ती प्रार्थना चढत जाईल, त्यात एक जोश निर्माण होईल जो प्रार्थनेच्या शेवटी शक्तिरसपूर्ण भाव उत्पन्न करेल असं मला वाटलं. त्याप्रमाणे वाद्यांच्या सुरावटींची योजना करावी असं माझ्या मनात आलं.
 
 
माझ्या डोक्यात प्रार्थनेच्या सांगीतिक रूपाची योजना आकार घेत होती. पाश्चात्त्य वाद्यमेळासह प्रार्थनेला नवा साज द्यायचा असल्याने ऑर्केस्ट्रातल्या प्रत्येक वाद्यासाठीचा स्कोअर स्वतंत्र लिहिणं आवश्यक होतं. कमलेश भडकमकर या माझ्या निष्णात संगीत संयोजक मित्राचा प्रवेश या प्रकल्पामध्ये इथून झाला. फिलहार्मोनिक स्कोअर लिहिणं हे फार कठीण असतं. त्याला पाश्चात्त्य संगीताचा अभ्यास हवा. पाश्चात्त्य वाद्यांचं ज्ञान हवं. कमलेशला याची माहिती आधीपासून होती. कमलेशची सुरांची समज, पाश्चात्त्य संगीताचा अभ्यास आणि शंभर टक्के प्रामाणिक, चोख काम यामुळे प्रार्थनेच्या संगीत संयोजनाची बाजू कमलेश सांभाळणार हे नक्की झालं. तयार झालेला स्कोअर त्या विशिष्ट लिपीत लिहिणे हे कामही तेवढंच महत्त्वाचं असतं. व्हायोलिनवादक नेव्हिल फ्रँको यांनी हा स्कोअर लिहून काढायचं काम केलं.
 

sangh-prarthana 
 
कमलेशने तयार केलेल्या संयोजनात दादांच्या आवाजातील प्रार्थनेचा आराखडा मी मोहनजींना धडधडत्या अतःकरणाने ऐकवला. झालेल्या कामाचं ‘सांगीतिक स्वरूप आणि अर्थासह उच्चारण’ या दोन्ही मुद्द्यांवर मला संघाकडून परवानगी हवी होती आणि त्याबाबतीत मोहनजींचा शब्द अंतिम होता. मोहनजींनी आराखडा ऐकून, चांगलं वाटतंय आणि लंडनला जाऊन रेकॉर्ड करून या, अशी संमती दिल्यावर मला खूपच हुरूप आला. पण प्रार्थनेसाठी लागणार्‍या निधीचं आर्थिक गणित अजून सुटलं नव्हतं.
 
 
त्याच दरम्यान पुण्यातल्या दोन उत्साही तरुणांशी माझा परिचय झाला, ते म्हणजे साहिल देव आणि ऋग्वेद देशपांडे. ऋग्वेद देशपांडे जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत आणि साहिल देव सी.पी.सी. नालिटिक्सचे सह-संस्थापक आहेत. या दोघांना संघप्रार्थनेची कल्पना अत्यंत आवडली आणि या माध्यमातून आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि उद्योजक इंद्रनील चितळे यांनी या प्रकल्पाचे निर्माते म्हणून जबाबदारी स्वीकारली.
 
 
अ‍ॅबी रोड स्टुडिओची आणि आर.पी.ओ.च्या वादकांची तारीख बुक करणे हे काम किमान सहा महिने आधी करावं लागणार होतं. किती आणि कोणत्या वाद्यसंख्येचा ऑर्केस्ट्रा हवा, तो आमच्या तारखांना उपलब्ध आहे की नाही? हे सगळं ठरवण्यात काही महिने गेले.
 
 
 
एच.एस.एस.ची प्रार्थना रेकॉर्ड करण्यासाठी एक आव्हान होतं. ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ची चाल तालात होती. एच.एस.एस.ची ‘सर्व मंगल मांगल्यां’ ही प्रार्थना श्लोकासारखी होते. त्यामुळे त्याला तालात बांधायची आवश्यकता होती, तरच त्याला गीताचं स्वरूप आलं असतं. दोन्ही प्रार्थनांच्या बाबतीत लय वाढवून चालणार नव्हती कारण ओळीच्याच लयीत पुढे एकेका ओळीचा अर्थही येणार होता. हरिशजींनी दोन्ही प्रार्थनांचा अर्थ हिंदीमध्ये लिहिला. ठरावीक वेळात प्रार्थनेचा आशय चपखल शब्दात लिहिण्याचं आव्हान हरिशजींनी समर्थपणे पेललं. दोन्ही प्रार्थनांच्या प्रत्येक ओळीनंतर त्या ओळीचा अर्थ आला तर श्रोत्यांना ते ऐकणं आणि अर्थ लावणं सोयीचं जाईल असं मला वाटलं आणि त्याप्रमाणेच अर्थासहित दोन्ही प्रार्थना करण्याचं ठरलं.
 
 
ध्वनिमुद्रणाची तारीख ठरविण्याआधी कमलेशने लिहिलेलं पाश्चात्य नोटेशन लंडनला पाठवलं. वाद्यवृंदाचा कंडक्टर जेम्स मॉर्गन याने ते तपासून नक्की केलं. तिथे वाजणार्‍या ऑर्केस्ट्रातील प्रत्येक वाद्याचं स्वतंत्रपणे लिहिलेलं नोटेशन कंडक्टर तपासतो. जेम्स मॉर्गनने हिरवा कंदील दाखविल्यावर 15 जून 2024 ही ध्वनिमुद्रणाची तारीख ठरविण्यात आली.
 
 
15 जूनला अ‍ॅबी रोड स्टुडिओ, लंडन इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू स्वयंसेवक संघाच्या दोन्ही प्रार्थनांच्या सुरावटी रॉयल फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या 57 वादकांनी वाजवल्या. ध्वनिमुद्रिक होता गॉर्डन डेव्हिडसन. हे ध्वनिमुद्रित ट्रॅक्स घेऊन मी मुंबईत आलो आणि त्यावर शंकर महादेवनचा आवाज शंकरच्याच लंबोदर स्टुडिओत ध्वनिमुद्रित केला. शंकरने प्रत्येक उच्चार सुस्पष्टपणे होईल यासाठी कष्ट घेतले. कोरसचं ध्वनिमुद्रण आणि ध्वनिमिश्रण मुंबईच्या प्रसिद्ध यशराज स्टुडिओत विजय दयाळ आणि सागर साठे या निष्णात ध्वनिमुद्रकांनी पूर्ण केलं. दादा गोखले आणि सौमित्रजी यांची देखरेख होतीच.
 
 
रा. स्व. संघाची प्रार्थना हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू, गुजराथी, कन्नड, मल्याळम, तमिळ या आठ भाषांत, आणि एच.एस.एस.ची प्रार्थना इंग्रजी, हिंदी, तमिळ, मल्याळम, फ्रेंच, डच, स्पॅनिश, जर्मन आणि बर्मीज या नऊ भाषांतील अर्थासह ध्वनिमुद्रित करायचं ठरलं.
 
 
संघप्रार्थनेचा इंग्रजी अर्थ हरीशजींनी लिहिलेल्या हिंदी अर्थावरून सई परांजपे यांनी शब्दबद्ध केला आणि मराठीत विवेक आपटे यांनी. हिंदी, मराठी, इंग्रजी वगळता अन्य भाषांत प्रार्थनेचं भाषांतर करण्यासाठी त्या त्या राज्यातील निपुण लोक सुमंतजींनी शोधले आणि माझं काम सुकर झालं. तेलुगू भाषेतल्या अर्थाच्या ओळी तेलुगूतले प्रसिद्ध अभिनेते साई कुमार यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या. हरिशजींच्या आवाजात हिंदी ओळी, सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजात मराठी आणि मनोज जोशी यांच्या आवाजात गुजराथी भाषेतला अर्थ ध्वनिमुद्रित झाला. एच.एस.एस.च्या इंग्रजी, फ्रेंच, डच आणि जर्मन भाषांतील अर्थाचे रेकॉर्डिंग मी त्या त्या देशात जाऊन केले, त्यासाठी त्या त्या देशातले स्वयंसेवक राम वैद्य (विश्व विभाग सह-संयोजक) यांच्या माध्यमातून लाभले. प्रार्थनेसोबतच त्याची चित्रफीत कशी असावी यावर देखील विचार सुरू होता. पुण्यातल्या अक्षय गाताडे याने संघप्रार्थनेची चित्रफीत माझ्या निगराणी खाली संकलित केली. एच.एस.एस.ची चित्रफीत हैदराबादच्या मोहन कुमार यांनी एआय तंत्रज्ञान वापरून बनवली.
 
27 सप्टेंबर 1925 हा संघ स्थापनेचा दिवस. संघस्थापनेला गेल्या वर्षी शंभर वर्षं पूर्ण झाली. म्हणून या प्रार्थनेचं लोकार्पण याच दिवसाचा मुहूर्त गाठून करायचं आम्ही ठरवलं. डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते संघाच्या ध्वनिचित्रफितीचं लोकार्पण नागपूरला रेशीमबागेत पार पडलं, तेव्हा गेल्या अडीच-तीन वर्षातील अनेकांच्या अविरत परिश्रमाचं चीज झाल्यासारखं वाटलं. हरिशजींनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याला मी न्याय देऊ शकलो असं मला वाटलं. डॉ. मोहनजींच्या हस्ते प्रार्थनेचं लोकार्पण व्हावं हा माझ्या आयुष्यातला भाग्याचा क्षण आहे, असं मी समजतो. एच.एस.एस.च्या प्रार्थनेचं लोकार्पण 25 डिसेंबर 2025 रोजी हिंदू स्वयंसेवक संघाच्या हैदराबाद येथे झालेल्या विश्व संघ शिबिरात पूजनीय गोविंदगिरी महाराज यांच्या हस्ते झालं. विश्व संघ शिबिरात ऐंशी देशातून आलेले एच.एस.एस.चे जवळजवळ दोन हजार लहानमोठे कार्यकर्ते मला भेटले.
 
 
हे दोन्ही प्रकल्प करत असताना संघाच्या कार्यपद्धतीचा मला जवळून आणि नव्याने परिचय झाला. अनेक संघप्रचारक तर मला भेटलेच, पण संघाशी जोडले गेलेले अनेक नवीन लोकही भेटले. गेली शंभर वर्षं जी संघटना अनेकांच्या जगण्याला आकार देते आहे, अर्थ देते आहे, स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाशी, देशाशी असलेलं नातं दृढ करते आहे त्या संघटनेशी जोडलं गेल्याचा आनंद मला सर्वांत जास्त आहे.
 
- राहुल रानडे (नामवंत संगीतकार)
rahul@rahulranade.com
शब्दांकन : अदिती जोगळेकर- हर्डीकर
adjos28@gmail.com