डॉ. सुवर्णा रावळ यांनी श्री विश्वकर्मा गुरूकुलम् - कौशल्य आणि औद्योगिक प्रशिक्षण हा प्रकल्प नुकताच सुरू केला आहे. याचे एका वाक्यात वर्णन करायचे म्हटले तर, ‘स्वयंसेवक वृत्तीने समर्पित भावाने सुरू केलेला प्रकल्प’ असे करावे लागेल. स्वयंसेवकवृत्ती म्हणजे समाजाची जी समस्या जाणवली आणि अनुभूतीला आली, तिच्या निराकरणासाठी स्वतःहून प्रयत्न करणे आणि असे निराकरण करताना तन, मन आणि धनपूर्वक समर्पित भावनेने काम करणे.
श्री विश्वकर्मा गुरूकुलम् - कौशल्य आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजनाचा कार्यक्रम 4 फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील झडपोली येथे झाला. डॉ. सुवर्णा रावळ यांनी आदेश दिला की, भूमिपूजन तुमच्या हस्तेच करायचे आहे आणि सकाळी 10 वाजता कार्यक्रम आहे. इतरांच्या दृष्टीने डॉ. सुवर्णा रावळ यांना बहुमानार्थी संबोधनाचा विषय असला तरी माझ्या दृष्टीने ती माझी कन्याच आहे. सामाजिक समरसता मंच आणि भटके-विमुक्त यांच्या कामात तिला ओढण्याचे पाप-पुण्य मीच केले आहे. त्यामुळे कन्येचा आदेश मानण्याशिवाय माझ्याकडे काही पर्याय नव्हता. परंतु लेखात तिचा उल्लेख मी बहुमानार्थीच करणार आहे.
भटके आणि विमुक्त विकास परिषदेचा कामात गुंतल्यानंतर दहा वर्षे त्या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी संभाळली. या दहा वर्षांत यमगरवाडीचा विकास, पालावरच्या शाळा, आणि अनेक जातींच्या जातपंचायतींशी संपर्क, त्यांच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांशी संपर्क आणि संबंध, त्यांची जीवनशैली, त्यांच्या परंपरा, रूढी, विश्वास, अंगभूत कलाकौशल्ये आदी सर्वांचा बारकाईने अभ्यास केला, तो थक्क करणारा आहे.
आणि यातून मग एक कल्पना आली की, भटके-विमुक्त जातीजमातीतील जे कौशल्य आहे, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोेड दिली पाहिजे, आधुनिक तंत्रज्ञान त्यांना शिकविले पाहिजे, ते शिकविण्यासाठी एक स्वतंत्र प्रकल्प उभा केला पाहिजे आणि ते उभारण्याचे काम अन्य कुणाला सांगून होण्यासारखे नसल्यामुळे ते मीच केले पाहिजे, हा संकल्प सुवर्णाताईंच्या मनात निर्माण झाला.
प्रकल्पासाठी जमीन लागते. ती शोधण्याचे काम सुवर्णाताईंनीच केले. अनेक जणांकडे जमीन मागितली, पण कुणी दिली नाही. मग गावात 52 गुंठे जमीन विकत घेतली, स्वतःच्या शिलकीतील सर्व पैसा त्यासाठी वापरला. प्रकल्पाचा परिपूर्ण आराखडा तयार केला. इमारतीचा कृतीआराखडा तयार केला. या सर्वांचे भूमिपूजन 4 फेब्रुवारीला होते. गुरूजींनी मंत्र सांगितला आणि तो समजावूनही सांगितला की, हे धरतीमाते, तुझ्यावर खोदकाम करून हे बांधकाम करावे लागेल. ते लोककल्याणासाठी असल्यामुळे खोदकामाबद्दल तू आम्हाला क्षमा कर. तुझ्या परिसरातील असलेली अनेक झाडे आणि त्यावर असलेले देवदेवता यांचे आशीर्वाद आम्हाला लाभोत.
भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी सुवर्णाताईंनी फार थोड्याच लोकांना बोलावले होते. त्यातील प्रमुख नावे अशी डॉ. पाल- कल्याण विभाग संघचालक, नरेश मारू - भिवंडी जिल्हा संघ चालक, विमल केडिया, शांताराम वांद्रे - अखिल भारतीय ओतारी समाज संघटना अध्यक्ष, किसन वांद्रे, ज्ञानेश्वर डोहाळे - पाषाण शिल्पकार, डॉ. बिपीन शाह, मुकेश पाध्या, नागपूरहून दिलीप चित्रीविकर, तसेच स्थानिक अनेक मान्यवर, संघाचे अनेक कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी, अन्य संस्थाचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच अनेक गावकरी उपस्थित होते.
केंद्र स्थळ : झडपोली, ता. विक्रमगड, जिल्हा पालघर. कार्यालय पत्ता : डॉ. सुवर्णा रावळ, ओम निवास,
सदिच्छा को हौस. सोसायटी, चरणीपाडा, राहणाळ,
भिवंडी, जिल्हा ठाणे. 421305.
मोः- 9225104312
Bank Details
Bank Name : TJSB Sahakari Bank Ltd.
Branch- Bhiwandi
Account Name : Nomadic Tribes Research And Development Foundation
A/C No. 047110100008641
RTGS/ NEFT/IFSC Code: TJSB0000047
भूमिपूजन झाल्यानंतर हे भूमिपूजन कशासाठी, भविष्यात इथे काय उभारायचे आहे, कोणत्या अठरा मौलिक कला आणि निर्मितीचे प्रशिक्षण देणार आहोत, त्याबद्दल सुवर्णाताई म्हणाल्या की, नोमेडिक ट्राईब्ज रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन संचालित श्री. विश्वकर्मा गुरुकुलम् अंतर्गत भटके विमुक्त समाजाची पारंपरिक कौशल्ये जसे पाथरवट, वडार समाजाची पाषाण शिल्पकारी, ओतारी समाजाची धातू कौशल्य, कतारींची लाकूड कला, चित्रकथी, कैकाडी- बुरुड समाजाची बांबू करागिरी, ज्वेलरी डिझानिंग, फॅशन डिझाईन आशी 18 कौशल्ये यात शिकवली जाणार आहेत. लोककलेच्या माध्यमातून लोकसंस्कृतीचे उपासक समाज प्रबोधन, धर्म जागरण करणार्या भटके विमुक्ततील समुदायाचे जीवन दर्शन घडविणारे डिजिटल म्युझियम या प्रकल्पात उभे राहणार आहे.
अखिल भारतीय ओतारी समाज संघटनेचे अध्यक्ष शांताराम वांद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले, विमल केडिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नागपूरचे दिलीप चित्रीविकर यांनी मनोगत व्यक्त केले आणि माझ्याकडे समारोपाचे भाषण करण्याचा विषय होता.
सुवर्णाताईंनी हा जो प्रकल्प सुरू केला आहे, त्याचे एका वाक्यात वर्णन करायचे म्हटले तर, ‘स्वयंसेवक वृत्तीने समर्पित भावाने सुरू केलेला प्रकल्प’ असे करावे लागेल. स्वयंसेवकवृत्ती म्हणजे समाजाची जी समस्या जाणवली आणि अनुभूतीला आली, तिच्या निराकरणासाठी स्वतःहून प्रयत्न करणे, उपदेश देत फिरणे नव्हे. आणि असे निराकरण करताना तन, मन आणि धनपूर्वक समर्पित भावाने काम करावे लागते. आयुष्यात मिळविलेले सगळे धन या कामासाठी वापरण्याचा सुवर्णाताईंचा निश्चय आहे. आपण काय करणार? या निश्यचाला बळ दिले पाहिजे. आणि प्रकल्प उभारणीसाठी जे अतिरिक्त धन लागेल, त्याची समाजकर्तव्य भावनेने परिपूर्ती केली पाहिजे. या प्रकल्पाची हीच अपेक्षा आपणा सर्वांकडून आहे.