वाळवंटातल्या ससाण्याची झडप

विवेक मराठी    13-Feb-2026
Total Views |
 
Lal Bahadur Shastri
भारताला चीनकडून स्वीकारावा लागलेला पराभव, त्याचा भारतीय जनमानसावर झालेला परिणाम, विशेषत: पंडित नेहरूंचा त्या पराभवाच्या धक्क्याने झालेला मृत्यू आणि या नेहरूंच्या तुलनेन सामान्य भासणार्‍या नेत्याचे पंतप्रधानपदी येणे, या सगळ्यांकडे पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष फील्ड मार्शल मोहम्मद अयुबखान आणि त्याचा भारतद्वेष्टा परराष्ट्रमंत्री झुल्फिकार अली भुत्तो यांचे बारकाईने लक्ष होते. 1947-48 च्या युद्धात हातांतून निसटलेले काश्मीर आता हिसकावून घ्यायचेच, असे त्यांनी ठरवले.
दिनांक 9 जून 1964 या दिवशी लालबहादूर शास्त्री यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यांच्या मंत्रीमंडळाचाही शपथविधी त्याच दिवशी झाला. संरक्षणमंत्री पद यशवंतराव चव्हाण यांच्याकडेच ठेवण्यात आले.
 
 
पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अयुबखान यांनी पाकिस्तान आकाशवाणीवरून भाषण करून शास्त्रींच्या पंतप्रधान पदाचे औपचारिक स्वागत केले. त्यांच्या भाषणाचा एकंदर सूर हा भारताशी जुळवून घेण्याचा होता. शास्त्रींनीही 11 जून 1964 रोजी भारतीय आकाशवाणीवरून राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पाकिस्तानच्या मुद्याचा उल्लेख करीत, अयुब यांच्या भाषणातील सामंजस्य आणि शहाणपणा यांची प्रशंसा केली.
 
 
यानंतर ऑक्टोबर 1964 मध्ये शास्त्री कैरो येथे भरलेल्या अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेत गेले. तिथून दिल्लीला परतताना वाटेत कराचीला उतरून अयुब यांची भेट घ्यायला आपल्याला आवडेल, असे शास्त्रींनी सुचवले. अयुब यांनी ते मान्य केले. त्यानुसार 12 ऑक्टोबर 1964 या दिवशी कैरोहून परत येताना शास्त्रीजी कराचीत उतरले. अयुब आणि शास्त्रीजी पाच तास एकत्र होते. दोघेही एकमेकांना जोखून पहात होते. शास्त्रीजींनी अयुबना सांगितलेल्या मुद्यांमधला मुख्य भाग म्हणजे - 1) पाकिस्तानची भरभराट व्हावी अशी भारताची मनापासून इच्छा आहे, 2) पाकिस्तानच्या इंचभर भूमीवर सुद्धा ताबा मिळवण्याची भारताची इच्छा नाही, 3) मात्र काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून यात पाकिस्तानचा हस्तक्षेप भारत सहन करणार नाही.
 
 
आता इथे एका गोष्टीचा उलगडा करायला हवा. 1947 साली पाकिस्तान निर्माण झाले, तेव्हा त्याची राजधानी कराची होती. 1958 साली जनरल अयुबखानने लष्करी बंड पुकारून सत्ता हडपल्यावर 1959 साली राजधानी रावळपिंडीत हलवण्यात आली. कारण रावळपिंडीमध्ये लष्कराची मोठी छावणी ब्रिटिशकाळापासून होती. 1959 मे 1967 या काळात जुन्या रावळपिंडी शहराबाहेर एक पूर्णपणे नवे शहर उभे करून त्याला इस्लामाबाद असे नाव देण्यात आले. 14 ऑगस्ट 1967 या दिवसापासून इस्लामाबाद ही पाकिस्तानची अधिकृत राजधानी झाली.
 
 
परंतु 1964 मध्ये जेव्हा शास्त्रीजींची वरील पाकिस्तान भेट झाली तेव्हा पाकिस्तानचा कारभार कराची आणि रावळपिंडी दोन्ही ठिकाणांहून चालत असे. परराष्ट्रमंत्री भुत्तो आणि परराष्ट्र सचिव अझिज अहमद यांनी कराचीमध्ये एक ’काश्मीर विभाग’ स्थापन केला होता. परराष्ट्र खाते, संरक्षण खाते आणि सेना यांच्यातील उच्चपदस्थ अधिकार्‍यांच्या या ’काश्मीर विभागात’ बैठकी होत असत. या बैठकीमधल्या चर्चांचा लेखी उल्लेख कुठेही केला जात नसे. खुद्द राष्ट्राध्यक्ष अयुबखान यांना या चर्चांचा गोषवारा तोंडी सांगितला जात असे.
 
 
शास्त्रीजींच्या कराची भेटीचा आणि त्यातल्या बोलण्याचा निष्कर्ष ’काश्मीर विभागाने’ असा काढला की, भारताचे नवे पंतप्रधान काश्मीरबद्दल कोणतेही लवचीक धोरण स्वीकारण्यास तयार नाहीत. तेव्हा आता पाकिस्तानने काहीतरी कारवाई करण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे.
 
 
तसेच, भारताने सोव्हियत रशियाकडून लष्करी सहाय्य मिळवले आहेच, पण खुद्द अमेरिकन संरक्षणमंत्री रॉबर्ट मॅक्नामारा आणि परराष्ट्रमंत्री डीन रस्क यांना देखील भारताने अनुकूल करून घेऊन किमान 5 ते 10 कोटी डॉलर्सचे लष्करी आर्थिक सहाय्य मिळवले आहे. भारत झपाट्याने आपल्या सेनादलांचे अद्ययावतीकरण करत आहे. लवकरच तो आपल्या (म्हणजे पाकच्या) पुढे जाईल. तेव्हा आताच योग्य वेळ आहे. झटपट लष्करी कारवाई करा आणि काश्मीर मिळवा. अन्यथा नंतर ते कधीच मिळणार नाही.
 
 
अशा तर्‍हेनेे ऑक्टोबर 1964 मधल्या अयुब-शास्त्री भेटीनंतर डिसेंबर 1964 पर्यंत भुत्तो आणि अझिज अहमद यांच्या काश्मीर विभागाने भारतावरील आक्रमणाचा एक सर्वसाधारण आराखडा चार टप्प्यात बनवला. पहिला टप्पा - पाक लष्कराने काश्मीर किंवा पंजाब सोडून अन्यत्र एक चाचपणी हल्ला चढवून भारतीय लष्कराच्या तयारीचा अंदाज घेणे, दुसरा टप्पा - साध्या वेषातले गनिमी सैनिकी काश्मीरमध्ये घुसवून त्यांनी जोरदार घातपाती हल्ले चढविणे. हे काश्मीरी जनतेने पुकारलेले बंड आहे, असा प्रचार पाक प्रसारमाध्यमांनी करायचा. तिसरा टप्पा- पंजाबकडून काश्मीरकडे जाणारा एकमेव रस्ता छांब विभागातील अखनूरमधून जातो. लष्करी आक्रमण करून ते अखनूर जिंकायचे आणि काश्मीरचा उर्वरित भारताशी असलेला जमिनी संपर्कच तोडायचा. चौथा टप्पा - भारत-पाक सीमेपासून 16 मैलांवर असलेले अमृतसर - हे प्रख्यात धार्मिक आणि व्यापारी शहर पहिल्या सपाट्यातच जिंकून घ्यायचे. नंतरच्या वाटाघाटीत संपूर्ण काश्मीर पदरात पाडून घेतल्यावरच अमृतसर परत द्यायचे.
 
 
ऑपरेशन डेझर्ट हॉक
 
जानेवारी 1965 मध्ये पाक लष्कराने पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीला सुरुवात केलीसुद्धा. पाकिस्तानच्या सिंध प्रांताला लागून भारताच्या गुजरात प्रांतातील कच्छचे रण आहे. मुळात ईरीण असा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ वाळवंटी भागाला, वालुकामय प्रदेश. ब्रिटिश इंडियामध्ये कच्छ हे एक संस्थान होते. त्याच्या या वाळवंटी भागाला कच्छचे रण असे म्हटले जात असे. इथे रण म्हणजे रणांगण नव्हे, तर तो ईरीण या संस्कृत शब्दाचा कच्छी बोलीभाषेतला अपभ्रंश शब्द आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर सिंध प्रांत पाकिस्तानात गेला. तर कच्छ संस्थान भारतान विलीन झाले. पुढे कच्छ भाग गुजरात या भाषिक प्रांताचा एक भाग बनला, म्हणजेच तो विवादित प्रदेश नसून निखालसपणे भारताचाच भूभाग होता. पण पाकिस्तानला खुसपटच काढायचे होते. त्याने कच्छच्या रणाचा 3500 चौरस मैलाचा प्रदेश हा आपलाच आहे, अशी बोंब ठोकली.
 
 
9 एप्रिल 1965 या दिवशी कच्छमधील सरदार या ठाण्यावर पाकच्या एका ब्रिगेडने 25 पौंडी तोफा आणि उखळी तोफा यांच्या सहाय्याने आक्रमण केले. लष्करी संकेतानुसार प्रत्येक मोहिमेला एक नाव दिले जाते. याप्रमाणे पाकच्या या मोहिमेचे नाव होतेे ’ऑपरेशन डेझर्ट हॉक‘. वाळवंटातल्या तीक्ष्ण दृष्टीच्या, चपळ शिकारी ससाण्याप्रमाणे आम्ही भारतावर हल्ला चढवून कच्छचे हे वाळवंट त्यांच्याकडून हिसकावून घेणार, असे यातून पाकला सुचवायचे होते. पाकच्या या हल्ल्याला तोंड द्यायला सरदार ठाण्यावर फक्त भारतीय पोलीस होते. सैन्याला तोंड द्यायला पोलिसांची शस्त्रे कशी पुरेशी पडणार? तरीही या बहाद्दर पोलिसांनी पाकचा पहिला हल्ला थोपवला.
 
 
मग पाकने अधिक जोमाने दुसरा हल्ला चढवला केला. तेव्हा मात्र भारतीय पोलिसांनी विगोकोट या ठाण्याकडे माघार घेतली. दिवशी भारतीय लष्कर विगोकोटमध्ये दाखल झाले. त्यांनी सूत्रे आपल्या हाती घेतली आणि प्रतिहल्ला चढवून सरदार ठाणे पुन्हा ताब्यात घेतले. 24 एप्रिल 1965ला पाकच्या एका डिव्हिजनने कच्छमधल्या सरदार, बिन्यार बेत, विगोकोट आणि पॉईंट 84 या चार भारतीय ठाण्यांवर एकाच वेळी हल्ला चढवला. यावेळी प्रथम त्यांनी पॅटन रणगाडे आणि 100 पौंडी तोफांचा वापर केला. 30 एप्रिलपर्यंत जोरदार लढाई चालू राहिली. अखेर ’पॉईंट 84’ हे ठाणे भारताला गमवावे लागले, अन्य तीन ठाणी मात्र शत्रूला मागे रेटून भारताने आपल्या हाती राखली.
 
 
पॅटन हे रणगाडे अमेरिकेकडून पाकिस्तानला मिळाले होते. तत्कालीन जगात पॅटन हा रणगाडा सर्वोत्तम, अत्याधुनिक असून कोणतेही अस्त्र-शस्त्र याचा भेद करू शकत नाही. तो अभेद्य-इनव्हिन्सिबल आहे, असा जोरदार प्रचार अमेरिकन युद्धसाहित्य उत्पादकांनी केलेला होता.
 
 
त्याचप्रमाणे 100 पौंडी तोफा म्हणजे सुमारे साडेपंचेचाळीस किलो वजनाचा एक तोफगोळा या हिशेबाने लक्ष्यावर अतिशय जलद मारा करणारी तोफ, पंचेचाळीस किलो वजनाचा तप्त लोखंडाचा गोळा जिथे जाऊन आदळतो तिथल्या सगळ्या वस्तूंचा किंवा माणसांचा तो अर्थातच चक्काचूर करतो.
 
 
ही सगळी आग पिऊन भारतीय सैन्याने पाकला मागे रेटले. पॉईंट 84 हे एक ठाणे मात्र गमवावे लागले. खरे तर हे अगदीच किरकोळ यश होते. पण पाकिस्तानी सेनापती आणि भुत्तो या यशाने भलतेच उत्तेजित झाले.
 
 
या संपूर्ण काळात पंतप्रधान शास्त्री आणि भारतीय सेनाप्रमुख जनरल जयंतनाथ चौधरी सतत एकमेकांच्या संपर्कात होते. कच्छचा भूभाग हा मोठ्या लष्करी लढाईसाठी अनुकूल नाही. तेव्हा इथे पाकला नुसते रोखून धरणेच योग्य राहील. प्रत्याक्रमण करण्याची गरज नाही, असे चौधरींनी शास्त्रींना सांगितले. शास्त्रींनी ते मान्य केले. पण पाकिस्तानला हा स्वत:च्या रणनीतीचा मोठाच विजय वाटला. त्यामुळे त्याने आपल्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला. त्याचे नाव होते ’ऑपरेशन जिब्राल्टर‘.