क्रीडा विश्लेषक हा मन आणि कामगिरी यांना जोडणारा वैज्ञानिक दुवा आहे. हे आपल्याला मागील लेखामधून लक्षात आलेच असेल. खेळामध्ये मनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर मात्र एका मानसशास्त्रज्ञाचीच गरज भासते.
क्रीडा विश्लेषक आणि क्रीडा मानसशास्त्रज्ञ या दोघांचेही अंतिम उद्दिष्ट खेळाडूंची कामगिरी उंचावणे हेच असते, मात्र त्यांचे कामाचे क्षेत्र वेगवेगळे आहे. हे दोघे मिळून खेळाडूंच्या शारीरिक आणि मानसिक तयारीचा समतोल साधतात.
उदा. - एखाद्या बास्केटबॉल खेळाडूची कामगिरी घरच्या मैदानावर चांगली, पण बाहेरच्या मैदानावर घसरत असल्याचे क्रीडा विश्लेषक ओळखतो.
तेव्हा क्रीडा मानसशास्त्रज्ञ त्या खेळाडूवर स्पर्धात्मक तणाव, आत्मविश्वास आणि लक्ष केंद्रित करण्याच्या तंत्रांवर काम करतो. परिणामस्वरूप - खेळाडू सर्व परिस्थितीत सातत्यपूर्ण कामगिरी करतो.
प्रत्येक खेळाडूच्या यशामध्ये क्रीडा मानसशास्त्रज्ञाचा सहभाग असतो.
खेळ म्हणजे केवळ ताकद, वेग किंवा कौशल्याचा खेळ नाही. आधुनिक खेळजगतात खेळाडूचे मन हेच त्याचे सर्वांत प्रभावी शस्त्र मानले जाते. अनेक वेळा दोन खेळाडू शारीरिकदृष्ट्या समान पातळीवर असतात, पण मैदानावर विजय मिळवतो तो मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम खेळाडू.
दबावातही सर्वोत्तम कामगिरी शक्य आहे का ?
अंतिम फेरीचा सामना, हजारो प्रेक्षक, थेट प्रक्षेपण, देशाच्या अपेक्षा - अशा वेळी खेळाडूच्या मनावर प्रचंड दबाव असतो.
उदा: एक युवा क्रिकेटपटू रणजी अंतिम सामन्यात पदार्पण करतो. सरावात उत्तम फलंदाजी करणारा हा खेळाडू सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद होतो. कारण कौशल्याचा अभाव नसतो, तर नर्व्हसनेस आणि अपेक्षांचा ताण.
याच ठिकाणी क्रीडा मानसशास्त्राची खरी गरज लक्षात येते. क्रीडा मानसशास्त्रज्ञ खेळाडूला श्वसन तंत्र, दृश्यात्मक सराव (Visualization), दबाव हाताळण्याचे मानसिक तंत्र, यांच्या माध्यमातून दडपणाला संधीमध्ये बदलायला मदत करतात. खेळात एक चांगला सामना खेळणे सोपे असते, पण सातत्याने चांगली कामगिरी करणे अवघड असते.
उदा: एका बॅडमिंटन खेळाडूची कामगिरी राष्ट्रीय स्पर्धेत अप्रतिम होती, पण स्थानिक स्पर्धांमध्ये ती ढासळत होती. याचे कारण म्हणजे, स्वतःबद्दलची मानसिक धारणा आणि लक्ष केंद्रित ठेवण्यात येणारी अडचण.
क्रीडा मानसशास्त्रज्ञाच्या मदतीने खेळाडूला स्वतःशी सकारात्मक संवाद साधणे, प्रक्रियेवर लक्ष ठेवणे (Process over Result) आणि चुकांनंतर लगेच सावरून खेळण्यास मदत झाली.
संघ खेळातील मानसिक समन्वय
संघ खेळात केवळ 11 किंवा 7 खेळाडू नसतात, तर 11 वेगवेगळी मने असतात.
उदा: फुटबॉल संघात दोन स्टार खेळाडूंमध्ये मतभेद असतात. त्यामुळे संघाची कामगिरी ढासळते. अशावेळी क्रीडा मानसशास्त्र मुख्यतः संवाद कौशल्य सुधारवण्यास, अहंकार व्यवस्थापन बसवण्यात, संघभावना आणि विश्वास वाढवण्यात मदत करते. परिणाम स्वरूप संघ म्हणून जिंकण्याची मानसिकता तयार होते.
दुखापत - शरीरापेक्षा मनाला जास्त लागणारी जखम
खेळाडूला झालेली दुखापत ही केवळ शारीरिक नसते; ती मानसिकदृष्ट्याही मोठा धक्का असते. उदा: एक अॅथलीट ACL दुखापतीनंतर मैदानात परततो, पण पुन्हा वेगाने धावायला घाबरतो. शरीर तयार असते, पण मन अजूनही भीतीत अडकलेले असते.
अशा वेळी क्रीडा मानसशास्त्रज्ञ त्या खेळाडूला भीतीवर मात करण्यास, आत्मविश्वास पुनर्स्थापित करायला आणि मी पुन्हा सक्षम आहे, ही भावना निर्माण करायला मदत करतात.
अपयश, टीका आणि सोशल मीडियाचा ताण
आजचा खेळाडू मैदानाबाहेरही खेळत असतो, किंबहुना सामना करत असतो - सोशल मीडिया, तुलना, ट्रोलिंग, अपेक्षा..
उदा: एका युवा टेनिस खेळाडूला सलग पराभवानंतर सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले. कालांतराने तो स्वतःवरच, त्याच्या क्षमतेवरच शंका घेऊ लागला.
क्रीडा मानसशास्त्र खेळाडूला टीकेपासून मानसिक अंतर कसे ठेवावे, आत्ममूल्य कामगिरीशी कसे जोडून न घ्यावे आणि आपले मानसिक स्थैर्य कसे टिकवावे ह्या साठी उपयुक्त ठरते.
लहान वयात घडलेले संस्कार हे मनावर कायम स्वरूपी कोरले जातात आणि तेच मोठ्या यशाची पायाभरणी ठरते.
बाल आणि किशोरवयीन खेळाडूंच्या मनाला जपणे, हाताळणे हे खूप महत्त्वाचे आहे ज्या वयात त्यांना खेळाचा आणि जीवनाचा आनंद घेणे अपेक्षित असते त्या वयात त्यांना स्पर्धेचा ताण, पालकांच्या अपेक्षा, अपयशाची भीती ह्या गोष्टींना सतत सामोरे जावे लागते.
उदा: एका 12 वर्षांच्या क्रिकेटपटूला ‘मॅच जिंकलीच पाहिजे’ या अपेक्षेनेनंतर खेळाची मजाच राहिली नाही.
क्रीडा मानसशास्त्र खेळाची आनंददायी बाजू जपण्यास मदत करते, तसेच आत्मविश्वास वाढवते आणि दीर्घकालीन क्रीडा करिअरसाठी मानसिक पाया मजबूत करते.
आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की, एका क्रीडा मानसशास्त्रज्ञाचे एखाद्या खेळाडूच्या जडणघडणीमध्ये यशामध्ये किती महत्त्वाचे स्थान आहे. पण तुमच्या पाल्याला जर क्रीडा मानसशास्त्र शिकायचे असेल तर त्यांना काही मूलभूत कौशल्ये आणि क्षमता त्यांच्यात असणे आणि विकसित करणे आवश्यक आहे.
क्रीडा मानसशास्त्र म्हणजे केवळ पुस्तकातील ज्ञान नाही. हे क्षेत्र मानवी मन, खेळ आणि कामगिरी यांचा सुंदर संगम आहे.
* मानवस्वभाव समजून घेण्याची जिज्ञासा - क्रीडा मानसशास्त्रज्ञाचे मुख्य काम म्हणजे खेळाडूच्या मनात काय चालले आहे ते समजून घेणे.
* ऐकण्याची कला (Active Listening) - क्रीडा मानसशास्त्रज्ञ हा आधी श्रोता असतो, नंतर मार्गदर्शक.
* मजबूत संवाद कौशल्ये - योग्य शब्द, योग्य वेळ आणि योग्य पद्धत - हे तिन्ही घटक क्रीडा मानसशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे असतात.
* स्वतःची भावनिक स्थिरता (Emotional Regulation) - ध्यान, स्व-अभ्यास, सुपरव्हिजन आणि आत्मपरीक्षणातून हे कौशल्य विकसित करण्यास मदत होते.
* क्रीडा आणि खेळाची मूलभूत समज - खेळाची मागणी, स्पर्धेचा ताण, सरावाचे स्वरूप, हे समजल्याशिवाय मानसशास्त्रीय हस्तक्षेप प्रभावी ठरत नाही.
* निरीक्षण क्षमता (Observation Skills) - कधी कधी खेळाडू जे बोलत नाही, ते त्याची देहबोली सांगते.
* नैतिकता आणि गोपनीयता - विश्वास, गोपनीयता आणि व्यावसायिक मर्यादा पाळणे अत्यंत आवश्यक.
आजची वास्तव स्थिती पहिली तर आंतरराष्ट्रीय व व्यावसायिक संघांमध्ये क्रीडा मानसशास्त्रज्ञ हे लक्झरी नाहीत, तर आवश्यक घटक झाले आहेत.
क्रीडा मानसशास्त्रज्ञ म्हणून करिअर करायचे असेल तर सर्वांत प्रथम 10+2 मध्ये मानसशास्त्र (असल्यास उत्तम), त्यानंतर BA / BSc in Psychology घेऊन योग्य, भक्कम शैक्षणिक पायाभरणी करणे आवश्यक आहे.
पदव्युत्तर शिक्षण हे MA/ MSc in Psycholog ह्या विषयांमध्ये करू शकता. त्यानंतर क्रीडा मानसशास्त्रात विशेष प्रशिक्षण घेऊ शकता. भारतामध्ये मुंबई, बंगलोर, चेन्नई, ग्वालियर, पटियाला, जयपूर अशा शहरांमध्ये विविध संस्थांमध्ये हे प्रशिक्षण उपलब्ध आहे.
शिक्षणासोबतच प्रात्यक्षिक अनुभव ही, तितकाच महत्त्वाचा आहे त्यामुळे क्रीडा अकादमी, शाळा/महाविद्यालये, व्यावसायिक संघ, पुनर्वसन केंद्रे अशा ठिकाणी जमल्यास इंटर्नशिप करावी.
क्रीडा मानसशास्त्र शिकण्यासाठी फक्त डिग्री पुरेशी नाही. या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी गरज असते ती,
* समजून घेण्याची,
* विश्वास निर्माण करण्याची कला असण्याची,
* खेळ आणि मन यांचा समतोल साधण्याची दृष्टी असण्याची.
आपण पहिले की, क्रीडा मानसशास्त्र खेळाडूच्या मनावर आणि त्याची कामगिरी अधिकाधिक उत्तम कशी बनत जाईल, ह्यावर काम करते. पण ही कामगिरी प्रत्येक सामन्यांमध्ये योग्य वेळी टिपणे, त्याची नोंद करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.
एखाद्या खेळाडूचे 10,000 रन्स झाले हे आपल्याला कसे कळले, कारण हा त्यांचा स्कोर कुणीतरी सातत्याने लक्षपूर्वक आणि एकाग्रतेने प्रत्येक क्रिकेटच्या सामन्यांमध्ये टिपत होते, लिहून काढत होते.
ही महत्त्वाची कामगिरी जे बजावतात ते म्हणजे क्रिकेट Scorer (गुणसंख्यालेखक) किंवा Statistician (सांख्यिकी तज्ज्ञ). पुढील लेखामध्ये आपण ह्या बद्दल जाणून घेऊ.
ज्यांना माणसे समजून घ्यायची आहेत आणि खेळाडू घडवायचे आहेत, त्यांच्यासाठी क्रीडा मानसशास्त्र हे एक अर्थपूर्ण करिअर आहे.
9820382117
- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.